बेलेम : (परा.) द. अमेरिकेतील ब्राझील देशाच्या परा राज्याची राजधानी व ॲमेझॉन खोऱ्यातील प्रमुख बंदर. लोकसंख्या ७,७१,६६५ (१९७५ अंदाज). हे अटलांटिक महासागरापासून १४५ किमी. ग्वमा नदीच्या मुखाशी वसलेले आहे. येथेच ही नदी परा नदीस मिळते. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर ब्राझीलमध्ये सर्वांत मोठा समजला जातो.

फ्रेंच, डच, इंग्रज यांच्या चाचेगिरीपासून उत्तर भागाचे संरक्षण व्हावे, या हेतूने पोर्तुगीजांनी इ. स. १६१६ मध्ये हे व‌सविले. यास शहराचा दर्जा १६६५ मध्ये मिळाला व १७७२ मध्ये हे परा राज्याची राजधानी बनले. सतराव्या शतकापर्यंत वेलेम साखर-व्यापारात अग्रेसर होते परंतु त्यानंतर त्याच्या आर्थिक विकासाच अनेकदा चढ-उतार होत गेले. एकोणिसाव्या शतकात रबर व्यवसायामुळे यास पुन्हा वैभव प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आर्थिक मंदीमुळे शहराच्या औद्योगिक विकासावर विपरित परिणाम झाला. दळणवळणाच्या साधनांतील वाढ, पीकबदल योजना इत्यादींमुळे शहर पुन्हा प्रगतिपथावर वाटचाल करीत आहे. येथे कापड, जहाजबांधणी, ताग, तंबाखू-प्रक्रिया, साबण तयार करणे, कातडी कमाविणे, लाकूडकाम इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. बेलेम बंदरातून प्रामुख्याने ताग, रबर, मिरे, ब्राझील नट इत्यादींची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

बेलेम हे राज्यातील प्रमुख सांस्कृतिक आणि ‌शैक्षणिक केंद्र असून येथील विद्यापीठ (स्था. १९५७) व विषुववृत्तीय रोग संशोधन संस्था उल्लेखनीय आहे. रुंद रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा झाडे, उद्याने, आकर्षक भव्य इमारती इत्यादींमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. येथील वनस्पतिउद्यान, सांतो अलेक्झांड्रो चर्च, गोएल्दी वस्तुसंग्रहालय, राज्यपालाचा प्रासाद (१७६२), नगरभवन तसेच कॅथीड्रल (१९१७) इ. प्रेक्षणीय आहेत.

गाडे, ना. स.