लाँग बीच : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी कॅलिफोर्निया राज्यातील एक प्रमुख बंदर, तसेच महत्त्वाचे औद्योगिक व पर्यटन केंद्र. लोकसंख्या ३,७८,८९४ (१९८४). लॉस अँजेल्स परगण्यातील हे शहर लॉस अँजेल्स शहराच्या मध्यवर्ती भागापासून दक्षिणेस सु. ३२ किमी., पॅसिफिक महासागरातील सॅन पेद्रो उपसागरावर वसले आहे.

अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात येथे अमेरिकन इंडियनांच्या वसाहती होत्या व त्यांचे हे एक व्यापाराचे ठाणे होते. १७८४ मध्ये मॅन्युएल निएटो या स्पॅनिश रँचरला (गुरे पालक) हा भाग वसाहतीसाठी अनुदान म्हणून मिळाला. या प्रदेशात येणारा हा पहिलाच यूरोपीय होय. १८८१ मध्ये युरोपीय वसाहतकऱ्यांपैकी विल्यम ई. विल्मोर याने वसाहतीची योजनाबद्ध आखणी केली व १८८२ मध्ये तिला ‘विल्मोर सिटी’ असे नाव दिले. येथील १३.५ किमी. लांबीच्या पुळणीवरून वसाहतकऱ्यांनी १८८४ मध्ये तिचे ‘लाँग बीच’ असे नामांतर केले. वसाहतीचा झालेला विस्तार व सागरसान्निध्यामुळे पर्यटकांची ये-जा वाढल्याने १८८८ पासून याला एक पर्यटनस्थळ म्हणून महत्त्व आले. १८९७ मध्ये त्याला शहराचा दर्जा देण्यात आला. शहराच्या सिग्नल हिल भागात (सांप्रत उपनगर) १९२१ मध्ये खनिज तेलाचा शोध लागल्यामुळे याचा औद्योगिक केंद्र व बंदर म्हणून झपाट्याने विकास झाला. १९३३ मध्ये भूकंपामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर लाँस अँजेल्सच्या महानगरीय विस्तारामुळे व रस्ते-लोहमार्गांच्या सुविधांमुळे शहराचाही विकास झपाट्याने झाला. सांप्रत याचा लॉस अँजेल्स शहराच्या महानगरीय प्रदेशात (लॉस अँजेल्स-लाँग बीच) समावेश होतो.

खनिज तेल उत्पादन हा शहराच्या परिसरातील प्रमुख उद्योग असून त्याशिवाय विमाने, स्वयंचलित वाहने, जहाजे, क्षेपणास्त्रांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिकी उपकरणे, बांधकाम-साहित्य, नैसर्गिक वायू, अन्नपदार्थ डबाबंदीकरण, धातुकाम, रबर, रसायने इत्यादींचे निर्मितीउद्योग येथे मोठ्या प्रमाणात विकास पावले आहेत. येथे सुकी गोदी आणि आधुनिक प्रकारच्या सर्व बंदरसुविधा उपलब्ध असून हे लॉस अँजेल्स शहराशी सेरीटोस खाडीने जोडलेले आहे. येथे अ.सं.सं.चा एक महत्त्वाचा नाविक तळ असून शहरात लाँग बीच सीटी कॉलेज (स्था. १९२७), कॅलिफोर्निया राज्य विद्यापीठ (१९४९)इ. उच्च शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. येथील पांढऱ्याशुभ्र वाळूची सुंदर पुळण, कच्च्या विटांचे १८४४ मधील ‘रँच हाउस’, बंदर भागातील मानवनिर्मित चार बेटे, सांप्रत सागर संग्रहालय व हॉटेल म्हणून जतन केलेले ‘क्कीन मेरी’ हे १९६७ मध्ये खरेदी करण्यात आलेले ऐतिहासिक ब्रिटिश जहाज, जुने रुग्णालय इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. हाउअर्ड ह्यूझ यांनी प्रायोगिक तत्त्वावर बनविलेले व १९४७ मध्ये एकदा प्रयोग केलेले ‘स्प्रूस गूस’ हे उडते व तरते लाकडी जहाज १९८२ पासून क्कीन मेरीच्या जवळच प्रदर्शनीय म्हणून ठेवण्यात आले आले. 

 चौंडे, मा. ल.