बाकू : सोव्हिएट संघराज्यातील आझग्बैजान राज्याची राजधानी आणि देशातील औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र. अप्शेरॉन द्वीपकल्पाच्या दक्षिणेस कॅस्पियन समुद्रावर ते वसले आहे. लोकसंख्या १४,१५,॰॰॰ (१९७७ अंदाज). हे शहर बाकू उपसागराभोवती एखाद्या अर्धवर्तुळाकार रंगमंदिराप्रमाणे वसले आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांपासून ते सुरक्षित बनले आहे. ‘वायुनगरी’ या अर्थाच्या मूळ इराणी शब्दापासून बाकू हे नाव प्रचलित झाले असावे. या शहराचा पहिला निर्देश नवन्या शतकातील आहे. तथापि इ.स.पू. सहाव्या शतकापासून या नगराच्या परिसरातील खनिज वायूच्या व तेलाच्या केंद्रांची लोक धार्मिक श्रद्धेने पूजा करीत, असे दिसते. पंधराव्या व सोळाव्या शतकांतील व्यापार व हस्तकला यांचे केंद्र असलेले हे शहर इराणच्या ताब्यात होते.१८॰६ पासून ते रशियाच्या ताब्यात आले. १८७॰ पासून येथे तेलउत्पादन व शुद्धीकरण करण्यात येऊ लागले. रशियन राज्यक्रांतीनंतरची दोन वर्षे (१९१८-२॰) ते प्रतिक्रांतिकारकांच्या ताब्यात होते. शहाराच्या जुन्या भागात अकराव्या शतकातील मशीद, पंधराव्या शतकातील खानाचा राजवाडा, २७.४ मी. उंचीचा मनोरा इ. वास्तु उल्लेखनीय आहेत. या मनोऱ्यावरून खानाच्या मुलीने उडी घेतली होती, अशी आख्यायिका आहे. शहरात तेलशुद्धीकरणाचे अनेक कारखाने आहेत. काळ्या समुद्रावरील बाटूमी शहरास तेल व तेलउत्पादने नळांद्वारे व अन्य साधनांनी येथून पुरविली जातात. जहाजबांधणी, तेलशुद्धीकरण व इतर तेलप्रक्रियांची यंत्रसामग्री, रसायने, कापड, सिमेंट इत्यादींचे कारखाने येथे विकसित झाले आहेत. शहरात शासकीय इमारती, विद्यापीठ, विज्ञान अकादमी, संगीतिकागृह इ. सोयी आहेत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत हे देशातील तेलउद्योगाचे प्रमुख केंद्र होते.

गाडे, ना. स.