सेनेगल : रिपब्लिक ऑफ सेनेगल. पश्चिम आफ्रिकेतील एक देश. आफ्रिकेच्या पश्चिम भागातील जो फुगीर भाग आहे त्या किनारी भागात या देशाचे स्थान आहे. सेनेगलच्या उत्तरेस व ईशान्येस मॉरिटेनिया, पूर्वेस माली, दक्षिणेस गिनी बिसाऊ आणि गिनी, पश्चिमेस अटलांटिक महासागर आणि तेथेच किनाऱ्यापासून आत सेनेगलच्या सीमेलगत असलेला पट्टीवजा लांबट आकाराचा गँबिया देश आहे. देशाची ईशान्य सरहद्द सेनेगल नदीने तर पूर्व सरहद्द सेनेगलची उपनदी फालेमे नदीने निश्चित केलेली आहे. सेनेगलचे अगदी पश्चिम टोक असलेले केप व्हर्द भूशिर हा आफ्रिका खंडाच्या मुख्य भूमीचा सर्वांत पश्चिमेकडील भूभाग आहे. देशाच्या सरहद्दीची एकूण लांबी ३,१०१ किमी. असून त्याला अटलांटिक महासागराचा ५३१ किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. देशाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १२° उ. ते १७° उ. अक्षांश आणि ११° ३०’ प. ते १७° ३०’ प. रेखांश असा आहे. देशाचा आग्नेय–वायव्य विस्तार ६९० किमी. व ईशान्य–नैर्ऋत्य विस्तार ४०६ किमी. आहे. देशाचे क्षेत्रफळ १,९६,७२२ चौ. किमी., लोकसंख्या १,२९,६९,६०६ (२०१२ अंदाज) होती. अटलांटिक किनाऱ्यावर वसलेले डाकार (लोकसंख्या २७,७७,०००–२००९ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सेनेगलची भूमी बरीचशी सपाट आहे. सेनेगलच्या उत्तर किनाऱ्यावरील केप व्हर्द ते सेंट लूइस या भागात वालुकागिरी व पुळणी तर त्याच्या दक्षिण भागात चिखलयुक्त नदीमुख खाड्या आढळतात. केप व्हर्द भूशिर हा डोंगराळ व खडकाळ प्रदेश असून त्यामुळे डाकार या नैसर्गिक बंदराचे संरक्षण झालेले आहे. किनारपट्टीपासून अंतर्गत भागात वालुकामय मैदानी प्रदेश असून त्याचा विस्तार उत्तरेस सेनेगल नदीच्या पूरमैदानापर्यंत झालेला आहे. दक्षिणेकडील काझामांस हा प्रदेश गँबियामुळे सेनेगलच्या इतर मुख्य भागापासून काहीसा एकाकी झाला आहे. हा प्रदेश कमी उंचीचा असला तरी त्यात प्राकृतिक विभिन्नता आढळते. देशाचा आग्नेय भाग गिनीतील फूटा जालन पर्वत पायथ्याच्या टेकड्यांचा प्रदेश असून त्याची सर्वाधिक उंची ४९८ मी. आहे. सेनेगलचा फर्लो या नावाने ओळखला जाणारा वायव्येकडील बराचसा भाग निमओसाड आहे. सलूम नदीमुखाच्या दक्षिण भागात खारफुटीयुक्त दलदली वृक्ष आढळतात. देशाचा मध्य भाग व काझामांस वगळता उर्वरित दक्षिण भाग सॅव्हाना प्रदेशाने व्यापला आहे.

सेनेगल, सलूम, गँबिया व काझामांस ह्या देशातील प्रमुख नद्या आहेत. नद्या प्रामुख्याने पूर्व–पश्चिम वाहतात. यांपैकी सेनेगल नदीद्वारे सेनेगलची उत्तर सरहद्द निर्माण झालेली असून पोदॉरपर्यंत ती वर्षभर जलवाहतुकीस उपयुक्त असते. सलूम ही देशाच्या मध्यभागातून वाहणारी नदी व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची आहे. काझामांस ही अगदी दक्षिण भागातून वाहणारी नदी जलवाहतुकीस उपयुक्त आहे. सेनेगल व पुढे गँबियामधून वाहणारी गँबिया नदी हा अतिशय महत्त्वाचा नैसर्गिक जलमार्ग आहे.

सेनेगलमध्ये विविध मृदाप्रकार आढळतात. त्यांत गाळाची, निक्षालित मृदा, डायर व वालुकामय मृदा प्रमुख आहेत. देशात फॉस्फेट व लोहखनिजाचे मोठे साठे आहेत.

हवामान : देशांत बव्हंशी सूदानी प्रकारचे हवामान आढळते. देशाचे स्थान शुष्क वाळवंटी व आर्द्र उष्ण प्रदेशाच्या दरम्यान आहे. पश्चिमेस थीस शहर ते पूर्वेस फालेमे नदीचे खोरे अशी हद्द धरून याच्या उत्तरेस सेनेगल नदीपर्यंतचा पट्टा साहेल प्रदेशात येतो. हा संक्रमित निमशुष्क प्रदेश आहे. येथे ऋतुनुसार २८° ते ३८° से. यांदरम्यान तापमान असते. पश्चिमेकडील किनारी भागात ते कमी तर उत्तर भागात ते सर्वाधिक असते. पावसाळा जून–जुलै ते ऑक्टोबर असा असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान उत्तरेकडील साहेल प्रदेशात ३५ सेंमी., साहेलच्या दक्षिण भागात ९० सेंमी., तर अगदी दक्षिण भागात (गँबिया व काझामांस नद्यांदरम्यानच्या प्रदेशात) ९० ते १५२ सेंमी. असते. देशाच्या एकूण भूक्षेत्राच्या ३१ टक्के क्षेत्र अरण्यांखाली आहे. सरासरी पर्जन्यमानानुसार वनस्पतिजीवन भिन्नभिन्न आढळते. साहेल प्रदेशात जाडेभरडे गवत व विखुरलेली झुडुपे आणि काटेरी वनस्पती तर साहेलच्या दक्षिणेस सॅव्हाना (सूदानी) प्रकारचे वनस्पतिजीवन आढळते. दक्षिणेकडे वनाच्छादन दाट बनत जाते. काझामांस प्रदेशात दलदल व कच्छ वनश्री आढळते. नैर्ऋत्य भागात दलदली, कच्छ वनश्री व उष्ण प्रदेशीय वने आहेत. तेल्या ताड, बांबू, गोरखचिंच, आफ्रिकन साग इ. वृक्षप्रकार येथे आढळतात. अनेक प्रकारची माकडे, ससे, हरणे, हत्ती, सिंह, बिबळ्या, तरस, रानडुकरे, रानटी कुत्री इ. विविध प्रकारचे प्राणी आढळतात. नद्यांमध्ये मगरी, पाणघोडे व विविध प्रकारची कासवे आहेत. लावा व माळढोक हे पक्षी येथे आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात सोनिन्के लोकांच्या घाना साम्राज्याचा प्रभाव सेनेगलच्या प्रदेशावर होता. हे साम्राज्य सोने उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. नवव्या शतकात पश्चिम सेनेगलमध्ये तुकुलूर लोकांनी आपल्या राज्याची स्थापना केली. अकराव्या शतकात तुकुलूर लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. या लोकांची येथील प्रदेशावर अठराव्या शतकापर्यंत सत्ता होती.

पोर्तुगीजांनी इ. स. १४४४ मध्ये केप व्हर्द भूशिराला वळसा घातला व त्यानंतर सेनेगल किनाऱ्याचे समन्वेषण केले. फ्रेंचांनी सेनेगल नदीच्या मुखाशी एका व्यापारी ठाण्याची स्थापना केली (१६३८). त्यानंतर १६५९ मध्ये सेंट लूइसची स्थापना केली. येथील गॉरे बेट आधी डचांनी, मग पोर्तुगीजांनी व त्यानंतर १६७७ मध्ये फ्रेंचांनी ताब्यात घेतले. सतराव्या आणि अठराव्या शतकांत यूरोपीय सेनेगलहून गुलाम, गम अरेबिक (एक प्रकारचा डिंक), हस्तिदंत व सोने यांची निर्यात करीत असत. इ. स. १६९३-१८१४ या काळात सेनेगलच्या किनाऱ्याचा ताबा फ्रान्स व इंग्लंड यांनी आळीपाळीने घेतला. पॅरिस तहानुसार (१८१४) सेंट लूइस व गॉरे बेट यांचा ताबा फ्रान्सला मिळाला. फ्रेंचांनी ल्वी-लेऑन फेदेर्ब याच्या नेतृत्त्वाखाली आपल्या राज्याचा विस्तार अंतर्गत भागात केला. तसेच तुकुलूर साम्राज्याचा विस्तारही रोखून धरला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सेनेगलमधील काही रहिवाशांनी फ्रेंच नागरिकत्व मिळविले. १८९५ मध्ये सेनेगल हा फ्रेंच पश्चिम आफ्रिकेचा एक भाग बनला. डाकार हे राजधानीचे ठिकाण बनले (१९०२).

सेनेगलमधील सर्व रहिवासी फ्रेंच नागरिक झाले (१९४६) आणि ही वसाहत फ्रान्सचा सागरपार प्रांत बनली. फ्रेंच समुदायांतर्गत हे स्वायत्त प्रजासत्ताक झाले (१९५८). २० जून १९६० रोजी सेनेगल हा माली फेडरेशनचा एक घटक म्हणून स्वतंत्र झाला. २० ऑगस्ट १९६० रोजी फेडरेशन बरखास्त करण्यात आले. सेनेगलच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे लिओपोल्ड सेदार सांगॉर यांची ५ सप्टेंबर १९६० रोजी या स्वतंत्र देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवीन संविधान १९६३ मध्ये अंमलात आले. १९९८ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आल्या. पुढे ७ जानेवारी २००१ रोजी घेतलेल्या जनमतनिर्देशानुसार नवीन संविधान स्वीकारण्यात आले. या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांना सर्वोच्च अधिकार देण्यात आले, उच्च सभागृह (सीनेट) बरखास्त केले आणि स्त्रियांना पहिल्यांदाच जमीन धारण करण्याचा हक्क देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. सार्वत्रिक मतदानाने त्यांची पाच वर्षांसाठी निवड केली जाते. एकव्यक्ती जास्तीतजास्त दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदी राहू शकते. राष्ट्राध्यक्ष पंत-प्रधानांची तर पंतप्रधान राष्ट्राध्यक्षांच्या सल्ल्यानुसार मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करतात.

सेनेगलमध्ये द्विसदनी विधानमंडळ आहे. त्यांपैकी राष्ट्रीय सभेमध्ये असलेल्या एकूण १५० सदस्यांपैकी ९० सदस्यांची साध्या बहुमताने पाच वर्षांसाठी तर ६० सदस्यांची प्रमाणशीर प्रतिनिधित्व मतदान पद्धतीने निवड केली जाते. जानेवारी २००७ मध्ये सीनेटची पुनःथापना करण्यात आली. सीनेटमध्ये १०० सदस्य असतात. त्यांपैकी ३५ सदस्य अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने निवडले जातात तर ६५ सदस्यांची राष्ट्राध्यक्ष नेमणूक करतात. देशात बहुपक्षीय राज्यव्यवस्था असून सोशालिस्ट पार्टी ऑफ सेनेगल आणि सेनेगलीज डेमॉक्रॅटिक पार्टी हे दोन प्रमुख पक्ष आहेत. देशातील निवडक व्यक्तींना राष्ट्रसेवेकरिता दोन वर्षांसाठी लष्करात दाखल व्हावे लागते. लष्करातील एकूण सैन्यापैकी ८,००० सैन्यदलात, ६०० नौसेनेत तर ८०० हवाई दलात अशी सैन्य संख्या होती (२००२).

आर्थिक स्थिती : सेनेगल हा विकसनशील देश असून अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मर्यादित प्रमाणात आर्थिक विकास साधला असला तरी अधूनमधून येणाऱ्या अवर्षणाच्या स्थितीचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. महत्त्वाकांक्षी आर्थिक सुधारणा कार्यक्रम १९९४ मध्ये हाती घेण्यात आला. पश्चिम आफ्रिकी आर्थिक व मुद्रा संघटनेचा हा सदस्य देश आहे. एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी १५·४ टक्के उत्पादन शेतीतून, २२·६ टक्के उद्योगांतून आणि ६१·९ टक्के सेवाव्यवसायांतून मिळाले (२०११). शेजारील इतर पश्चिमी आफ्रिकी देशांच्या तुलनेत सेनेगलमध्ये सामाजिक व राजकीय स्थिरता असून आर्थिक विकास सावकाश परंतु स्थिर स्वरूपात घडून येत आहे. पर्जन्यातील अनियमितपणामुळे जलसिंचनाची गरज भासते. एकूण कामकरी लोकांपैकी ७३·१ टक्के कृषी व्यवसायात गुंतले होते. मशागती क्षेत्र सु. २·४६ द. ल. हेक्टर, कायम पिकांखाली ४६,००० हे. आणि जलसिंचनाखाली ७१,००० हे. होते (२००२). २००८ मध्ये प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन ००० टनांत) : ऊस ८९०, भुईमूग शेंग ५६६, ज्वारवर्गीय धान्य ८१०, कलिंगड २२४, तांदूळ २५५, ज्वारी १४४, कसाव्हा ४०६, मका ९८, कांदा १४२, आंबा ७३.

देशात २००६ मध्ये पशुधन व प्राणिज उत्पादने पुढीलप्रमाणे होती : पशुधन – मेंढ्या ४·६२ द. ल., शेळ्या ३·९७ द. ल., गुरे ३·०२ द. ल., घोडे ५ लाख, गाढवे ४ लाख व डुकरे ३,०३,०००. प्राणिज उत्पादने (उत्पादन ००० टनांत) – गोमांस (बीफ व व्हील) ४३, शेळ्यांचे मांस १७, मेंढ्यांचे मांस १५, डुकराचे मांस १०, घोड्याचे मांस ७, कोंबड्यांचे मांस ६४, गाईचे दूध ९२, शेळ्यांचे दूध १७, मेंढ्यांचे दूध १६, अंडी ३३. लाकडी ओंडक्यांचे उत्पादन ६ द. ल. घ. मी. झाले. एकूण मत्स्योत्पादन ४,०५,०७० टन असून त्यापैकी ८८ टक्के सागरी मासेमारीतून व १२ टक्के गोड्या पाण्यातील मासेमारीतून झाले (२०१०).

कृषी मालावरील प्रक्रिया, मत्स्यप्रक्रिया, फॉस्फेटाचे उत्खनन, खनिज तेल शुद्धीकरण, शेंगदाणा तेल निर्मिती, वस्त्रोद्योग, सौम्य पेये, साखर, दुग्धजन्य पदार्थ, सिगारेटी, बांधकामाचे साहित्य निर्मिती हे येथील प्रमुख उद्योग आहेत. कॅल्शियम फॉस्फेटचे उत्पादन १·५ द. ल. टन व चुनखडीचे उत्पादन १५,८८,००० टन झाले (२००३). सोन्याचे वार्षिक उत्पादन सु. ६०० किग्रॅ. असून ब्रिटिश, कॅनडा व ऑस्ट्रेलियन सोने समन्वेषण कंपन्या येथे कार्यरत आहेत. विद्युत्शक्ती उत्पादन २·३५ महापद्म किवॉ. तास झाले (२००४). पर्यटन व्यवसायापासून देशाला २६९ द. ल. अमेरिकी डॉलर महसूल मिळाला (२००३). सेनेगलला सु. ३,६३,००० परदेशी पर्यटकांनी भेट दिली (२००४).


फ्रँक सीएफए हे देशातील अधिकृत चलन आहे. मध्यवर्ती बँकेकडून चलन निर्गमित केले जाते. येथे इस्लामिक बँक आणि काही व्यापारी व विकास बँका आहेत. बँकेच्या खातेदारांची संख्या अगदी अल्प आहे. देशाचे अंदाजपत्रक ९५५·८ अब्ज फ्रँक सीएफए महसुलाचे व १,०८४·४ अब्ज फ्रँक सीएफए खर्चाचे होते (२००५). एकूण आयात व निर्यात मूल्य अनुक्रमे २,४९५·८ द. ल. व १,५०९·४ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२००४). खाद्यपदार्थ, मद्य, भांडवली वस्तू यांची आयात तर मासे, भुईमूग शेंग, खनिज तेल उत्पादने, फॉस्फेट व कापूस यांची निर्यात केली जाते. फ्रान्स, नायजेरिया, थायलंड, जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, भारत, ग्रीस, माली, इटली या देशांशी आयात-निर्यात व्यापार चालतो.

सेनेगलमधील रस्त्यांची एकूण लांबी १४,००८ किमी. असून त्यांपैकी ४,०९९ किमी. लांबीचे रस्ते पक्के होते (२०१२). लोहमार्गांची लांबी ९०६ किमी. होती (२०१२). डाकार येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. एअर सेनेगल इंटरनॅशनल ही प्रमुख हवाई वाहतूक कंपनी आहे. डाकार हे प्रमुख सागरी बंदर आहे. सेनेगल नदीचा सेंट लूइस ते पोदॉरपर्यंतचा ३६३ किमी. लांबीचा प्रवाह बारमाही तर केझपर्यंतचा ९२४ किमी. लांबीचा प्रवाह जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत वाहतुकीस खुला असतो. सलूम नदी काऊलाकपर्यंत तर काझामांस नदी झीगेंशॉरपर्यंत वाहतुकीस उपयुक्त आहे.

लोक व समाजजीवन : सेनेगलमध्ये वॉलॉफ ४३%, सेररे १४·७%, फुलानी १६%, तुकुलूर ९%, दिओला ९%, बांबारा ६%, यांशिवाय मालिंके व सराकोल हे प्रमुख तसेच काही लहान वांशिक गटाचे लोक येथे राहतात. सुमारे ९४ टक्के लोक इस्लाम सुन्नी पंथीय आहेत (२०११). उर्वरितांमध्ये ख्रिश्चन (मुख्यत: रोमन कॅथलिक) धर्मीयांचे आधिक्य आहे. अधिकृत भाषा फ्रेंच असून वॉलॉफ भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. एकूण लोकसंख्येत स्त्रियांची संख्या ६६,९७,१६४ होती (२०१२). लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ६७ व्यक्ती अशी असून ५८% लोक ग्रामीण भागात रहात होते. (२०१२).

दर हजारी जन्मदर ३६·१९, मृत्युदर ९·०५ (२०१२) असून वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर २·५% होता (२००१-११). बालमृत्युमान दर हजारी ३·७ होते (२०१०). सरासरी आयुर्मान पुरुषांचे ५८·२२ वर्षे तर स्त्रियांचे ६२·१९ वर्षे होते. सरासरी प्रसूतिमान प्रती स्त्री ४·६९ अपत्ये असे होते. एकूण लोकसंख्येपैकी सु. ५४% लोक दारिद्य्ररेषेखालील होते (२०१२).

देशात ६ ते १२ वयोगटातील प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक, सक्तीचे व मोफत आहे. सुमारे ६०% मुले प्राथमिक विद्यालयांत; तर सु. २०% माध्यमिक विद्यालयांत दाखल होतात. प्रौढ साक्षरतेचे सरासरी प्रमाण ३९·३% असून ते पुरुषांमध्ये ५१·१% तर स्त्रियांमध्ये २९·२% होते (२००३). देशातील ६,०६० प्राथमिक विद्यालयांत ३२,०१० शिक्षक व १३,८२,७४९ विद्यार्थी, तर माध्यमिक विद्यालयांत ३,५५,७३२ विद्यार्थी होते (२००३–०४). चेइख अँता दिऑप, गॅस्टन बर्जर, डाकार बोर्गिबा व साहेल येथे विद्यापीठे आहेत. याशिवाय उच्च शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आहेत.

शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्यविषयक स्थिती बरीच असमाधानकारक आहे. देशातील बहुतांश डॉक्टर व वैद्यकीय सुविधा डाकारमध्ये आढळतात. २००१ मध्ये २२ रुग्णालये, ५८ आरोग्य केंद्रे, ८८८ आरोग्य ठाणी व ४११ ग्रामीण प्रसूतिगृहे होती. एकूण ६४९ डॉक्टर, ९३ दंतवैद्यक व ५८८ प्रसविका होत्या (१९९६). येथून पाच दैनिक वृत्तपत्रे व १३९ नियतकालिके प्रसिद्ध होत होती (१९९८).

सेनेगल हे सामाजिक व धार्मिक दृष्ट्या मुख्यत: मुस्लिम राष्ट्र असले तरी सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्रीय असून त्यांच्या विकासात किंवा हक्कांत कोणतेही कायदेशीर अडथळे येत नाहीत. सोशालिस्ट पार्टी या वर्चस्व असलेल्या पक्षासह इतर राजकीय पक्षांतही स्त्रिया सक्रीय आहेत. शासकीय व खाजगी क्षेत्रांत तसेच डाकार विद्यापीठात प्राध्यापक म्हणून, स्त्रिया मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. स्त्रियांना आपले हक्क मिळवून देणे व ते अबाधित राखणे यासाठी अनेक संघटना कार्यरत आहेत. उदा., फेडरेशन ऑफ विमेन्स राइट्स. धर्माला अनुसरून येथे लोकविद्या व पुराणकथा आढळतात. स्वतंत्र सेनेगलचे पहिले राष्ट्राध्यक्ष लिओपोल्ड सांगॉर हे स्वत: कवी, तत्त्वज्ञ व मुत्सद्दी होते.

महत्त्वाची स्थळे : डाकार या राजधानीच्या ठिकाणाशिवाय थीस (लोक. ३,२०,०००), रूफीस्क (१,८७,२०३) काउलाक (१,७२,३०५), सेंट लूइस (१,५४,५५५), म्बोरो (१,७०,६९९) आणि झीगेंशॉर (१,६२,४३६) ही महत्त्वाची शहरे आहेत. युनेस्कोने सेनेगलच्या किनाऱ्याजवळ असणाऱ्या गॉरे बेटाचा समावेश जागतिक वारसा स्थळांत केला आहे (१९७८). पूर्वी येथे आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील गुलामांच्या व्यापाराचे एक मोठे केंद्र होते. सेनेगलच्या त्रिभुज प्रदेशातील जोदज अभयारण्यात सु. १·५ द. ल. पक्ष्यांचे संवर्धन केले आहे या अभयारण्याचा आणि गँबिया नदीतीरावरील निओकोलोकोबा राष्ट्रीय उद्यानाचा १९८१ मध्ये जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला. त्यात डर्बी एलंड (सर्वांत मोठी हरणे), चिंपँझी, सिंह, चित्ता, हत्ती तसेच विविध प्रकारचे पक्षी, सरपटणारे व उभयचर प्राणी आढळतात. (चित्रपत्र).

चौधरी, वसंत


सेनेगल
डाकार शहराचे एक दृश्यपारंपरिक वेशभूषेतील फुलानी पुरुष
गुलामगिरी उच्चाटनाचे जागतिक स्मारक : गॉरे बेट.तूबा येथील प्रसिद्ध मशीद.