एर्नांदो सोतो

सोतो, दे एर्नांदो : (? १४९६–२१ मे १५४२). मिसिसिपी नदी, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा आग्नेय भाग व मध्य अमेरिका यांचे समन्वेषण करणारा स्पॅनिश समन्वेषक. जन्म स्पेनमधील बॉथाहोस प्रांतातील बार्कारोता येथे. त्याचे बालपण हेरेझ द लोस काबायेरोस येथे गेले. त्याच्या वडिलांनी त्याला वकील करण्याचे ठरविले होते; परंतु लहान वयातच त्याने वेस्ट इंडीजला जाण्याची इच्छा त्याच्या वडिलांजवळ प्रकट केली. त्यासाठी तो सेव्हिल येथे गेला. त्याच्या वयाच्या मानाने त्याचे धाडस व अश्वारोहणातील चपळाई यांमुळे त्याला इ. स. १५१४ मध्ये पेद्रो आर्यास दे आव्हिला या पनामाच्या स्पॅनिश गव्हर्नरसमवेत डॅरिएन येथे जाण्याची संधी मिळाली. धाडसी व परिश्रमाची वृत्ती यांमुळे पनामामध्ये एक चांगला समन्वेषक व व्यापारी म्हणून त्याचा नावलौकिक झाला. १५१६–२४ या कालावधीत त्याने रेड इंडियनांविरुद्धच्या अनेक साहसी लष्करी मोहिमांचे नेतृत्व केले, तसेच आव्हिलाच्या समवेत उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा व अंतर्गत भागाचे समन्वेषण केले. १५२० च्या सुमारास त्याने निकाराग्वा व पनामा संयोगभूमीच्या प्रदेशात गुलामांचा व्यापार करून भरपूर संपत्ती मिळविली. १५२४–२७ या कालावधीत निकाराग्वावरील नियंत्रणाच्या अधिकारावरून हील गाँथालेथ दे आव्हिला याच्याशी त्याचा संघर्ष झाला होता व त्यात त्याचा विजय झाला. त्यानंतर निकाराग्वाचा लष्करी कमांडर म्हणून त्याने काही वर्षे काम केले.

सोतोने १५३१–३६ या कालावधीत आव्हिला व फ्रांथीस्को पिझारो यांच्यासमवेत अनुक्रमे मध्य अमेरिका व पेरू यांच्या मोहिमांमध्ये भाग घेतला होता. १५३१ मध्ये आव्हिलाचा मृत्यू झाला व सोतो पिझारोच्या मोहिमेत सामील झाला. त्याला मोहिमेचा कॅप्टन करण्यात आले. पेरूतील इंकांविरुद्धच्या मोहिमेत सोतोने चांगली कामगिरी बजावली. १५३२ मध्ये काहामार्का येथे इंकांचा पराभव झाला व पुढे कूस्को ही त्यांची राजधानीही स्पॅनिशांच्या ताब्यात आली. इंकांचा सम्राट अतावाल्पा याच्याशी संघर्ष करणारे हे पहिले यूरोपीय असावेत असे मानले जाते. या कालावधीत सोतोने भरपूर संपत्ती मिळविली व १५३६ नंतर तो स्पेनला परतला. त्याने आव्हिलाची मुलगी इझाबेल दे बोबॉथील्यॉ हिच्याशी विवाह केला. मध्य अमेरिकेतील त्याच्या धाडसी कामगिरीमुळे स्पेनचा राजा पाचवा चार्ल्स याने क्यूबाचा गव्हर्नर म्हणून त्याची नेमणूक केली व त्याबरोबरच सांप्रतच्या फ्लॉरिडा प्रदेशाचे समन्वेषण करण्याचे अधिकारही त्याला दिले. त्यामुळे १५३८ मध्ये सोतो हाव्हॅना (क्यूबा) येथे गेला. या काळात सोन्याच्या शोधासाठी उत्तर अमेरिकेच्या मध्य व आग्नेय प्रदेशांत स्पर्धा चालू होती. सोतोने स्वतःच्या नेतृत्वाखाली १५३९ मध्ये उत्तर अमेरिकेच्या समन्वेषणाची मोहीम आखली व त्याच वर्षी तो फ्लॉरिडाच्या किनाऱ्यावर टँपा बे जवळ पोहोचला. सोन्याच्या शोधार्थ ही त्याच्या धाडसी मोहिमेची सुरुवात होती. १५३९–४१ या काळात त्याने जॉर्जिया, कॅरोलायना, टेनेसी त्यानंतर दक्षिणेस ॲलाबॅमा या प्रदेशांत सोन्याचे शोधकार्य केले; परंतु त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. ॲलाबॅमामध्ये रेड इंडियनांबरोबरच्या लढाईत (१५४०) तो जखमी झाला. त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले व युद्धसाहित्यही नष्ट झाले. एक महिन्यानंतर तो पुन्हा उत्तरेकडे परतला; परंतु हा निर्णयही दुर्दैवी ठरला. रेड इंडियनांनी हल्ले करून त्याला हैराण केले. याच प्रवासात २१ मे १५४० रोजी त्याला मिसिसिपी नदीचा शोध लागला. या नदीचा शोध लावणारा व ती नदी ओलांडणारा तो पहिला यूरोपीय मानला जातो. पुढे आर्कॅन्सॉ, लुइझिॲना या प्रदेशांचे समन्वेषण करून सोतो मिसिसिपी नदीकडे परत आला. परंतु १५४२ मध्ये या नदीच्या किनारी भागाच्या मोहिमेवर असताना तो तापाने आजारी पडला व त्यातच त्याचे सांप्रतच्या लुइझिॲना राज्यातील फेरिडे येथे निधन झाले. रेड इंडियनांकडून त्याच्या देहाचा अनादर होऊ नये म्हणून त्याच्या सोबत्यांनी झाडाच्या एका ओंडक्यामध्ये त्याचा देह ठेवून तो मिसिसिपी नदीमध्ये बुडविला. पेरूतील एक सर्वोत्कृष्ट लेखक व इतिहासकार रिकार्दो पाल्मा (१८३३–१९१९) याने सोतोचे ‘सूर्यपुत्रालाही जिंकणारा सच्चा स्पॅनिश सहृदयी सद्गृहस्थ’ असे वर्णन केले आहे.

चौंडे, मा. ल.