व्हँकूव्हर : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या महानगर २०,३३,००० (२००० अंदाज), ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मी लोकसंख्या या महानगराची आहे. प्रांताच्या नैर्ऋत्य भागात, जॉर्जिया सामुद्रधुनीच्या बरार्ड उपखाडीवर, व्हँकूव्हर बेटाच्या विरुद्ध बाजूस हे शहर वसले आहे. मॉंट्रिऑल व टोरॉंटोखालोखाल हे कॅनडातील तिसऱ्या क्रमांकाचे महानगर आहे. शहराच्या दक्षिणेस फ्रेझर नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. संयुक्त संस्थानांपैकी वॉशिंग्टन राज्याच्या सरहद्दीपासून उत्तरेस फक्त ४० किमी. अंतरावर व्हँकूव्हर शहर आहे. येथील जानेवारीचे सरासरी तापमान २ अंश से., तर जुलैचे सरासरी तापमान १७ अंश से. असते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७ सेंमी. असून बहुतांश पाऊस नोव्हेंबर ते मार्च यांदरम्यान पडतो.

कॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर याने १७९२ मध्ये बरार्ड उपखाडीचे समन्वेषण केले. १८०८ मध्ये सायमन फ्रेझर याने येथील नदीचे समन्वेषण केले. त्याचेच नाव त्या नदीला देण्यात आले. १८६२ मध्ये काही ब्रिटिश वसाहतकारांनी उपखाडीच्या उत्तर किनाऱ्यावर एक लाकूड कापण्याची गिरणी सुरू केली. परिसरातील लाकडाच्या विपुलतेमुळे येथे अशा गिरण्यांची वाढ होत गेली. त्यामुळे १८७० मध्ये याला ग्रॅनव्हिल हे नाव देण्यात आले. १८८४ मध्ये कॅनडियन पॅसिफिक लोहमार्गाचे पश्चिमेकडील अंतिम स्थानक म्हणून याची निश्चिती करण्यात आली. याच वर्षी कॅप्टन जॉर्ज व्हँकूव्हर याच्या सन्मानार्थ याला व्हँकूव्हर हे नाव देण्यात आले. १८८६ मध्ये याला शहराचा दर्जा देण्यात आला. १८८७ मध्ये पहिली रेल्वे व्हँकूव्हरला आली.

व्हँडकूव्हेरः एक औद्योगिक शहरजहाजबांधणी, मत्स्यप्रक्रिया, साखर-निर्मिती, अन्नप्रक्रिया, मांस हवाबंद डब्यात भरणे, तेलशुद्धीकरण, वस्त्रोद्योग, धातू, लाकूड व लाकूड उत्पादने, कागद व खनिज उत्पादने हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. कॅनडातील ठोक व किरकोळ व्यापाराचे हे सर्वांत मोठे केंद्र असून त्यात सु. १,००,००० कामगार गुंतले आहेत. पॅसिफिक किनाऱ्यावरील वर्षभर खुले असणारे व सर्वाधिक रहदारीचे हे एक नैसर्गिक बंदर आहे. या बंदरातून दरवर्षी ६० मे. टन मालाची चढउतार होते. येथून आशियाई देशांशी मोठा व्यापार चालतो. कॅनडातील पॅसिफिकचे प्रवेशद्वार म्हणूनच व्हँकूव्हर ओळखले जाते. ट्रान्स कॅनडियन लोहमार्गावरील हे पश्चिमेकडील अंतिम स्थानक असून कॅनडातील महामार्ग व हवाई मार्गांचे हे पश्चिमेकडील महत्त्वाचे केंद्र आहे तसेच ट्रमॉंटेन नळमार्गाचेही पश्चिमेकडील अंतिम ठिकाण असून त्याद्वारे एडमंटन येथील तेल पश्चिम किनाऱ्या वर आणले जाते.

किनारी पर्वतश्रेणी व महासागर यांच्या दरम्यान असलेल्या नयनरम्य टेकडीवरील याच्या स्थानामुळे तसेच बंदराचे व बर्फाच्छादित पर्वतश्रेण्यांचे दिसणारे अतिशय सुंदर दृश्य, किनाऱ्यावरील वालुकामय पुळणी, हिरवीगार वनराजी, विविध उद्याने, विविध करमणूक केंद्रे, सहलीची स्थळे, हिवाळ्यातील सौम्य हवामान यांमुळे बारमाही पर्यटनकेंद्र म्हणून व्हँकूव्हरची ख्याती आहे. येथील स्टॅन्ली पार्क (३६४ हे.) विशेष प्रसिद्ध असून त्यात प्राणिसंग्रहालय व अनेक स्थानिक वनस्पतिप्रकार पहावयास मिळतात. याशिवाय शहरातील वेगवेगळ्या खेळांची प्रशस्त मैदाने, विविध सांस्कृतिक केंद्रे, एच. आर. मॅक्मिलन खगोलालय, वस्तुसंग्रहालये, व्हँकूव्हर कलावीथी (१९३१), क्रीडागार (१९८३) इ. विशेष उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ (१९०८), सायमन फ्रेझर विद्यापीठ (१९६५), ब्रिटिश कोलंबिया संशोधन मंडळ व इतर अनेक शैक्षणिक संस्था शहरात आहेत. येथील ७०% लोक कॅनडियन असून त्याखालोखाल मोठा गट ब्रिटिशांचा आहे. त्यांशिवाय चिनी, जर्मन, फ्रेंच, इटालियन, युक्रेनियन, स्कँडिनेव्हियन, पोर्तुगीज, भारतीय व जपानी लोकही आहेत.

चौधरी, वसंत