लिबिया : (सोशालिस्ट पीपल्स लिबियन अरब जामहिरीअ). उत्तर आफ्रिकेतील एक स्वतंत्र अरब मुस्लिम राष्ट्र. क्षेत्रफळ १७, ५९, ५४० चौ. किमी. लोकसंख्या ४०,८०, ००० (१९८९). अक्षवृत्तीय विस्तार १९° ते ३०’ ते ३३°उत्तर व रेखावृत्तीय विस्तार ९°३०’ ते २५°पू. यांदरम्यान आहे. पूर्व-पश्चिम लांबी १,४४० किमी., दक्षिणोत्तर रुंदी १, ३२० किमी. आफ्रिकेतील मोठ्यांत मोठ्या देशांपैकी हा चौथ्या क्रमांकाचा देश असला, तरी त्यामानाने त्याची लोकसंख्या बरीच कमी आहे. लिबियाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पूर्वेस ईजिप्त व सूदान, दक्षिणेस चॅड व नायजर, पश्चिमेस अल्जीरिया व ट्युनिशिया हे देश आहेत. देशाला भूमध्य समुद्राचा सु. १,९२० किमी. लांबीचा किनारा लाभलेला आहे. ट्रिपोली (लोकसंख्या ८,५८,०००-१९८१) ही देशाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर आहे. ट्रिपोलीच्या दक्षिणेस ६५० किमी. अंतरावरील जोफ्रा मरूद्यानाजवळील हून येथे देशाची भावी राजधानी ठेवण्याचा सर्व शासकीय विभाग तेथे हलविण्याचा आदेश कर्नल गडाफी यांनी दिला परंतु ही योजना पूर्णपणे सफल होऊ न शकल्यामुले सिद्रा आखातावरील सूर्त (सिद्रा) येथे भावी राजधानी १ सप्टेंबर १९८९  पासून म्हणजे क्रांतीच्या विसाव्या स्मृतिदिनापासून हलविण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली (सप्टेंबर १९८८). शासनाच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने सर्व शासकीय कार्यालये या तिन्ही शहरांमध्ये राहतील, असेही जाहीर करण्यात आले.

भूवर्णन : देशाची  सु ९५% भूमी वाळवंटी किंवा ओसाड असून सहारा वाळवंटाने देशाचा ९०% प्रदेश व्यापलेला आहे. भूभागाची सरासरी उंची २०० ते ६०० मी. आहे. ट्रिपोलिटेनिया, सायरेनेइका सिर्ते डेझर्ट व फेझान असे लिबियाचे प्रमुख चार भौगोलिक विभाग पडतात. ट्रिपोलिटेनिया प्रदेश देशाच्या वायव्य भागात आहे. याचा भूमध्य समुद्रकिनाऱ्यावरील मैदानी व मरूद्यानयुक्त प्रदेश शेतीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. ट्रिपोलिटेनिया प्रदेशातच १५, ५४० चौ. किमी. क्षेत्रफळाचा त्रिकोणाकृती जेफारा मैदानी प्रदेश व जेबेल नेफूझा हा ६१० ते ९१५ मी. उंचीचा व ३२० किमी. लांबीचा चुनखडीयुक्त पठारी प्रदेश यांचा समावेश होतो. जेबेल नेफूझा या खुरट्या वनस्पतियुक्त प्रदेशात राहणारे लोक ऑलिव्ह वृक्षांचीही लागवड करतात. देशातील हा महत्त्वाचा प्रदेश अर्धओसाड, वालुकामय, मैदानी स्वरूपाचा आहे. ट्रिपोलिटेनियातील भूमध्य सागरी किनारी मैदानात असलेल्या जेफारा ह्या अर्धओसाड परंतु जलसिंचित प्रदेशात दाट लोकवस्ती आहे. याच भागात ट्रिपोली हे शहर आहे . ट्रिपोलिटेनियाच्या दक्षिण भागात हमादा अल्-हमरा हा तांबड्या वालुकाश्माचा वाळवंटी पठारी प्रदेश आहे. ट्रिपोलिटेनियातील किनारी मरूद्यानांवर व मैदानांत नारिंग, अंजीर, लिंबृ, ऑलिव्ह, जरदाळू, खजूर, सातू व एस्पार्टो गवत यांचे उत्पादन घेतले जाते.

देशाच्या ईशान्य भागात सायरेनेइका हा प्रदेश असून त्यातील उत्तरेकडील भागात जेबेल अख्दार (ग्रीन हिल्स) हे ६०० मी. उंचीचे पठार आहे. तेथे पशुपालन व्यवसाय चालतो. सायरेनेइका प्रदेशातच ९१० मी उंचीचे बार्क हे वालुकामय पठार आहे. बार्क हा सायरेनेइकामधील अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग आहे. तेथे लोकवस्तीही अधिक आहे. बार्कच्या दक्षिणेस कमी उंचीचा वालुकाश्मयुक्त पठारी प्रदेश आढळतो. ईजिप्तच्या सरहद्दीकडील भागात वालुकाराशींची निर्मिती झालेली दिसते. आग्नेयीकडील वाळवंटातील मानवी जीवन मरूद्यानांवरच अवलंबून आहे. पश्चिमेकडे क्वचितच मरूद्याने आढळतात. सायरेनेइका प्रदेशातच बेंगाझी शहर आहे. लिबियाचा उत्तर मध्य म्हणजेच सिद्रा आखातावरील सिर्ते डेझर्ट प्रदेशाचा किनारा बराच वेडावाकडा असून तेथे अंतर्गत भागातील सहारा वाळवंटी प्रदेश भूमध्य समुद्रकिनाऱ्याला येऊन भिडलेला आहे. हा अतिशय ओसाड प्रदेश असून त्यानेच ट्रिपोलिटेनिया व सायरेनेइका प्रदेश एकमेकांपासून अलग केलेले आहेत. देशाच्या आग्नेय व नैर्ऋत्य भागांत अधूनमधून सुपीक मरूद्याने आढळतात. नैर्ऋत्य भागात असलेल्या फेझान द्रोणी प्रदेशात अधूनमधून लहानलहान मरूद्याने, विहिरी व झरे आढळतात. अगदी दक्षिणेकडे तिबेस्ती पर्वत असून त्याचा विस्तार पुढे चॅडमध्ये झालेला आहे. याच पर्वतातील बेट हे देशातील सर्वोच्च शिखर (२,२८६ मी.) आहे. पश्चिमेकडील किनाऱ्यावर आढळणारी करडी-तपकिरी मृदा क्षारयुक्त आहे. पूर्वेकडील बार्क मैदानातील मृदा हलकी व सुपीक आहे. उर्वरित प्रदेश वाऱ्याच्या झीज कार्यामुळे निर्माण झालेला खडकाळ व वाळवंटी आहे.

लिबियात बारमाही वाहणाऱ्या नद्या नाहीत. वाडी किंवा जलप्रवाह अनेक असले, तरी वर्षातील बहुतांश काळ ते कोरडेच असतात. अनेक ठिकाणी भूमिगत पाण्याचे साठे आढळतात. भूमिगत पाणी आर्टेशियन विहिरी व झऱ्यांच्या रूपाने घेतले जात असून त्यांपासून देशाच्या ६०%  भागाला पाणीपुरवठा केला जातो. किनारपट्टीच्या प्रदेशात खाऱ्या पाण्याची अनेक सरोवरे आढळतात. आग्नेय भागात असलेल्या अल् कूफ्रा ह्या अवाढव्य सरोवरामुळे विस्तृत प्रदेश जलसिंचनाखाली आलेला आहे.

हवामान : लिबियाच्या बहुतांश भागातील हवामान उष्ण वाळवंटी प्रकारचे आहे. किनारी प्रदेशात मात्र भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. देशाच्या हवामानावर हिवाळ्यात समुद्राचा, तर उन्हाळ्यात सहारा प्रदेशाचा अधिक प्रभाव पडतो. बऱ्याचशा भागातील वार्षिक पर्जन्यमान १५ सेंमी. पेक्षाही कमी आहे. वायव्य व ईशान्य लिबियात वर्षाला ५१ सेंमी. पाऊस पडतो. देशातील सेब्‍हा हा पृथ्वीवरील अतिकोरड्या प्रदेशांपैकी एक आहे. ईशान्य भागातील जेबेल अख्दार या देशातील एकमेव अरण्यमय प्रदेशात वार्षिक ६० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. बेंगाझी व ट्रिपोली येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे २५ सेंमी. व ३६ सेंमी. आहे. ट्रिपोलीचे हवामान जवळजवळ वर्षभर भूमध्य सागरी प्रकारचे व आल्हाददायक असते. किनारी प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो. तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २० ते ४० सेंमी. च्या दरम्यान असते. सहारा प्रदेशात तर वर्षाला ५ सेंमी. पेक्षाही कमी पाऊस पडतो. पर्वतीय प्रदेश व बार्क पठारावरील हवामान काहीसे आर्द्र असते. मध्य लिबियात दैनिक तापमानकक्षा जास्त असते. पठारी प्रदेशात हिवाळे फारच कडक असतात. उन्हाळ्यातील तापमान ४६° से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील (जानेवारी) सरासरी तापमान उत्तर भागात ११° से. तर दक्षिण भागात १७° से. असते. याउलट उन्हाळ्यातील (जुलै) तापमान उत्तर भागात २८° से., तर दक्षिण भागात ३८° से. असते. दक्षिणेकडून वाहत येणाऱ्या ‘गिब्ली’ ह्या अतिउष्ण सहारा वाऱ्यांमुळे लिबियाचे उन्हाळ्यातील तापमान काही तासांतच २२° से. पर्यंत वर चढते. या वाऱ्यांबरोबर फार मोठ्या प्रमाणात वाळू व धूळ वाहून आणली जाते. त्यामुळे संपूर्ण आकाश लाल रंगाचे होऊन दृश्यता एकदम कमी होते. ट्रिपोलिच्या नैर्ऋत्येस ८० किमी. वर असलेल्या अल् अझीझीयाह येथील १३ सप्टेंबर १९२२ या दिवसाच्या सावलीतील तापमानाची नोंद ५८° से. एवढी झाली असून जगातील हा सर्वाधिक तापमानाचा उच्चांक आहे. पर्वतीय व मरूद्यानांचे भाग वगळता देशाचा उर्वरित विस्तृत प्रदेश खूपच कोरडा असतो. दर दहा वर्षांतून सरासरीने दोन वर्षे अतितीव्र अवर्षणाची असतात.


वनस्पती व प्राणी : लिबियाच्या बहुतांश भागात विखुरलेल्या स्वरूपात अल्पायुषी झुडुपे व गवत आढळते. लिबियात सामान्यपणे खजूर, जूनिपर या वनस्पती पहावयास मिळतात.उत्तरेकडील जेबेल अल् अख्दार प्रदेशात तुलनेने अधिक दाट अरण्ये असून जूनिपर व रुमा मस्तकी हे त्यांतील प्रमुख वृक्ष आहेत. अगदी उत्तर भागात शेळ्या व गुरे, तर दक्षिण भागात मेंढ्या व उंट हे पाळीव प्राणी दिसून येतात. येथील उंट प्रामुख्याने दोन मदारींचे असतात. त्यांशिवाय तरस, कोल्हा, खोकड, स्कंक, कुरंग, जर्बोआ, रानमांजर, ससा, उंदीर, सरडा, बिनविषारी साप इ. प्राणी व चंडोल, तितर, जंगली कबूतर, प्रेअरी कोंबडी, गरुड, गिधाड इ. पक्षी आढळतात. हिवाळ्यात यूरोपकडून बरेच पक्षी स्थलांतर करून लिबियात येतात.

चौधरी, वसंत

इतिहास : लिबियाचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही कारण ट्रिपोलिटेनिया, सायरेनेइका आणि फेझान या प्रांतांना स्वतंत्र इतिहास असून सोळाव्या शतकापर्यंत (तुर्की साम्राज्य) त्यांवर भिन्न राजवंशांनी आधिपत्य गाजविले. पुरातत्त्वीय उत्खननांत आढळलेल्या अवशेषांवरून इ. स. पू. ६००० मध्ये येथे नवाश्मयुगीन संस्कृती नांदत असावी, असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यावेळी लिबियाच्या किनारपट्टीत पशुपालन व कृषी हे व्यवसाय होते आणि दक्षिणेकडील सहारा वाळवंटी प्रदेशात पाणथळ जागी शिकारी व पशुपालक यांच्या वसाहती होत्या. वाढते शुष्कीकरण आणि बर्बर जमातींचे आगमन यांमुळे येथील वसाहती विरळ होत गेल्या. इ. स. पू. २००० च्या आसपास नैर्ऋत्य आशियातून बर्बरांच्या जमाती येथे आल्या असाव्यात. ईजिप्तमधील थडग्यांतील चित्रकलेवरून बर्बर इ. स. पू. २४०० च्या सुमारास भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातून उत्तर अफ्रिकेत आले असावेत, असे अनुमान काही तज्ञ काढतात. त्यांपैकी लेबू बर्बरांचे या प्रदशात वर्चस्व निर्माण झाले. इ. स. पू. १००० मध्ये फिनिशियन दऱ्यावर्दींनी येथील किनाऱ्यांवर वसाहती स्थापन केल्या. त्यांपैकी ट्रिपोली ही त्यांची प्रमुख वसाहत होय. एअ, लेप्टिसमॅग्ना व सॅब्रत या तीन गावांची मिळून ही वसाहत झाली होती, म्हणून तिला ट्रिपोली हे नाव मिळाले. इ. स. पू. ७०० च्या सुमारास ग्रीक वसाहतवाल्यांनी सायरेनेइका येथे वसाहत केली. ग्रीक लोक ईजिप्त वगळता उत्तर आफ्रिकेच्या या भागास लिबिया-लेबू बर्बरांचा प्रदेश-असे म्हणत त्यावरूनच देशाला ‘लिबिया’ हे नाव रूढ झाले. पुढे अलेक्झांडर द ग्रेट (कार. इ. स. पू. ३३६-३२३) याने तो प्रदेश जिंकला आणि तेथे प्रशासनासाठी राज्यपाल नेमला. अलेक्झांडरच्या मृत्युसमयी (इ. स. पू. ३२३) ईजिप्तमध्ये पहिला टॉलेमी-सोटर क्षत्रप होता. त्याने सायरेनेइका जिंकून तेथे टॉलेमींची सत्ता स्थापन केली (इ. स. पू. ३२३-ते ९६). इ. स. पू. ९६ मध्ये रोमने ते पादाक्रांत केले मात्र त्यावेळी ट्रिपोलिटेनियात कार्थेजचा प्रभाव होता. रोमचा बर्बर मित्र मॅसनिस याने तो प्रदेश जिंकला. त्याच्या घराण्याकडे हा प्रदेश जूलिअस सीझरच्या झंझावाती हल्ल्यापर्यंत (इ. स. पू. ४६) होता. पुढे प्यूनिक युद्धांत (इ. स. पू. २६४ ते १४६) रोमनांनी कार्थेजचा पराभव करून ट्रिपोली पादाक्रांत केली. इ. स. पू. ९६ मध्ये त्यांनी सायरेनेइका सोडण्यासाठी ईजिप्तवर दबाव आणला. त्यामुळे या प्रदेशावर रोमनांचे वर्चस्व फेझान प्रांतापर्यंत प्रस्थापित झाले. डायोक्लीशन (कार. इ. स. २८४-३०५) सम्राटाच्या वेळी लिबियाचे विभाजन करण्यात आले आणि प्रशासनाच्या सोयीसाठी सायरेनेइका उपसम्राटाच्या देखरेखीखाली गेला व ट्रिपोलिटेनिया खुद्द रोमच्या वर्चस्वाखाली ठेवण्यात आला. रोमन अंमलाखाली लिबायाची सर्व क्षेत्रांत भरभराट झाली. रोमन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर (इ. स. पाचवे शतक) रानटी व्हँडालांनी पश्चिम लिबियाचे लचके तोडले (इ. स. ४५५). पुढे त्यांना बायझंटिनियन सम्राट पहिला जस्टिनिअन (कार. ५२७ -६५) याच्या सैन्याने लिबियातून हाकलून लावले (५३३). परिणामतः लिबियाच्या किनारी भागात पूर्व रोमन साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली. ६४२-४४ च्या दरम्यान अरबांनी या प्रदेशावर आक्रमणे केली. आपाततः अरब व बर्बर यांत संकर होऊन अरब मुस्लिम संस्कृती लिबियात विकसित झाली. अब्बांसी खलिफ हारुन अल् रशीद याने ८०० मध्ये ट्युनिशियातील अगलब कुटुंबास उत्तर आफ्रिकेचे वंशपरंपरागत राज्यपाल नेमले. अगलबांनी काही काळ ट्रिपोलिवर ताबा मिळविला परंतु फातिमी खिलाफतीने ट्युनिशिया घेऊन ईजिप्तसह ट्रिपोलीचा भूप्रदेश व्यापला (९१०). अकराव्या शतकात बनी हिलाल व बनी सलीम या दोन अरब भटक्या टोळ्यांनी येथील बऱ्याचशा नागरी वसाहतींवर हल्ले करून कृषिक्षेत्राचा विध्वंस केला. पुढे ११४५ मध्ये नॉर्मनांनी ट्रिपोली व सभोवतीचा परिसर काबीज केला. मोरोक्कोच्या अल्‍मोहेदांनी ११६९ मध्ये ट्रिपोलिटेनिया घेतला तथापि सायरेनेइका हा भूप्रदेश ईजिप्तच्या अंमलाखाली होता. लिबियाच्या पश्चिम भागावर ट्युनिशियातील हाफ्‍सिद घराण्याची सत्ता १५७४ पर्यंत होती. त्यांच्या कारकीर्दीत इस्लामी कला व संस्कृती यांची वाढ झाली. यानंतर लिबियावर अनुक्रमे स्पॅनिश हल्लेखोर व ऑटोमन तुर्क यांनी आक्रमणे केली. तुर्कांनी ट्रिपोलीच्या आधिपत्याखाली संयुक्त लिबियाची राज्यव्यवस्था आणली. तुर्की सैन्यात ख्रिस्ती तरुण व कैद केलेले सैनिक यांची ‘जॅनिसेरीझ’ (निवडक दल) नावाची एक पलटण होती. त्यांना मुस्लिम धर्माची दिक्षा आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले जाई. पुढे तिच्यामध्ये मुसलमान सामील झाले व सभासदत्व वंशपरंपरागत करण्यात आले. या दलाने डे नावाचा नेता निवडला होता राज्यपालापेक्षा त्यास अधिक मान मिळे. या जॅनिसेरीझचा १७११ मध्ये अहमद कारामान्ली हा नेता झाला. त्याने तुर्की राज्यपालाचा खून करून लिबियाची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. कारामान्ली चाच्यांकडून जबरदस्त कर-वसुली करीत. कारामान्लींच्या या घराण्यातील राज्यपालांनी १८३५ पर्यंत लिबियावर सत्ता गाजविली. या काळात अमेरिकेच्या खलाशांवर युसूफ कारामान्लीने काही अटी लादल्या व कर बसविला आणि त्यांना अटक केली. तेव्हा अमेरिकेच्या नौसेनेने १८०१ ते १८०५ दरम्यान कारामान्लींशी युद्ध केले. या युद्धात अमेरिकेच्या नौदलाने दारनाह (देर्ना) काबीज करून (१८०४) अमेरिकन कैदी खलाशांची मुक्तता केली. इंग्लंधड, फ्रान्स व सिसिली यांनीही चाचेगिरीविरोधी मोहीम आखली. परिणामतः कारामान्लींचे उत्पन्न कमी होऊ लागले आणि त्यांचे सैन्यही कमकुवत बनले. ऑटोमन सम्राट दुसरा सुलतान मुहंमद याने ‘स्फाहिझ’ या खास विश्वासू व कडव्या सैन्यदलाच्या मदतीने कारामान्लींना लिबियातून हाकून लावले (१८२६). त्यानंतर इस्तंबूलच्या तुर्कांचा अंमल ट्रिपोलीवर चालू झाला (१८३५). तुर्कांनी राजकीय स्थैर्य आणि आर्थिक विकासही साधला नाही. त्यामुळे सनूसी बंधुत्ववादाची, विशेषतः सायरेनेइकांमध्ये, वाढ झाली व त्याचे अनुयायी शासनविरोधात उभे राहिले. इटलीने राज्यविस्ताराच्या हेतूने १९११ मध्ये लिबियातील उत्तर ट्रिपोलिटेनियावर आक्रमण केले. इटलीला तुर्की लष्कर आणि मूळ रहिवासी यांच्याकडून कडवा प्रतिकार झाला तथापि इटलीने किनारपट्टीतील प्रमुख स्थळांवर ताबा मिळविला आणि पहिल्या महायुद्धानंतर बराच प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. त्यांना पुढे सनूसी बंधुत्ववादी चळवळींना दीर्घकाळ तोंड द्यावे लागले. एकाच गव्हर्नर जनरलच्या अंमलाखाली लिबियातील सायरेनेइका आणि ट्रिपोलिटेनिया या दोन स्वतंत्र वसाहती होत्या. बाल्बो ह्या गव्हर्नर जनरलच्या कारकीर्दीत रस्ते, इमारती, शाळा रुग्णालये यांचे काही प्रमाणात बांधकाम झाले. पुढे १९३४ मध्ये वरील दोन वसाहती एकत्र करून लिबियाची वसाहत करण्यात आली


(१९३४) व तो  इटलीचा अविभाज्य भाग ठरविण्यात आला (१९३९). दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी जानेवारी १९४३ मध्ये इटलीच्या पराभव करून लिबिया हस्तगत केला. १९४७ च्या तहानुसार इटलीने लिबियातील सर्व हक्क  सोडले. संयुक्त राष्ट्रांनी संमत केलेल्या ठरावानुसार ग्रेट ब्रिटनने ट्रिपोलिटेनिया व सायरेनेइका यांची आणि फ्रान्सने फेझानची प्रशासनव्यवस्था पहावी असे ठरले. संयुक्त राष्ट्रांनी १९४९ मध्ये लिबियाच्या स्वातंत्र्याविषयी एक ठराव संमत करून त्यानुसार १ जानेवारी १९५२ हि लिबियास स्वातंत्र्य देण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. १९५०-५१ मध्ये प्रत्येक भागातील एक लोकप्रतिनिधी याप्रमाणे राष्ट्रीय सभा अस्तित्वात येऊन तिने राजेशाही संविधानाचा मसुदा तयार केला आणि सायरेनेइकाचा सनूसी बंधुत्ववाद संघटनेतील प्रमुख अमीर महंमद इद्रिस अल् सनूसी यांची नियोजित राजा म्हणून डिसेंबर १९५१ मध्ये निवड केली. २४ डिसेंबर १९५१ रोजी अमीराने लिबिया स्वतंत्र झाल्याची औपचारिक घोषणा केली आणि सायरेनेइका ट्रिपोलिटेनिया व फेझान हे तीन स्वतंत्र प्रांत एकत्र करून लिबिया हे संघीय राज्य अस्तित्वात आले. यावेळी लिबियाची बहुसंख्य जनता अशिक्षित व गरीब होती. लिबिया तात्काळ अरब लिग संघटनेचा सभासद झाला. (१९५३) व नंतर संयुक्त राष्ट्रांत त्यास प्रवेश मिळाला (१९५५). लिबियन शासनाने अमेरिका व ग्रेट ब्रिटन या देशांना लिबियामध्ये लष्करी तळ ठेवण्यास स्वतंत्र करारानुसार संमती दिली व त्याबदल्यात भरघोस द्रव्यसहाय्य (खंडणी) व तांत्रिक सहकार्य मागितले. १९५८ मध्ये देशात खनिज तेलाचा शोध लागला त्यामुळे परकीय कंपन्या आपले भांडवल येथे गुंतवू लागल्या. अंतर्गत हेवेदावे, प्रांतीय अभिमान यांनी राजकारण ढवळू लागले. याचवेळी ईजिप्तमधून अनेक सुशिक्षित तरुण लिबियात नोकऱ्यांसाठी आले. यामुळे उद्योगधंद्यास, विशेषतः तेलउद्योगास, चालना मिळाली. परिणामतः लिबियाची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारू लागली. लिबियाने १९६३ मध्ये एकात्म शासनपद्धतीचा स्वीकार केला. तिन्ही प्रांत व त्यांची विधिमंडळे बरखास्त करून त्यांऐवजी दहा प्रशासकीय विभाग पाडण्यात आले. त्यांकरिता मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली व राजातर्फे पंतप्रधान नेमण्यात आला. अमेरिका व ग्रेट ब्रिटनबरोबरचे लष्करी व आर्थिक संदर्भांतील करार लिबियाने रद्द केले. अरब-इझ्राएल युद्धाच्या वेळी अमेरिका, ग्रेट ब्रिटन यांविरुद्ध निदर्शने करण्यात आली ( १९६७) परंतु लिबियन लष्कराने या युद्धात मात्र भाग घेतला नाही.

लष्करातील काही सेनाधिकाऱ्यांनी कर्नल मूआम्‍मार अल् गडाफी (१९४२- ) याच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर १९६९ रोजी अवचित सत्तांतर करून राजास पदच्युत केले, जुने संविधान रद्दबातल ठरविले व सर्व सत्ता रेव्हलूशनरी कमांड कौन्सिल (आर. सी. सी. ) या क्रांतिकारक गटाच्या हाती घेतली त्याचवेळी लिबिया हे प्रजासत्ताक राज्य असल्याचे त्याने जाहीर केले. गडाफी हा लिबियाचा नेता, अध्यक्ष व सर्वसत्ताधारी झाला. १९६९ नंतरचा आजपर्यंतचा लिबियाचा इतिहास हा वेगवेगळ्या संघटनांद्वारे गडाफीने राबविलेल्या एकाधिकारशाहीचा वृत्तांत आहेत. कर्नल गडाफी हा मोहंमद अब्दुलसलाम अबुमिनियार व आयेशा बेन निरान या धनगर दांपत्याचा सुशिक्षित मुलगा. त्याने लिबिया विद्यापीठातून पदवी घेऊन बेंगाझी येथे लष्करी अकादमीत सैनिकी शिक्षण घेतले आणि १९६५ मध्ये लष्करात प्रवेश केला. हळूहळू तो कर्नलच्या हुद्यापर्यंत चढला. आर. सी. सी. चा अध्यक्ष (१९६९-७७), लष्करप्रमुख (१९६९ – ) पंतप्रधान व संरक्षण मंत्री (१९७०-७२) पीपल्स काँग्रेसचा सरचिटणीस (१९७७ -७९), ओएयूचा (आफ्रिकी ऐक्य संघटनेचा ) अध्यक्ष (१९८२-८३) वगैरे विविध उच्चपदे त्याने भूषविली असून त्याच्या कडे १९७९ पासून कोणतेही अधिकृत शासकीय पद नाही तथापि अरब सोशॅलिस्ट युनियन या सत्ताधारी पक्षाचा तो महासचिव असून सर्व लष्कराचा प्रमुख आहे त्याने द ग्रीन बुक, स्ट्रॅटिजी अँड मोबिलायझेशन इ. काही पुस्तकेही लिहिली आहेत.

गडाफीने लिबियाचा सर्वसत्ताधारी झाल्यानंतर काही दिवसांतच अरब सोशॅलिस्ट युनियन (असू) या राजकीय पक्षाची स्थापन केली (१९७१). या पक्षाचे पहिले अधिवेशन-जनरल नॅशनल काँग्रेस-जानेवारी १९७६ मध्ये भरविण्यात आले. पुढे त्याचे नाव जनरल पीपल्स काँग्रेस (जी. पी. सी.) असे करण्यात येऊन गडाफीच्या सूचनेनुसार लिबियाचे अधिकृत नाव ‘सोशॅलिस्ट पीपल्स लिबियन अरब जम्हूरियात’ असे करण्यात आले (२२ मार्च १९७७). याचवेळी रेव्हलूशनरी कमांड कौन्सिल रद्द करून सर्व सत्ता जनरल पीपल्स काँग्रेसकडे (संसद) गेली. पुढे सत्तेचे विभाजन स्थानिक लोकसमित्यांत करण्यात आले. यातून जी. पी. सी. चे प्रतिनिधी नेमले जातात. सचिवांमार्फत वेगवेगळी खाती व प्रसासकीय व्यवस्था पाहिली जाते. २ ते ९ मार्च १९८९ दरम्यान मंत्रिमंडळात आमूलाग्र फेरबदल करण्यात आले. आठ नवीन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांत प्रथमच फातिमा-अब्द-अल्-हाफीज मुख्तार या स्त्रीकडे शिक्षणखाते देण्यात आले आणि ईजिप्शियन नागरिक अमीन हालिमी याच्याकडे छोट्या उद्योगधंद्यांचे मंत्रिपद देण्यात आले.

गडाफीने इस्लाम धर्म हा राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारला असून देशांतर्गत मुस्लिम समाजवाद आणि कुराणावर आधारित न्याय व कायदा यांचा अवलंब केला आहे. त्याचा समाजवाद मुख्यत्वे इस्लाम धर्मावर, विशेषतः कुराणपुरस्कृत चालीरीती. संकेत, परंपरा आणि विधी यांवर, अधिष्ठित होता. म्हणून त्याने परंपरागत जमात-नेत्यांची सत्ता क्षीण केली व जमीनदार, सरदार, श्रीमंत लोक व मोठे व्यापारी यांवर विवक्षित बंधने लादली. मुस्लिम समाजवादासाठी त्याने सांस्कृतिक क्रांतीची घोषणा केली आणि लिबियातील परकीय हस्तक्षेप निपटून काढण्याचे धोरण अवलंबिले. एवढेच नव्हे तर परकीय मालकीच्या तेलकंपन्यांत हस्तक्षेप करून या उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण केले. परकीय अभियंते व तंत्रज्ञ यांना देशाबाहेर हाकलून त्याजागी लिबियन तज्ञांच्या नियुक्त्या केल्या. १९८० नंतर तेलाच्या व्यापारातील चढ-उतारांमुळे गडाफीला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले तरीसुद्धा रस्ते, तेलशुद्धीकरण इत्यादींबाबत अनेक सुधारणा झाल्या. अलीकडे जी. पी. सी. ने देशांतर्गत सुधारणांसाठी शासकीय आयात-निर्यात संघटना बंद करून (मार्च १९८९) व्यापाऱ्यांनी स्वतःच्या हिंमतीवर हा व्यवसाय करावा, असे सुचविले. दक्षिण कोरियाच्या मदतीने एक मोठा जलप्रकल्प हाती घेण्यात आला (ऑगस्ट १९८९). त्यानुसार फेझान वाळवंटापासून ट्रिपोलीपर्यंत सु. १, १०० किमी. चा नळमार्ग (१९९१ अखेर) टाकण्याची योजना आहे. त्यामुळे शहरास दररोज १० लाख घ. मी. पाणी मिळेल. देशात मिस्त्राता स्टील कंपनीद्वारे एक पोलाद समूह स्थापण्यात आला असून त्यातून ११० लक्ष टन पोलाद तयार केले जाते. १९९० मध्ये लिबियाने तुर्कस्तानबरोबर आर्थिक समस्यांना तोंड देण्यासाठी तेल व नैसर्गिक वायू यांबाबत नवीन करार केले.


 गडाफीच्या परराष्ट्रीय धोरणाचे मूलसूत्र सकल अरबवाद व इस्लामी राष्ट्रवाद आणि त्यांचा प्रसार व प्रचार हे आहे. त्याकरिता त्याने ईजिप्त, सिरिया, ट्युनिशिया, चॅड, सूदान, मोरोक्को इत्यादींशी मैत्रीचे व संघटनात्मक करार केले, पण ते फार काळ टिकले नाहीत या सर्व धोरणांच्या मुळाशी इझ्त्राएल-विरोध हे मूलतत्त्व होते आणि इझ्त्राएलला मदत करणारा वा त्याच्याशी संबंध ठेवणारा तो लिबियाचा शत्रू, हे प्रमुख कारण होते. परिणामतः या देशांबरोबरचे सलोख्याचे संबंध संपुष्टात आले. एवढेच नव्हे, तर चॅडमधील युरेनियमचे साठे असलेली पट्टी पादाक्रांत करून त्याने खळबळ उडविली, तसेच १९७९ मध्ये तेथील यादवी युद्धात हस्तक्षेप केला आणि त्याच साली इदी अमीनच्या युगांडावर अयशस्वी हल्ला केला. आंतरराष्ट्रीय दबावामुळे चॅडमधून त्यास माघार घेणे क्रमप्राप्त झाले. तरी प्रत्यक्षात ३ ऑक्टोबर १९८८ पर्यंत तेथे लिबियाचे सैन्य होते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन आदी पाश्चात्त्य देशांनी इझ्त्राएलला मदत करताच त्यांचा तेलपुरवठा लिबियाने बंद केला, रशियन तंत्रज्ञ बोलावून आपल्या लष्कराला प्रशिक्षण दिले आणि रशियाकडून शस्त्रसामग्री विकत घेतली. लेबानन आणि आपल्या अनेक शत्रुराष्ट्रांत घूसखोरांद्वारे घातपाती कृत्ये करीत असल्याचा आरोप आजही लिबियावर करण्यात येतो. या दहशतवादी कारवायांना पायबंद बसावा, म्हणून अमेरिकेने १५ एप्रिल १९८६ रोजी लिबियातील नागरी वसाहतींवर बाँबहल्ले केले. गडाफीने यासर अराफत आणि त्याची पॅलेस्टिनी मुक्ती संघटना यांच्याशी व इराकसारख्या त्यांच्या मित्रांशी मैत्रीचे संबंध ठेवले आहेत. १ सप्टेंबर १९८९ रोजी क्रांतीचा विसावा स्मृतिदिन देशभर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्याला यासर अराफतसह काही नेते ट्रिपोली येथे उपस्थित होते.

राजकीय स्थिती : लिबियन अरब प्रजासत्ताकाची १ सप्टेबर १९६९ रोजी अवचित सत्तांतराद्वारे निर्मिती झाली आणि रेव्ह्लूशनरी कमांड कौन्सिल (आर.सी सी.) या क्रांतिकारक मंडळाने जुने राजेशाही संविधान आणि सीनेट व लोकप्रतिनिधिगृह बरखास्त करून पुढे ११ डिसेंबर १९६९ रोजी नवीन कामचलाऊ संविधान स्वीकारले. त्यात निवडणुका किंवा संसदीय पद्धतीचा उल्लेख नव्हता परंतु १९७१ मध्ये कर्नल गडाफीने नवीन विधिमंडळ नेमण्यात येईल, निवडण्यात येणार नाही, असे निःसंदिग्ध शब्दांत स्पष्ट केले आणि अरब सोशॅलिस्ट युनियन या पक्षाची स्थापना करून अन्य सर्व राजकीय पक्षांवर कायद्याने बंदी घातली. या संविधानाने लिबिया हे अरब लोकसत्ताक आणि स्वतंत्र प्रजासताक राज्य अस्तित्वात आले. ते अरब राष्ट्रांचा (अरब लीग) एक अविभाज्य अंग मानण्यात येऊन त्याचा उद्देश बहुव्यापक अरब एकात्मता, असा गृहीत धरण्यात आला. देशाच्या शासन-व्यवस्थेचे सर्वोच्च अधिकार आर. सी .सी मधील बारा सभासदांच्या गडाफी अध्यक्ष असलेल्या कार्यकारिणीस देण्यात आले. तिने पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करावी, असे ठरविण्यात आले. अध्यक्ष गडाफी हाच राज्यप्रमुख आणि सर्व सैन्याचा सरसेनापती  झाला. अरब सोशॅलिस्ट युनियन पक्षाने नोव्हेंबर १९७५ मध्ये जनरल नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन बोलाविले. त्यातून १,११२ सदस्यांची जनरल पीपल्स काँग्रेस (जी.पी.सी.) ही संसद अस्तित्वात आली. तिच्या मार्च १९७७ मधील अधिवेशनात देशाचे अधिकृत नाव सोशॅलिस्ट पीपल्स लिबियन अरब जम्हूरियात असे ठेवण्यात येऊन पूर्वीचे क्रांतीकारक मंडळ रद्द करण्यात आले. तथापि पुढे त्यातील पाच लोक सचिवालयात सचिव म्हणून घेण्यात आले. तत्त्वतः सर्वोच शासकीय अधिकार या नवनियुक्त संसदेस देण्यात आले.

याच्या सभासदांची नियुक्ती छोट्या गावांतील स्थानिक (मूळ) तसेच  लोकप्रिय काँग्रेस समित्यांतून करण्यात येते. या समित्यांचे सभासदही नियुक्त केले जात. जी. पी. सी. या सर्वोच्च लोकनियुक्त संसदेचे वर्षातून सु. दोन आठवडे एकदा अधिवेशन भरते आणि ती धोरणात्मक निर्णय घेते. त्यातून सचिवालयाची नियुक्ती केली जाते. या सचिवालयचा एक सरचिटणीस (महासचिव) असे. हे पद स्वाभाविकच कर्नल गडफीकडे असून तो सचिवालय व समितीची निवड करतो. या समितीतून दहा खात्यांचे सचिव (मंत्री) निवडण्यात येतात. हे मंत्रिमंडळ खातेनिहाय प्रशासकीय व्यवस्था पाहते. सकृत्‍दर्शनी जरी लोकांच्या हाती सत्ता दिसत असली, तरी लिबियात निवडणुका वा तत्सम पद्धती अस्तित्वात नाही देशाची सर्व शासकीय सूत्रे १९७७ च्या संविधानानुसार सरचिटणिसाच्या हातात एकवटलेली होती. १९७९ मध्ये गडाफीने जी. पी.सी. चे सरचिटणीसपद सोडले व शासनात कोणतेच अधिकृत पद घेण्यास नकार दिला मात्र स्वतःकडे अरब सोशॅलिस्ट युनियन ह्या सरकारमान्य पक्षाचे अध्यक्षपद आणि लष्कराचे सरसेनापतीपद ठेवले त्यामुळे प्रत्यक्षात देशाची सर्व सत्ता कर्नल गडाफी व त्याचे निकटचे सल्लागार सहकारी त्याच्या हातातच अद्याप एकवटलेली  आहे. जी. पी. सी. चे तेरावे अधिवेशन मार्च १९८८ मध्ये झाले.

देशाची प्रशासनाच्या सोयीसाठी दहा प्रशासकीय विभाग व पंचवीस नगरपालिकांत (बलारियांत) विभागणी केलेली असून त्या सर्वांवर केंद्रसत्तेचे नियंत्रण आहे. नगरपालिकांची पुन्हा विभागणी उपनगरपालिकांत (भूकटिबंधांत) केली असून त्यांमधील नागरिकांतून स्थानिक काँग्रेसचे सभासद निवडले जातात आणि त्याचा नेता व नेतृत्व समिती क्रांतिकारक मंडळाकडून नेमली जाते. जी.पी. सी. वर जाणाऱ्या  सदस्यांची शिफारस ह्या समित्या करतात. किरकोळ अपवाद वगळता हे सर्व सभासद अरब सोशॅलिस्ट युनियन या अधिकृत राजमान्य पक्षाचे सदस्य असतात. 

 

न्यायव्यवस्था : लिबियाची न्यायव्यवस्था पुढीलप्रमाणे आहे: सर्वोच्च न्यायालय अपील न्यायालये, तात्काळ न्याय देणारी न्यायालये आणि समरी न्यायालये सर्व न्यायालयांत अपवादात्मक (नीतिविषय व खास बाबी) दावे वगळता जाहीर रीत्या दाव्यांची सुनावणी केली जाते. विधिपद्धतीही प्रामुख्याने पृर्वापार चालत आलेली ईजिप्शियन संहिता व पूर्वगामी दाखले यांवर आधारित असून व्यक्तिगत संबंधातील सर्व दावे मुस्लिम कायद्यानुसार (शरियत) निकालात काढण्यात येतात. दाव्यांची सुनावणी मुख्यतः अरबी भाषेत होते. सर्वोच्च न्यायालयात अध्यक्ष व अन्य तीन ज्येष्ठ न्यायाधीश असून त्यांचा निकाल अंतिम मानण्यात येतो. उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालयांतून आलेल्या काही विशिष्ट अपिलांची सुनावणी चालते. प्रामुख्याने या न्यायालयात घटनात्मक अन्वयार्थ दर्शविणारे वाद, प्रशासकीय समस्या व कायदेविषयक बाबी या संदर्भांतील तंट्यांचा विचार केला जातो. समरी न्यायालये आणि तात्काळ न्यायालये ही ग्रामीण भागात तसेच लहान गावांत असून अपील न्यायालये प्रांतांच्या राजधान्यांत आहेत. यांशिवाय काही खास न्यायालये व लष्करी न्यायालये असून त्यांतून देशविरोधी अभिप्रेत गुन्ह्यांबाबत सुनावणी केली जाते. प्रमुख न्यायाधीशांची नियुक्ती जी. पी. सी. करते १९८१ मध्ये खाजगी वकील-व्यवसाय बंद करण्यात येऊन सर्व वकील हे न्यायखात्याचे सेवक बनले.

संरक्षण व्यवस्था : स्वातंत्र्यानंतर सुरुवातीस कमकुवत असणारे लिबियाचे लष्कर कर्नल गडाफीच्या नेतृत्वाखाली कार्यक्षम व सुसज्ज करण्यात आले. लिबियात लष्करी शिक्षण सक्तीचे असून प्रत्येक पुरुष नागरिकाने ते घेतलेच पहिजे, असा कायदा १ जानेवारी १९७५ पासून लागू करण्यात आला. तत्त्वतः हा नियम स्त्रियांनाही लागू आहे तथापि त्याची अद्यापि प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. या कायद्यानुसार भूसेनेत तीन वर्षे, तर नौदल व हवाईदल ह्यांत चार वर्षे सक्तीची लष्करी सेवा करावी लागते. याशिवाय वय वर्षे ४९ पर्यंत प्रत्येक नागरिकास केव्हाही किमान दोन वर्षे राखीव सैन्यात सेवा केली पहिजे, अशी सक्ती आहे. १९९० मध्ये लिबियाचे एकूण सैन्य ८५,००० असून त्यांपैकी भूसेनेत ५५,०००, नौदलात ८,००० व हवाईदलात २२,००० होते  त्याशिवाय राखीव सैन्य ४०,००० आणि सकल आफ्रिकन निमलष्करी सेना २,५०० होती.


 भूसेनेत पलटणीनुसार , रणगाडा, विमानवेधी तोफा, तोफखाना, छत्रीधारी सैन्य, प्रतिहल्ला  करणारी, अशी पथके आहेत. १९९० मध्ये १,९८० लढाऊ रणगाडे आणि २९ हेलिकॉप्टर होती. नौदलात रशिया व पश्चिम यूरोपियन राष्ट्रांनी बनविलेल्या संमिश्र लढाऊ जहाजांचा ताफा असून डीझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या, क्षेपणास्त्रयुक्त लढाऊ जहाजे, जलदगती क्षेपणास्त्रधारी व टेहळणी गलबते, रणगाडावाहू बोटी, रसद पुरविणारी व मालवाहू जहाजे इ.विविध प्रकारच्या लहानमोठ्या ८८ जहाजांनी ते सुसज्ज आहे.

हवाईदलाची स्थापन १९५९ मध्ये झाली १९७४ मध्ये त्यात ११० लढाऊ मिराज विमाने व प्रशिक्षित वैमानिक होते. रशियाकडून लिबियाला शत्रूवर मारा करणारी विविध प्रकारची मिग विमाने मिळाली असून त्यात टी-यू-२२ पराध्वनिक, टेहळणी व बाँबफेकी आणि गतिरोधक विमाने होती. लिबियास प्रामुख्याने रशिया, फ्रान्स व चेकोस्लोव्हाकिया या देशांनी विविध प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर यांची मदत केलेली असून शस्त्रास्त्रसामग्रीच्या बाबतीत रशिया सढळ हाताने मदत करीत आहे. कर्नल गडाफीने १ सप्टेंबर १९८९ या क्रांतिस्मृतिदिनी एक हुकूमनामा काढून संरक्षण खात्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल केला. त्यानुसार संरक्षण खात्याचे सर्वाधिकार एका समितीकडे सुपूर्त करण्यात आले असून तिच्या प्रमुखपदी कर्नल गडाफी आहे. १९८७ च्या अंदाजपत्रकात संरक्षणावर सु. १४१ कोटी डॉलर खर्चाची तरतूद केलेली होती.

देशपांडे, सु. र.

आर्थिक स्थिती : लिबिया हा १९५९ पर्यंत जगातील सर्वांत गरीब राष्ट्रांपैकी एक होता. त्याच्या विकासास अत्यंत मर्यादित वाव होता. ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्याकडून भाडेकरारावर मिळणारी मदत हाच परकीय चलनप्राप्तीचा  मार्ग होता. परंतु १९५९ मध्ये देशात झाल्टन तेलक्षेत्रांचा व त्यापाठोपाठ इतरही तेलक्षेत्रांचा शोध लागल्याने देशाच्या आर्थिक विकासास गती मिळाली. 

शेती : देशातील सु. ८० टक्के लोकसंख्या १९५९ पर्यंत शेती व पशुपालन व्यवसायांत गुंतलेली होती. अत्यंत कमी पर्जन्य व शेतीयोग्य जमिनीचा अभाव यांमुळे उत्पादन फारच कमी येई परंतु १९८० पर्यंत हे प्रमाण १९ टक्क्यांपर्यंत खाली आले. खाणकामाखालोखाल शेती हा देशातील दुसरा महत्त्वाचा आर्थिक घटक आहे. एकूण क्षेत्राच्या केवळ १.४ टक्के भूमी शेतीयोग्य असून तीपैकी फक्त ७ टक्के कृषिक्षेत्र जलसिंचनाखाली आहे (१९८०). स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेती, अरण्योद्योग व मासेमारी यांचा वाटा केवळ १.५ टक्के आहे. शेती हे एकच आर्थिक क्षेत्र असे आहे की, जेथे खाजगी मालकी अद्याप महत्त्वाची  मानली जाते. आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने सातू हे देशातील प्रमुख पीक आहे. ट्रिपोलिटेनियाच्या किनारपट्टी प्रदेशात हिवाळ्यात मुख्यतः पावसावर आधारित, तर उन्हाळ्यात विहिरीच्या पाण्यावर शेती केली जाते. ट्रिपोलीच्या सभोवताली ट्रक शेती (शेतमाल जलद ट्रकवाहतुकीद्वारा बाजारात पाठविणे) केली जाते. तेथे लिंबू जातीची फळे, खजूर, ऑलिव्ह व बदाम ही उत्पादने घेतली जातात सायरेनेइकातील बार्क मैदानात धान्य, ऑलिव्ह व फळांचे उत्पादन घेतले जाते. फेझानमधील शेती केवळ मरूद्यानांच्या ठिकाणीच आढळते. टेकड्यांच्या दक्षिणेकडील भागात सातूचे उत्पादन पावसावर अवलंबून असते. पश्चिमेकडील व पूर्वेकडील पठारी प्रदेशांतून गव्हाचे उत्पादन घेतले जाते. बहुतेक सर्व उत्पादने स्थानिक उपभोगासाठीच वापरली जातात. अन्नधान्याची गरज आयातीमधून भागवावी लागते. देशातील काही महत्त्वाची कृषिउत्पादने खालीलप्रमाणे आहेत (उत्पादन हजार मे. टनामध्ये) : गहू १९०, सातू ९०, ऑलिव्ह १२०, लिंबू वर्गीय फळे ९९, बदाम १२.५, टोमॅटो २०५, खजूर १०५, बटाटे ११२, द्राक्षे २१ (१९८६ अंदाज), कांदे ६९, कलिंगडे १७१, नारिंग ३५ (१९८१). ऑलिव्ह वृक्ष ३४ लक्ष व खजुराची झाडे सु. ३० लक्ष होती (१९८८).

शेतीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी बरीच मोठी गुंतवणूक केली जात आहे. जलसिंचनाखालील क्षेत्र, आधुनिक तंत्राचा शोध व त्याचा वापर वाढविणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. बी-बियाणे व खते यांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते. ट्रिपोलिटेनियामधील जेफारा, बेंगाझीच्या पूर्वेकडील जेबेल अख्दार, फेझानचा काही भाग, कूफ्रा व सारिर मरूद्याने, हे त्या द्दष्टीने निवडलेले प्रदेश आहेत. कूफ्रा मरूद्यानातील पाण्याचा उपयोग गुरांच्या चारा उत्पादनासाठी केला जातो.

खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी पशुपालन व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा होता. अन्न, वस्त्र, निवारा, वाहतूक या गरजा प्राण्यांपासून भागविल्या जात. ट्रिपोलिटेनियातील सु. ८० लक्ष हेक्टर क्षेत्र व सायरेनेइकामधील सु ४० लक्ष हेक्टर क्षेत्र कुरणांखाली आहे. जेबेल प्रदेशाच्या दक्षिण भागात असलेल्या अवर्षणरोधक वनस्पतींच्या पट्ट्याचा उपयोग अजूनही त्या भागातील  भटके व अर्धभटके पशुपालक गुरांच्या चराईसाठी करतात. फेझानमधील भटके पशुपालक मरूद्याने किंवा प्राण्यांच्या दृष्टीने सोईस्कर अशा इतर वनस्पतींनी युक्त प्रदेशांतून भटकत असतात. अवर्षण व रोगराई यांमुळे येथील प्राणी दुबळे राहतात. देशात ५७ लक्ष मेंढ्या, ९.६५ लक्ष शेळ्या, २.१५ लक्ष गुरे, ३७० लक्ष कोंबड्या (१९८८), १.७ लक्ष उंट (१९८५) व १४,००० घोडे (१९८१) होते. खाजगी दुग्धव्यवसायला परवानगी आहे  मात्र उत्पादित  दूध शासनाकडे विकावे लागते. मोठी कुक्कटपालनक केंद्रे शासनामार्फत चालविली जातात. १९८६ मध्ये काही महत्त्वाची प्राणिज उत्पादने खालीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांत) : गोमांस ४६, मेंढ्यांचे मटन ५४, शेळीचे मांस ३, कोंबडीचे मांस ४८, दूध १३०, कोंबडीची अंडी १६, मध ०.६, लोकर ११.६, कातडी ६.३ व चामडी १४.

लिबियात मासेमारी व्यवसाय विशेष महत्त्वाचा नाही. शासनाकडून मासेमारी व तद्संबंधित व्यवसायांच्या विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ट्यूना, सार्डीन ह्या माशांच्या प्रमुख जाती येथील किनाऱ्यावर सापडतात . १९८६ मध्ये एकूण ७,८०० टन मासे पकडण्यात आले.

सायरेनेइकामधील जेबेल अख्दार प्रदेशात आढळणारी जूनिपर वृक्षांची झुडुपे हाच देशातील एकमेव महत्त्वाचा अरण्यमय प्रदेश आहे. काही प्रदेशात तुरळक सूचिपर्णी वृक्ष आढळतात. वाळवंटाचा उत्तरेकडे होणारा विस्तार थांबविण्यासाठी बाभूळ, पाइन, कॅरोब, सायप्रस, यूकॅलिप्टस, ऑलिव्ह, ताड इ. वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. १९८५ मध्ये देशात पुढीलप्रमाणे लाकूड उत्पादन झाले (उत्पादन हजार मे. टनांत): कापील इमारती लाकूड पृष्ठावरणाच्या लाकडाचे ठोकळे व लोहमार्ग तळपाटाचे  लाकूड मिळून ६३, इतर उद्योगांसाठीचे लाकूड ३५ व जळाऊ लाकूड ५३६.

उद्योग : लिबियाच्या औद्योगिक विकासास १९६१ पासून म्हणजेच खनिज तेल उत्पादनानंतर सुरुवात झाली. बीर झाल्टन ते किनाऱ्या वरील पोर्ट ब्रेगा यांदरम्यान पहिला तेलवाहक नळमार्ग १९६१ मध्ये टाकण्यात आला. त्यानंतर इतर तेलक्षेत्रेही नळवाहतुकीने भूमध्य समुद्रकिनाऱ्यायवरील बंदरांशी जोडण्यात आली. झाल्टन, अमाल, जालो, वहा, रागुबा, सारिर ही देशातील प्रमुख तेलक्षेत्रे आहेत. लिबियात खनिज तेलाचे २३ महापद्म पिंपे एवढे साठे होते. (१९८८). १९७० पर्यंत १,६०० लक्ष मे. टन इतक्या प्रचंड प्रमाणात तेलाचे उत्पादन वाढले. त्यामुळे १९५० मध्ये दरडोई वार्षिक उत्पन्न फक्त ४० डॉलर होते, ते १९६९ मध्ये १,००० डॉलरपर्यंत वाढले १९८३ मध्ये ते ८,४८० डॉलरवर पोहोचले. आफ्रिकेतील हे सर्वाधिक उत्पन्न होते. १९७० मध्ये लिबियाचा तेल उत्पादनात जगात पाचवा व तेलनिर्यातीत तिसरा क्रमांक होता. त्यानंतर तेलाचे उत्पादन घटले मात्र तेलाच्या किंमती वाढल्या. १९८९ मध्ये ५३० लक्ष टन तेल उत्पादन झाले. तरीही जगातील अग्रेसर तेल उत्पादक राष्ट्रांमध्ये लिबियाचे स्थान कायम राहिले आहे. देशाच्या एकूण निर्यात मूल्यापैकी ९९% पेक्षा अधिक निर्यात मूल्य तसेच स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६०% पेक्षा अधिक उत्पादन खनिज तेल, खनिज तेलउत्पादित पदार्थ व नैसर्गिक वायू यांचे असते.  तेल निर्यातक राष्ट्र संघटनेचा (ओपेक) लिबीया एक सदस्य आहे.


 खनिज तेल संपत्तीच्या विकासासाठी १९५५ मध्ये लिबियन शासनाने खनिज तेल सवलत कायदा  केला. या उद्योगातून मिळणारा नफा तेल कंपन्या व लिबियन शासन यांच्यात समप्रमाणात वाटण्यात यावा व सवलतीची रक्कम ठराविक कालावधीनंतर राज्याकडे देण्यात यावी, अशी अट त्या कायद्यात होती. १९७२ पर्यत अशा २१ अमेरिकन व युरोपीय कंपन्या होत्या. तेल संपतीच्या समुपयोजनासाठी ‘लिबियन नॅशनल ऑइल कॉर्पोरेशन’ (एन्ओसी) ची स्थापना मार्च १९७० मध्ये  करण्यात आली. एन्ओसी प्रत्यक्ष खोदकाम करीत नसले, तरी ‘ऑक्किटेन लिबिया’ व ‘विंटरशाल लिबिया’ हे दोन छोटे उत्पादक वगळता  बाकी सर्व उत्पादक कंपन्यांचा मोठा भाग ‘एन्ओसी’ चा होता. १९७३ पर्यंत देशातील सर्व तेल कंपन्या शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या. शासकीय नियंत्रणामुळे पुढे उत्पादन मात्र घटले. १९८५ पर्यंत वार्षिक उत्पादन ५१० लक्ष मे. टनापर्यंत खाली आले. देशातील नैसर्गिक वायूचे प्रत्यक्ष उत्पादन व साठे अनुक्रमे २,९०० कोटी घ.मी. (१९८२) व ६,२०० कोटी घ.मी.(१९८८) होते. नैसर्गिक वायूची वाहतूक मुख्यतः नळमार्गाने केली जाते. विद्युत्‍निर्मिती क्षमता ५,६१५ मेवॉ. (१९८५) असून १९८६ मध्ये प्रत्यक्ष उत्पादन २१२.६ कोटी किवॉ. ता.झाले. हेच उत्पादन १९८४ मध्ये ७२७ कोटी किवॉ. ता. होते. देशातील विद्युत्‍निर्मिती प्रकल्प मुख्यतः खनिज तेलावरच अवलंबून आहेत. अणुशक्तिनिर्मितीत लिबियाला विशेष रस आहे. ताजुरा येथे १० मेवॉ. क्षमतेचा संशोधन विक्रियक असून तो रशियाच्या मदतीने ४४० मेवॉ. क्षमतेचा करण्याची योजना आहे. निरीक्षकांच्या मते या विक्रीयकामधून वर्षाला ११० किग्रॅ. प्लुयटोनियमची निर्मिती होईल किंवा ते २० अण्वस्त्रांना पुरेल.

खनिज तेल व नैसर्गिक वायूशिवाय लोहखनिज, पोटॅश, चुनखडक, संगमरवर, मॅग्नेयशियम व पोटॅशियमची लवणे, मँगॅनीज, कोळसा, जिप्सम ही खनिजोत्पादने लिबियातून घेतली जातात. फेझान प्रदेशातून लोह खनिजाचे सिर्ते वाळवंटातून पोटॅशचे व गंधकाचे, ट्रिपोलिटेनियामधून जिप्सम, मँगॅनीज, मीठ, लिग्नाइट कोळसा यांचे उत्पादन  घेतले जाते. १९८२ मध्ये जिप्सम उत्पादन १,७२,४०० टन झाले. नैर्ऋत्य भागातील घाट प्रदेशात युरेनियमचे साठे सापडले आहेत.

लिबियातील बहुतांश उद्योगधंदे खनिज तेल उत्पादनावरच आधारित आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पादनांत औद्योगिक उत्पादनांचा वाटा १९८० मध्ये २,६५० लक्ष लिबियन दिनार (२.६%) एवढा होता. बहुतांश उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण ट्रिपोली व बेंगाझी येथे झालेले आहे. नैसर्गिक वायू द्रवीकरण कारखाना (स्था. १९७१) तसेच मिथेनॉल, अमोनिया, यूरिया यांचे निर्मिती प्रकल्प पोर्ट ब्रेगा येथे आहेत. १९८१ मध्ये लिबियाने ८,५०,००० टन द्रवरूप नैसर्गिक वायूचे उत्पादन केले. देशातील सर्वांत मोठा म्हणजे प्रतिदिनी १,२०,००० पिंपे तेलशुद्धीकरण कारखाना झावीआ येथे होता. परंतु त्याच्या दुप्पट क्षमतेचा तेलशुद्धीकरण कारखाना रास लानूफ येथे उभारण्यात येत आहे (१९८१). तसेच तेथे एथिलीन व इतर खनिज तेल रसायने  निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प होता (१९८२). १९८१ मध्ये एकूण ५४,७०,००० टन शुद्ध केलेले खनिज तेल उत्पादन झाले. खनिज  तेलाची १९७३ मध्ये  असलेली ४९७ लक्ष डॉलरची निर्यात १९८० मध्ये १ महापद्म डॉलरपर्यंत वाढली. देशात १९८४ मध्ये काही प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (हजार मे. टनांत) : विमानाचे इंधन ५४०, मोटारीचे इंधन ५६०, नॅप्था १,४५०, रॉकेल १७०, ऊर्ध्वपातित इंधन तेले १,२८०, शेष इंधन तेले २,४४०, द्रवरूप नैसर्गिक वायू ४८०, ऑलिव्ह तेल (अशोधित) १२, सिगारेटी ३५० कोटी नग, चुनकळी २६० यांशिवाय १९८३ मध्ये गव्हाचे पीठ १,३५,०२०, मे.टन, खनिज जल १,०६,०२०, हेक्टोलिटर सौम्य पेये ७,३६,०२०, हेक्टोलिटर व सिमेंट उत्पादन ३०,९३,०००, मे. टन झाले. मिस्राटा (मीझूराटा) येथे लोहपोलाद निर्मितीचे एक प्रचंड संकुल उभारण्यास १९८१ मध्ये सुरुवात झाली आहे. अनेक सिमेंट कारखानेही उभारले जात आहेत. स्थानिक उत्पादक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्लॅस्टिक, पादत्राणे, धातूंच्या वस्तूंची निर्मिती इ. तेरा उद्योग कराधान व सीमाशुल्क यांमधून वगळण्यात आले आहेत (१९७७).

लिबियातील इतर निर्मितिउद्योग अल्प भांडवल गुंतवणुकीचे व  स्थानिक कृषिउत्पादनांवर  प्रकिया करणारे लघुउद्योग आहेत. यांत कातडी कमावणे, फळे व भाजीपाला हवाबंद डब्यांत भरणे, ऑलिव्ह तेल निर्मिती यांचा समावेश होतो. तसेच वस्त्रोद्योग ,बांधकामाचे साहित्य व मूलभूत उपभोग्य वस्तुनिर्मिती उद्योगही चालतात. चटया,रंग, चांदीचे दागिने, कापड, काचेच्या व चामड्याच्या वस्तू यांचे उत्पादन, हे हस्तोद्योग आहेत. कुशल कामगारांचा देशात अभाव असल्याने विज्ञान आणि तांत्रिक पदांवर मुख्यतः परदेशी कामगार आहेत.

तेलउद्योग वगळता लिबियातील इतर उद्योगांत परदेशी गुंतवणूक फारच कमी  आहे. बँका, विमा, देशांतर्गत व्यापार या क्षेत्रांत परदेशी गुंतवणूकीला परवानगी नाही. संयुक्त भांडवली कंपन्यांमधील किमान ५१.% भांडवल लिबियन असावे, तसेच संचालक मंडळाचा अध्यक्ष लिबियन नागरिक असावा अशा अटी आहेत. १९७६ मध्ये अनेक आफ्रिकन देशांशी आर्थिक सहकार्याचे करार करण्यात आले आहेत.

व्यापार व अर्थकारण : ट्रिपोली हे देशातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. विरळ लोकसंख्या व वाहतुकीमधील अडचणी यांमुळे देशांतर्गत व्यापार मर्यादित स्वरूपाचा राहिला आहे. १९७८ मध्ये गडाफी यांनी वैयक्तिक व्यापार बंद करण्याची घोषणा केली १९७९ मध्ये खाजगी आयात-निर्यात   व्यपारावरही बंदी घातली. १९८१ मध्ये सर्व दुकाने बंद करून त्यांऐवजी विशेष बाजार सुरू करण्यात आले. त्यांतील विक्रीच्या मालाची खरेदी राज्यांकडून  केली जाई. सधारण डझनभर मूलभूत वस्तूंच्या किंमतींत सवलती देण्यात आल्या, तसेच अल्कोहॉलची विक्री थांबविण्यात आली. प्रतिवर्षी मार्चमध्ये आंतराष्ट्रीय व्यापारजत्रा ट्रिपोलीमध्ये भरते. ट्रिपोली व बेंगाझी येथे वाणिज्यमंडळे आहेत.

मोठ्या प्रमाणावरील खनिज तेल निर्यातीमुळे लिबियाचा आंतरराष्ट्रीय व्यापार अनुकूल संतुलनाचा होता.परंतु लिबियाच्या जास्त किंमतीच्या तेलाची मागणी कमी झाल्याने १९८० मध्ये असलेले १,२६५.१ कोटी डॉलरचे व्यापाराधिक्य कमी होऊन ते १९८१ मध्ये १९.२० कोटी डॉलरवर आले. येथील तेलातील गंधकाचे कमी प्रमाण व इराणच्या आखातामधील देशांपेक्षा औद्योगिक दृष्ट्या प्रगत पश्चिम यूरोपीय देशांकडे येथून तेल पाठविण्यासाठी येणारा कमी वाहतूक खर्च यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत लिबियाला अनुकूल असे फायदे मिळालेले आहेत. यंत्रे,खाद्यपदार्थ, बांधकामाचे साहित्य,वाहतूक साधने, कापड व निर्मिती वस्तू यांची हा देश आयात करतो. इटली, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जर्मनी, स्पेन, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, जपान या देशांशी लिबियाचा व्यापार चालतो. सर्वाधिक व्यापार इटलीशी चालतो. लिबियाचे १९८४ मधील एकूण निर्यातमूल्य १०.१ महापद्य डॉलर व आयातमूल्य ८.१ महापद्य डॉलर इतके होते. यांतील ९९ % निर्यातमूल्य खनिज तेल व खनिज तेल उत्पादनांचे होते.


 लिबियन दिनार (लि. दि.) हे देशांचे अधिकृत चलन असून १,००० दिरहॅमचा एक लिबियन दिनार होतो. १, ५, १०, २०, ५०, व १०० दिरहॅमची नाणी, तर २५० व ५०० दिरहॅमच्या आणि १, ५, १० दिनारच्या नोटा चलनात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ५०८.३७ दिरहॅम १ अमेरिकन डॉलर = २७०.६३ दिरहॅम आणि १०० लिबियन दिनार = १९६.७१ स्टर्लिंग पौंड = ३६९.५१ डॉलर असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८७). १९९० मध्ये तो १ अमेरिकन डॉलर =०.२९४८ लिबियन दिनार आणि १ स्टर्लिंग पौंड = ०.४८३३ लिबियन दिनार झाला.

‘नॅशनल बँक ऑफ लिबिया’ची स्थापना १९५५ मध्ये झाली. १९७२ मध्ये तिचे नाव ‘सेंट्रल बँक ऑफ लिबिया’ असे करण्यात आले. देशात असलेल्या सर्व परदेशी बँकांचे डिसेंबर १९७० मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. १९७२ मध्ये ‘लिबियन अरब फॉरिन बँके’ची स्थापना करण्यात आली. याशिवाय देशात राष्ट्रीय कृषी बँक (१९५७), औद्योगिक व स्थावर संपदा बँक (१९६५) या बँका आणि लिबियन विमा कंपनी व अल्-मुख्तार या विमाकंपन्या आहेत. अल्-मुख्तार विमा कंपनीला १९८० मध्ये लिबियन विमा कंपनीत सामावून घेण्यात आले.

देशात सर्वसाधारण खर्चासंबंधीचे (प्रशासकीय) व विकास खर्चासंबंधीचे, असे दोन अर्थसंकल्प असतात. यांपैकी विकास अर्थसंकल्प मोठा असतो. १९८५ चा प्रशासकीय अर्थसंकल्प १२० कोटी, तर विकास अर्थसंकल्प १७० कोटी लि. दि. चा होता. १९५८ च्या कायद्यानुसार तेलापासून मिळालेल्या एकूण महसुलापैकी १५% महसूल देशाच्या राखीव निधीकडे वर्ग करावा लागतो आणि ७०% विकास खर्चासाठी वापरावा लागतो. तेलाव्यतिरिक्त इतर बाबींपासून मिळालेला महसूल सर्वसाधारण खर्चासाठी वापरला जातो.तो कमी पडला, तर तेलापासून मिळालेला काही महसूल तिकडे वळविण्यात येतो. विकास अर्थसंकल्पासाठी जर महसूल कमी पडला, तर काही प्रकल्पांची उभारणी पुढे ढकलली जाते. १९६९ पासून देशात उद्गामी आयकर पद्धतीचा अवलंब केला जात आहे. तेलाचे उत्पादन व त्याची किंमत यावर आधारित तेल कंपन्यांकडून स्वामित्वशुल्क घेतले जाते. तेलकंपन्यासाठी आयकर दर ६५% होता(१९७८).

लिबियाच्या पहिल्या पंचवार्षिक विकास योजनेत (१९६३-६८) औद्यगिक उत्पादनवाढ तसेच कृषिसुधार व कृषिविस्ताराच्या अनेक योजना हाती घेण्यात आल्या होत्या. ही योजना ४७, ३६, ५८, ००० डॉलरची होती परंतु अयोग्य आर्थिक पाया व प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा यांमुळे १९६८ च्या अखेरीस यातील १९% विकास निधी वापराशिवाय तसाच शिल्लक राहिला. १९६९-७४ या दुसऱ्या  पंचवार्षिक योजनेत ३ महापद्म डॉलर आर्थिक व सामाजिक प्रकल्पांसाठी आणि १ महापद्म डॉलर लष्करी खर्चासाठी राखून ठेवण्यात आले होते. १९७६-८० ही विकास योजना ७.५० कोटी लि.दि.ची होती, परंतु प्रत्यक्षात ९.२५ कोटी लि.दि. इतका खर्च झाला. १९८१-८५ ची योजना १८.५ महापद्म लि.दि. ची होती. १९८९ चा विकास अर्थसंकल्प ११७.४ कोटी लि.दि. चा जाहीर करण्यात आला होता.

दळणवळण : ट्युनिशियाच्या सरहद्दीपासून ईजिप्तच्या सरहद्दीपर्यंत १,८२२ किमी. चा सर्वांत लांब असलेला देशातील राष्ट्रीय किनारी मार्ग ट्रिपोली व बेंगाझीवरून जातो. किनारी रस्त्यापासून फेझानकडेही एक महामार्ग गेलेला आहे. देशातील वाळवंटी मरूद्यानांसह सर्व महत्त्वाची नगरे व खेडी मोटारमार्गांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. देशांतर्गत रस्त्यांची एकूण लांबी २५,६७५ किमी. होती (१९८६). येथे ४,१५,५०९ प्रवासी मोटारगाड्या व ३,३४,४०५ व्यापारी वाहने होती (१९८२). लिबियात अद्याप लोहमार्ग नाहीत (१९८९). परंतु ट्रिपोली ते रास जेदिर यांदरम्यानचा १७० किमी. लांबीचा लोहमार्ग तयार करून देण्याबाबतचा एक करार १९८३ मध्ये चीनबरोबर झालेला आहे. लिबियन अरब एअरलाइन्स (एल्एए) ची स्थापना १९६५ मध्ये झाली. बेंगाझी व ट्रिपोली येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून रास लानूफ येथे नव्याने आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जात आहे. ट्रिपोली, बेंगाझी व पोर्ट ब्रेगा, मिझूराटा (मिस्त्राटा), सिद्रा, देर्ना व टोब्रुक ही देशातील प्रमुख बंदरे आहेत.

लिबियातील टपाल, दूरध्वनी व बिनतारी संदेशवहन-व्यवस्था शासकीय आहेत. ‘ सोशलिस्ट पीपल्स लिबियन अरब जामहिरीअ ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ कडून अरबी व इंग्रजीमधून नभोवाणी कार्यक्रम, तर अरबी, इंग्रजी, इटालियन व फ्रेंच भाषांमधून दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रसारित केले जातात. देशात ५,००,००० रेडिओ संच २,३५,३०० दूरचित्रवाणीसंच (१९८६) व १,०२,००० दूरध्वनिसंच होते (१९८२).

लोक व समाजजीवन : देशाचा विस्तृत असा कोरडा प्रदेश आणि पूर्व व पश्चिम लिबियातील भौगोलिक व ऐतिहासिक परिस्थितीतील भिन्नता, यांचा लिबियातील लोकजीवनावर परिणाम झालेला दिसून येतो. खनिज तेलाच्या शोधानंतर तर लोकजीवनात खूपच बदल झालेला दिसतो. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २.३ व्यक्ती अशी आहे. देशातील सु.९० टक्के लोकसंख्या अरुंद किनारपट्टीच्या प्रदेशातच एकवटलेली आहे. एकूण लोकसंख्येपैकी ७५.८% नागरी, तर २४.२% ग्रामीण लोकसंख्या आहे. पुरुषांचे प्रमाण ५१.०७%  व स्त्रियांचे प्रमाण ४८.९३% होते(१९८४). देशातील ७५% लोक शेती किंवा पशुपालन व्यवसायावर अवलंबून होते. खनिज तेल उत्पादन सुरू झाल्यानंतर रोजगाराच्या संधी शहराच्या ठिकाणी उपलब्ध होऊ लागल्या, त्यामुळे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे लोकांनी स्थलांतर सुरू केले. परिणामतः शेती व पशुपालन व्यवसायांत गुंतलेल्या लोकांचे प्रमाण कमी झाले.

देशातील ८९% लोक अरब व बर्बर वंशांचे आणि ११% लोक इतर वांशिक गटांचे होते(१९८४). हजारो वर्षांपासून लिबियात बर्बर लोकांची वस्ती आहे. फिनिशियन, कार्थेजियन, ग्रीक, रोमन, व्हँडाल व बायझंटिन लोकांनी लिबियाच्या किनारी प्रदेशात अनेकदा स्वाऱ्या करून हा प्रदेश काबीज केला. परंतु त्याचा वांशिक दृष्ट्या विशेष परिणाम झालेला दिसत नाही. इ. स. सातव्या शतकात येथे अरब लोक येऊ लागले. तेव्हा येथील पूर्वाधिकारी बर्बर लोकांनी स्थलांतर केले किंवा ते अरबांशी एकरूप झाले. फेझान प्रदेशात अरब, तुआरेग, बर्बर व दक्षिणेकडून आलेले कृष्णवर्णीय आफ्रिकन यांचे मिश्रण आढळते. पूर्व लिबियातील बहुतेक लोक अरब कुळातील व इतर प्रदेशांत अरब व बर्बर वंश परंपरांतील लोकांचे मिश्रण आढळते. इस्लाम हा देशातील अधिकृत धर्म असून ९७% लोक सुन्नी, तर केवळ ३% लोक इतर धर्मांचे होते (१९८२). सुमारे ४५,००० लोक ऑर्थडॉक्स, रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट  खिश्चन होते (१९८०). वसाहत-काळात येथील इटालियन लोकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ७०,००० होती ती १९६४ मध्ये ३०,००० वर घसरली. १९७० मध्ये त्यांच्या जमिनीचे व संपत्तीचे राष्ट्रीयीकरण झाले, तेव्हा त्यांतील बहुसंख्य लोक देश सोडून गेले. तसेच येथे ३०,००० ज्यू होते. (१९४८), परंतु अरब-इस्त्राएल यांच्यातील वादामुळे १९७३ पर्यंत सर्वांनी स्थलांतर केले. १९७९ मध्ये देशात अधिकृतपणे ४,४१,२०० लिबियनेतर होते. त्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक ईजिप्शियन, १५% ट्युनिशियन व बाकीचे आफ्रिकन, मध्यपूर्व आशियाई व इतर ठिकाणचे होते. बेकायदेशीर देशांतरामुळे येथील परकीयांची प्रत्यक्षातील संख्या अधिक असावी. १९८१ मध्ये सु. एक लाख लिबियनांना हद्दपार करण्यात आले. भटक्या जमातींचे स्थलांतर मात्र सतत चालू असते. कुरणांच्या शोधार्थ त्या आपल्या शेळ्या, मेंढ्या, उंट यांच्यासह स्थलांतर करीत असतात. दक्षिणेकडील भटक्या जमाती तर आंतरराष्ट्रीय सीमांची मर्यादा विचारातच घेत नाहीत. काही जमाती वाळवंटातील मरूद्यानांजवळ राहतात.


 कायद्याने कामगारांना वैद्यकीय वेतन, आजार, विकलांगता, मृत्यू, प्रसूति-लाभ, निवृत्ती-वेतन इ.लाभ मिळतात तसेच बेकारी भत्ताही दिला जातो. आजारी व विकलांग कामगारांना रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नफ्यातील भागीदारी, मोफत वैद्यकीय सेवा व शिक्षण, सवलतीच्या दरात अन्न इ. समाजकल्याणविषयक सुविधा पुरविल्या जातात.

देशातील १९८५-९० या काळातील दरहजारी जन्मदर ४३.९, मृत्यूदर ९.४ व नैसर्गिक वाढीचा दर ३४.५ होता. याच काळातील स्त्रियांची सरासरी जननक्षमता ६.९ मुले इतकी होती. कर्नल गडाफी यांनी स्त्रियांच्या विकासासाठी व्यापक प्रमाणावर उत्तेजन देण्याची घोषणा केली असली, तरी स्त्रियांवर अद्यापही परंपरागत कडक मुस्लिम बंधने असलेली आढळतात. १९७५-८० या कालावधीत स्त्रीने सरासरीने ७.४ मुलांना जन्म दिलेला आहे. केन्यामधील जननक्षमते खालोखाल ही जगातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक जननक्षमता आहे. फक्त मातेचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गर्भपातासच कायदेशीर मान्यता आहे. देशात १९८१ मध्ये ७४ रुग्णालये, १५,३७५ खाटा, ४,६९० डॉक्टर, ३१४ दंतवैद्य, ४२० औषधनिर्माते, १,०८० प्रसाविका व ५,३४६ परिचारिका होत्या. यांशिवाय १०० आरोग्यकेंद्रे व ७५० चिकित्सालये होती (१९८०). १९८५-९० च्या कालावधीतील सरासरी पुरुषांचे आयुर्मान ५९.१ वर्षे व स्त्रियांचे ६२.५ वर्षे आहे. हिवताप, विषमज्वर, क्षय आमांश व खुपरी ही मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. काही काळापूर्वी हिवताप ही एक प्रमुख समस्या होती, परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने हा रोग आटोक्यात आणला आहे. आरोग्यसेवा मोफत पुरविली जाते. बहुतांश ड़ॉक्टर परदेशी आहेत. जाचक धार्मिक रूढी व बंधने यांमुळे स्त्रियांना परिचर्याविषयक प्रशिक्षण घेता येत नाही.

वाढत्या नागरीकरणारोबर प्रमुख शहरांमध्ये गलिच्छ वस्त्या वाढू लागल्या व त्या अनुषंगाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. १९५४ पासून गलिच्छ वस्त्या काढून टाकणे व घरे  बांधून त्यांच्या निवाऱ्याच्या समस्या सोडविण्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. १९६९-७७ या काळात सु. १,२५,००० नवीन घरे बांधण्यात आली. परंतु अद्याप पूर्णपणे घरांची समस्या सोडविता आलेली नाही. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना शासनाकडून १०% किंमतीत तयार घरे खरेदी करण्याची किंवा बिनव्याजी कर्ज घेऊन स्वतःची घरे स्वतः बांधून घेण्याची सवलत आहे.

 

शिक्षण : स्वांतत्र्यसमयी लिबियातील ९०% लोकसंख्या निरक्षर होती व पदवीधरकांचे प्रमाण अत्यल्प होते. परिणामतः शासनाने शिक्षणावर बराच खर्च करण्यास सुरुवात केली. सर्व स्तरांवरील शिक्षण मोफत, तर ६ ते व १५ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी शिक्षण सक्तीचे केले. त्यामुळे निरक्षरतेचे प्रमाण १९७३ पर्यंत ६१ टक्क्यांवर (पुरुषांमध्ये ३८.७ % व स्त्रियांमध्ये ८५.२ %) आले. तर १९८५ पर्यंत ते ३३.१ टक्यांपर्यांत (पुरुषामंध्ये १८.६ % व स्त्रियांमध्ये ५०.२ %) खाली आले. प्रत्येकी सहा वर्षांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण असते. देशात कृषी, तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थाही आहेत. ट्रिपोली, बेंगाझी व पोर्ट ब्रेगा येथे विद्यापीठे आहेत. १९८२-८३ मध्ये देशातील २,७४४ प्राथमिक शाळांमध्ये ७,४१,५०२ विद्यार्थी व ४२,२०२ शिक्षक १,३५० पदवीपूर्व शाळांत २,३९,६७९ विद्यार्थी व २०,२९४ २०५ माध्यमिक शाळांत ६१,७३६ विद्यार्थी व ४,७५० शिक्षक ११७ शिक्षक प्रशिक्षण विद्यालयांत ३०,००२ विद्यार्थी व २,२८९ शिक्षक आणि ७८ तंत्र शाळांत २०,३६१ विद्यार्थी व १,५९४ शिक्षक होते. १९७६ मध्ये लिबिया विद्यापीठाचे ‘अल् फतेह विद्यापीठ’ असे, तर बेंगाझी येथील लिबिया विद्यापीठाचे ‘गारीयॅनस विद्यापीठ’ असे नामकरण करण्यात आले. त्यांशिवाय पोर्ट ब्रेगा येथे ‘ब्राइट स्टार युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉ लॉजी’ची स्थापना करण्यात आली आहे. (१९८२). अल् बेदा येथे इस्लामिक विद्यापीठ असून तेथे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते. या विद्यापीठाला व इस्लामिक शाळांना शासनाकडून अर्थसहाय्य मिळते.

भाषा व साहित्य : अरबी ही लिबियाची अधिकृत भाषा असली, तरी इंग्रजी व इटालियन भाषांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. परकीयांसह सर्वांच्याच दैनंदिन जीवनांत अरबीच्या वापरास प्रोसाहन देण्यासाठी १९६९ मध्ये लिबियन शासनाने एक आदेश काढला. शासकीय प्रसारणात इटालियन या दुसऱ्यार क्रमांकावरील भाषेचे स्थान आता इंग्रजीने घेतलेले आहे. बर्बर भाषा मुख्यतः ट्रिपोलिटेनियातील अल्पसंख्य समाजात बोलली जाते. बेंगाझी येथील सार्वजनिक ग्रंथालय (ग्रंथसंख्या ११,०००-१९८२), गारीयॅनस विद्यापीठातील ग्रंथालय (२,९४,८४४) व ट्रिपोलीमधील शासकीय ग्रंथालय (३५,५००) ही देशातील प्रमुख ग्रंथालये आहेत. ऑटोमन साम्राज्याखालील ट्रिपोलिटेनियाच्या इतिहासासंबंधीच्या असंख्य कागदपत्रांचा संग्रह ट्रिपोलीमधील राष्ट्रीय दप्तरखान्यात आढळतो. ट्रिपोली, बेंगाझी, शाहत, लेप्टिसमॅग्ना (लेब्द) व साब्रता (साब्रताह) येथे प्रमुख वस्तुसंग्रहालये आहेत ‘अल्-फज्र अल् जदिद’ व ‘अल्जिहाद’ ही दोन प्रमुख शासकीय दैनिके ट्रिपोली येथून प्रकाशित होतात.

कला व क्रीडा : लिबियन लोकांच्या सांस्कृतिक जीवनात प्रामुख्याने इस्लाम धर्म व संस्कृती यांचा पगडा स्पष्टपणे दिसतो. लोकांना घोड्यांच्या शर्यती व लोकनृत्ये यांची विशेष आवड दिसते. येथील संगीत अरबी धाटणीचे आढळते. पावा व ढोल या वाद्यांचा सर्रास वापर केला जातो. शासनाचे माहिती, शिक्षण, राष्ट्रीय मार्गदर्शन हे विभाग व अल्-फिक्र संस्था यांद्वारे शासन वेगवेगळ्या कलागुणांना उत्तेजन देते.

महत्त्वाची स्थळे : ट्रिपोली, बेंगाझी (लोकसंख्या ३,६८,०००-१९८१) व मीझूराटा (१,१७,०००) ही देशातील मोठी शहरे आहेत. राजधानी ट्रिपोली हे देशातील सर्वांत मोठे शहर, गजबजलेले बंदर व प्रमुख सांस्कृतिक केंद्र आहे. त्याशिवाय झावीआ ३९,३८२- १९७३, अल्-बेदा -३१,७९६, आजदाबीया- ३१,०४७, देर्ना- ३०,२४१, सेबहा- २८,७१४, टोब्रुक- २८,०६१, अल्-मार्ज- २५,१६६, झाल्टन- २१, ३४० ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. तसेच सिट्रा रास अल् ऊनुफ, मार्सा अल्, बूरायकाह एझ झ्वेटिन व मार्सा अल् हरिका ही शहरे नव्याने उदयास येत आहेत.

लिबियाच्या किनाऱ्यावरील उत्तम हवामान, विस्तीर्ण पुळणी आणि छानदार असे ग्रीक व रोमन अवशेष यांमुळे पर्यटक आकर्षिले जातात. १९८४ मध्ये एकूण १,००,००० पर्यटकांनी या देशाला भेट दिली. १९८० मध्ये पर्यटनव्यवसायापासून १२० लक्ष डॉलरचे उत्पन्न मिळाले. ७५% पेक्षा अधिक पर्यटक अरब देशांतील असतात. अरब देश वगळता इतर देशांतील पर्यटकांना प्रवेशपत्राची आवश्यकता असते. पारपात्र व प्रवेशपत्रासंबंधीची सर्व कागदपत्रे अरबी भाषेमधून पूर्ण करून द्यावी लागतात. पटकी व पीतज्वरग्रस्त प्रदेशांतून येणाऱ्यांना संबधित रोगाची लस टोचून घेणे आवश्यक असते. पर्यटनव्यवसायाच्या वाढीसाठी शासनाकडून ठोस प्रयत्न केले जात आहेत. 

चौधरी, वसंत


 लिबिया

लिबिया

हॉम्स बंदराजवळील खुल्या रोमन रंगमंदिराचे अवशेष


सहारा वाळवंटातील खनिजतेल संशोधन केंद्र    ट्रिपोलीजवळील मेंढपाळी