धावडशी : सातारा जिल्हातील एक धार्मिक ठिकाण. सातारच्या वायव्येस सु. १० किमी. वरील मेरुलिंग डोंगरांच्या पायथ्याशी वनश्रीने नटलेले एक खेडेगाव. लोकसंख्या १,१२७ (१९७१). येथे ब्रह्मेंद्रस्वामी उर्फ भार्गवराम यांची समाधी आणि मठ आहे. हे स्वामी वाई तालुक्यातील विरमाडे येथे समाधिस्त झाले होते परंतु आपली समाधी धावडशी येथे असावी,  अशी इच्छा त्यांनी पूर्वीच दर्शविलेली असल्याने धावडशी येथे त्यांची समाधी बांधून तेथे देऊळ बांधण्यात आले. या स्वामींचा व त्या वेळच्या (पूर्व पेशवाईतील) प्रमुख मराठी मुत्सद्यांचा गुरुशिष्यसंबंध असे. छत्रपती शाहू महाराज आणि पहिले तीन पेशवे हे या स्वामींचे शिष्य होते. या ठिकाणी असलेले स्वामींचे देऊळ व संगमरवरी पुतळा, गुहा आणि दोन तलाव तसेच जवळच असलेले शिवमंदिर मेरुलिंग विशेष उल्लेखनीय आहेत. येथील देवळात एक शिलालेख आहे. दरवर्षी श्रावण शु. प्रतिपदा ते नवमीपर्यंत येथे यात्रा भरते.

चौधरी, वसंत