ऑस्टिन : अमेरिकेतील संयुक्त संस्थानांपैकी टेक्सस राज्याची राजधानी. लोकसंख्या २,५१,८०८ (१९७०). हे कोलोरॅडो नदीकाठी वसले असून उद्योग, व्यापार व शिक्षण यांचे केंद्र आहे. खाद्यपदार्थ, पेये, यंत्रे, फर्निचर, विटा-कौले व चिनी मातीची भांडी इ. वस्तू येथे होतात. टेक्सस विद्यापीठ, रोमन कॅथलिकांचे सेंट एडवर्ड विद्यापीठ आणि विविध शिक्षणसंस्था येथे आहेत. विख्यात अमेरिकन कथालेखक ओ. हेन्री व प्रसिद्ध मूर्तिशिल्पज्ञ एलीझाबेत नाय यांच्या निवासस्थानी उभारलेली वस्तुसंग्रहालये प्रसिद्ध आहेत. शहराजवळच हवाईतळ व नदीवर जलविद्युत्‌प्रकल्प आहे. बार्टन स्प्रिंग्ज या गरम पाण्याच्या झऱ्यासाठी व शहराच्या सभोवतालच्या सृष्टिसौंदर्याकरिता लोक येथे येतात.

लिमये, दि. ह.