सेंट जॉन्स बंदराचे दृश्य

सेंट जॉन्स : वेस्ट इंडीज द्वीपसमूहातील लीवर्ड बेटांपैकी अँटिग्वा व बारबूडा देशाची राजधानी आणि कॅरिबियन समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ४३,३८० (२००७). हे अँटिग्वा बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर वसलेले आहे. ब्रिटिशांनी १६३२ मध्ये येथे वसाहत स्थापन केली. फ्रेंचांचा १६६६-६७ हा कालावधी वगळता सेंट जॉन्स हे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होते. अठराव्या शतकात वेस्ट इंडीजमधील रॉयल नेव्हीचे मुख्यालय येथे होते. १६९० व १८४३ चे भूकंप, १७६९ मध्ये लागलेल्या आगी व १८४७ मधील हरिकेन वादळ यांमुळे या शहराचे अतोनात नुकसान झाले होते. या बेटांवर नैसर्गिक खोल सागरी बंदर नसल्यामुळे येथे १९६८ मध्ये सेंट जॉन्स बंदराची खोली वाढवून तेथे अनेक बंदर सुविधा निर्माण करण्यात आल्या. हे शहर देशाचे प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर आहे. येथून मुख्यत्वे साखर, कापूस, यंत्रसामग्री व अन्नपदार्थ यांचा व्यापार चालतो. शहराच्या ईशान्येस १० किमी.वर व्ही. सी. बर्ड हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे देशातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून येथील सागरी वस्तूंचे संग्रहालय, अँग्लिकन कॅथीड्रल, फोर्ट जेम्स, ब्रिटिश गव्हर्नरचे जुने निवासस्थान, सर व्हिव्हियन रिचर्ड्स प्रेक्षागार, अँटिग्वा व बारबूडा संग्रहालय, वनस्पतिउद्यान, दीपगृह ही पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.