ओरिसा : भारताचे पूर्व किनाऱ्यावरील घटक राज्य. उ. अ. १७ ̊ ४८’ ते २२ ̊ ३४’ आणि पूर्व रे. ८१ ̊ ४२’ ते ८७ ̊ २९’. क्षेत्रफळ १, ५५, ७८२ चौ. किमी. लोकसंख्या २,१९, ४४, ६१५ (१९७१). ओरिसाच्या उत्तरेस बिहार, पश्चिमेस मध्य प्रदेश, दक्षिणेस आंध्र प्रदेश, पूर्वेस बंगालचा उपसागर व ईशान्येस पश्चिम बंगाल आहेत. राज्याची राजधानी भुवनेश्वर ही आहे.

भूवर्णन : राज्याचे सामान्यत: चार नैसर्गिक विभाग पडतात. (अ) उत्तरेचे पठार : यात मयूरभंज, केओंझार व सुंदरगढ हे जिल्हे आणि धेनकानाल जिल्ह्याचा पाल्लहरा तालुका हा उंचसखल प्रदेश उत्तरेकडून दक्षिणेकडे उतरत येतो. हा बिहारच्या छोटा नागपूर पठाराचाच दक्षिण भाग असून त्याच्या टेकड्यांवर पडणारा पाऊस असंख्य प्रवाहांनी नद्यांना जाऊन मिळतो. या पठाराचा सरासरी ९३० मी. उंचीचा मध्यभाग, वैतरणी व ब्राह्मणी नद्यांमधील सर्वांत महत्त्वाचा जलविभाजक आहे. त्याच्या उत्तर व पूर्व भागांत अनेक टेकड्यांच्या रांगा असून त्यांत मलयगिरी, मानकर्णाच, मेघसानी अशी १,१०० ते १,२०० मी. उंचीची शिखरे आहेत. (आ) मध्यवर्ती  नदीखोऱ्यांचा विभाग : हा उत्तरेचे पठार व पूर्वेच्या टेकड्या यांच्या दरम्यान येतो. यात राज्यातल्या मुख्य नद्यांची जलवाहन क्षेत्रे असून त्यांत बोलानगीर, संबळपूर व धेनकानाल जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागात जमिनी सुपीक आहेत. सपाट मैदानांतून मधूनमधून उभ्या टेकड्या आढळतात. राज्याच्या वायव्य भागातले महानदीतले खोरे बरेच विस्तृत आहे. मध्य विभागातली महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या नद्यांची खोरी समांतर, कृषिसंपन्न व दाट वस्तीची आहेत. (इ) पूर्वेकडच्या टेकड्यांचा भाग :  हा भाग म्हणजे भारतीय पूर्वघाटाच्या शेवटच्या रांगा आहेत. मध्यभागातील नदीखोऱ्यांच्या दक्षिणेस व नैर्ऋत्येस सु. २५० किमी., ईशान्य नैर्ऋत्य रोखाने या पसरल्या असून त्या कोरापुट, कालाहंडी, बौध खोंडमाल्स व गंजाम जिल्ह्यांतून जातात. त्यांच्यामधील प्रशस्त खुल्या पठारांभोवती वनप्रदेश व राज्यातली सर्वोच्च शिखरे– देवमाली १,६७० मी., तुरिआ कोंडा १,५९८ मी. व महेंद्रगिरी १,५०० मी. आहेत. या गिरिप्रदेशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ९३० मी. असून तो बहुमोल वृक्षांच्या दाट रायांनी व्यापलेला आहे. यावर पडणारा पाऊस दोन बाजूंना वाहून ऋषिकूल्या, नागावली व वंशधारा नद्यांतून थेट बंगालच्या उपसागरात आणि उपनद्यांतून गोदावरी व महानदी या नद्यांकडे जातो. (ई) किनारी सपाटीचा प्रदेश : यात बलसोर, कटक व पुरी जिल्हे आणि गंजाम जिल्ह्याचा काही भाग येतो. पश्चिमेकडील डोंगराळ भाग आणि पूर्वेकडील खारपट्ट्या यांच्या दरम्यान हा नदीगाळाचा विस्तृत पट्टा आहे. बंगालच्या उपसागराला अगदी लागून असलेल्या भूप्रदेशात अनेक मंदवाही आणि समुद्राच्या भरती-ओहोटीनुसार कमीजास्त मचूळ होणारे प्रवाह  आहेत. बलसोर व पुरी जिल्ह्यांतला यांचा भाग रेताड आणि कटक जिल्ह्यात दलदलीचा आहे. या किनारपट्टीमागची प्रशस्त गाळजमीन मात्र अनेक नद्यानाल्यांनी भिजून भरपुर भातपीक देते.

राज्याच्या उत्तरेच्या पठारभागाची माती लाल आहे. इकडे ग्रॅनाइट खडक जास्त असल्याने त्याची रेती मातीत असते. या भागात पाणी धरून ठेवणाऱ्या चिकणमातीचेही काही प्रमाण जमिनीत आहे. मध्यपठारावरच्या मृदा विविध प्रकारांच्या आहेत. खडकापासून बनलेली माती, वाऱ्या-पावसाने वाहून आणलेली धूळ आणि गंजाम जिल्ह्याच्या ईशान्येतील व महानदीच्या दोन्ही काठांची कपाशीची काळी माती. आणखीही वेगवेगळ्या जातींच्या मृदा मध्यपठारावर सापडतात. किनाराभागात दुमट माती आहे. ओरिसाच्या मृदांची संपूर्ण पाहणी अजून झालेली नाही. 

राज्यात लोहधातुकाचे प्रचंड साठे आहेत. ६० प्रतिशतपेक्षा अधिक लोहांश देणारे कच्चे खनिज विशेषत: सुंदरगढ, केओंझार व मयूरभंज जिल्ह्यांत सापडते. कटक जिल्ह्यातही नवे साठे मिळाले आहेत. भारतातले २० प्रतिशत मँगॅनीज केओंझार, सुंदरगढ, बोलानगीर व कालाहंडी जिल्ह्यांत निघते. केओंझार, धेनकानाल व कटक जिल्ह्यांत क्रोमाइट उपलब्ध आहे. धेनकानालच्या तालचेर तालुक्यात भरपूर कोळसा मिळतो. गंजाम जिल्ह्याच्या गंगपूर भागात डोलोमाइट व चुनखडक काढण्यात येतात. 

महानदी, ब्राह्मणी व वैतरणी या राज्यातल्या मुख्य नद्या वायव्येकडून आग्नेयीकडे जवळजवळ समांतर वहात जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यांच्याखेरीज राज्यात उत्तर भागात सालंदी, बुराबलंग व सुवर्णरेखा आणि दक्षिण भागात ऋषिकूल्या, वंशधारा, नागावली, इंद्रावती, कोलाब आणि मचकुंद या लहान नद्या आहेत. मध्य प्रदेशातून येणारी महानदी ओरिसात ८५३ किमी. लांब वाहते. ती येथील सर्वांत मोठी नदी असून १,३२,६०० चौ. किमी. क्षेत्रातले पाणी वाहून नेते आणि महापुराचे वेळी ४४,८०० घमी./से. किंवा जवळजवळ गंगेइतके पाणी बंगालच्या उपसागरात सोडते. अशा वेळी तिचे पात्र दीड किमी. पेक्षाही जास्त रुंदावते. ती अनेक मुखांनी सागराला मिळते. या व दुसऱ्या दोन नद्यांच्या मुखप्रवाहांचे एक जाळेच त्यांच्या त्रिभुजप्रदेशात बनले आहे. ओरिसातले मोठे जलाशय म्हणजे हिराकूद धरणाने झालेला तलाव आणि भरतीच्या वेळी खाऱ्या व ओहोटीच्यावेळी गोड्या पाण्याचे किनाऱ्याच्या आतले चिल्का सरोवर हे होत. राज्याचा ४८२ किमी. लांबीचा समुद्रकिनारा रेताड व नद्यांच्या गाळाने उथळ बनलेला आहे. 

कर्कवृत्ताच्या दक्षिणेस एकच अंशावर उत्तरसीमा असणारे हे राज्य उष्ण कटिबंधात अतएव स्वाभाविकतः उष्ण वायुमानचे आहे. वातावरणाच्या कमी दाबाच्या पट्ट्यात येत असल्याने येथील पर्जन्यप्रमाण मध्यम आहे वेगवेगळ्या भागांच्या उंचसखलपणामुळे त्यांत थोडेबहुत फेरफार होतात. उन्हाळ्यात पूर्वेकडील टेकड्या व उत्तरेकडचे पठार यांच्या उंचीवरची ठिकाणे वगळता सर्वत्र सामान्य तपमान ३८° से. असते व किनाऱ्याकडून अंतर्भागाकडे ते वाढत जाते. थंडीच्या दिवसात सरासरी तपमान २२·८ ते १५ से. पर्यंत उतरते. पावसाळ्यात सरासरी वार्षिक १४८ सेंमी. पाऊस पडतो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर या दोन्हींवरचे मान्सून प्रवाह या राज्यात एकत्र येतात. नैर्ऋत्य मान्सूनचे काळात बंगालच्या उपसागरावरून किनाऱ्यावर पुष्कळदा तुफाने येतात. याच सुमारास ईशान्य मान्सूनचे काही झोत पूर्वेकडच्या टेकड्यांवर येतात. राज्यात झालेल्या १९७१च्या तुफानाने फार नुकसान झाले.

राज्याचा ४२ प्रतिशत, मुख्यत: पश्चिमेकडचा भूप्रदेश वनाच्छादित आहे. त्यात शाल, साग, शिसवी, पिआसाल, कुरूम, चाफा व गंभर या जातींचे वृक्ष आहेत. इमारती व इतर बहुमोल लाकडांखेरीज बाकीचा लाकुडफाटा जळणाच्या कामी येतो. बांबूची बेटेही विस्तीर्ण क्षेत्रांवर आहेत. त्यांचा विनियोग कागद-गिरण्या करतात. बिड्या वळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या तेंदूच्या पानांचे उत्पादनही बऱ्याच प्रमाणात होते. ओरिसाच्या जंगलातून सर्पगंधासारख्या कित्येक औषधी वनस्पती आणि थोड्याफार प्रमाणात मध व लाख जमा करण्यात येते. वन्यप्राण्यांपैकी या राज्यात वाघ, हत्ती व चित्ते विपुल आहेत. वायव्यभागात काही रानरेड्यांचे कळप आहेत. महानदी  व ब्राह्मणी नद्यांच्या मुखाशी सुसरी आढळतात. चिल्का सरोवरात पाणबदके व स्थलांतर करणाऱ्या काही पक्ष्यांच्या जाती आढळतात. मयूरभंज जिल्ह्यात वन्यपशुसंरक्षणार्थ १,०४० चौ. किमी. क्षेत्राचे सिमिलीपाईगिरी अभयारण्य आहे. तशीच संरक्षित क्षेत्रे चंडका व खंडगिरी येथे करण्याची योजना आहे. कालाहंडी व कोरापुट जिल्ह्यांतील काही वनप्रदेश १९५८ साली सुरू झालेल्या दंडकारण्य निर्वासित-पुनर्वसन योजनेत गेला आहे. 


इतिहास व राज्यव्यवस्था : पुराणांतून उत्कल म्हणून ओरिसाचा निर्देश प्राचीन काळापासून झाला आहे. सुवर्णरेखा नदीपासून ऋषिकूल्येपर्यंत आणि मेकल राज्यासून कपिशेपर्यंत असा त्याच्या सीमांचा उल्लेख आहे. सुद्युम्‍नपुत्र उत्कल याने स्थापन केले म्हणून त्याचे नाव मिळाले. मेकल, आंध्र, उद्र व कलिंग  यांच्याबरोबरच उत्कल देशाचे नाव येते. कलिंग म्हणूनही या प्रदेशाचे प्राचीन नाव आहे. याचे स्थान आर्यावर्ताच्या पूर्वेस, वैतरणीचे तीरावर, आंध्रच्या उत्तरेस असे वर्णिलेले आहे. वेळोवेळी याच्या वेगवेगळ्या सीमांचे उल्लेख आहेत. पुरी ते गंगानदी या सीमा कामसूत्रात सांगितल्या आहेत. कलिंगाचा उल्लेख नेहमी अंग व वंग देशांबरोबर झालेला आढळतो. वायुपुराणात कृतयुगातील पहिला मानव या भूमीवर झाला असे म्हटले आहे. कर्मपुराणात गंगा ते गोदावरी व अमरकंटक ते सागरतट या प्रदेशांत कोसल, उद्र, उत्कल व कलिंग ही मोठी राज्ये असल्याचे वर्णन आहे. महाभारतात कलिंगाचा मार्ग गंगामुखाच्या दक्षिणेस ताम्रलिप्ती, कर्वाट, सुह्म व वैतरणीवरून जातो असे सांगितले आहे. दिधनिकाय, जातकाठ्ठकथासारख्या बौद्ध साहित्यात कलिंग देशाचे अनेक निर्देश आहेत. खि. पू. चौथ्या शतकात कलिंगातील जैनधर्मीय राजांचा मगधाच्या नंदांनी पराभव केला, पण नंदांचा नि:पात करून चंद्रगुप्त मौर्य राज्यावर आला, तेव्हा कलिंग स्वतंत्र झाला.चंद्रगुप्तचा नातू अशोक याने मोठे युद्ध करून कलिंग देश जिंकला, तेव्हाच्या संहारानेच त्याला उपरती होऊन तो अहिंसावादी बौद्ध धर्माचा उपासक बनला. अशोकांनंतर कलिंग देश पुन्हा स्वतंत्र झाला. ख्रि. पू. दुसऱ्या शतकात चेदी वंशाचा तिसरा राजा खारवेल हा या प्रदेशाचा विख्यात नृपती होऊन गेला. त्याने कन्याकुमारी पासून गंगेपर्यंत आणि पश्चिमेस महाराष्ट्रापर्यंत दिग्विजय केला. नंदांनी  पूर्वी  नेलेली कलिंगजिनाची मूर्ती मगध जिंकून परत आणली आणि भुवनेश्वरजवळचे उदयगिरी-खंडगिरी क्षेत्र जैन धर्माचे श्रद्धाकेंद्र बनवले. तेथील हाथीगुंफेत खारवेलाच्या कारकीर्दीचा वृत्तांत कोरलेला आहे. तथापि याची तेजस्वी राजवट अल्पकाळच टिकली व त्यामागून चेदी वंशाला पडता काळ आला. त्यानंतर कित्येक शतकांपर्यंतचा कलिंगाचा इतिहास अस्पष्ट आहे. तथापि उपलब्ध साधनांवरून दिसून येते की, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत उत्कल प्रदेशाच्या किनाऱ्याला भरभराटीत असलेली कित्येक बंदरे होती व त्यांतून यवद्वीप, सुमात्रा, बाली व आग्नेय आशियातील अन्य स्थळांकडे योद्धे, व्यापारी, धर्मप्रसारक व इतर लोक यांची रीघ लागली होती. त्या लोकांनी स्थापन केलेल्या वसाहतींची कालांतराने प्रबळ राज्ये झाली. प्रत्यक्ष कलिंग देश सागरी व्यापारावर संपन्न पण अनेक छोट्या राज्यांत विभाजित झाला होता. बौद्ध धर्माची पुन्हा चलती होती. चौथ्या शतकात दक्षिण दिग्विजयास निघालेल्या सम्राट समुद्रगुप्ताच्या मार्गात आलेल्या उत्कल प्रदेशातील पाच राजांचा प्रतिकार त्याने मोडून काढल्याचा इतिहासात उल्लेख आहे.सातव्या शतकात कलिंग हर्षवर्धनाच्या राज्यात आला व तेथे महायान बौद्धमताच्या प्रचाराचा प्रयत्न झाला. त्याच्या कारकीर्दीत ६३८मध्ये ह्युएनत्संग हा चिनी यात्रेकरू कलिंगात आला होता. त्याने नमूद केले आहे की, येथील लोकांची भाषा व चालीरीती मध्य भारतातील लोकांहून वेगळ्या असून, हे लोक उंच व सावळ्या वर्णाचे आहेत. सातव्या शतकाच्या उत्तरार्धात ओरिसात सोमवंशीय महाभावगुप्त जनमेजयाने (६८०—७१२) नवे प्रबळ राज्य स्थापन करून कटकपर्यंत सीमाविस्तार केला. त्याच्या मागून महाशिवगुप्त, ययाती नावाचे दोन राजे पाठोपाठ गादीवर आले. त्यांतील दुसऱ्याने उत्कल देशाच्या इतिहासातील विख्यात केसरी कुलाची राजवट सुरू केली (७९५). कलिंग, कंगोड, कोसल व उत्कल ही राज्ये एकत्रित करून खारवेलाची साम्राज्यपरंपरा त्याने पुनरुज्जीवित केली. वैदिक धर्माचा उत्साहाने पुरस्कार करून त्याने कान्यकुब्जाहून दहा हजार विद्वान ब्राह्मण ओरिसात वसवले असे सांगण्यात येते. पुरीला पहिले जगन्नाथमंदिर त्यानेच बांधले असे मानतात. त्याचा मुलगा उद्योतकेसरी दुसरा महाभावगुप्त हाही खंबीर राज्यकर्ता व धर्माभिमानी होता. त्याचा कल शैव मताकडे असून भुवनेश्वर येथील बरीच मंदिरे त्याच्या कारकीर्दीत उभी राहिली. अकराव्या शतकात पूर्वेच्या गंग वंशाचा राजा तिसरा वज्रहस्त याने त्रिकलिंगाधिपती ही पदवी धारण करून तीस वर्षे कलिंगाचे वैभवसंपन्न राज्य भोगले. त्याचा नातू अनंतवर्मन् चोडगंग याने अकराव्या शतकाअखेरच्या काळात पुरीच्या जगन्नाथमंदिराचे शिखर व सभामंडप बांधल्याचा समज आहे. गंग राजे वैष्णव मताचे अभिमानी होते. त्यांच्यापैकी पहिला अनंगभीम, दुसरा राजराज, दुसरा अनंगभीम व कोणार्कचे प्रसिद्ध सूर्यमंदिर बांधणारा पहिला नरसिंहदेव यांनी विशेष कीर्ती मिळविली. तोराव्या शतकाअखेरीपासून ओरिसाला मुस्लिमांचा उपद्रव जाणवू लागला. बंगालच्या सुलतानांची धाड १३५२ मध्ये येऊन गेली. तीनच वर्षांनी दक्षिणेच्या प्रबळ विजयानगरच्या सेनापतीने गंगाराज भानुदेवीचा पराभव करून ओरिसा राज्य खिळखिळे केले. १३६१ मध्ये फिरोजशाह तुघलकाने स्वारी करून लूट केली अनेक देवळे नष्ट केली व कटक येथे भानुदेवास शरणागती पतकरण्यास भाग पाडले. १४३१ मध्ये दुबळ्या गंग वंशाला बाजूला सारून सूर्यवंशी कपिलेंद्रदेवाने सत्ता बळकावली व गजपती राजवट सुरु केली. त्याने प्रथम ओरिसातील अंतर्गत बंडे मोडून काढली नंतर बंगालच्या सुलतानाचा समाचार घेतला बहामनी सैन्याचा पराभव केला आणि विजयानगरचाही  बराच प्रदेश जिंकून घेतला. १४६४ मध्ये त्याच्या राज्याची सागरसीमा गंगेच्या मुखापासून कावेरीच्या मुखापर्यंंत होती. तथापि कपिलेंद्रदेवामागून गजपती वंशाची सत्ता क्षीण होत गेली. उत्तरेकडल्या आक्रमकांबरोबर व गोवळकोंड्याच्या सुलतानाशी झगडे चालूच राहिले. तशात घरच्या कलहांनी आणि विश्वासघातांनी राज्य पोखरले आणि अखेर १५६८ मध्ये बंगालचा सुलतान सुलेमानखान याचा सेनापती काला पहाड याच्याशी झालेल्या लढाईत ओरिसाचा शेवटचा राजा मुकुंददेव पडला. तेव्हापासून बंगालच्या अफगाण सुलतानाकडे असलेला हा प्रांत १५९२ मध्ये अकबराचा सेनापती मानसिंग याने जिंकून मोगल साम्राज्याला जोडला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीच्य बादशाहला न जुमानता स्वतंत्र असल्यासारखे वागणारे बंगालचे नबाब ओरिसाचे सत्ताधारी होते. १७५१ मध्ये हा सुभा अलीवर्दीखानाने नागपूरच्या भोसल्यांना दिला. मग ओरिसावरचा पन्नास वर्षांवरील मराठ्यांचा अंमल संपुष्टात आणून १८०३ मध्ये ब्रिटिशांनी हा मुलूख घेतला. सुरुवातीस तो कटक जिल्हा म्हणून एका मुलकी अंमलदाराकडे होता व अनेक छोट्या छोट्या संस्थानांशी ईस्ट इंडिया कंपनीचे स्वतंत्र तहनामे झाले होते. १८२८ मध्ये कटक, बलसोर व पुरी हे जिल्हे व खंडणी देणारी संस्थाने मिळून एक उपप्रांत म्हणून ओरिसा बिहारला जोडण्यात आला.१९०५ मध्ये त्यात संबळपूर जिल्ह्याची भर पडली. १९३६ मध्ये ओरिसा वेगळा प्रांत झाला. बिहारपासून विभक्त व सर्व ओडिया भाषिकांच्या एकत्रित अशा प्रांतासाठी १९०३ पासूनच देशभक्त मधुसूदन दास यांच्या नेतृत्वाने उत्कल युनियन कॉन्फरन्सची चळवळ सुरू झाली होती. नंतर महात्मा गांधींच्या अहिंसात्मक असहकाराच्या आंदोलनात ओरिसा काँग्रेस हिरिरीने सहभागी झाली. १९३०च्या मीठ सत्याग्रहात गोपबंधू दास, मेहताब, रमादेवी, मालतीदेवी, सरलादेवी इत्यादींनी यशस्वी नेतृत्व केले. १९३७ मध्ये श्री. विश्वनाथ दास यांचे पहिले काँग्रेस सरकार अधिकारारूढ झाले पण दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेसपक्षाने सत्तात्याग केला. १९४२च्या स्वातंत्र्य आंदोलनात ओरिसात हजारो देशभक्तांनी चौफेर उठाव केला लक्ष्मण नायको यास फाशी देण्यात आले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ओरिसा, मध्य प्रदेश व बिहारमधील एकूण २६ संस्थाने विलीन झाली. १९४९ पासून संपूर्णपणे ओडियाभाषी ओरिसाने संघराज्यात आपले योग्य स्थान मिळविले.

राज्याच्या विधानसभेत १४० लोकनियुक्त सदस्य असून त्यांपैकी २२ अनुसूचित जाती व ३४ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या साहाय्याने राज्यकारभार सांभाळतो. राज्यात विविध पक्ष असून मार्च १९७१च्या निवडणुकीत नवकाँग्रेस ५१, जुनी काँग्रेस १, उत्कल काँग्रेस ३२, जनकाँग्रेस १, स्वतंत्र ३६, समाजवादी ४, झारखंड ४, कम्युनिस्ट ६ व अपक्ष ४ निवडून आले. उत्कल काँग्रेस, स्वतंत्र व झारखंड पक्ष यांचे संमिश्र मंत्रिमंडळ विश्वनाथ दास यांच्या नेतृत्वाखाली अस्तित्वात आले. मार्च १९७३ मध्ये राष्ट्रपती राजवट सुरू झाली. फेब्रुवारी १९७४च्या निवडणुकांत नवकाँग्रेस पक्षाचे बहुमत होऊन श्रीमती नंदिनी सत्पथी यांचे मंत्रिमंडळ अधिकारावर आले. कारभाराच्या सोईसाठी राज्याचे घटक पुरी, धेनकानाल, फुलबानी, बलसोर, संबळपूर, गंजाम, कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ, बोलानगीर, केओंझार व कालाहंडी या १३ जिल्ह्यांची ५२ महसुली उपविभाग व त्यांची तहसिलात विभागणी केली आहे. राज्यात १९ नगरपालिका, १३ जिल्हा परिषदा, ४४ अधिसूचित क्षेत्रसमित्या, ३१४ पंचायत समित्या व ३,८३१ ग्रामपंचायती १९६१ पासून क्रमश: विकेंद्रित शासनाच्या प्रयोगात अधिकाऱ्यांच्या मदतीने सहभागी होत आहेत. वरिष्ठ न्यायालयात प्रमुख न्यायमूर्ती व चार साहाय्यक न्यायमूर्ती आहेत. जिल्हावार न्यायव्यवस्थेत सत्रन्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी व त्यांचे कनिष्ठ अधिकारी अंतर्भूत आहेत. भारताच्या लोकसभेत २० व राज्यसभेत १० सदस्य ओरिसातून निवडून जातात.


आर्थिक व सामाजिक स्थिती : १९६९–७० मध्ये एकूण १·५६ कोटी हे. जमिनीपैकी ४९·६ लक्ष हे. जमीन जंगलव्याप्त होती सु. ८ लक्ष हे. पडीक, ७·२३ लक्ष हे. चराऊ, ८·०७ लक्ष हे. शेतीयोग्य पण पडीक, ८३·८२ लक्ष हे. एकूण पिकांखाली व १४·२३ लक्ष हे. ओलिताखाली होती. मुख्य पिके तांदूळ, बटाटे, ऊस, डाळी, ताग व तेलबिया असून त्यांखेरीज अंबाडी, हळद, मिरची, मोहरी, तंबाखू वगैरे पिकांचे थोडे उत्पादन होते. राज्यातील ८०% लोक तांदळावर अवलंबून आहेत. १९७१ मध्ये एकूण लोकसंख्येच्या ३१·६% लोक कामकरी होते. कामकऱ्यांच्या एकूण संख्येपैकी  ४८·५ %शेतकरी, २७·८% शेतमजूर व २३·७ %इतर कामगार होते. राज्याला अनुकूल समुद्रकिनारा तसेच चिल्का सरोवर, हिराकूद जलाशय, इतर तळी व अनेक नद्या असूनही मच्छीमारीचा विकास पुरेसा नाही. समुद्रातून व चिल्का सरोवरातून मॅकेरल, सरंगा, हिलसा, वोय या जातीचे मासे काढण्यात येतात. मच्छीमारीच्या एकूण १४,३०० चौ. किमी. क्षेत्रातून सु. ४ कोटी रु. किंमतीचे मत्स्योत्पादन होते.

शासकीय क्षेत्रातील हिंदुस्थान स्टीलचा राउरकेला येथील प्रचंड पोलाद कारखाना वर्षाला १० लाख टन उत्पादन करीत आहे. त्याच्याभोवती व राज्यात अन्यत्र लोहसंबंधित व पूरक वस्तूंचे अनेक कारखाने, यंत्रमाग, लोखंडी नळ, ओतीव बीड, भट्टीच्या विटा, प्रशीतके, रसायने व खते तयार करू लागले आहेत. हिराकूदच्या विजेवर चालणारा ॲल्युमिनियमचा एक कारखाना वर्षाला १०,००० टन उत्पादन करीत आहे. त्याखेरीज ओरिसात सिमेंट, चिनी मातीच्या वस्तू, कागद, कापड, काच, साखर इ. मालांचे कारखाने, उपलब्ध कच्चामाल, पाणी, जळण, वीज आणि मजूर या सोयींचा फायदा घेऊन चालू झाले आहेत. भारतातील निकेलचा  पहिला कारखाना कटक जिल्यातील सुकिंदा येथे सुरू होत आहे. देशाच्या मँगॅनीज उत्पादनातील २० टक्के भाग ओरिसाचा आहे. शिवाय राज्यभर विविध लघुउद्योगांचे कारखाने आहेत. हस्तव्यवसाय व कुटीरोद्योग यांत मुख्यतः हातमाग कापड, बांबू व वेतकाम, विड्या, खेळणी, तांब्यापितळेच्या वस्तू, कलाकुसरीच्या उपयुक्त वस्तू व चांदीचे जाळीकाम अशा मालांचे उत्पादन होते. कटक हे औद्योगिक केंद्र व मुख्य बाजारपेठ आहे. पुरी, बलसोर, संबळपूर, भुवनेश्वर, चौद्वार व पर्लाकिमिडी येथेही प्रादेशिक व्यापार चालतो. राज्यात १९७१ साली १,७१३ किमी. लांबीचे लोहमार्ग आग्‍नेय रेल्वेच्या कक्षेत पूर्व किनाऱ्याला, उत्तर सीमेवर आणि पश्चिमेकडे वळणारे असे होते. त्यात आणखी २११ किमी.ची  भर खाणी व कारखान्यांच्या वाढत्या विकासासाठी दुसऱ्या व तिसऱ्या योजनांत मिळून पडली आणि संकल्पित बैलादिला-कोट्टलवलसा हा ५०२ किमी. मार्ग पुरा झाल्यावर राज्याच्या दूरच्या भागांपर्यंत रेलवाहतूक सुलभ होणार आहे. ओरिसातल्या सु. ७९,००० किमी. सडकांपैकी अंदाजे १३,००० किमी. पक्क्या आहेत. नद्या व कालव्यांमधून नौकानयनास योग्य असे जलमार्ग ३४७ किमी. आहेत. भुवनेश्वरच्या मुख्य विमानतळाखेरीज राज्यात इतर तीन तळ व कित्येक धावपट्ट्या आहेत. शासकीय राज्यवाहतुकीच्या ४५० वर बसगाड्या दिवसाला सु. पाऊण लाख उतारूंची वाहतूक करतात. ओरिसा मार्ग वाहतूक ही दुसरी यंत्रणा केंद्र, राज्य व सार्वजनिक अशा सामाईक स्वामित्वाची असून तीही सु. २०० वाहनांनी वर्षाला ४० लाख उतारूंची ने-आण करते. राज्याचे पारादीप बंदर भारताच्या आठ प्रथमश्रेणीच्या बंदरांपैकी एक आहे  व कच्च्या खनिजांच्या निर्यातीसाठी याचा उपयोग होऊ लागला आहे. चांदबाली व गोपालपूर ही ओरिसातली दुय्यम बंदरे आहेत त्यांचा उपयोग मुख्यत: मच्छीमारी नौकांना होतो.

सामाजिक स्थिती : ओरिसात वेळोवेळी वेगवेगळ्या वंशांचे लोक येऊन स्थायिक झाल्यामुळे राज्यातील प्रजा एकजिनसी नाही. लोकसंख्येत अनुसूचित जमातींचे प्रमाण १५·७ प्रतिशत आहे आणि आदिवासी २४ प्रतिशत आहेत. ९४ (१९६१) अनुसूचित जमातींपैकी पाण, गंदा, डोम, धोबा, बावरी व कांद्रा हे बहुसंख्य आहेत. आदिवासींच्या ६२ जमातींपैकी कोंड, गोंड, संताळ, सावरा, मुंडा, कोल, भुइयाँ, ओराओं, भूमिजी, भौमिया व शबर यांची संख्या जास्त आहे. कोरापुट, मयूरभंज, सुंदरगढ व गंजाम जिल्ह्यांत यांची वस्ती जास्त आहे. आदिवासींचे धर्म प्राथमिक स्वरूपाचे जडप्राणवादी आहेत. ओरिसातले इतर लोक बव्हंशी वैष्णव किंवा शैव पंथी हिंदुधर्मीय आहेत. पुरीचा जगन्नाथ हे राज्यातले प्रधान दैवत असून त्याच्या भक्तांखेरीज भुवनेश्वराचे शिवभक्त व अल्पप्रमाणात जैन मताचे लोक राज्यात आहेत. बहुसंख्य प्रजा कृषिव्यवसायी ग्रामीण असल्याने तिचे जीवन रूढीप्रमाणे व्यतीत होते. कारखाने व खाणींमुळे झालेल्या नव्या वस्तीच्या ठिकाणांतून मात्र लोकांची राहणी आधुनिक होऊ लागली आहे. १९६१ च्या शिरगणतीत ओरिसाची लोकसंख्या पावणेदोन कोटींवर होती. १९७१ पर्यंत त्यात २४·९९ टक्क्यांची भर पडली. १९७१ मध्ये स्त्रिया व पुरुषांचे प्रमाण अनुक्रमे ९८९ व १,००० होते. आधीच्या दशकात जन्मप्रमाण हजारी २६ व मृत्युप्रमाण हजारी १६ होते. १९७१ मध्ये वस्तीची घनता चौ. किमी.स १४१ झाली. लोकसंख्येपैकी ८·२७ प्रतिशत लोक शहरात राहणारे होते. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रोजगारीसाठी आंध्र प्रदेश व इतर शेजारच्या राज्यांतून ओरिसात येणाऱ्या लोकांपेक्षा सु. एक लाख अधिक लोकांनी या राज्यातून मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल व आसाममध्ये स्थलांतर केल्याचे आढळून आले. ग्रामीण ओरिसातील टुमदार खेडी माडा-आंब्यांच्या रायांत वसलेली असतात. मातीने रंगविलेल्या घरांच्या भिंतींवर चुन्याने काढलेल्या नक्षीत भात पिकांचे भारे, देवळे, हत्ती, वाघ असे चित्रविषय असतात. पुरुषांचा वेश सामान्यत: धोतर, बनिअन व खांद्यावर चादर आणि स्त्रियांचा गुडघ्याइतकी साडी असा असतो. आदिवासींच्या वन्य राहणीत जमातीनुसार फरक असतात.  त्यांचे उपजीविकेचे मार्ग शिकार, फळे गोळा करणे, फिरती किंवा एके जागी शेती असे आहेत तथापि खाणींतून आणि नवीन निघणाऱ्या कारखान्यांतून बरेच आदिवासी आता नियमित कामावर जाऊ लागले आहेत.

ओरिसाची ओडिया ही भाषा मागधी प्राकृत गटातील आहे. ओडिया लिपीचा विकास ब्राह्मी लिपीतून झाला आहे. या भाषेत अकराव्या शतकापासून ग्रंथरचना होऊ लागली. सोळाव्या शतकापर्यंतच्या आदियुगात बौद्धगान ओ दोहासारख्या धर्मपर व मादलापांजीसारख्या इतिहासस्वरूप रचना झाल्या. ओरिसाचा आद्यकवी ‘शूद्रमुनी ’ सारळा दास याची विलंका रामायण, महाभारत चंडीपुराण  ही काव्ये याच काळात झाली. मध्ययुगाच्या पूर्वार्धात किंवा भक्तियुगात पुरीच्या जगन्नाथभक्तांनी व चैतन्यशिष्यांनी अनेक भक्तिपर ग्रंथ लिहिले सालवेग नावाच्या मुसलमान भक्तानेही कवने रचली. त्याखेरीज विविध कवींच्या कपटकेली, शशिसेणासारख्या ललितकृती झाल्या. उत्तरार्धाच्या रीतियुगात शास्त्र, कला, संगीत अशा विषयांवरच्या अनेक काव्यलक्षणयुक्त रचना पंडितांनी व कवींनी केल्या.उपेंद्र भंज हा या काळातला सर्वश्रेष्ठ कवी मानण्यात येतो. त्याची पौराणिक काव्ये प्रगल्भ शैलीची आहेत. मध्ययुगांनंतरच्या काळात भक्तिप्रधान व रीतिप्रधान पद्धतींचा समन्वय झाला. हळूहळू फार्सी व हिंदी भाषांचा थोडा प्रभाव ओडियावर पडला. ब्रिटिशांच्या राजवटीबरोबर आधुनिक युग आले व राधानाथ राय, फकीरमोहन, मधुसूदन  राय, रामशंकर राय, गोपबंधू दास, मायाधर मानसिंह, कालिंदीचरण पाणिग्राही, सच्चिदानंद राऊन, गोपीनाथ महांती व नित्यानंद महापात्र अशा लेखकांनी काव्य, नाटक, कादंबरी अशा अनेक प्रकारांत साहित्यनिर्मिती करून ओडिया वाङ्‍यम आधुनिक युगात आणून ठेवले.

साक्षरतेचे प्रमाण १९७१च्या शिरगणतीत या राज्यात २६·१२ प्रतिशत, पुरूषांत ५५·४४% व स्त्रियांत ७·५८% होते. १९६१ मध्ये अनुसूचित जमातीत ११·३% आणि आदिवासींत ७·३% साक्षर होते. राज्यात ४ विद्यापीठे, ८३ महाविद्यालये, ४ शिक्षक महाविद्यालये, ४,००० माध्यमिक शाळा, ९०० उच्च माध्यमिक प्रशाला, ३  विशेष शिक्षणसंस्था व २०,००० वर प्राथमिक शाळा आहेत. उच्च शिक्षण सु. ३२,००० व शालेय शिक्षण २५ लाख विद्यार्थी घेत आहेत. 

कला, क्रीडा इ. : मूलत: ग्रामीण जीवनातून स्फूर्ती घेणाऱ्या लोककला ओरिसात विकसित झाल्या आहेत. मूळ ओरिसामधील ⇨ ओडिसा नृत्याची परंपरा फार जुनी असून संगीत नाट्य अकादमीने या नृत्यप्रकारास मान्यता दिली आहे. ओरिसामधील निरनिराळ्या आदिवासी लोकांमध्ये प्रसंगोपात्त केली जाणारी नृत्येही वैशिष्ट्यपूर्ण असतात. शेती हाच बहुसंख्य लोकांचा व्यवसाय असल्याने पावसासाठी, सुगीनंतर अथवा गाईबैलांकरिता निर्माण झालेले सण ओरिसाभर पाळले जातात. आजुबाजूच्या उपलब्ध साहित्याचा उपयोग करून कारागीर अनेक शोभिवंत वस्तू तयार करतात. पुरीचे आणि परिसरातले शिल्पकार साध्या दगडांतून ओरिसातल्या भव्य वास्तूंच्या प्रतिकृती कोरून काढतात ⇨ कोनारक आणि भुवनेश्वराच्या देवळांतील देवता आणि इतर आकृतीचे सुंदर छोटे नमुने मऊ दगडांतून हुबेहुब तयार करतात. इकडची लाकडी खेळणी आणि जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्ती वास्तवदर्शी नसून प्रतीकात्मक असतात आणि विविध चमकदार रंगांनी त्या मोठ्या वेधक दिसतात. तशीच साध्याभोळ्या पद्धतीने, ओबडधोबड कागदावर रंगवलेली ओरिसाची परंपरागत ‘पट’ चित्रे ढोबळ शैलीची, अवास्तव व भडक असूनही त्यांच्या संरचना व लयरचना लक्षणीय असतात. नाजुक नक्षीदार चांदीचे जाळीकाम ही कटकची एक विशेष कला आहे. अशा पद्धतीने बनविलेले दागिने व शोभेच्या वस्तू देशभर विख्यात आहेत. संबळपूरच्या हातमाग साड्या व मयूरभंज, सोनेपूर व बेहरामपूरचे रेशमी व टसर कापड प्रसिद्ध आहे. पर्लाकिमिडी व कटक येथे हस्तिदंत व शिंगावरीस उत्तम कोरीवकाम होते. ओरिसातले प्रमुख उत्सव मे-जूनमधील पुरीची चंदनयात्रा, जून-जुलैमधील त्रिखंडकीर्तीची जगन्नाथ रथयात्रा, फेब्रुवारीतील कोनारकचा एक दिवसाचा मेळा व नोव्हेंबरमधील कटकची बलीयात्रा हे होत. या उत्सवांना राज्यातून व बाहेरून लाखोंनी लोक जमतात. प्राचीन राजधानी कटक, जगन्नाथाची पुरी, उदयगिरी-खंडगिरी लेणी, कोणार्कचे मंदिर, मंदिरांचे नगर व नवी राजधानी भुवनेश्वर, हिराकूदचे धरण व राउरकेलाचा पोलाद कारखाना, गोपालपूर बंदर, चिल्का सरोवर इ. ओरिसातली प्रक्षणीय स्थळे आहेत.                                                    

ओक, शा. नि.


ओरिसा


कोनारकचे सुप्रसिद्ध सूर्यमंदिर जगन्नाथाची रथयात्रा, जगन्नाथपुरी चिल्का सरोवर : पर्यटकांचे आकर्षण प्राचीन गणेश गुंफा, उदयगिरी संथाळ युवती, मयूरभंज जिल्हा पारादीप बंदर : एक दृश्य हिराकूद धरण. राउरकेला येथील पोलाद कारखाना.