नवसारी: गुजरात राज्याच्या बलसाड जिल्ह्यातील नवसारी तालुक्याचे ठिकाण व मुंबई–अहमदाबाद लोहमार्गावरील स्थानक. लोकसंख्या ७२,९७९ (१९७१). हे सुरतच्या दक्षिणेस २९ किमी. वर पूर्णा नदीकाठी वसले आहे. पर्शियातून परागंदा झालेल्या पारशांनी १९४२ मध्ये येथे आपली पहिली वसाहत स्थापन केली. दादाभाई नवरोजी व जमशेटजी टाटा यांचे हे जन्मग्राम होय. याच्या आसमंतातील ज्वारी, बाजरी, कापूस इत्यादींची ही बाजारपेठ आहे. येथे सुती आणि रेशमी कापड, लाकडावरील नक्षीकाम, तांब्यापितळेची भांडी, कातडी वस्तू, सुगंधी द्रव्ये, साबण, ‘कस्ती’ ही पारशांची जानवी बनविणे इत्यादींचे उद्योग चालतात. पारशांचे आतश बेहराम हे पवित्र अग्निमंदिर, टॉवर ऑफ सायलेन्स, जैनांचे पारसनाथ मंदिर, दर्गे, नसरवानजी टाटांनी मातेच्या स्मृत्यर्थ बांधलेला मनोरा इ. प्रेक्षणीय वास्तू येथे आहेत.

गाडे, ना. स.