आशिया मायनर: आशिया खंडाच्या पश्चिम टोकावरील द्वीपकल्प. पूर्वेकडील देश या अर्थाने ग्रीकांनी याला ॲनातोलिया नाव दिले व याच नावाने सध्या तो तुर्कस्तानात मोडतो. याच्या उत्तरेस काळा, दक्षिणेस भूमध्य व पश्चिमेस इजीअन समुद्र आहे. काळ्या व इजीअन समुद्रांना जोडणारा मार्मारा समुद्र तसेच बॉस्पोरस व दार्दानेल्स सामुद्रधुन्या यांनी यूरोप व आशिया ही खंडे विभागली आहेत. टायग्रिस-युफ्रेटीस संस्कृतींशी प्राचीन ग्रीक संस्कृतीचा संबंध आशिया मायनरच्या द्वारा होता. इ.स.पू. सहा हजारमध्ये आशिया मायनरच्या दक्षिण भागात सुसंस्कृत जमाती राहत होत्या. त्यानंतर चार हजार वर्षांनी ⇨ बोगाझकई ही हिटाइटांची भरभराटलेली राजधानी आशिया मायनरच्या उत्तर भागात होती. ग्रीकांनी आपल्या अनेक वासाहती आशिया मायनरमध्ये स्थापल्या. बिथिनिया, पाँटस, पॅफ्लागोनिया, गॅलिशिया, फ्रिझिया, मिशिया,लिडिया, कॅपाडोशिया, लायकेओनिया, पँफिलिया, पिसिडिया ही येथील काही महत्त्वाची राज्ये. पर्शियनांच्या उदयामुळे त्यांचे ग्रीकांशी संघर्ष बहुतांशी याच भागात घडले. सिकंदरच्या साम्राज्याचा हा भाग होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर येथे अनेक लहान लहान राज्ये उदयास आली. कालांतराने आशिया मायनर रोमन साम्राज्यास जोडले गेले. तथापि तेथे शांतता नांदू शकली नाही. पर्शियन, अरब, सेल्जुक तुर्क, मोंगल आदींच्या स्वाऱ्या या मुलखावर होतच राहिल्या. धर्मयुद्धाच्या काळात (११–१४ शतक) येथे काही वर्षे ख्रिस्ती राज्येही होती. शेवटी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर पंधराव्या शतकात आशिया मायनर ऑटोमन तुर्कांच्या आधिपत्याखाली गेला.

आशिया मायनर

ओक, .