गोल्डन ट्रँगल : पिटर्सबर्गचा औद्योगिक परिसरपिट्‌सबर्ग : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील औद्योगिक शहर व अलेगेनी परगण्याची राजधानी. लोकसंख्या ४,५८,६५१ (१९७५ अंदाज). हे फिलाडेल्फियाच्या पश्चिमेस ४०० किमी., अलेगेनी आणि मनाँगहीला या नद्यांच्या संगमावर वसलेले असून हा संयुक्त प्रवाह पुढे ओहायओ नदी म्हणून ओळखला जातो. ‘गोल्डन ट्रंगल’ हा नदीसंगमाजवळचा भाग व्यापारी केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागाच्या स्वामित्वासाठी ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात दीर्घकालीन झगडा चालू होता. १७५८ मध्ये ब्रिटिश जनरल जॉन फोर्ब्‌झ याने हा भाग जिंकला आणि ब्रिटिश पंतप्रधान थोरला पिट याच्या गौरवार्थ त्याला पिट्‌सबर्ग हे नाव दिले. १७६१ मध्ये ब्रिटिशांनी येथे फोर्ट पिट हा किल्‍ला बांधला. तो केंद्र धरून १७६४ मध्ये पिट्‌सबर्गची आखणी करण्यात आली. या शहराच्या परिसरात कोळसा, चुनखडी, तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे आहेत. १८३४ च्या सुमारास पेनसिल्व्हेनिया कालवा व पोर्टेज रेल्वेमार्ग पूर्ण करण्यात आले. तेव्हापासून या शहराची औद्योगिक प्रगती झपाट्याने होत गेली. अमेरिकेच्या अंतर्गत भागातील हे सर्वांत मोठे नदीबंदर असून, दळणवळणाच्या सर्व सोयी येथे आहेत. अमेरिकेच्या एकूण पोलाद उत्पादनापैकी २० % उत्पादन या शहराच्या परिसरात होते. म्हणूनच या शहराला ‘स्टिल सिटी’ असे म्हणतात. खनिज तेल, काच, विजेची उपकरणे, यंत्रसामग्री, रासायनिक पदार्थ, कोळसा इ. उद्योग या शहरात प्रचंड प्रमाणावर विकसित झालेले आहेत. येथील ७,६०० हून अधिक कारखाने ६,००० वर विविध वस्तूंची निर्मिती करतात. १७० वर औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा पिट्सबर्गच्या औद्योगिक परिसरात आहेत. योथो साठांवर प्रमुख अमेरिकन कंपन्यांची प्रधान कार्यालये आहेत. दुसर्‍या महायुद्धानंतर शहराच्या विकास योजनेत मोठे बदल करण्यात येऊन त्यांद्वारा पूर, औद्योगिक प्रदूषण इत्यादींचे नियंत्रण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. १९५७ साली येथे पहिल्यांदाच अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती होऊ लागली. गोल्डन ट्रंगल भागाचीही पुनर्रचना करण्यात आली. परिणामत: पॉइंट स्टेट पार्क, गेटवे सेंटर आणि नागरी सभागृह व क्रीडामैदान हे प्रेक्षणीय भाग अस्तित्वात आले. येथील पिट्‌सबर्ग, कार्नेगी-मेलन व डूकेन ही विद्यापीठे तसेच कार्नेगी इन्स्टिट्यूट या महत्वाच्या शैक्षणिक संस्था होत. यांशिवाय वस्तुसंग्रहालय, व्यूहल खगोलालय, यू.एस्. स्टील कॉर्पोरेशनची ६४ मजली कार्यालयीन इमारत इ. प्रेक्षणीय आहेत. ललितकलासंस्थांमध्ये पिट्‌सबर्ग, कार्नेगी ग्रंथालय इ. प्रसिद्ध आहेत.

लिमये, दि.ह.