रत्नागिरी जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी. असून ते राज्याच्या २·७% आहे. लोकसंख्या १३,७९,६५५ (१९८१). ती राज्याच्या २·२% आहे. अक्षवृत्तीय विस्तार १६०३०’ ते १८०४’ उत्तर व रेखावृत्तीय विस्तार ७३०२’ ते ७३०५२’ पूर्व रेखांश यांदरम्यान आहे. जिल्ह्याची उत्तर–दक्षिण लांबी सु. १८० किमी. असून पूर्व–पश्चिम विस्तार सरासरी ६४ किमी. आहे. रत्नागिरी जिल्ह्याची उत्तरेला रायगड जिल्हा, पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा व त्याचप्रमाणे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. सांप्रतच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मिळून पूर्वी रत्नागिरी हा १५ तालुक्यांचा एकच जिल्हा होता परंतु १ मे १९८१ पासून रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांत विभाजन करण्यात आले. उत्तरेस सावित्री नदीपासून दक्षिणेस शुक नदीपर्यंतचा रत्नागिरी जिल्हा व त्याच्या दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत. सर्वांत उत्तरेला मंडणगड तालुका व सर्वांत दक्षिणेला राजापूर तालुका आहे. क्षेत्रफळाने संगमेश्वर तालुका हा सर्वांत मोठा, तर मंडणगड तालुका सर्वांत लहान आहे. जिल्ह्यात एकूण १,३९२ खेड्यांचा समावेश होतो त्यांपैकी चार ओसाड खेडी आहेत. रत्नागिरी (लोकसंख्या ४७,०३६–१९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

भूवर्णन : प्राकृतिक दृष्ट्या रत्नागिरी जिल्ह्याचे तीन विभाग पडतात : (१) सह्याद्री, (२) वलाटी किंवा पठारी प्रदेश, (३) खलाटी किंवा किनारपट्टीचा प्रदेश. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या रांगा असून हा संपूर्ण प्रदेश चढउतारांनी युक्त्त आहे. डोंगराळ प्रदेशाने जिल्ह्याची ८५% भूमी व्यापलेली आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उंच व दुर्गम कडे आहेत. पर्वतरांगांदरम्यानच्या भागात खोल दऱ्या आहेत. दऱ्याखोऱ्यांच्या दक्षिणोत्तर लांबचलांब पसरलेल्या या पट्ट्यालाच ‘सह्याद्री पट्टा’ किंवा ‘बांद्री पट्टा’ असे म्हणतात. सह्याद्रीच्या उंच शिखरांवर पूर्वी बांधलेले महिपतगड, सुभानगड, भैरवगड, प्रचितगड यांसारखे गड आहेत. प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. या प्रदेशात भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात उतारावरून पाणलोट वाहतात व नद्यांना जाऊन मिळतात. प्रदेशात जंगले खूप असून लोकसंख्या विरळ आहे. कशेडी, कुंभार्ली व आंबा हे या विभागातील प्रमुख घाट असून त्यांमधून अनुक्रमे रायगड, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांशी दळणवळण चालते.

डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी जो काहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात. या पट्टीत काळी व तांबडी जमीन तसेच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत. भात हे या भागातील मुख्य पीक आहे. वलाटीच्या पश्चिमेला जो किनारपट्टीचा प्रदेश आहे त्यालाच ‘खलाटी’ असे म्हणतात. किनारपट्टीवरील जमीन रेतीमिश्रित असून तीत प्रामुख्याने नारळाची लागवड केलेली आढळते. जिल्ह्यातील बरीचशी लोकसंख्या याच प्रदेशात केंद्रित झालेली आहे. समुद्राच्या कडेला ज्या ठिकाणी डोंगरासारखे उंच भाग आहेत, तेथे किल्ले बांधलेले दिसतात. सुवर्णदुर्ग, जयगड, रत्नदुर्ग, पूर्णगड, गोपाळगड हे अशा प्रकारचे किल्ले आहेत. रत्नदुर्ग व जयगड येथील दीपगृहे महत्त्वाची आहेत.

जिल्ह्यात जांभ्या मृदेचे प्रमाण अधिक आहे. ऑक्सिडीकरण क्रियेच्या प्रमाणानुसार या मृदेचा रंग गर्द लाल ते तपकिरी लाल आढळतो. जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे या जमिनीची धूप दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे काही ठिकाणी खडक उघडे पडले आहेत, तर काही ठिकाणी जमिनीची जाडी अगदी काही सेंमी.पर्यंत आढळते. या मृदा अम्लयुक्त्त आहेत. त्यांच्यामध्ये चुनखडीचे प्रमाण फारच कमी, तर सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण बरेच असते. खाड्यांतील पाणी काही ठिकाणी तीर ओलांडून आजूबाजूच्या भागात पसरून तेथे खारजमीन तयार झालेली दिसते. वलाटीच्या भागात काही ठिकाणी काळी कसदार जमीन आढळते. जमिनीच्या सुपीकतेवरून जिल्ह्यातील मृदेचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात : (१) साधारण ओलावा धरून ठेवणारी जमीन की, जेथे भाताचे पीक घेण्यात येते. (२) किनाऱ्यालगतची जमीन जेथे नारळाच्या व सुपारीच्या बागा आहेत. (३) डोंगरउताराची वरकस जमीन जेथे काजू, आंबा यांसारख्या फळांचे व नाचणीचे पीक घेतले जाते. (४) क्षारयुक्त्त जमीन जी कृषी उत्पादनासाठी योग्य नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात बॉक्साइट, चिनी माती, डोलोमाइट, मँगॅनीज, सिलिका, क्रोमाइट व इल्मेनाइट हे खनिज पदार्थ मिळतात. जिल्ह्यात जांभा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. जांभा दगड कापून त्याच्या चौकोनी विटा काढतात. त्यांचा बांधकामासाठी उपयोग केला जातो. काळीथर हा दगड डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सापडत असून, त्या दगडापासून मोठमोठे खांब व खडी तयार केली जाते. त्याशिवाय कुरुंदाचा दगडही येथे मिळतो. मालगुंड, तिवरे, पूर्णगड या भागांत इल्मेनाइट खनिज मिळते. राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावाच्या आसपास सिलिकायुक्त्त वाळू अधिक मिळते. काच तयार करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. दापोली, मंडणगड या तालुक्यांतून बॉक्साइट मिळते. राजापूर, दापोली व चिपळूण तालुक्यांत चिकणमाती मिळते. तिचा उपयोग मंगलोरी कौले, विटा, फरशा व भांडी तयार करण्याकरिता होतो.

नद्या : जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेत उगम पावून पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात. त्यांची लांबी ६५ किमी. पेक्षा अधिक नाही. शास्त्री, वाशिष्ठी, अंबा, जगबुडी, नळकडी, मुचकुंदी, जोग, काजळी व शुक (वाघोटन) या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात तीव्र उतारामुळे नद्या वेगाने वाहतात. पुढे वलाटी व खलाटीच्या प्रदेशांत त्यांना इतर प्रवाह मिळून त्यांचा आकार वाढतो. जिल्ह्यातील नद्यांना पावसाळ्यात पूर येतात, तर उन्हाळ्यात बहुतेक नद्या कोरड्या पडतात. फक्त्त वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते, कारण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर पोफळी (रत्नागिरी) येथे वीज तयार केल्यानंतर ते पाणी पुढे वाशिष्ठी नदीत सोडले जाते. त्या पाण्याचा उपयोग पुढे वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील शेतीसाठी केला जातो. हीच जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाची नदी आहे. सह्याद्रीच्या तिवरे भागात तिचा उगम होतो. तिची लांबी सु. ४८ किमी. असून समुद्रकिनाऱ्यापासून ४० किमी. पर्यंत या नदीतून वाहतूक केली जाते. उत्तरेकडील जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी असून तिचा उगम सह्याद्रीतील हटलोट खिंडीजवळ होतो. वाशिष्ठीच्या दक्षिणेस शास्त्री नदी (लांबी सु. ६४ किमी.) असून ती प्रचितगडाजवळ उगम पावते. अगदी उत्तरेस रत्नागिरी–रायगड सरहद्दीवरून वाहणारी सावित्री नदी महाबळेश्वरच्या डोंगरात उगम पावते. नदीच्या मुखाकडील प्रवाहात सु. ५८ किमी.पर्यंत म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत लहानलहान जहाजांची वाहतूक होऊ शकते. मोठी जहाजे मात्र मुखापासून आत सु. ३८ किमी. मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळपर्यंतच येऊ शकतात. जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्या व खाड्या भरतीचे पाणी घेणाऱ्या आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने नद्यांचे मुखाकडील प्रवाह फार उपयुक्त्त आहेत. नद्यांच्या दोन्ही तीरांवर काही प्रमाणात सुपीक जमिनी असून त्या शेतीसाठी महत्त्वाच्या आहेत. अरबी समुद्रकिनाऱ्यावरील बाणकोट, केळशी, दाभोळ, जयगड, भाट्ये, पूर्णगड, जैतापूर या खाड्या विशेष प्रसिद्ध आहेत.

हवामान : समुद्रसान्निध्य लाभल्याकारणाने हवामान उष्ण, दमट व सम प्रकारचे असते. मे महिना सर्वाधिक तापमानाचा, तर जानेवारी महिना किमान तापमानाचा असतो. मोसमी हवामान असल्याने जिल्ह्यात तीन ऋतू स्पष्टपणे दिसून येतात. हिवाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान २८0 से. व किमान तापमान २०0 से., तर उन्हाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान ३०0 ते ३३0 से. व किमान तापमान २१0 ते २६0 असते. उंचीमुळे सह्याद्रिपट्टीतील हवामान थंड असते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर तापमानाची तीव्रता कमी होते. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे चार महिने पावसाळा ऋतू असून या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जुलै महिन्यात सर्वांत जास्त पाऊस पडत असून तो वार्षिक पर्जन्यमानाच्या सु. एक-तृतीयांश असतो. पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे सह्याद्री पर्वताकडे वाढत जाते. घाटमाथ्यावर पर्जन्य सर्वाधिक पडतो. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३३० सेंमी. आहे. हवेतील आर्द्रता ५० टक्क्यांपेक्षा कमी क्वचितच असते.

वनस्पती व प्राणी : जिल्ह्यातील ४९·६१ चौ. किमी. क्षेत्र म्हणजेच जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या १·२२% क्षेत्र अरण्यांखाली आहे. त्यापैकी ११·२९ चौ. किमी क्षेत्रातील अरण्ये राखीव आहेत. बहुतेक क्षेत्र वनखात्याच्या अधिकाराखालील आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या सह्याद्रिपट्टीत मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजे, राजापूर या तालुक्यांत जंगलांचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहेत. त्याच्या पश्चिमेला पानझडी वृक्ष दिसून येतात. जंगलांमध्ये साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इ. महत्त्वाच्या वृक्षांच्या जाती आहेत. जंगलांतून लाकडाचे उत्पादन मिळविले जाते. त्याशिवाय मध, मेण, डिंक, कात, लाख, रंग, औषधी वनस्पती, कातडी कमावण्यासाठी लागणारे पदार्थ अशी दुय्यम उत्पादनेही जंगलांतून मिळतात. अलीकडे रबराच्या झाडांची लागवडही करण्यात आलेली आहे. जंगलांत वाघ, लांडगा, सांबर, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण इ. प्राणी दिसून येतात.

आर्थिक स्थिती : कच्च्या मालाचा तुटवडा, लोहमार्ग व हवाईमार्ग यांसारख्या दळणवळण साधनांचा अभाव व प्रशिक्षित कामगार पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यामुळे जिल्ह्याची औद्योगिक प्रगती फारच अल्प झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील जे अविकसित जिल्हे आहेत, त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होतो. हा मागासलेपणा घालविण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासनांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. येथे कारखाने सुरू करणाऱ्या कारखानदारांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या १५% अनुदान व पाणी, जमीन, वीज यांसारख्या इतर सवलती जाहीर केल्या आहेत. उत्पादित मालावरील विक्रीकरातही सूट दिली जाते. प्रशिक्षित कामगार उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतने व औद्योगिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. मागासलेल्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने एकात्मिक क्षेत्र विकास हा युनिसेफपुरस्कृत कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमतः केवळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत १९८१ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत माता-बाल कल्याण, सकस आहार, आरोग्य, सामुदायिक स्वच्छता, शिक्षण, रोजगार व आर्थिक विकास प्रशिक्षण आणि संस्थाविकास या प्रमुख योजना राबविल्या जातात. शेती हा या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून सु. ७०% लोकसंख्या याच व्यवसायावर अवलंबून आहे. फळबागा व मच्छिमारी या दोन व्यवसायांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. विशिष्ट प्राकृतिक रचनेचा परिणाम म्हणून एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी लागवडयोग्य क्षेत्र फार कमी (सु. ३०%) आहे. जलसिंचनाच्या सुविधा अत्यंत अपुऱ्या असून बहुतांशी शेती मोसमी पर्जन्यावर आधारित आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी केवळ २% क्षेत्रच ओलिताखाली होते (१९८३-८४). एकूण ३,७८३ हे. एवढ्या जलसिंचित क्षेत्रापैकी १,३५२ हे. क्षेत्राला विहिरींद्वारे जलसिंचन केले जाते. खेड तालुक्यातील कसबा नातू या गावाजवळ मध्यम स्वरूपाचा जलसिंचन प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे १,३७० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांतर्गत लाभ होणारी बहुतेक सर्व जमीन खेड तालुक्यामधीलच आहे.

भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हलक्या जमिनींमध्ये नाचणी, वरी, तीळ इ. खरीप पिके घेतली जातात. रत्नागिरी-२४, जया, सोना, पंकज अशा भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातीही लावल्या जातात. यांशिवाय कोळंबा, पटणी, भडस, वरंगळ या प्रकारच्या भातांचीही लागवड केली जाते. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. दापोली येथील कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व खेड तालुक्यांत भाताच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. रब्बी हंगामात वाल, कुळीथ, मूग, पावटा, उडीद, चवळी यांसारखी पिके घेतली जातात. थोडीबहुत मिरचीची लागवड केली जाते. आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ, सुपारी इ. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हापूस आंबा प्रसिद्ध असून तो परदेशांतही पाठवला जातो. डोंगरउतारावरील तांबड्या जमिनीत व खाऱ्या हवेत हापूस आंब्याचे उत्पादन चांगले मिळते. हापूसशिवाय पायरी, माणकुर या जातीच्या आंब्यांचीही लागवड केली जाते. रायवळ आंब्याचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. आंब्यापासून लोणची, मुरांबे, आंबा पोळी, आंबावडी इ. पदार्थ तयार करण्याचा तसेच आंब्याचा रस काढून तो हवाबंद डब्यात भरण्याचा (कॅनिंगचा) व्यवसाय चालतो. आंब्यासाठी लागणारी लाकडी खोकी व बांबूच्या करंड्या तयार करणे हा पूरक व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. रातांबीच्या झाडाला येणाऱ्या फळांना कोकम म्हणतात. कोकम फळापासून मिळणारी उत्पादनेही घेतली जातात. नारळ हे किनारी प्रदेशातील प्रमुख उत्पादन आहे. रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूण तालुक्यांमध्ये नारळाखालील क्षेत्र अधिक आहे. नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे, नारळ व नारळाच्या झाडापासून काथ्या, ब्रश, दोरखंडे, पायपुसणी, पिशव्या, केरसुण्या इ. वेगवेगळ्या उपयुक्त वस्तू तसेच शोभेच्या वस्तू बनविण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. त्याचप्रमाणे माडाच्या झाडापासून नीरा मिळविली जाते. माडाच्या कमी उंचीच्या व जास्त नारळ देणाऱ्या नवीन जाती शोधून काढण्यासाठी रत्नागिरीजवळील, भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. बाणोली, सिंगापुरी, टी. डी. अशा माडाच्या नवीन जातींची लागवड करण्यात येते. गुहागरी नारळ विशेष प्रसिद्ध मानला जातो, कारण त्याची चव चांगली असते. जिल्ह्यात पोफळीच्या भरपूर बागा पहावयास मिळतात. गुहागर, राजापूर, रत्नागिरी, दापोली व मंडणगड तालुक्यांत पोफळीची मोठाली आगरे आहेत. त्यांपासून सुपारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. फणस हे तर जिल्ह्याचे वैशिष्ट्यच आहे. फणसाचे गरे वाळविणे, फणस पोळी तयार करणे हे त्यांवर आधारित व्यवसाय चालतात. येथील काजूला परदेशांतही मोठी मागणी असते. काजूचे गर काढणे, ते हवाबंद डब्यात भरणे, बाजारपेठेत पाठविणे हे व्यवसाय मुख्यतः रत्नागिरी तालुक्यात शिरगाव व खेडशी येथे अधिक चालतात. देवरूखजवळील सडवली येथे गुच्छ गवताची (सिट्रोनेला ग्रास) लागवड केलेली आहे. त्या गवतापासून तेल काढतात. हे तेल अत्तर, उदबत्ती, साबण इ. सुगंधी वस्तू बनविण्यासाठी उपयोगी पडते. बहुतेक ठिकाणी पोफळीच्या व काही ठिकाणी आंब्यांच्या झाडांवर पानवेली चढविलेल्या असतात. तसेच काही ठिकाणी पोफळीच्या झाडांवर मिरवेली दिसतात. त्यांपासून ‘मिरी’ उत्पादन घेतले जाते.

रत्नागिरी जिल्ह्याला सु. १६७ किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीच्या प्रदेशातील दालदी, खारवी, भंडारी, गाबीत व कोळी हे लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. सप्टेंबर ते मेपर्यंत मासेमारीचा व्यवसाय चालतो. खाडीमध्ये मात्र बाराही महिने मासळी पकडता येते. किनारपट्टीवर रापण, पाग, गरी (जाळे, काठी, दोर) इ. साधनांच्याद्वारे मासेमारी केली जाते. अधिक खोल समुद्रात यांत्रिक होड्यांच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. समुद्रात पकडलेले मासे जिल्ह्यात ४९ बंदरांवर उतरविण्याची सुविधा उपलब्ध आहे. अरबी समुद्रात सुरमई, बांगडा, कर्ली, रावस, पापलेट, पेडवे, रेणवे, कोळंबी इ. जातींची मासळी मिळते. जिल्ह्याच्या लगतच्या समुद्रात कोळंबी मोठ्या प्रमाणावर सापडते. कोळंबीची निर्यातही मोठ्या प्रमाणावर केली जाते. कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे तसेच ती हवाबंद करण्याचे जिल्ह्यात पाच कारखाने आहेत. १९८४-८५ मध्ये कोळंबीचे ५,१५३ मे. टन उत्पादन झाले व किंमतीपोटी ६·१२ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. १९८२-८३ ते १९८४-८५ या काळात माशांच्या विक्रीपासून ३४·६९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. कालव प्रकारची कवच असलेली मासळी हर्णै, जैतापूर व रत्नागिरी येथे मिळते. कोळंबीची पैदासकेंद्रे कोंकण कृषी विद्यापीठाने चालविली आहेत. रत्नागिरी येथे मत्स्य संशोधन केंद्र व मासेमारीचे शिक्षण देणारे विद्यालय सुरू करण्यात आलेले आहे. खाण्यासाठी उपयोगी नसलेल्या मासळीपासून खत तयार केले जाते. राजापूर तालुक्यातील नाटे येथे माशांची भुकटी तयार करण्याचा उद्योग आहे. ती भुकटी खतासाठी वापरली जाते. काही मासळी वाळवून किंवा खारवून ठेवली जाते. सर्वसामान्यपणे एकूण पकडलेल्या माशांपैकी १८% वाळविले जातात, १०% खारविले जातात, तर उरलेल्या ७२% ताज्या माशांपैकी ७०% मासे लगतच्या पुणे, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यांत आणि मुंबई शहरात पाठविले जातात व बाकीच्या माशांची जिल्ह्यातच विक्री केली जाते. किनारपट्टीवर मीठ तयार करण्याचा व्यवसायही महत्त्वाचा आहे.

औद्योगिक दृष्ट्याही हा जिल्हा मागासलेला आहे. जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत कारखान्यांची संख्या ९८ आहे. ती राज्यातील एकूण कारखान्यांच्या ०·५% आहे. त्यांमधील कामगारांची संख्या ३,२२२ आहे. ही संख्या राज्यातील कामगार संख्येच्या ०·३% आहे. यावरून जिल्ह्याचा औद्योगिक मागासलेपणा लक्षात येतो. जिल्ह्यात चिपळूणजवळील खेर्डी, खेडमधील लोट्याचा माळ व रत्नागिरीजवळील मिरजोळे येथे औद्योगिक वसाहती आहेत. येथील कारखान्यांना कोयना जलविद्युत्‌ प्रकल्पामधून वीज पुरवठा केला जातो. चिपळूणजवळ अगंज पोलादाची भांडी, कागद, पुठ्ठा, ॲल्युमिनियमची भांडी व रंगीबेरंगी फरश्या बनविण्याचे उद्योग चालतात. रत्नागिरीजवळ सिमेंट, सिमेंटच्या वस्तू, लोखंडी खिडक्या, दरवाजे, पोलादी वस्तू, होड्या बांधणे असे उद्योग चालतात. चिपळूण तालुक्यातील खेर्डी व पेढांबे येथे काजूच्या बोंडांपासून फेणी हे मद्य तयार करणे, चिपळूण व दापोली तालुक्यांतील आंजर्ले येथे औषधे तयार करणे, रत्नागिरी तालुक्यात पाली, बसणी व खेडशी येथे साबण तयार करणे, पाडगाव, देवरुख व लांजे येथे मातीची भांडी राजापूर तालुक्यातील आडिवरे, दापोली तालुक्यातील गव्हे व चिपळूण येथे कौले तयार करणे इ. उद्योग चालतात. रत्नागिरी येथे शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय मोठा आहे. कृषी उत्पादनावर आधारित बरेच उद्योगधंदे जिल्ह्यात आहेत. भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या हे व्यवसायही महत्त्वाचे आहेत. रत्नागिरी, चिपळूण व संगमेश्वर येथे शेतमालाच्या प्रमुख बाजारपेठा आहेत. रत्नागिरी तालुक्यातील रनपार (रंदपार)-पावस यांदरम्यान ‘स्वरूपानंद शिपबिल्डिंग अँड शिप रिपेअर यार्ड लिमिटेड’ हा जहाजबांधणी व दुरुस्ती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ३५० कोटी रुपये असून त्यात किमान तीन हजार स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा तंत्रज्ञवर्ग तयार करण्यासाठी एक प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कोकणचा औद्योगिक कायापालट होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात लोहमार्ग अजिबात नाहीत. जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणातील ही महत्त्वाची समस्या आहे. मुंबई–कोकण–गोवा हा १७ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. जिल्ह्यात एकूण २,९६६ किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. त्यांपैकी सिमेंट काँक्रीट व डांबराचे १,२०८ किमी. व खडीचे रस्ते १,७५८ किमी. आहेत. कच्च्या रस्त्यांची एकूण लांबी १,४२५ किमी. होती (१९८४-८५). चिपळूणहून कुंभार्ली घाटातून कराडला रत्नागिरीहून आंबा घाटातून कोल्हापूरला रस्ता जातो. रत्नागिरी येथे विमानतळ आहे. जिल्ह्यात बाणकोट, हर्णै, दाभोळ, गुहागर, पालशेत, बोरया, जयगड, तिवरे, रत्नागिरी (भगवती बंदर), रनपार (रंदपार), पूर्णगड, मुसाकाजी अशी लहानमोठी बंदरे अरबी समुद्रकिनाऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथील बंदराचा अधिक विकास करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५८७ गावांमध्ये एकूण ६१३ डाक कार्यालये आहेत. त्यांशिवाय ५२ दूरध्वनी कार्यालये, २,१८७ दूरध्वनी संच व १८,१८५ रेडिओ संच होते (१९८१-८२). रत्नागिरी शहरात एक आकाशवाणी केंद्र आणि एक लघुशक्त्तिशाली दूरदर्शन केंद्रही आहे. जिल्ह्यातून तीन दैनिके, पाच साप्ताहिके, एक पाक्षिक व एक मासिक प्रकाशित होत होते (१९८२).

लोक व समाजजीवन : रत्नागिरी जिल्ह्याची १९८१ साली एकूण लोकसंख्या १३,७९,६५५ असून तीपैकी ६,११,०२९ पुरुष आणि ७,६८,६२६ स्त्रिया होत्या. शहरी लोकसंख्येचे प्रमाण केवळ १०·५% होते. समुद्रकिनाऱ्यालगतच्या खेडेगावांमध्ये मच्छीमारी करणाऱ्या लोकांची वस्ती आहे. लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी.स १६७ आहे. सर्वांत कमी घनता लांजे तालुक्यात (दर चौ. किमी.स १३१) आणि सर्वाधिक घनता रत्नागिरी तालुक्यात (दर चौ. किमी.स २२८) होती (१९८१). खेडेगावांतील घरे उतरत्या छपरांची दिसून येतात. जिल्ह्यातील ७३३ गावांचे विद्युतीकरण झालेले होते (१९८१-८२). येथील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीबरोबरच कुक्कुटपालन व पशुपालन हे जोडव्यवसाय केले जातात. भात, नाचणी अथवा तांदळाची भाकरी, भाजी आणि मासे हे लोकांचे मुख्य अन्न आहे. जेवणामध्ये कोकमचे सार घेण्याची पद्धत आहे. तांदूळ, गहू व खोबरे यांची पक्वान्ने बनवितात. जिल्ह्यात औद्योगिकीकरण कमी प्रमाणात झालेले आहे तसेच शेतीयोग्य जमीन थोडी असल्याने शेतीमधील उत्पन्न वर्षभर पुरत नाही म्हणून घरातील तरुण वर्ग मुंबईला नोकरी करतो. रोजगारासाठी मुंबईकडे लोकसंख्येचे, विशेषतः पुरुषांचे, सातत्याने स्थलांतर घडून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे. दर हजार पुरुषांमागे १,२५९ स्त्रिया असे जिल्ह्यातील प्रमाण होते (१९८४-८५). त्यामुळे जिल्ह्यातील लोकसंख्यावाढीचा वेगही कमी आहे. गेल्या तीन दशकांतील लोकसंख्यावाढीचा वेग अनुक्रमे ६.५२% (१९५१–६१), ११·५६% (१९६१–७१) व ७.८९% (१९७१–८१) असा होता, तोच वेग महाराष्ट्राच्या बाबतीत अनुक्रमे २३·६६%, २७·४५% व २४·४०% असा होता. १९७१-८१ या दशकात राज्याच्या लोकसंख्यावाढीच्या दरापेक्षा हा दर जवळजवळ १७ टक्क्यांनी कमी होता. साक्षरतेचे प्रमाण ४३·९% होते (१९८१). गौरी-गणपती व शिमगा हे प्रमुख सण असून त्यावेळी मुंबईहून चाकरमानी आपापल्या घरी आवर्जून येतात. गौरी-गणपतीच्या सणाला भजने-फुगड्या यांचा कार्यक्रम, तर शिमग्याच्या वेळी पालखी नाचविण्याचा कार्यक्रम चालतो. कोळी लोक नारळी पौर्णिमेचा सण आनंदाने साजरा करतात. जिल्ह्यात सहा कायम चित्रपटगृहे व पाच फिरती चित्रपटगृहे आहेत (१९८४-८५). डोंगराळ प्रदेशात धनगर राहत असून ते शेतीही करतात. याच भागात कातकरी राहतात. कातकरी मध गोळा करणे, शिकार करणे यांसारखे व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. रत्नागिरी जिल्ह्यात मुसलमानांची संख्याही बरीच आहे. बरेच मुसलमान आखाती देशांत नोकऱ्यांसाठी जातात. जिल्ह्यात अनुसूचित जाति-जमातींचेही लोक आहेत.

मुंबई शहराशी सतत संबंध असल्याने येथील लोकांच्या राहणीमानात फरक पडू लागला आहे. जिल्ह्यात एकूण २,४१३ प्राथमिक शाळा, १६३ माध्यमिक शाळा, २० उच्च माध्यमिक विद्यालये, कला विज्ञान व वाणिज्य शाखांची चार महाविद्यालये होती (१९८४-८५). दापोली येथे कोंकण कृषी विद्यापीठ आहे. इतर महाविद्यालये मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहेत. रत्नागिरी येथे शासकीय तंत्रनिकेतन आहे. जिल्ह्यात एकूण ९ रुग्णालये, ८ दवाखाने, ६४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ प्रसूतिगृहे, १४१ डॉक्टर, २७१ परिचारिका आणि ८६५ खाटा यांची व्यवस्था आहे (१९८४).

महत्त्वाची स्थळे : पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंचउंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहानमोठ्या दऱ्या आणि त्यांमध्ये दूरवर पसरलेले समुद्र खाड्यांचे पाणी, हिरवीगार दाट वनश्री, नारळी-पोफळीच्या बागा अशा निसर्गरम्य देखाव्यांनी रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे. पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक रमणीय स्थळे जिल्ह्यात ठिकठिकाणी आढळत असल्याने ती पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक जिल्ह्यात येतात.

रत्नागिरी, चिपळूण (लोकसंख्या–२७,२४०–१९८१), खेड (१०,२१६), राजापूर (८,८८४), दापोली (७,८२७), दाभोळ (६,३६३), पोफळी (४,८१७), हर्णै (४,७०३) ही जिल्ह्यातील महत्त्वाची नगरे व गावे आहेत. चिपळूणजवळील परशुराम मंदिर, राजापूरजवळील धूतपापेश्वर, देवरुखजवळील मारळेश्वर, रत्नागिरीजवळील गणपतिपुळे, संगमेश्वरजवळील कर्णेश्वर ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. गणपतिपुळे हे पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. संगमेश्वरजवळच संभाजी महाराजांना मोगलांनी पकडले होते. तेथे संभाजी महाराजांचे एक स्मारक उभारण्याची योजना आहे. पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे. राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, आरवले, दापोली तालुक्यातील उन्हावरे येथे गरम पाण्याचे झरे आहेत. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांपैकी रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग, जयगड व पूर्णगड, चिपळूण तालुक्यातील गोवळकोट, दापोली तालुक्यातील दाभोळच्या खाडीजवळील गोपाळगड व हर्णै येथील समुद्रात एका खडकाळ बेटावर बांधलेला सुवर्णदुर्ग, खेड तालुक्यातील पालगड, महिपतगड, रसाळगड, सुमारगड इ. किल्ले उल्लेखनीय आहेत. दापोली तालुक्यातील पन्हाळे काजी गावाजवळच्या एका टेकडीवर कोरीव लेणी सापडली आहेत. लोकमान्य टिळक, नामदार गोखले, अण्णसाहेब कर्वे, कवी केशवसुत, रँग्लर परांजपे, अप्पासाहेब पटवर्धन यांसारख्या थोर व्यक्त्ती रत्नागिरी जिल्ह्यानेच देशाला दिल्या आणि म्हणूनच या जिल्ह्याला ‘नररत्नांची खाण’ असे म्हटले जाते.

लेखक : पटवर्धन, मधुसूदन; चौधरी, वसंत

 

परशुराम मंदिरातील परशुराम (मध्यभागी), त्याच्या उजवीकडे काळ व डावीकडे काम यांच्या मूर्ती, चिपळून.
ब्रह्मदेशाचा पदच्युत राजा थिबा याचा राजवाडा, रत्नागिरी.
कृशी संशोधन केंद्रातील संकरित भात शेती, शिरगाव.
भगवती बंदर, रत्नागिरी.

KH - 14 - P - 8 - 1