कृषिमहाविद्यालय, परभणीपरभणी शहर: महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागातील परभणी जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ६१,५७० (१९७१). मराठवाड्यातील गोदावरीच्या सखल भागात दुधना व पूर्णा नद्यांच्या संगमाच्या नैर्ऋत्येस १३ किमी.वर वसले असून ते मनमाड–काचीगुडा या लोहमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे प्रस्थानक आहे. परभणी–परळी वैजनाथ हा रुंद मापी रेल्वेफाटाही येथूनच सुरू होतो. या शहरात प्रभावती देवीचे एक पुरातन मंदिर होते व त्यावरून शहराला ‘परभणी’ हे नाव पडले असावे. खल्‍जी आक्रमणांत मंदिराचे ‘रोशन खान गढी’ या मशिदीत रूपांतर करण्यात आले. १९४३ पासून या शहराला नगरपालिका आहे. येथील उन्हाळे व हिवाळे तीव्र असतात आणि सर्वसाधारणपणे जानेवारी ते एप्रिल हा काळ हवामानदृष्ट्या सुखदायक असतो. पाऊस सु. ८० सेंमी. पडतो. शहरात सर्वत्र विहिरी असून त्यांपासूनच मुख्यत्वे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शिवाय नगरपालिकेने दुधना नदीवरून नळाने पाणी आणून शहरास पुरविले आहे. येथील बाजारपेठेत शहराच्या परिसरातून कापूस, ज्वारी, डाळी, मिरची, भाजीपाला या वस्तू येतात. येथे एक डाळगिरणी, सरकी काढण्याच्या व गठ्टे बांधण्याच्या ५ गिरण्या आणि ८ खाद्यतेल गिरण्या आहेत. शहरात हवामान खात्याची वेधशाळा असून जिल्हापातळीवरील सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, जिल्हा रुग्णालय आणि क्षयरोगोपचार केंद्र इ. सोयी आहेत. येथे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाची सोय असून कृषिमहाविद्यालयही आहे. परभणी येथे आकाशवाणीचे एक उपकेंद्र आहे. एक हिंदी व तीन मराठी अशी चार साप्ताहिके येथून प्रसिद्ध होतात. शहरात धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे भरपूर असून त्यांत शिवाजी उद्यान, बालाजी, बाळाजी बैरागी, बेलेश्वर, जबरेश्वर, पार्श्वनाथ इत्यादींची मंदिरे व खादिम जामे, रोशन खान गढी या मशिदी प्रसिद्ध आहेत. येथून ३ किमी. वर हजरत सय्यद शाह तुराबत-हक यांचा दर्गा असून दरवर्षी (३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी) येथे मोठा उरुस भरतो. विशेष म्हणजे या दर्ग्याचे पुजारी व विश्वस्त हिंदू आहेत. परभणी हे मराठवाड्यातील एक वर्धमान शहर आहे.

पाठक, सु. पुं. आठल्ये, द. बा.