नायजेरिया : अधिकृत नाव फेडरल रिपब्‍लिक ऑफ नायजेरिया. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वांत मोठा देश. क्षेत्रफळ ९,२३,७७३ चौ. किमी. लोकसंख्या ७,९८,००,००० (१९७३). ऑगस्ट १९७५ मध्ये १९७३ च्या जनगणनेचा आकडा अविश्वसनीय ठरविण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजाप्रमाणे नायजेरियाची लोकसंख्या १९७३ मध्ये ५,९५,८२,००० १९७४ मध्ये ६,१२,१९,००० व १९७५ मध्ये ६,२९,२५,००० होती. विस्तार २° ३० पू. ते १४° ३० पूर्व व ४° ३० उ. ते १४° १७ उ. यांदरम्यान. याच्या उत्तरेला नायजर, पूर्वेला कॅमेरून व पश्चिमेस बेनिन प्रजासत्ताक (दाहोमी) हे देश असून दक्षिणेस अटलांटिक महासागराचे गिनीचे आखात व ईशान्येस चॅड सरोवर आहे. याची पूर्व-पश्चिम लांबी १,१२६·५ किमी. आणि दक्षिणोत्तर लांबी १,०५० किमी. आहे. लागोस ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : नायजेरिया हा आफ्रिकी पठाराच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे उतरत गेलेला भाग आहे. त्यात ६१० मी. ९१५ मी. व १,२२० मी. उंचीचे भाग आहेत. चॅड सरोवरी प्रदेश व सोकोटो नदी प्रदेश यांप्रमाणेच किनारी प्रदेश मऊ, अर्वाचीन खडकांचा ऊर्मिल प्रदेश आहे. पश्चिमेकडे व उत्तरेकडे प्राचीन कठीण खडकांचा, मधूनमधून द्वीपगिरी असलेला उंचावरील मैदानी प्रदेश आहे. पूर्वेकडील ॲडामावाचा उंच डोंगराळ प्रदेश व ऊडी पठारी प्रदेश आणि उत्तरेकडील जॉस व ब्यू पठारी प्रदेश हे नायजेरियातील महत्त्वाचे डोंगराळ प्रदेश आहेत. या देशाचा उत्तरेकडील भाग सहारा वाळवंटाला लागून आहे. नायजर ही आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाची नदी नायजेरियात वायव्येकडून प्रवेश करते व नैर्ऋत्येकडून वाहत जाऊन गिनीच्या आखाताला त्रिभुज प्रदेशातील अनेक फाट्यांनी मिळते. तिची महत्त्वाची उपनदी बेन्वे ही समुद्रापासून सु. ५४५ किमी. वर लोकोजा येथे नायजरला मिळते. नायजेरियातील नायजरच्या इतर प्रमुख उपनद्या सोकोटो व काडूना या आहेत. मध्यभागातील जॉस पठारावरून निघणाऱ्या कोमाडूगू व हडेजीया या नद्या चॅड सरोवराला मिळतात.

हवामान : नायजेरिया हा उष्ण कटिबंधात असला, तरी तेथे आग्‍नेयीकडे उष्णकटिबंधीय दमट, उत्तरेकडे व पश्चिमेकडे उष्णकटिबंधीय सॅव्हाना प्रकारचे व अतिउत्तरेकडे कोरडे स्टेप प्रकारचे हवामान आढळते. दक्षिणेकडे पावसाळा मार्च ते नोव्हेंबरपर्यंत असून त्यांत ऑगस्ट कोरडा जातो. उत्तरेकडे मेच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. दक्षिणेकडे हवामान सम व सौम्य क्वचितच ३२° से. पेक्षा जास्त, तर उत्तरेकडे ते विषम होत जाते. तेथे मध्यान्हीचे तपमान ३८° से. पर्यंतही जात असले, तरी रात्री मात्र थंड असतात. जॉस पठारावर तपमान कमी असते. तपमानाप्रमाणे पर्जन्यमानातही विविधता आढळते. पश्चिमेकडील सरासरी पर्जन्यमान १७५ सेंमी. आहे, तर पूर्वेस ते ४२५ सेंमी. पर्यंत वाढत असून अंतर्गत भागात ते कमी होते. काही ठिकाणी १२५ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. अगदी उत्तरेस सहारा वाळवंटाच्या बाजूस पर्जन्यमान केवळ ५० सेंमी. आहे. किनारी प्रदेशात तपमानापेक्षा आर्द्रतेमुळेच हवामान असह्य होते.

येथे वाऱ्याचे दोन प्रमुख प्रकार आढळतात. एक हरमॅटन – हे उष्ण व अतिकोरडे वारे सहारा वाळवंटाकडून वाहत येतात. ते उत्तरेकडे तीन महिने, तर दक्षिणेकडे फक्त दोन आठवडे वाहतात. त्यांच्याबरोबर तांबडी व बारीक धूळ आणि रेती वाहत येते. या वाऱ्यांमुळे दिवसा तपमान खूप वाढते व रात्री कमी होते. वनस्पती शुष्क होणे, झाडाझुडुपांस आगी लागणे, माणसाची कातडी शुष्क व रुक्ष होऊन तिला भेगा पडणे इ. परिणाम या वाऱ्यांमुळे दिसून येतात. दुसरे विषुववृत्तीय सागरी वारे हे पाऊस आणणारे नैर्ऋत्य मोसमी वारे असून ते अटलांटिक महासागरावरून वाहतात. या दोन प्रमुख वाऱ्यांवर देशातील हवामान अवलंबून असते.

वनस्पती व प्राणी : नायजेरियातील वनस्पती संपूर्णपणे हवामानावर अवलंबून आहेत. त्यामुळे दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्व-पश्चिम गेलेले वनस्पतिपट्टे दिसतात. किनाऱ्याजवळ १६ ते ९६ किमी. रुंदीचे खारफुटी व दलदली जंगल असून त्यापलीकडे ८० ते १६० किमी. रुंदीची विषुववृत्तीय वर्षावने आहेत. त्यांत तेल्या ताड, सापेली, मॉहॉगनी, इरोको, ओबिची इ. वृक्ष उंच वाढतात. आग्‍नेयीकडील प्रदेशात मूळचे अरण्य नाहीसे झाले असून तेथे फक्त पामची झाडे दिसतात. वेस्टर्न व मिड वेस्टर्न प्रदेशांत कोको व रबर यांच्या लागवडी केलेल्या आहेत. अरण्य-पट्ट्याच्या उत्तरेस मधूनमधून चिंच, गोरखचिंच, लोकस्टबीन इ. झाडे असलेला सॅव्हाना गवताळ प्रदेश आहे. तो उत्तरेकडे विरळ, खुरट्या झाडांचा व बुटक्या गवतांचा होत जातो. चॅड सरोवराकडे बाभळीसारखी झाडे, मरुसदृश वनस्पती आणि नद्यांकाठी चिंचोळा झाडी प्रदेश आढळतो.

येथील जंगलांत बऱ्याच प्रकारचे प्राणी आढळतात. गोरिला, चिंपँझी यांप्रमाणे इतर माकडेही सापडतात. निरनिराळे साप, मगर, सुसर व नद्यांत मासे भरपूर सापडतात. नायजेरियात अनेक प्रकारचे काळवीट आहेत. पाणघोडा, हत्ती, जिराफ, सिंह हे क्वचित कोठेकोठे आढळत असून त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चित्ता, रानमांजर, गवत खाणारा उंदीर, खारी, सायाळ यांची संख्या भरपूर आहे. येथे घार, गिधाड, लावा, पोपट इ. विविध पक्षी आणि फुलपाखरे, कीटक, मोठमोठे विंचू, माशा इ. प्राणीही विपुल आहेत.

इतिहास : इंग्रजांच्या राजवटीपूर्वीचा नायजेरियाचा इतिहास विशेष उपलब्ध नाही. मध्ययुगात नायजेरियाचा संबंध पश्चिम सूदानीय (घाना, सोंघाई इ.) राज्यांशी होता. सहाराच्या पलीकडे असणाऱ्या भूमध्य सागरीय प्रदेशांशीही त्याचे संबंध होते. पंधराव्या शतकापर्यंत नायजेरियावर इस्लामी धर्माचा भरपूर प्रभाव पडला होता. कानो हे इस्लामी धर्मशास्त्राचे शिक्षण देणारे एक केंद्र होते, तसेच ते एक व्यापारी केंद्र म्हणून नावाजलेले होते. इंग्रज येण्यापूर्वी उत्तर नायजेरियात हा व्यापारदृष्ट्या पुढारलेला भाग होता. याचा उत्तर व पूर्व आफ्रिकेशी व्यापारी संबंध होता. विणलेले कापड, लोखंडाच्या निरनिराळ्या वस्तू या भूमध्य सागरी प्रदेशापर्यंत जात होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला फुलानी शेख याने ‘जिहाद’ किंवा पवित्र युद्ध केले. उथमान डॅन फोडिओ याने हौसा राज्याचा बीमोड करून फुलानी साम्राज्य प्रस्थापित केले. इंग्रजांचे आधिपत्य येईपर्यंत हे राज्य अस्तित्वात होते.


गुलामांचा व्यापार सुरू झाल्याने किनाऱ्यावरील लोक आणि यूरोपीय यांचा संबंध आला. गुलामांचा व्यापार सुरू करणारे पहिले यूरोपीय म्हणजे पोर्तुगीज होत (१४७२). त्यानंतर तीन शतकांपर्यंत जवळजवळ सगळ्याच मोठमोठ्या यूरोपीय देशांनी या व्यापारात भाग घेतला. नायजेरियाच्या किनाऱ्यावर गुलामांचा व्यापार चालत असल्यामुळे त्याला गुलामांचा किनारा म्हणून ओळखत असत. काही स्थानिक लोकच इतर लोकांना पकडून गुलाम म्हणून विकत असत. १८०७ मध्ये इंग्रजांनी गुलामांचा व्यापार बंद केला व तो इतरांनीही बंद करावा यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे इतर व्यापाराची हळूहळू भरभराट होऊ लागली. नायजर नदीचा मार्ग सापडल्यामुळे व्यापाराची अधिकच प्रगती झाली, कारण तिचा उपयोग जलमार्गासाठी करीत असत. इंग्रजांनी नायजेरियात आपले आधिपत्य हळूहळू प्रस्थापित केले. उष्ण कटिबंधात आढळून येणाऱ्या निरनिराळ्या रोगांमुळे प्रगती फार हळूहळू होणे साहजिक होते. क्किनीन (कोयनेल) चा वापर सुरू झाल्यानंतर मात्र प्रगतीचा वेग वाढला. १८६१ मध्येच इंग्रजांनी लागोस बेट जिंकले आणि त्याबरोबरच ताड तेलाचा व्यापारही त्यांच्या हातात आला. नंतर हळूहळू त्यांनी आपला प्रभाव योरूबा लँडचा मुख्य भाग आणि आजूबाजूच्या इतर प्रदेशांत पसरविला. तेथेही अंतर्गत दुहीचा त्यांना फायदा मिळाला. १८८५ नंतर इंग्रजांच्या आधिपत्याखालील पूर्व किनाऱ्यावरील प्रदेशाला ऑइल रिव्हर प्रोटेक्टरेट हे नाव देण्यात आले. हा भागदेखील अंतर्गत नायजेरियापर्यंत वाढविण्यात आला व १८९३ मध्ये नायजर कोस्ट प्रोटेक्टरेट म्हणून तो भाग इंग्रजांकडे राहिला.

नायजेरियाचा मध्यभाग इंग्रजांच्या ताब्यात आणण्याचे काम सर जॉर्ज गोल्डी या इंग्रज गृहस्थाने केले. याने १८८५ मध्ये आफ्रिकेतील काही जबाबदार अधिकाऱ्यांशी करार करून येथील व्यापारी स्पर्धा नष्ट केली. बर्लिनमध्ये झालेल्या सभेत इंग्रजांनी आपले नायजेरियावरील आधिपत्य यूरोपीय राष्ट्रांकडून मान्य करून घेतले. यामुळे इंग्रजांची सत्ता उत्तर नायजेरियावरही प्रस्थापित झाली आणि हळूहळू संपूर्ण उत्तर नायजेरिया इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला. एकोणिसाव्या शतकात संपूर्ण नायजेरिया इंग्रजांचा विश्वस्त प्रदेश म्हणून राहिला.

येथे १९१४ मध्ये ब्रिटिशांची एक वेगळी वसाहत निर्माण झाली. तिचा राज्यकारभार इंग्रजांच्या हाती होता. प्रथम सर फ्रेडरिक लुगार्ड व नंतरचा लॉर्ड लुगार्ड हा गव्हर्नर होता. त्यांच्यात इंग्रजांच्या विभागातील वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी तेथे स्थानिक लोकांच्या हातून राज्यकारभार चालविण्यास सुरुवात केली. स्थानिक लोकांना राज्यकारभारात वाव देण्याच्या उद्देशामुळे तेथील जुन्या राजकीय संस्था तशाच राहिल्या व त्यांचा उपयोग नवीन सरकारला आपल्या हितासाठी करता आला. अशा प्रकारची राज्यव्यवस्था उत्तर नायजेरियात उत्तम प्रकारे चालली, पश्चिम नायजेरियात साधारण बरी चालली, पण पूर्व नायजेरियात मात्र तीत अपयश आले. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्याची मागणी होऊ लागली व त्यांनी काही काळापुरते एक संविधान तयार केले. १९५४ च्या संविधानानुसार नायजेरियात संघराज्यात्मक सरकार स्थापन करण्यात आले. मे आणि जून १९५७ मध्ये भरलेल्या सभेत पूर्व व पश्चिम भागांत स्वायत्त प्रादेशिक सरकारे असावीत असे ठरले. १९५९ च्या ठरावानुसार उत्तर नायजेरियालाही स्थानिक सरकार देण्यात आले. १९५८ मध्ये इंग्रज वसाहतीच्या सचिवाने घोषणा केली की, १ ऑक्टोबर १९६० पासून नायजेरियाला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात येईल आणि नायजेरिया हा राष्ट्रकुलाचा संपूर्ण स्वतंत्र असा सभासद समजला जाईल.

१ ऑक्टोबर १९६० रोजी नायजेरियाचे संघराज्य म्हणून देश स्वतंत्र होऊन १९६३ मध्ये नायजेरिया प्रजासत्ताकाची स्थापना झाली. पूर्वी जर्मन आधिपत्याखाली असलेला उत्तर कॅमेरून हा भाग १९६१ मध्ये या देशात आला. परंतु उत्तर विभागामध्ये देशाचे दोनतृतीयांश क्षेत्र व निम्म्याहून अधिक लोकसंख्या येत होती. अशा प्रकारच्या असंतुलत्वामुळे वारंवार अडचणी निर्माण होऊ लागल्या. १५ जानेवारी १९६६ रोजी संघराज्याचे प्रधानमंत्री व अर्थमंत्री, उत्तर नायजेरिया व पश्चिम नायजेरियाचे मुख्य मंत्री आणि अनेक लष्करी अधिकारी यांची हत्या करून २५ लष्करी अधिकाऱ्यांनी अवचित सत्तांतराने शासनाचा ताबा घेतला, पण १७ जानेवारीला लष्करप्रमुख मेजर जनरल इरोन्सी याने बंडाळी थांबवून आपल्या हाती सत्ता घेतली. संविधान तहकूब करून सर्व राजकीय पक्ष व टोळीसंस्था नष्ट करण्यात आल्या. २४ मे रोजी राज्याच्या विभागांऐवजी प्रांत करण्यात आले व संघराज्याऐवजी प्रजासत्ताक हे नाव देण्यात आले. २९ जुलैला इरोन्सीला पदभ्रष्ट करून लेफ्टेनन्ट कर्नल गॉवॉन सत्ताधारी झाला. राष्ट्रीय लष्करी प्रशासनाऐवजी पुन्हा संघराज्यीय लष्करी प्रशासन आले. प्रांतांचे पुन्हा विभाग झाले. लागोसच्या राज्यप्रदेशाचा पुन्हा संघराज्य प्रदेश झाला. २७ मे १९६७ रोजी संघीय प्रजासत्ताकाची वेस्टर्न, नॉर्थ ईस्टर्न, सेंट्रल ईस्टर्न, कानो, नॉर्थ वेस्टर्न, साउथ ईस्टर्न, नॉर्थ सेंट्रल, बेन्वे प्लॅटो, मिड वेस्टर्न, क्कार, रिव्हर्स आणि लागोस अशी बारा राज्ये करण्यात आली. ३० मे रोजी पूर्वेकडील राज्याचा लष्करी राज्यपाल ओजुक्‍वू याने बीआफ्रा प्रजासत्ताक या नावाने वेगळे स्वतंत्र राज्य घोषित केले. ३ ऑगस्टला त्याने मिड वेस्टर्न राज्य घेतले. परंतु लवकरच संघसैन्याने ते परत घेतले. एप्रिल १९६८ पर्यंत बहुतेक फुटीर प्रदेश परत काबीज झाला आणि जानेवारी १९७० मध्ये कर्नल एफिआँगकडे संघसैन्याला शरण जाण्याचे काम सोपवून ओजुक्‍वू देश सोडून पळून गेला. २९ जुलै १९७५ रोजी गॉवॉनची सत्ता झुगारून देऊन ब्रिगेडिअर (नंतर जनरल) महंमद राष्ट्रप्रमुख झाला. १३ फेब्रुवारी १९७६ रोजी पुन्हा सत्तांतराचा प्रयत्‍न होऊन जनरल महंमद मारला गेला. नंतर ले. ज. ओबासांजो हा राष्ट्रप्रमुख झाला आहे. मार्च १९७६ मध्ये राज्यांची संख्या १२ वरून १९ वर नेण्यात आली. राज्यांची नवीन नावे अनांब्रा, बाऊची, बेंडेल, बेन्वे, बोर्नो, क्रॉस रिव्हर, गाँगोला, इमो, काडूना, कानो, क्कार, लागोस, नायजर, ओगून, आँडो, ऑयो, प्लॅटो, रिव्हर्स, सोकोटो अशी आहेत. रेडिओ, दूरचित्रवाणी व प्रमुख वृत्तपत्रे शासनाने ताब्यात घेतली आहेत. १९७९ ला पुन्हा लोकशाही आणि मुलकी सत्ता जाहीर करण्याचा संकल्प केला आहे. नायजर राज्यातील आबूजा येथे नवीन संघराज्य राजधानी बांधण्याचे ठरले आहे.

राज्यव्यवस्था : लष्करी प्रशासनात सर्वोच्च लष्करी कौन्सिल कारभार करते. त्यात लष्कराचा सरसेनापती हा अध्यक्ष व राष्ट्रप्रमुख असून १९ लष्करी राज्यपाल आणि भूदल, नौदल, वायुदल, पोलीस यांचे प्रमुख असतात. तसेच एक संघराज्य कार्यकारी कौन्सिल असून त्यात सरसेनापतीबरोबर प्रत्येक राज्याचा एकेक मुलकी प्रतिनिधी असतो, त्यास कमिशनर म्हणत असून ते सरसेनापतीने नेमलेले असतात. प्रत्येक राज्याचेही कार्यकारी मंडळ असून त्याचा प्रमुख लष्करी राज्यपाल असतो व त्याने मुलकी कमिशनर नेमलेले असतात.

ऑगस्ट १९७६ मध्ये राज्याची बरीचशी कामे स्थानिक शासन मंडळांकडे दिली आहेत. त्यांचे सभासद नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये निवडले आहेत. ही मंडळे २०३ सभासदांची संविधान समिती निवडतील व ती ऑक्टोबर १९७६ च्या संविधान मसुद्याचा विचार करेल. राज्य आणि संघराज्य विधान मंडळांच्या निवडणुका, मतदार संघ, राजकीय पक्षांची नोंदणी इ. कामांसाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.


संरक्षण : १९७६ मध्ये भूदलात २,२१,००० नौदलात ३,५०० वायुदलात ५,५०० सैनिक व मुलकी पोलीसदलात ४०,००० लोक होते. सैनिकी सेवा ऐच्छिक आहे. १९७५ च्या अखेरीस १,००,००० सैनिक सेवामुक्त करण्याचे जाहीर करण्यात आले. आफ्रिकेत नायजेरियाचे सैन्यदल सर्वांत मोठे आहे. तिसऱ्या राष्ट्रीय विकास योजनेत संकल्पित संरक्षण खर्च २८० कोटी नायरांचा आहे. त्यातील बराचसा नवीन साधनसामग्रीवर व्हावयाचा आहे. पोलीसदल दुप्पट व्हावयाचे आहे.

न्याय : मॅजिस्ट्रेटची व स्थानिक न्यायालये, उच्च न्यायालये व संघीय सर्वोच्च न्यायालय या श्रेणींची न्यायव्यवस्था आहे. त्यांशिवाय महसूल न्यायालय व राष्ट्रीय औद्योगिक न्यायालय आहे. स्थानिक न्यालयात सामान्यतः स्थानिक रूढ कायदा चालतो. उत्तरेकडील इस्लामी भागात मुस्लिम कायदा चालतो. संघीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नेमणुका राष्ट्राध्यक्ष करतो राज्यांच्या उच्च न्यायालयांचे न्यायाधीश राज्यपाल नेमतो.

आर्थिक स्थिती : दुसऱ्या महायुद्धानंतर उद्योगधंदे वाढत असले, तरी शेती हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य पाया आहे. अन्नधान्याच्या बाबतीत हा देश बऱ्याच प्रमाणात स्वयंपूर्ण आहे. कोको, भुईमूग, कापूस, ताडतेल, रबर ही प्रमुख नगदी पिके आहेत. तसेच कथिल, खनिज तेल, कोलंबाइट ही खनिजे महत्त्वाची आहेत. जागतिक बाजारपेठेतील चढउतारांचा परिणाम नायजेरियावर ताबडतोब होतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या धोरणातील बदल व जागतिक बाजारपेठेतील कथिलाच्या किंमतीबद्दलचा करार यांचा परिणाम नायजेरियातील खनिजांच्या निर्यातीवर झाला. युरोपीय व्यापारी संघ निर्माण झाल्यानंतर अर्थातच या संघातर्फे यूरोपीय व्यापाऱ्यांना जास्त मदत मिळणार असल्यामुळे नायजेरियाच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झाला.

शेती हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. सु. ७५% लोक या व्यवसायात गुंतलेले आहेत एकूण उत्पन्नाच्या ६६% उत्पन्न शेतीपासून मिळते. येथे शेतीचे लहानलहान विभाग केले आहेत. बहुधा निर्वाह शेतीच करण्यात येते. शेतीची अवजारे साधी व जुन्या पद्धतीची आहेत. काही ठिकाणी स्थलांतरित शेतीही आढळते. शेतकऱ्यांना मोठमोठी शेते असल्यामुळे होणाऱ्या फायद्यांची जाणीव आलेली आहे. त्या दृष्टीने ते सहकारी शेतीचा अवलंब करीत आहेत. सरकारही त्यांना सहकारी शेतीसाठी मदत करते. सध्या मळ्याची शेतीच सहकारी पद्धतीने चालते. ही शेती खाजगी मालकीची असून व्यापारी स्वरूपाची आहे. भरपूर पाणीपुरवठा, उत्तम हवामान व मोठे क्षेत्र असूनही निकृष्ट जमिनीमुळे उत्पादनक्षमता कमी आहे. १९७४ साली एकूण क्षेत्रापैकी २ कोटी ५३ लाख हे. लागवडयोग्य व कायम पिकांखाली, २ कोटी ७ लाख २० हजार हे. कुरण व गुरचराईखाली आणि ३ कोटी १० लाख ६९ हजार हे. जंगलाखाली होते. १९७५ साली प्रमुख पिकांचे पुढीलप्रमाणे उत्पादन झाले. (आकडे हजार मे. टनांमध्ये) : भात ३६८ मका १,००० भरडधान्य ३,२०० ज्वारी ३,४३७ रताळी १९० कसावा १०,००० सुरण १५,००० मिरची ५५० तुरी ८५० तारो १,८०० ऊस ७०० भुईमूग २८० ताड व ताडतेल ७६५ कोको २२० रबर ९५ कापूस १२२ सरकी ९२ नारळ ९० टोमॅटो २३०.

यांपैकी मका व भरडधान्ये उत्तरेकडे होतात, तर सुरण व कसावा ही दक्षिणेकडील प्रमुख खाद्य पिके होत. उत्तरेकडे पिकणाऱ्या धान्यांत प्रथिनांची कमतरता असल्याने ते धान्य सकस नसते. सकस धान्याचा पुरवठा हा देशापुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. येथे पुष्कळ प्रकारची फळे व भाजीपाला निघतो. ताडाचे उत्पादन प्रामुख्याने पूर्व भागातून येते. ताडाचे तेल आणि तिळाचे तेल रोजच्या जेवणात वापरतात. तंबाखू उत्तर व पश्चिम भागांत पिकतो. त्याचे उत्पादन स्थानिक वापरांसाठीच होते. रबराचे उत्पादन पश्चिमेकडील डोंगराळ भागात, तर कोको नैर्ऋत्य भागात होतो. बेन्वेच्या खोऱ्यात सोयाबीन व उत्तरेकडे कापूस व शेंगदाणा ही नगदी पिके होतात. निर्यातीत १९६० मध्ये ८०% किंमतीचा माल शेतीचा असला, तरी त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व होते. कारण त्यापासून देशाला जास्तीतजास्त प्रमाणात परदेशी चलन मिळे. १९७५ मध्ये खनिज तेलाच्या अपूर्व निर्यातीमुळे शेतीमालाच्या निर्यात किंमतीचे प्रमाण फक्त ७% उरले आहे. तथापि अद्याप ६६% कामगारांस शेतीच रोजगार पुरविते. नायजेरियात माशांना विशेष महत्त्व आहे. कारण जेवणांत प्रथिनांचे प्रमाण जास्त असणारा मासा हा एकच पदार्थ असतो. येथे माशांच्या जवळजवळ १५० जाती आहेत. नदीत, खाडीत, खाजणांत मासेमारी करतात. या व्यवसायात सु. १५ लाख लोक आहेत. प्रादेशिक सरकार व केंद्र सरकार मासेमारीला प्रोत्साहन देतात व मदतही करतात. १९७४ साली अंतर्गत जलाशयांत ३ लाख ४७१ हजार मे. टन व अटलांटिक महासागरात ३ लाख ३७८ हजार मे. टन मासे पकडण्यात आले.

उत्तरेकडे मुख्यत: गुरेढोरे पाळण्याचा व्यवसाय चालतो. उत्तरेकडील फुलानी हे भटके लोक पशुपालनाचा व्यवसाय करतात. उत्तरेकडील लोकांच्या जेवणात मांसाचे प्रमाण थोडेतरी असल्याकारणाने त्यांना थोड्या प्रमाणात तरी प्रथिनांचा पुरवठा होतो. गुरांची शिंगे व हाडे परदेशी पाठवून देशाच्या अर्थव्यवस्थेला थोडासा हातभार लागतो. त्सेत्से माशा हा गुरांचा फार मोठा शत्रू होय. १९७५ साली देशात पुढीलप्रमाणे पशुसंपत्ती होती. (आकडे हजारांमध्ये) : गुरे ११,००० मेंढ्या ७,६५० बकऱ्या २२,५०० डुकरे ८८० घोडे २५० गाढवे ७२० उंट १८ कोबड्या ८५,०००. याच वर्षी त्यांपासून पुढीलप्रमाणे उत्पादने झाली. (आकडे हजार मे. टनांमध्ये) : गोमांस व वासरांची सागुती १९३ गाईचे दूध २९७ कोंबड्यांची अंडी १०७ लोणी ६·७ चीज ५·४ कातडी ५७ इतर एकूण मांस २६२.

देशाचा ३,६२,६०० चौ. किमी. भाग जंगलाने व्यापलेला आहे. त्यापैकी ४६,६२० चौ. किमी. जंगल उंचावर असून २७,१९५ चौ. किमी. जंगल हे आर्थिक दृष्ट्या विशेष महत्त्वाचे आहे. कारण यातून इमारतीसाठी लाकूड मिळते. सॅव्हाना जंगलाने २,५९,००० चौ. किमी. भाग व्यापलेला आहे. पण आर्थिक दृष्ट्या त्याची किंमत कमी आहे. तथापि त्यातून जळणासाठी व घरे बांधण्यासाठी लाकूड मिळते. बहुतेक इमारती लाकूड हे पश्चिमेकडील उंचावरील जंगलांतून येते. तेथे वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. नद्यांचा आणि रस्त्यांचा व तीव्र उतारांचा लाकूड वाहून नेण्यास उपयोग करतात. या भागातून नायजेरियातील सर्वच्या सर्व कापीव लाकूड, किंमतीच्या दृष्टीने जंगलव्यवसायातून मिळणारे सु. ८०% उत्पन्न व निर्यात केले जाणारे सर्वच्या सर्व लाकूड पैदा होते. १९७४ साली गलाटे लाकडाचे ६,३१,४७,००० घ. मी. व कापीव लाकडाचे ७,९५,००० घ. मी. उत्पादन झाले.


खनिज संपती : एकूण उत्पादनापैकी खाणकामापासून सु. ६ टक्के उत्पादन येते. नायजेरियात अनेक महत्त्वाची खनिजे आहेत. निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे कथिल व कोलंबाइट ही होती. परंतु १९५८ पासून खनिज तेलाचा शोध लागल्यानंतर त्याचे उत्पादन हळूहळू वाढू लागले. १९६५ च्या सुमारास ते सर्वांत महत्त्वाचे खनिज बनले. आता एकूण निर्यातीपैकी ९२·७% किंमतीची निर्यात खनिज तेलाची होते. १९७६ मध्ये तेलाचे रोजचे उत्पादन २१ लक्ष बॅरल होते. पोर्ट हारकोर्ट येथील तेलशुद्धीकरणाचा कारखाना अपुरा पडू लागला म्हणून आणखी याप्रकारचे ४ कारखाने आणि खनिज तेल रसायन उद्योग स्थापण्याचे ठरले आहे. खनिज तेलामुळे नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेत क्रांतीच झाली आहे. १९७५ मध्ये तेल उत्पादनात या देशाचा जगात आठवा क्रमांक होता. मध्य पूर्वेतील युद्धपरिस्थितीचा येथे अनुकूल परिणाम झाला. परकीय चलन परिस्थिती सुधारली १९७१ नंतर आर्थिक विकासात दरसाल ८% वाढ झाली. परकी मदत कमी झाली व रोजगार वाढला. यादवी युद्ध होऊनही १९७३ मध्ये व्यवहार शेष १०५·४ कोटी नायरा झाला. तो १९७४ मध्ये ४०० कोटी व १९७५ मध्ये १२०·४ कोटींचा झाला. कथिल व कोलंबाइट उतरेकडील जॉस पठारावर सापडतात. कोलंबाइट हा येथील महत्त्वाचा धातू आहे. या धातूचे जगातील उत्पादनापैकी ९५% उत्पादन नायजेरियात होते. पश्चिम आफ्रिकेत फक्त नायजेरियातच कोळशाचे उत्पादन होते, त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पूर्व विभागातील एनूगू या कोळसा क्षेत्रामुळे नायजेरियाची कोळशाची गरज भागविली जाते. खनिज तेलाचे साठे नैर्ऋत्य भागातील नायजरच्या त्रिभुज प्रदेशात आहेत. चुनखडी, शिसे, जस्त, लोखंड यांच्याही काही खाणी नायजेरियात आहेत.रशियाच्या मदतीने आबेओकूटा येथे एक मोठा लोखंड-पोलाद प्रकल्प उभारण्यात येत आहे. तेथील उत्पादन १९८३ मध्ये सुरू होईल. १९७५ मध्ये २,३७,००० मे. टन कोळसा,८४,४०,००० मे. टन अशुद्ध खनिज तेल ६६·१ कोटी घ.मी. नैसर्गिक वायू ७७ किग्रॅ. सोने,०८२ मे. टन कथिल,३१६ मे. टन कोलंबाइट असे प्रमुख खनिजांचे उत्पादन झाले.

कोळसा हे येथील महत्त्वाचे शक्तिसाधन असले, तरी खनिज तेलाचे उत्पादन वाढत असल्याने त्याचे महत्त्व थोडे कमी होत आहे. जलविद्युत् शक्ती अजूनही व्हावी तितकी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. जॉस पठारावर चार जलविद्युत् केंद्रे आहेत. जलविद्युत् शक्ति सरकारतर्फे पुरविण्यात येते. १९६९ मध्ये पूर्ण झालेल्या नायजर नदीवरील काइंजी धरणाचा स्वस्त वीज पुरवण्यात महत्त्वाचा हात आहे. १९७५ मध्ये एकूण ३,१७,५०,००,००० किवॉ. ता. वीज उत्पादन झाले.

उद्योगधंदे : येथे निरनिराळ्या उद्योगधंद्यांची वाढ होत आहे. लोखंड व पोलाद, सुती कापड व्यवसाय, हस्तव्यवसाय, कातडी वस्तू, हातमाग, भांडी, ताड तेलाच्या आणि शेंगदाणा तेलाच्या गिरण्या हे येथील महत्त्वाचे व्यवसाय आहेत. तसेच स्वयंचलित मागांचा व्यवसाय सहकारी पद्धतीने चालविला जातो. अशा सहकारी सस्थांना सरकार मदत करते. येथील इतर वाढते व्यवसाय म्हणजे सिमेंट, सिगरेट, विटा व कौले, पीठ, बिस्किटे, साखर, मिठाई, पादत्राणे, रंग, रबरी धावा, खिळे, नटबोल्ट, रेडिओ, दूरचित्रवाणी, मोटारींचे भाग जोडणे, रबराच्या वस्तू, भांडी, बीर व इतर पेये, साबण, फळांचे रस, डबाबंद अन्नपदार्थ, धातूचे डबे, प्लायवुड, सूत, कापड, मृत्तिकाशिल्प इ. होत.खनिज तेलाचे उत्पादन सुरू झाल्यापासून खनिज तेलाचे शुद्धीकरण व खनिज तेलजन्य रसायने यांचे उद्योग वाढीस लागले आहेत. उद्योगधंद्यांमध्ये लक्ष घातल्यानंतर सरकारने प्रथम यंत्रसामग्री, कुशल कारागीर आणि अर्धवट प्रक्रिया केलेले जिन्नस आयात करण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे पूर्वी आयात करावे लागणारे उपभोग्य जिन्नस देशात तयार होऊ लागले. परंतु यासाठी काही गोष्टी आयात करणे आवश्यक असल्यामुळे बंदरांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे उद्योगधंद्यांची वाढ अशा बंदरांच्या ठिकाणी झाल्याचे आढळून येते. नायजेरीयाचे औद्योगिक उत्पादन १६ महत्त्वाच्या शहरांत केंद्रित झाले असून एकट्या महालागोसमध्ये देशातील ३०% उद्योगधंदे केंद्रित झाले आहेत. अशा प्रकारच्या औद्योगिक केंद्रीकरणाचा परिणाम देशातील अंतर्गत स्थलांतरावर झाल्याचे आढळून येते. यामुळेच लोकांचा ओघ खेड्यांकडून शहरांकडे का लागला आहे हे ध्यानात येते. १९७२ व १९७६ च्या हुकूमनाम्यांनी छोट्या उद्योगांत परकीयांना बंदी व मोठ्या उद्योगांत नायजेरियाचे भांडवल ५० टक्क्यांहून जास्त अशी सक्त्ती केली आहे. १९७५ मध्ये एकूण ३,७२,१५,००,००० नायरा किंमतीची आयात झाली. तीत यंत्रसामग्री, लोखंडी व पोलादी माल, वाहने, अधातू खनिजनिर्मित माल, सुती धागा व कापड, विजेची उपकरणे, औषधे, कागदी माल, रासायनिक पदार्थ, साखर, दूध, धान्ये, पीठ व त्याचे पदार्थ, रंग, शिवणयंत्रे व कापड गिरणी यंत्रे, मोटारींचे व मोटारसायकलींचे सुटे भाग, कपडे यांचा मुख्यत्वे समावेश होता. यांचा पुरवठा करणारे देश प्रामुख्याने ग्रेट ब्रिटन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदर्लंड्स, जपान, बेल्जियम आणि लक्सेंबर्ग, हाँगकाँग, चीन, डेन्मार्क, भारत, चेकोस्लोव्हाकिया, नॉर्वे, पोलंड, रशिया हे होते. एकूण निर्यात ४,९२,०२,००,००० नायरांची झाली. तीत क्रूड खनिज तेल ४,५६,३१,००,००० नायरांचे व बाकीच्यात कोको बिया, कथिल, ताडगर, रबर, कोको, लोणी, कातडी, इमारती लाकूड, प्लायवुड, शेंगदाणा पेंड, शेंगदाणा तेल यांचा समावेश होतो. खरेदी करणारे देश प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटन, नेदर्लंड्स, फ्रान्स, जर्मनी, जपान, रशिया, इटली, डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, लक्सेंबर्ग व घाना हे होते.

१९७६-७७ चा अर्थसंकल्प ५,७५,६२,००,००० नायरा आय व प्रत्यावर्ती व्यय २,४१,४०,००,००० नायरा आणि भांडवली व्यय ७,३७,८२,००,००० नायरा असा होता. प्रत्यावर्ती व्ययात संरक्षण, शिक्षण, पोलीस आरोग्य, अर्थव्यापार व विकास यांस प्राधान्य होते. भांडवली खर्चात खुष्कीची व इतर वाहतूक व दळणवळण, संरक्षण, निर्मिती, घरबांधणी, खाणी, शिक्षण, शेती, शक्ती, व्यापार, सामान्य प्रशासन यांस प्राधान्य होते.

नायजेरियाची पहिली राष्ट्रीय विकास योजना १९६२ ते १९६८, दुसरी १९७० ते १९७४ व तिसरी १९७५ ते १९८० ची ३,००० कोटी नायरांची आहे. १ जानेवारी १९७३ पासून नायरा हे नायजेरियाचे अधिकृत चलन आहे. एका नायराचे १०० कोबो होतात. १०, ५, १ नायरांच्या व ५० कोबोंच्या नोटा आणि २५, १०,५,१ व १/२ कोबोंची नाणी प्रचारात आहेत. ऑक्टोबर १९७६ मध्ये १ पौंड स्टर्लिंग = ९९·७ कोबो व १ अमेरिकी डॉलर = ६२·९ कोबो व १०० नायरा = १००·२८ पौंड = १५९·०५ डॉलर असा विनिमय दर होता. नायजेरियातील बँकांत सेंट्रल बँक ऑफ नायजेरिया, नॅशनल बॅक ऑफ नायजेरिया, बँक ऑफ दि नॉर्थ, को-ऑपरेटिव्ह बँक, आफ्रिकन काँटिनेंटल बँक, मर्कंटाइल बँक ऑफ नायजेरिया या देशी आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका, बँक ऑफ अमेरिका, चेस मर्चंट बँक, बार्क्लेज बँक ऑफ नायजेरिया, बँक ऑफ इंडिया, स्टँडर्ड बँक नायजेरिया, अरब बँक, इंटरनॅशनल बँक फॉर वेस्ट आफ्रिका इ. परदेशी बँक शाखा असून लागोस येथे शेअरबाजार व सु. १८ विमाकंपन्या आहेत.


वाहतूक व संदेशवहन : नायजर व बेन्वे या नायजेरियातील वाहतुकीस उपयुक्त नद्या होत. तथापि त्यांतील पाण्याचे बदलते प्रमाण व नायजरच्या मार्गातील द्रुतवाह व धबधबे यांमुळे ही वाहतूक वर्षभर किंवा अखंड होऊ शकत नाही. क्रॉस नदीतून कॅलॅबार बंदराकडे खंडित वाहतूक होते. तसेच किनाऱ्याजवळच्या खारकच्छांतून व खाड्यांतूनही वाहतूक होते.

नायजेरियात बूरूटू, लागोस, पोर्ट हारकोर्ट, कोको, वॉरी, कॅलॅबार ही व्यापारी बंदरे आहेत. लागोस (अपापा) हे महत्त्वाचे बंदर असून ५०% मालाची ने-आण बंदरातून चालते. दुसरे बंदर पोर्ट हारकोर्ट होय. यातून २०% मालाची ने-आण होते. परंतु ही दोन बंदरे वाढत्या व्यापाराच्या दृष्टीने अपुरी पडू लागल्याने नायजरच्या त्रिभुज प्रदेशातील वॉरी आणि आग्नेय टोकाकडील कॅलॅबार ही दोन महत्त्वाची बंदरे नव्याने पुढे येत आहेत.

येथे ४,३१३ किमी. चे मीटर मापी लोहमार्ग आहेत. लागोस ते कानो हा पश्चिमेकडील आणि पोर्ट हारकोर्ट ते मायडूगरी हा पूर्वेकडील असे दोन प्रमुख लोहमार्ग असून त्यांचे फाटे इतरत्र गेलेले आहेत. नवे रूळ टाकून व डीझेल तेलाचा उपयोग करुन हे मार्ग अधिक कार्यक्षम करण्यात आले आहेत. हे मार्ग नद्यांना समांतर जात असल्याने पूर्व व पश्चिम भाग जोडण्याच्या दृष्टीने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. कोको, कापूस, शेंगदाणा पिकवणारे प्रदेश व जॉस पठारावरील खाण प्रदेश येथे रस्त्यांचे जाळे अधिक दाट आहे. दिवसेंदिवस लोहमार्गांपेक्षा सडकांस अधिक महत्त्व येत आहे. तथापि १,००० किमी. लांबीचे प्रमाणमापी लोहमार्ग टाकण्यात येत आहेत.

येथे सु. ९०,००० किमी. लांबीचे रस्ते आहेत. त्यांपैकी १६,००० किमी. लांबीचे डांबरी आहेत. ताड, कोको ही पिके येणाऱ्या प्रदेशात रस्त्यांची अधिक दाटी आहे. लागोस राजधानीशी राज्यांच्या राजधान्या जोडणारे रस्ते केंद्रशासनाकडे, राज्यांच्या राजधान्या तेथील प्रमुख शहरांशी जोडणारे रस्ते राज्य शासनाकडे व इतर रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहेत.

विमानवाहतूकही वाढत आहे. लागोस व कानो येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ‘नायजेरियन एअरवेज’ही राष्ट्रीय विमान कंपनी आहे. देशातील सु.१२ शहरे अंतर्गत विमान मार्गाने जोडली आहेत. देशाचा पूर्व व पश्चिम भाग जोडण्याच्या दृष्टीने विमान वाहतुकीचा विशेष उपयोग झाला आहे. नायजेरियात १,६६७ डाकघरे असून त्यांपैकी २८० ठिकाणी तार, मनिऑर्डर व सेव्हिंग बँक या सोयी आहेत. सर्व जगाशी तारायंत्राने संपर्क साधता येतो. १९७५ मध्ये देशात १,११,४७८ दूरध्वनियंत्रे होती. १९७५ मध्ये ५० लाख रेडिओ परवानाधारक व एक लाख दूरचित्रवाणी परवानाधारक होते. लागोस येथे मुख्य नभोवाणी केंद्र असून तेथून राष्ट्रीय कार्यक्रम व काडूना, ओनिचा, कानो इ. इतर १७ केंद्रांतून स्थानिक कार्यक्रम मुख्यतः इंग्रजीतून व १६ नायजेरियन भाषांतून प्रसारित होतात. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम इंग्रजी, फ्रेंच, अरबी व हौसा भाषांतून प्रसारित होतात. एप्रिल १९७६ पासून दूरचित्रवाणी संघराज्य लष्करी प्रशासनाकडे आहे. लागोस व काडूना येथे प्रमुख व इतर आठ ठिकाणी दुय्यम चित्रवाणीकेंद्रे आहेत.

नायजेरियात २१ दैनिके, ८ रविवारची व २१ इतर साप्ताहिके, ४१ इंग्रजी व ३ देशी भाषांतील नियतकालिके प्रसिद्ध होतात. एका दैनिकाचा खप १,२०,००० आहे. बहुतेक वृतपत्रे इंग्रजीत प्रसिद्ध होतात. देशात २५ छापखाने व प्रकाशक आहेत.

लोक व समाजजीवन : संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार १९७५ मध्ये येथील लोकसंख्या ६,२९,२५,००० होती. आफ्रिकेतील कोणत्याही देशापेक्षा नायजेरियाची लोकसंख्या अधिक आहे. दरवर्षी लोकसंख्येत साधारणपणे २·५% वाढ होत असून नागरी वस्तीत वाढीचे प्रमाण अधिक आढळून येते. १९७२ सालच्या आकडेवारी नुसार २०% लोक शहरांत, तर ८०% लोक खेड्यांत राहतात. येथील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला ६८·११ आहे. लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने नायजेरियाचे तीन ठळक विभाग पाडता येतील. उत्तरेकडील राज्यांत लोकसंख्या घनतेचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. कानो विभागात तर हे प्रमाण चौ.किमी. ला १३४ इतके आहे.मध्य भागात असणाऱ्या राज्यांत लोकवस्तीची घनता कमी आहे. दक्षिणेकडील राज्यांत लोकवस्तीची घनता खूपच वाढते. सर्वांत अधिक घनता (चौ.किमी. ला ४०३) लागोस राज्यात आढळते.

नायजेरियात प्रामुख्याने आढळणारे लोक म्हणजे निग्रो होत. यांचे इतर अनेक जमातींशी मिश्रण झालेले आहे. बहुतेक भागांत निग्रोंचे प्रमाण अधिक आहे. शुद्ध निग्रो जमात केवळ दक्षिणेकडील जंगलव्याप्त प्रदेशात आढळते. याशिवाय फुलानी व सेमिटिक-सुवा-अरब हे लोक ईशान्य कोपऱ्यातील चॅड सरोवराच्या आजूबाजूला आढळतात. येथे प्रामुख्याने योरूबा, इबो व हौसा या जमाती आढळतात. योरूबांची संख्या १३ कोटी असून नैर्ऋत्येकडे त्यांची संख्या जास्त आहे. इबोंची संख्या ७८ लक्ष असून पूर्वेकडे त्यांचे प्रमाण जास्त आहे तर हौसांची संख्या ६८ लक्ष असून ते उत्तरेकडे जास्त आहेत. त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या जमाती म्हणजे पश्चिमेस इडो, पूर्वेस इबिबीओ आणि इज्यो व उत्तरेकडे फुलानी (५० लक्ष), कानुरी, नुप व टीव या आहेत. नायजेरियात बोलीभाषेवर आधारित असे २५० लोकसमूह आढळतात. इंग्रजी ही शासन व्यवहाराची भाषा आहे. योरूबा, इबो व हौसा या भाषाही पुष्कळ लोक बोलतात. नायजेरियात १९६३ मध्ये मुस्लीम २६२ लक्ष, खिश्चन १९२ लक्ष व इतर धर्मांचे १०१ लक्ष लोक होते. उत्तरेकडे मुस्लिमांचे प्रमाण जास्त आहे, तर दक्षिण व पश्चिम भागांत ख्रिश्चनधर्मीयांचा जोर आढळतो. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या कित्येक लोकांचा अजूनही परंपरागत रूढींवर विश्वास आहे.

नायजेरियातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे पश्चिम यूरोपीय राष्ट्रांप्रमाणे तेथे समाजकार्याची प्रगती नाही. येथे प्रामुख्याने निर्माण होणारा प्रश्र्न म्हणजे बेकारी हा होय. त्या त्या ठिकाणच्या समाजकार्याची जबाबदारी प्रादेशिक सरकारवर आहे. सरकारी नोकरांना मोफत वैद्यकीय मदत, निवृत्तिवेतन व इतर लाभ मिळतात. तसेच मोठ्या कंपन्यादेखील आपल्या नोकरवर्गांना मोफत वैद्यकीय मदत देतात. निरनिराळ्या जमातींच्या प्रगतीसाठी सरकारने खास संस्था काढल्या आहेत. राष्ट्रीय निर्वाह निधीतून आजारपण, निवृत्ती व वार्धक्य यांसाठी साह्य मिळते. कामगारांसाठी १९७४ च्या कायद्याने कल्याण योजना झाली आहे. तसे़च लागोसमध्ये समाजकार्यासाठी युवक मंडळे काढली आहेत.

लोकसंख्येची बेसुमार वाढ व स्थानिक साधनसामग्रीची कमतरता यांमुळे काही भागांत बेकारी वाढत आहे. याचा परिणाम म्हणूनच खेड्यांकडून शहरांकडे स्थलांतर करण्याची प्रवृत्ती वाढली असून त्यामुळे शहरांची वाढ बेसुमार होत आहे. अशा वाढीमुळे शहरांमध्ये घरबांधणी व इतर प्रश्र्न अधिक तीव्र होत आहेत.

येथील खेड्यांतील घरे ही मातीची असतात व वरील छप्पर गवताचे असते. तसेच सभोवती मातीच्या भिंतींचे कुंपण असते. नद्यांच्या भागांत मातीऐवजी बांबू वापरतात. शहरांत मातीच्या घरांना आजकाल बाहेरच्या बाजूने सिमेंट लावतात. शहरांतून आता आधुनिक इमारती होऊ लागल्या आहेत. घरबांधणीसाठी सहकारी संस्थांचा उपयोग होत आहे. देशात सहकारी चळवळीची वाढ होत असून १९७५ मध्ये सु. ४,५०० सहकारी संस्था होत्या.


शिक्षण : नायजेरियात प्रथम निघालेल्या शाळा या मिशनरी लोकांनी काढल्या होत्या. पहिली शाळा १८४२ मध्ये निघाली व त्यानंतर साधारण ५० वर्षांनी सरकारी शाळा निघाल्या. नंतर सरकारने मिशनरी शाळांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. पहिल्या महायुद्धानंतर शाळांची संख्या खूप वाढली, तेव्हा सरकारने शिक्षणाकडे विशेष लक्ष घालावयास सुरुवात केली. १९२६ पासून शाळांची वार्षिक तपासणी होऊ लागली व प्रत्येक शिक्षकाने आपले नाव सरकारी खात्यात नोंदविले पाहिजे असा दंडक घातला गेला.

अलीकडे शिक्षणासाठी सरकारने पुष्कळ सवलती दिल्या आहेत पण अजूनही सु. ८०% लोक निरक्षर आहेत. प्राथमिक व दुय्यम शिक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारांकडे आहे. तथापि १९७० पासून केंद्र शासनाने अधिक जबाबदारी स्वीकारली असून त्याचे देशातील १२ विद्यापीठांवर नियंत्रण आहे. तिसऱ्या विकासयोजनेत शिक्षणासाठी २५० कोटी नायरांची तरतूद आहे. १९७६ पासून प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक आणि नि:शुल्क झाले. १९८० पासून ते सक्तीचे होईल. १९७३ मध्ये देशात १४,५२५ प्राथमिक शाळांतून ४६,६२,४०० विद्यार्थी व १,३६,१४२ शिक्षक होते. १,४९९ माध्यमिक शाळांतून ५,१६,६५८ विद्यार्थी व २०,४४८ शिक्षक होते. व्यावसायिक शाळांतून २१,५१५ विद्यार्थी व १,१११ शिक्षक होते. १५७ शिक्षक प्रशिक्षण संस्थांतून ४२,७७१ विद्यार्थी व २,१२२ शिक्षक होते. उच्च शिक्षण घेणारे २३,२२८ विद्यार्थी व त्यांचे ३,४५९ शिक्षक होते. १९७४ मध्ये सर्व विद्यापीठांत शिकणारे विद्यार्थी एकूण सु. २०,००० होते. झारीया (१९६२), बेनिन सिटी (१९७०), कॅलॅबार (१९६६), ईबादान (१९६२), ईफे (१९६१), ईलॉरीन (१९७६), जॉस (१९७६),लागोस (१९६२), मायडूगरी (१९७६), पोर्ट हारकोर्ट(१९७६), सोकोटो (१९७६) येथे विद्यापीठे आहेत. एन्सूका येथील नायजेरिया विद्यापीठ १९६० मध्ये स्थापन झाले आहे. उतर विभागापेक्षा पूर्व व पश्चिम विभागांत शिक्षणाचा प्रसार जास्त झाला आहे. या वाढीचे श्रेय ख्रिस्ती मिशनऱ्यांकडे प्रामुख्याने जाते. उतर विभाग सोडल्यास ९०% ‏शैक्षणिक संस्था मिशनऱ्यांकडे किंवा खाजगी संस्थांकडे आहेत. उत्तर विभागात मुस्लिम धार्मिक संस्थांनी शाळा चालविल्या होत्या. अशा शैक्षणिक संस्थांना सरकारकडून मदत मिळते. प्राथमिक शाळेत पहिली दोन वर्षे तेथील स्थानिक भाषा शिकवितात व नंतर इंग्रजी शिकवितात. देशातील अनेक विद्यार्थी इंग्लंड, अमेरिका यांसारख्या देशांत सरकारतर्फे शिक्षण घेतात.

आरोग्य : उष्णकटिबंधीय प्रदेशातील बहुतेक रोगांचा प्रादुर्भाव नायजेरियात झालेला आढळतो. विशेषतः अंधत्व, यॉज, कुष्ठरोग, निद्रारोग, हिवताप व कृमिरोग हे दिसतात. तथापि प्रतिकार आणि उपाययोजनांचा बराच उपयोग होत आहे. अंधत्व व हिवताप यांविरुद्ध जागतिक आरोग्य संघटनेच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मोहिमा काढल्या जात आहेत. देवीनिर्मूलनासाठी वार्षिक मोहीम काढली जाते. १९६८ मध्ये ३३० लक्ष लोकांस देवीची लस टोचण्यात आली. देशाच्या बहुतेक भागांत साधे व फिरते दवाखाने आहेत. लागोस विद्यापीठास जोडलेले शैक्षणिक रुग्णालय ३५० रुग्णशय्या, परिचारिका विद्यालय व ईबादान येथील शैक्षणिक रुग्णालय यांनी सुसज्ज आहे. झारीया व ईफे येथील विद्यापीठांतही वैद्यकीय शिक्षणक्रम सुरू होत आहेत.

खेळ व करमणूक : देशात १९६७ मध्ये १०५ चित्रपटगृहे होती. त्यांत वाढ होत आहे. संघराज्य व प्रादेशिक राज्ये विविध प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्याकरिता फिरत्या चित्रपटगाड्यांचा उपयोग करतात.

नायजेरियाची परंपरागत कला समृद्ध व विविध आहे. निरनिराळ्या राज्यांत अखिल नायजेरिया कला व संस्कृति-उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. जागतिक कृष्ण आणि आफ्रिकी कला व संस्कृतीचा दुसरा उत्सव १९७७ मध्ये या देशात साजरा झाला.

नायजेरियाच्या युवकांत फुटबॉल, कुस्ती, मुष्टियुद्ध, टेनिस, पोहणे व अनेक प्रकारचे व्यायामप्रकार लोकप्रिय आहेत. शासनाने १९७५ मध्ये खेळ व स्पर्धा प्रकल्पांसाठी ७० लक्ष नायरा मंजूर केले होते.

पर्यटन : देशातील पर्यटन व्यवसायास उत्तेजन देण्यात येत आहे. नायजेरियाची हवा उत्तम असून दाट जंगले व किनारी भागातील वनश्री रम्य आहे. देशातील परंपरागत कला व संस्कृती आकर्षक आहे. १९७० मध्ये परदेशांतून आलेले नायजेरियाचे नागरिक धरून ब्रिटनमधून ३,११३, अमेरिकेतून १,४८० व इतर देशांतून ८,५०१ पर्यटक नायजेरियात आले होते.

महत्त्वाची स्थळे : लागोस (अपापा) ही नायजेरियाची राजधानी ओगून नदीच्या मुखाशी वसली आहे. लोकसंख्या ९,००,९६९ (१९७१). हे बंदर कृत्रिम रीत्या खोल केलेले असून हे देशाचे सर्वांत महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे.

ईबादान (७,५८,३३२) हे पश्चिम विभागाची राजधानी म्हणून महत्त्वाचे असलेले शहर औद्योगिक केंद्रही आहे. कानो (३,५७,०९८) हे व्यापारी केंद्र असून ट्रान्स-सहारा लोहमार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. येथे कापूस, चामडे, भुईमूग व तंबाखू या स्थानिक उपलब्ध होणाऱ्या गोष्टींवर प्रकिया करणारे उद्योगधंदे आहेत. अलीकडे येथे मोटारींचा कारखानाही निघालेला आहे.

आबेओकूटा (२,२६,३६१) हे नायजेरियाच्या नैर्ऋत्य भागातील शहर फळांचे रस व जॅम बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. ईफे (१,५७,१७८) हे याच विभागातील पुरातन व धार्मिक केंद्र असून तेथे विद्यापीठदेखील आहे. ईलेशा, इबो आणि ओशोग्बो ही या विभागातील इतर महत्त्वाची स्थळे आहेत. उत्तरेकडे झारीया (२,००,८५०) येथे विद्यापीठ व सुती कापडाची गिरणी आहे. जॉस (९०,४०२) हे याच नावाच्या पठारावरील कथिल खाणकामाचे केंद्र आहे. काडूना (१,८१,२०१) हे वर्तमानपत्रछपाईचे महत्त्वाचे केंद्र असून तेथे दूरचित्रवाणी केंद्र आहे. तंबाखू व कापड इ. धंदे येथे चालतात. अलीकडे येथे कारखाना निघाला आहे.

यांशिवाय ऑग्बोमोशो (३,८६,६५०), पोर्ट हारकोर्ट (२,१७,०४३), मायडूगरी (१,६९,१८०), एनूगू (१,६७,३३९), बेनिन सिटी (१,२१,६९९), कॅलॅबार (७६,४१८), आबा (१,३१,००३), सोकोटो (८९,८१७) इ. इतर महत्त्वाची शहरे आहेत.

कुऱ्हेकर, द. वि. फडके, वि. शं.

नायजेरियाकोटोको जमातीची झोपडीनायजेरियन लोकनृत्य : एक दृश्य.नायजेरियनांची अशुभनिवारण देवकचिन्हे असलेली मातीची घरेराष्ट्रीय सिमेंट कारखान्याचा भाग, अन्‌कालागू.राजधानी लागोस : एक दृश्य.कोको : नायजेरियाचे प्रमुख उत्पादन.जॉस पठारावरील कथिलाची खाणपारंपरिक नृत्यासाठी जमलेल्या इबो जमातीच्या महाविद्यालयीन युवती

कानो शहरातील पारंपरिक वस्तीचे विहंगम दृश्य