कोरिया :  आशियाच्या ईशान्य भागातील द्वीपकल्पीय देश. क्षेत्रफळ २,२०,८९१ चौ.किमी. लोकसंख्या ४,५३,६०,००० (१९७०). नैर्ऋत्येकडील चेजू बेट आणि किनाऱ्याजवळील सु. ३,३०० बेटांसह ३३°७’ ते ४३°१’ उ. आणि १२३°४५’ पू. ते १३०°५०’ पू. यांदरम्यानच्या या देशाची दक्षिणोत्तर लांबी सु. ९६० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सु ३२० किमी. असून याचा किनारा सु. ८,६४० किमी. आहे. याच्या उत्तरेस चीनचामँचुरिया, अगदी ईशान्य कोपऱ्यात सु. १७·६ किमी. सीमेवर रशिया, पश्चिमेस पीत समुद्र, पूर्वेस जपानचा समुद्र, दक्षिणेस चिनी समुद्र व आग्नेयीस कोरियाची सामुद्रधुनी व तिच्या पलीकडे कोरियापासून सु. १९२ किमी. वर जपानचा किनारा आहे. चीन, जपान व रशिया यांच्या दृष्टीने कोरियाचे हे स्थान अगदी मोक्याचे आहे.१९४५ मध्ये ३८° अक्षवृत्तावर या देशाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झाले आणि कोरियन युद्धानंतर (१९५०–५३) हान नदीच्या मुखापासून ईशान्येकडे हे अक्षवृत्त ओलांडून गेलेल्या सीमेवर उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया असे दोन स्वतंत्र देश अस्तित्वात आले. उत्तर कोरियाचे क्षेत्रफळ १,२२,३७० चौ.किमी., देशाचा ५४·८% भाग व लोकसंख्या १,३९,७५,००० (१९७१) आहे व दक्षिण कोरियाचे क्षेत्रफळ ९८,४२१ चौ.किमी. आणि लोकसंख्या ३,२७,००,००० (१९७१) आहे. उत्तर कोरियाची राजधानी प्यंगयांग आणि दक्षिण कोरियाची सेऊल आहे. कोरियन लोक आपल्या देशाला चोसन– ‘प्रात:कालच्या शांततेची भूमी’– म्हणतात. दक्षिण कोरियात हानगुक असेही म्हणतात. कोर्यो घराण्यावरून पाश्चात्त्यांनी दिलेल्या कोरियायानावाचा अर्थ ‘उत्तुंग पर्वतांची व चमकदार प्रवाहांची भूमी’ असा होतो.

भूवर्णन : कोरियाचा जवळजवळ ८०% भूप्रदेश डोंगरांनी व्यापलेला आहे. हजारो उंच शिखरांपैकी पॅक्तू– २,७४४ मी. सर्वोच्च असूनक्वान्मो– २,५४१ मी., म्योह्यांग–१,९०९ मी., कुमगांग–१,६३८ मी. व चेजू बेटावरील हाल्ला –१,९५० मी. ही इतर उंच शिखरे होत. बहुतेक सर्व उत्तर-मध्य कोरिया व्यापणाऱ्या पेक्सान पर्वतप्रदेशापासून पूर्व किनाऱ्याला समांतर तॅबाक पर्वतरांग दक्षिणेस जवळजवळ पुसानपर्यंत जाते. तिच्या मध्यापासून नैर्ऋत्येकडे सोबाकरांग जाते. तिचे मौंट चिरीसान हे १,९१५ मी. सर्वोच्च शिखर आहे. पूर्वेकडील किनारपट्टी अगदीच अरुंद आहे. पश्चिमेकडील किनारपट्टी त्यामानाने बरीच रुंद आहे. नैर्ऋत्य व दक्षिण भागांत नद्यांच्या खोऱ्यांत गाळाची सुपीक मैदाने आहेत. दक्षिण किनाऱ्यापासून सु ८० किमी. कोरियाचे सर्वांत मोठे बेट चेजू व जपान समुद्रातील उल्लूंग बेट ही ज्वालामुखीजन्य आहेत. चेजूवरील हाल्लासानचा उद्रेक १००७ मध्ये झाला होता. उत्तरेकडील पेक्सान पर्वतप्रदेशात व डोंगरमाथ्यावर ज्वालामुखी क्रियेची लाव्हा वगैरे लक्षणे दिसतात. शेजारच्या जपानच्या मानाने कोरियात भूकंप क्वचितच होतात.

कोरियातील नद्या आखूड आहेत. उत्तरेकडील पॅक्तू पर्वतप्रदेशात यालू नदी उगम पावते. ती उत्तर सीमेवरून नैर्ऋत्येकडे ७८६ किमी. वाहत जाऊन पीत समुद्राच्या कोरिया उपसागराला मिळते. त्याच पर्वतप्रदेशात उगम पावून तुमन ही नदी ५१७ किमी. वाहत जाऊन जपान समुद्राला मिळते. प्यंगयांगवरून जाणारी तॅदाँग (४३५ किमी.) व ३८°अक्षवृत्ताजवळील इम्जिन (२५३ किमी.) या उत्तर कोरियातील इतर नद्या होत. हान सेऊलच्या पूर्वेस सु. १६० किमी. उगम पावते व दक्षिणेकडे एक मोठे वळण घेऊन ५१२ किमी. वाहत जाऊन सेऊलवरून पुढे पीत समुद्राच्या कांघवा उपसागराला मिळते. दक्षिण कोरियाच्या शेतीप्रदेशातून वाहणारी ही मोठी नदी असून तिच्या डोंगराळ टप्प्यात जलविद्युत् उत्पादन होते. कुम (३९८ किमी. ) व याँगसान (११५ किमी.) या नद्या नैर्ऋत्येकडील शेतीप्रदेशास पाणी पुरविता. सोमजिन (२११ किमी.) दक्षिण भागास व नाकताँग (५२२ किमी.) आग्नेय भागास उपयोगी पडते. पश्चिम व दक्षिणवाहिनी नद्या छोट्या नौकांस काही अंशी उपयोगी पडतात. पश्चिम किनाऱ्यावर पुष्कळ खाड्या आहेत. तेथे भरतीचे पाणी १० मी.पर्यंत चढते. दक्षिण किनाऱ्याजवळ शेकडो लहानमोठी बेटे आहेत. पूर्व किनारा तीव्र उताराचा, डोंगराळ असून तेथे भरती फक्त एक मी. पर्यंत येते.

उन्हाळ्यात कोरियाचे हवामान सर्वत्र उष्ण व आर्द्र असते. पाऊस मोसमी प्रकाराप्रमाणे एप्रिल ते सप्टेंबर या काळात, विशेषतः जूनअखेर ते ऑगस्टपर्यंत पडतो. त्याचे प्रमाण उत्तरेकडे ५० सेंमी. पासून दक्षिणेकडे १५० सेंमी. पर्यंत असते. निम्म्यापेक्षा अधिक प्रदेशास ७५ सेंमी. ते १०० सेंमी. पाऊस मिळतो. यावेळी दक्षिणेकडे सु. २५°से. ते २७ °से., प्यंगयांगच्या जवळपास २५°से. पर्यंत व ईशान्य किनाऱ्यावर २१°से., पर्यंत तपमान असते. हे हवामान भातशेतीसाठी चांगले मानवते. हिवाळ्यात पाऊस नसतो.जानेवारीचे सरासरी तपमान चेजू बेटावर ४·५° से., पुसान येथे २·२° से., सेऊल येथे -५° से., प्यंगयांग येथे -८·७° से. तर उत्तर सीमेवरील चुंगगँग येथे -२१·७° से. असते म्हणजे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात तापमानाचा फरक दक्षिणेकडून उत्तरेकडे अधिकाधिक पडत जातो. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास विध्वंसक चक्रीवादळेही– टायफून– होतात.

कोरियात तीन हजारांहून अधिक जातीच्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी सु. ५०० केवळ कोरियात सापडणाऱ्या आहेत. शेकडो वर्षे जमीन शेतीसाठी वापरली जात असल्यामुळे तिची धूप फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तथापि डोंगराळ भागात बरीच अरण्ये शिल्लक आहेत. कोरियात सापडणारी अत्यंत प्रसिद्ध वनस्पती म्हणजे जिनसांग. या रानटी वनस्पतीचे मूळ मनुष्यप्राण्याच्या आकाराचे असते व ते अनेक रोगांवर रामबाण आहे असा त्याचा लौकिक आहे. उत्तर सीमेवर लार्च, स्प्रूस, फर, बर्च हे विशिष्ट वृक्ष आढळतात. तरुरेषेच्या वर ऱ्होडोडेंड्रॉन व पाइन दिसतात. यालू नदीखोऱ्यात व मध्य कोरियात मॅपल, बासवुड, बर्च, पॉप्लर, ओक, ॲश, एल्म, चेस्टनट, हॅकबेरी, मॅग्नोलिया, जपानी यू इ. पानझडी झाडे आहेत. दक्षिणेकडे सदाहरित ओक, लॉरेल जातीची झाडे, कॅमेलिया व बांबूची बने आढळतात.

प्राणिशास्त्रज्ञांना कोरियात माशांच्या ५००, पक्ष्यांच्या ४००, सस्तन प्राण्यांच्या १००, सरपटणाऱ्या व उभयचरांच्या ४० जाती सापडल्या आहेत. लांडगा, अस्वल, रानडुक्कर, अनेक प्रकारचे हरिण व काळवीट, हिमचित्ता, लिंक्स, वाघ, बेडूक, सरडे, साप व अनेक प्रकारचे कीटक येथे आहेत.

इतिहास : चीन आणिमँचुरियातील नवाश्मयुगीन टोळ्या पाच हजार वर्षांपूर्वी कोरियात उतरल्या. ब्राँझ व त्यानंतर लोखंड यांच्या धातुकामाचे ज्ञान त्यांनी चीनपासूनच मिळविले. तानगन या प्राचीन कोरियन राजाचे घराणे इ.स. पू. ११२२ पासून कोरियावर राज्य करीत होते असे म्हणण्यात येते. पण याला ऐतिहासिक पुरावा नाही. चीनमधील परागंदा विद्वान किजा याने नंतर सत्ता काबीज केली. त्याच्यानंतर इ.स.पू. १९४ मध्ये वीमन घराणे गादीवर आले. यानंतरच्या काळात कोरियामध्ये एकूण तीन राज्ये होती : उत्तरेस कोगुर्यो, नैर्ऋत्येस पेकचे व आग्नेयीस अत्यंत बलशाली व सुसंस्कृत असे सिला घराणे. सिला सत्ताकाळात कोरियात बौद्ध धर्म आला व पूर्व आशियाच्या सागरी व्यापारावर कोरियाची छाप बसली. ९१८ मध्ये वांग कन (८७७–९४३) याने स्थापन केलेल्या कोर्यो घराण्याने ९३६ पर्यंत सर्व देशभर आपला अंमल बसविला. या घराण्याच्या सु. ५०० वर्षांच्या काळात चीनचा राजकीय, सामाजिक व वैचारिक पगडावाढत राहिला. परकीय स्वाऱ्यांनी देश संत्रस्तच राहिला. तथापि याच काळात बौद्ध त्रिपिटक व कोरियाचा इतिहास यांच्या लाकडी ठशांनी आवृत्त्या निघाल्या. १३९२ मध्ये यी घराण्यातील यी साँगग्ये (१३३५–१४०८) राजाने सत्ता बळकावली. त्याने प्रथम बौद्ध धर्माच्या जागी कन्फ्यूशस मताचा राजधर्म म्हणून स्वीकार केला. यी घराण्याच्या सत्तेखाली सेऊल ही राजधानी झाली. छापखान्यासाठी धातूचे ठसे जगात प्रथमच येथे १४०३ मध्ये पाडण्यात आले व १४४६ मध्ये कोरियाचा श्रेष्ठ राजा सेजोंग (१३९७–१४५०) याने कोरियन मुळाक्षरे निश्चित केली. या लिपीला हांगल म्हणतात. इतिहास, भूगोल, संगीत, राज्यकारभार यांवरील पुस्तके तयार झाली. पर्जन्यमापक यंत्रे तयार होऊन देशात ठिकठिकाणी वापरली जाऊ लागली. १५९२ मध्ये जपानी राजा हिडियोशी याने केलेले आक्रमण नौदलप्रमुख यी सूनसिन याने मोडून काढले. तथापि सततच्या युद्धाने जेरीस आलेल्या यी चोसनला अखेर मांचू सत्तेचे मांडलिकत्व पतकरावे लागले. अठराव्या शतकात योंगजो व चोंगजो यांनी जमिनीचे तंटे, कारभाराची शिथिलता व शेतकऱ्यांची दुरवस्था यांस आळा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कोरियन विद्वानांची भरभराट अल्पकालीन ठरली. परकीयांना थारा न देण्याचे धोरण अयशस्वी ठरले व १८९५ मध्ये चीनचा व १९०४-०५ मध्ये रशियाचा पाडाव करून अमेरिकेच्या व इतर पाश्चात्त्य राष्ट्रांच्या पाठिंब्याने १९१० मध्ये जपानने कोरिया आपल्या राज्याला जोडून टाकला. कोरियन राष्ट्रवाद दडपण्यासाठी जपानने कोरियन भाषेवरही बंदी घातली. १९१९ च्या मार्चमध्ये डॉ. सिंगमन ऱ्ही याने जपानी सत्तेविरुद्ध बंड करून भूमिगत असतानाच कोरियन प्रजासत्ताकाची घोषणा केली. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धात जपानचा पाडाव झाल्यावर रशियन व अमेरिकन सैन्ये कोरियात घुसली. त्यांचे स्वागतच झाले. नंतर ३८° उत्तर अक्षवृत्तावर कोरियाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडण्यात आले. उत्तरेकडील भागात रशियाचे आणि दक्षिणेकडील भागात अमेरिकेचे लष्करी वर्चस्व राहिले. अमेरिका व रशिया यांचे उत्तर आणि दक्षिण कोरिया एकीकरणाचे प्रयत्न फसल्यावर, सप्टेंबर १९४७ मध्ये कोरियाचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांपुढे नेण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाप्रमाणे दक्षिण कोरियात १० मे १९४८ रोजी निवडणुका घेण्यात आल्या. संविधानसमितीने लोकतंत्री संविधान तयार करून १५ ऑगस्ट १९४८ रोजी दक्षिण कोरियाचे प्रजासत्ताक राज्य घोषित केले. डॉ. सिंगमन ऱ्ही त्याचा पहिला निर्वाचित अध्यक्ष झाला. या नवीन राष्ट्राला रशिया व त्याच्या गटातील राष्ट्रांखेरीज इतर राष्ट्रांनी मान्यता दिली. अमेरिकेचा तेथील लष्करी अंमल संपला. उत्तर कोरियात कोरियन कम्युनिस्टांच्या द्वारा सोव्हिएट पद्धतीची सामाजिक आणि आर्थिक घडी बसविण्याचे जोराने प्रयत्न झाले. ९ सप्टेंबर १९४८ रोजी निवडणुका होऊनमुख्य प्रधान किम-इल-सुंग यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोरियाचे डेमॉक्रॅटिक ऑफ पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया स्थापन करण्यात आले. त्याला रशिया व इतर कम्युनिस्ट राष्ट्रांनी मान्यता दिली. रशियाचा तेथील लष्करी अंमल संपला.

देशाच्या या दोन भागांत लहान प्रमाणात झगडे सुरू राहिलेच. या परिस्थितीत २५ जून १९५० रोजी उत्तर कोरियाच्या सैन्याने दोन्ही कोरियांच्या एकत्रीकरणासाठी३८°अक्षवृत्त ओलांडून दक्षिण कोरियावर हल्ला चढविला. २७ ते३० जूनपर्यंत अमेरिकेच्या प्रे. ट्रुमनने आपले भू, नौ व वायुदल युद्धात लोटले. ब्रिटनने त्याचे अनुकरण केले आणि संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली अनेक राष्ट्रांची सैन्ये युद्धात दाखल झाली. सेऊल जिंकून आग्नेय कोरियापर्यंत घुसलेल्या उत्तर कोरियाच्या सैन्याला संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने थोपविले व जनरल मॅक्ऑर्थरने १५ सप्टेंबरला इंचॉनला उतरून त्यांची दाणादाण केली. परंतु अमेरिकन सैन्य यालू नदीच्या जवळ येऊन चीनला धोका निर्माण झाल्यामुळे कम्युनिस्ट चीन आता युद्धात उतरला व संयुक्त राष्ट्रांच्या दलास माघार घ्यावी लागली. दोन वर्षे ३८°अक्षवृत्ताच्या आसपास घनघोर लढाई चालू राहिली व अखेर २७ जुलै १९५३ रोजी शस्त्रसंधी झाली. तेव्हापासून दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत कोरियाचा प्रश्न चर्चिला जात आहे परंतु उत्तर व दक्षिण कोरियांचे एकीकरण अद्याप साध्य झालेले नाही.

४ जुलै १९७२ रोजी दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया दोघांनीही बळाचा वापर न करता किंवा त्याची भीती न दाखविता दोन्ही कोरियांचे एकीकरण करण्याच्या प्रयत्नाची घोषणा केली आहे. त्यातून काय निष्पन्न होते इकडे साऱ्या जगाचे लक्ष लागणे साहजिकच होते.

राजकीय स्थिती : उत्तर कोरियाचे नऊ प्रांत असून प्यंगयांग, केसाँग, चंगजिन व हामहुंग या शहरांना प्रांताचा दर्जा आहे. देशाचे सर्वश्रेष्ठ सत्ताधारी व कायदे करण्याचे अधिकार असलेले मंडळ म्हणजे सुप्रीम पीपल्स असेंब्ली होय. त्यात ५०,००० लोकांस एक याप्रमाणे निवडलेले डेप्युटी असतात. १९४८, १९५७ व १९६२ मध्ये या मंडळाच्या निवडणुका झाल्या.असतात.१८ वर्षांवरील वयाच्या सर्व स्त्री-पुरुषांस मताधिकार आहे. सध्या या मंडळात ३८३ डेप्युटी आहेत. अधिवेशनांदरम्यान कारभारासाठी हे मंडळ प्रेसिडियम निवडते. त्यात अध्यक्ष, अनेक उपाध्यक्ष, एक जनरल सेक्रेटरी व अनेक सभासद असतात. मंडळ एक मंत्रिमंडळही नेमते. त्यात मुख्य मंत्री, अनेक उपमुख्य मंत्री, मंत्री व प्रमुख शासकीय खात्यांचे अधिकारी असतात. कोरियन वर्कर्स पार्टी (कम्युनिस्ट) हा सत्ताधारी पक्ष आहे. १९६८ मध्ये त्याचे १७ लक्ष सभासद होते. पक्षाचे कार्य नॅशनल पार्टी काँग्रेस, तिची मध्यवर्ती कमिटी, हिशेब तपासनीस कमिटी, संघटक कमिटी, नियंत्रक कमिटी व प्रेसिडियम यांच्या द्वारे चालते. प्रेसिडियममध्ये पक्षाचे प्रमुख पुढारी व शासकीय अधिकारी असतात. अकरा जणांच्या पॉलिटब्यूरोतील सहाऐवजी आता चौघांचे प्रेसिडियम १९६८ पासून आहे. मुख्य मंत्री किम व त्याचे तिघे दीर्घकालीन सहकारी हे सध्या प्रेसिडियममध्ये आहेत. शहरे, प्रांत व री म्हणजे गाव किंवा कामगारांचे कॉम्यून यांचा कारभार त्यांच्या त्यांच्या निवडलेल्या लोकमंडळाकडे असतो. रिलिजस चोंगू पक्ष व फादरलँड फ्रंट हे इतर दोन पक्ष आहेत.

दक्षिण कोरियाचेही नऊ प्रांत असून सेऊलला प्रांताचा दर्जा आहे. डिसेंबर १९६२ च्या संविधानाप्रमाणे कोरियाचा अध्यक्ष शासनप्रमुख आहे. सार्वमताने चार वर्षांसाठी अध्यक्ष निवडला जातो. तो स्टेट कौन्सिल नेमतो. त्याचा प्रमुख मुख्य प्रधान असतो. अध्यक्ष नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल नेमतो. ते देशान्तर्गत, परराष्ट्रीय व लष्करी धोरण ठरवून स्टेट कौन्सिलपुढे मांडते. नॅशनल असेंब्लीला कायदे करण्याची सत्ता असते. तिच्या १७५ सदस्यांपैकी १३१ सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येतात व ४४ जागा मतांच्या प्रमाणात निरनिराळ्या पक्षांना मिळतात. सदस्य कोणत्या तरी पक्षाचे असावे लागतात. असेंब्ली मंत्र्याची शिफारस करू शकते किंवा त्याला काढून टाकू शकते. परंतु सरकारवर अविश्वासाचा ठराव तिला करता येत नाही. १९४८ ते १९६० पर्यंत सिंगमन ऱ्ही चार वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आला परंतु १९६० मध्ये जनरल पार्क चुंग ही याच्या नेतृत्वाखाली लष्करी उठावाने त्याला काढून टाकले. त्याला परदेशात पळून जावे लागले. १९६३ मध्ये पार्क मुलकी सरकारचा अध्यक्ष म्हणून निवडून आला. तोपर्यंत पोसन युनच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पुनर्रचना समितीने कारभार केला. ८ जून १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनरल पार्कचा डेमॉक्रॅटिक रिपब्लिकन पक्ष विजयी झाला. पोसन युनच्या न्यू डेमॉक्रॅटिक पक्षाला फक्त ४४ जागा मिळाल्या. १९६९ च्या घटना दुरुस्तीने जन. पार्क तिसऱ्यांदा अध्यक्ष झाला. परंतु ऑक्टोबर १९७२ मध्ये अध्यक्ष पार्क याने पुन्हा लष्करी सरकार पुकारले. दक्षिण कोरियाच्या शासनात वारंवार झालेल्या बदलांमुळे आणि मध्यंतरीच्या लष्करी कारभारामुळे स्थानिक स्वराज्य व्यवस्था विस्कळित झाली. सुधारित संविधानाप्रमाणे पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकांची तरतूद आहे.

उत्तर कोरियात प्रांतिक, नागरी, जिल्हा व खास न्यायालये त्या त्या स्तरांवरील लोकसभांनी नेमलेली असतात. बहुतेक खटले शहरी अथवा जिल्हा स्तरांवर जनता न्यायालयात चालतात. प्रांतिक न्यायालयासमोर महत्त्वाचे खटले आणि खालच्या कोर्टांच्या निवड्यांविरुद्धची अपिले येतात. या सर्वांच्या वर सुप्रीम पीपल्स असेंब्लीने नेमलेले सुप्रीम कोर्ट असते. असेंब्लीने नेमलेला प्रॉसिक्यूटर जनरल न्यायव्यवस्थेवर देखरेख करतो. दक्षिण कोरियात १९६२ च्या संविधानाप्रमाणे न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खालोखाल अपील न्यायालये व जिल्हा न्यायालये असतात. न्यायाधीश शिफारस समितीच्या सल्ल्याने व लोकसभेच्या संमतीने अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो. त्याच्या सल्ल्याने तो सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करतो.

उत्तर कोरियात प्रत्येक नागरिकाला १७ वर्षे वयानंतर ३ ते ४ वर्षे सैनिकी सेवा आवश्यक आहे.१९७२ मध्ये भूदलात ३,६०,००० सैनिक, त्यांच्या२ चिलखती व २० पायदळ डिव्हिजन, ८०० सोव्हिएट रणगाडे, ८,००० तोफा व ३०० क्षेपणास्त्रे असावी. नौदलात १९७२ मध्ये ११,००० अधिकारी व सैनिक, ३ पाणबुड्या, १० सुरुंग काढणाऱ्या बोटी, ४३ पाणतीर बोटी, ३३ पाणबुड्यांचा पाठलाग करणाऱ्या बोटी, १२ किनारा संरक्षक बोटी व १३० इतर नौका होत्या. चीन व रशिया यांच्या साहाय्याने ३०,००० लोकांचे वायुदल व ५५५ लढाऊ विमाने आहेत. त्यात ९० स्वनातीत मिग–२१ २० मिग–१० ३५० मिग–१७ ७० इ. (इल्युशिन)–२८ दुहेरी जेट बाँबर व इतर विमाने आणि हेलिकॉप्टर आहेत.

दक्षिण कोरियाच्या भूदलात १९७३ मध्ये १९ डिव्हिजनमध्ये ५,६०,००० सैनिक, त्यात १० चिलखती विभाग, एम्–४७ व एम्–४८ रणगाड्यांसह व ८० तोफखाना विभाग होते. दोन पायदळ तुकड्या व इंजिनियर विभाग मिळून ५०,००० सैनिक दक्षिण व्हिएटनाममध्ये आहेत. नौदलात ३ विनाशिका, त्यांच्या ३ संरक्षक नौका, ११ किनारी सुरुंगकाढ्या, ४ फ्रिगेट्स, ६ जलदवाहू नौका, १५ संरक्षण नौका, ६ पहारा नौका, २० सैन्य उतरविणाऱ्या नौका, ६ पुरवठा नौका, ४ तेल नौका, २ टग व १ दुरुस्ती नौका होत्या. नाविकदलात १९७२ मध्ये १८,९०० अधिकारी व सैनिक होते. वायुदलात २३,००० लोक व २२० लढाऊ विमाने आहेत. यात १८ एफ्–४ डीफँटम, ७५ एफ्–५ टॅक्टिकल फायटर, २०–एफ्–८६ डी, १०० एफ्–८६ एफ् फायटर बाँबर, १० आर्एफ–८६ एफ् मदतनीस व शिवाय कमांडो स्कायमास्टर्स, टी–२८, टी–३३ व हेलिकॉप्टर आहेत.

आर्थिक स्थिती :उत्तर कोरियात १९५४ पासून १९७० पर्यंत तीन योजना कमीअधिक यशस्वी झाल्या. सध्याची १९७१ ते ७६ ची योजना तांत्रिक सुधारणा व स्थानिक छोट्या उद्योगधंद्यांची आहे. गेल्या १० वर्षांत ‘चॉल्लिमा’ (उडता घोडा) म्हणजे झपाट्याची व स्वावलंबी आर्थिक सुधारणा ही मोहीम जोरात सुरू आहे. शक्ती, खाणी, धातुविज्ञान व रासायनिक उद्योग यांस प्राधान्य आहे.इलेक्ट्रॉनिक उद्योगाचा विकास होत आहे. औद्योगिक उत्पादन दरवर्षी १४% वाढावे अशी योजना आहे.१९७६ चे लक्ष्य ३,००० कोटी किवॉ. वीज, ५ कोटी टन कोळसा, ३५ लक्ष टन पिग-आयर्न, ३८ लक्ष टन पोलाद, ३० लक्ष टन रोल्ड पोलाद,२८ लक्ष टन रासायनिक खते व ३५ लक्ष टन तांदूळ व ३५ लक्ष टन इतर धान्ये असे आहे.

दक्षिण कोरियात १९६२–६६ च्या पंचवार्षिक योजनेत प्रत्यक्ष वार्षिक वाढ ८·५% दिसून आली. स्वावलंबी शेती हे ध्येय होते.१९६७–७१ च्या योजनेत वार्षिक ११·७% वाढ अपेक्षित आहे. औद्योगिक वाढीवर भर आहे. पेट्रो-केमिकल, लोखंड आणि पोलाद, यंत्रनिर्मिती व तेलशुद्धीकरण या उद्योगांवर विशेष लक्ष आहे.

उत्तर कोरियात २०% जमीन शेतीयोग्य आहे. बाकीची डोंगराळ व जंगलमय आहे. जल व भूसंरक्षणावर विशेष भर देण्यात येतो.१९४६ मध्ये सर्व जपानी मालकीची व५ जंगबो (१ जंगबो = १ हेक्टर) वरील जमीन मालकांची जमीन ७,२४,५०० भूमिहीन व छोटे भूधारक यांस वाटून देण्यात आली.१९५४ ते१९६८ पर्यंत सामुदायिक शेतीचा कार्यक्रम पुरा करण्यात आला. सरासरी १३० जंगबोंची १३,३०९ सहकारी शेते होती .१९५८ मध्ये ही ५०० जंगबोंच्या ३,८४३ ‘री’ या घटकात सामील करण्यात आली. लागवडीखालील ९०% जमीन सहकारी व्यवस्थेखाली आहे. सरकारी पशुपालन केंद्रांवर गुरे व मेंढ्या वगैर पाळली जातात. लागवडीखालील ३० लक्ष जंगबो जमिनीपैकी /जमीन ओलीताची आहे. ८,००० किमी. पाणीपुरवठा कालवे आहेत. भाताची २ पिके निघावी अशी योजना आहे. १९६८ मध्ये ५५,००० ट्रॅक्टर व ४९,००० इतर शेतीयंत्रे होती. यांत्रिकीकरणाने धान्याचे उत्पादन १९६८ मध्ये ७५ लक्ष टनांपर्यंत वाढले. त्यात प्रमुख उत्पादन भाताचे होते. १९६४ मध्ये देशांत ६,९९,००० गुरे, १५ लक्ष डुकरे, १,६१,००० मेंढ्या होत्या. अंड्यांचे उत्पादन वर्षास ७० कोटी अंडी इतके होते.

दक्षिण कोरियात सु. ९० लक्ष हे. शेतीयोग्य जमिनीपैकी २० लक्ष हे. जमीन लागवडीखाली आहे. मुख्य पीक भाताचे असून १९६९ मध्ये त्याचे उत्पादन ४०,९०,००० टन झाले. बार्ली, गहू, घेवडे, अन्नधान्ये आणि तंबाखू ही इतर पिके होतात. १९६७ मध्ये सरकारी मक्तेदारीच्या तंबाखू पदार्थाचे उत्पादन १,१३,७०० टन झाले. एकेकाळी भरभराटीत असलेला पशुपालन व्यवसाय शासन व संयुक्त राष्ट्रे यांच्या मदतीने जेमतेम जीव धरून आहे. १९६७ मध्ये १२,४०,००० गुरे, १३ लक्ष डुकरे व १७३ लक्ष कोंबड्या बदके होती.

उत्तर कोरियात १९६५ मध्ये ७,४५,४०० टन मासे पकडण्यात आले. ३,००० आधुनिक यांत्रिक व शिडांच्या मासेमारी नौका असून खोल समुद्रातील मासेमारी, शीतगृहे व प्रशीतक नौका यांची वाढ होत आहे. दक्षिण कोरियात १९६९ मध्ये ८,६२,८०० टन मासे पकडण्यात आले. व्हेल मासेही पकडले जातात.

उत्तर कोरिया खनिजसंपन्न आहे. कोळसा, लोखंड, शिसे, जस्त, तांबे, टंगस्टन, निकेल, मँगॅनीज व ग्रॅफाइट ही खनिजे मिळतात. १९५७ पासून पेट्रोलियम मिळू लागले. खाणींचे उत्पादन वाढत आहे.

दक्षिण कोरियात खनिजे कमीच आहेत.१९६९ मध्ये ४४८ खाण कंपन्यांत १,१३,००० कामगार होते. टंगस्टन हेच काय ते प्रमुख खनिज होय. संगडाँग खाणीतील साठा जगातील मोठ्या साठ्यांपैकी एक आहे .अँथ्रासाइट कोळसा, लोहधातुक, केओलीन, चुनखडी, तांब्याचे व शिशाचे धातुक, जस्त, सोने व चांदी ही खनिजे अल्प प्रमाणात सापडतात.

उत्तर कोरियात उत्तरेकडे सूचिपर्णी वृक्षांची बने आहेत. १९५७ पेक्षा १९६० मध्ये इमारतीलाकडाचे उत्पादन सु. २८% वाढले व कापीव लाकडात सु. ६·२५% वाढ झाली. पूर्व किनाऱ्यावरील किल्चू व यालूच्या मुखांजवळील शिनईजू येथे मोठ्या कागदाच्या व लगद्याच्या गिरण्या आहेत. १९६४ मध्ये १,१०,००० हे. जमिनीत जंगलवाढ केली गेली.

दक्षिण कोरियात १९६८ मध्ये ६७% क्षेत्र जंगलाचे होते. तथापि प्रत्यक्ष उपयुक्त जंगल कमीच होते. धुपलेली जमीन व झुडपे यांनी व्यापलेले क्षेत्र कमी करून जंगलांची वाढ करण्यात येत आहे. देशाची फक्त २०% गरजच देशातील जंगलांनी भागते.

उत्तर कोरियात जलविद्युत् हेच प्रमुख शक्तिसाधन आहे. १९६५ मध्ये १३·३ अब्ज किवॉ. तास वीज उत्पादन झाले. यालू नदीवरील सूपुंग केंद्रात७ लक्ष किवॉ. वीज होते. यात चीनलाही काही वाटा मिळतो. चागांग प्रांतातील कांग्ये यूथ केंद्राची उत्पादनक्षमता १९६४ मध्ये २,४६,००० किवॉ. होती. प्यंगयांग व उनबाँग येथे अनुक्रमे ५०० मेगॅवॉट व ४०० मेगॅवॉटची औष्णिक केंद्रे आहेत. यांशिवाय इतर १८ लहानमोठी वीजकेंद्रे आहेत.

दक्षिण कोरियाचा उत्तरेकडील जलविद्युत् पुरवठा उत्तर कोरियाने मे १९४८ मध्ये बंद केला. तेव्हा गैरसोयीची व अपुरी जलविद्युत् केंद्रे आणि औष्णिक वीजकेंद्रे यांवर भर द्यावा लागला. १९६९ मध्ये १,६३५·७ मेगॅवॉट उत्पादनक्षमता होती. पुप्यांग, वांगशिपरी व पुसान येथे औष्णिक वीजकेंद्रे सुरू करण्यात आली.

उद्योगधंदे : जपानी अंमलाखाली कोरिया हा फक्त कच्चा माल पुरविणारा देश होता. तथापि उत्तर कोरियामध्ये जपानी सरकारने काही उद्योगधंदे निर्माण केले. उत्तर कोरियात१९६३ पर्यंत धातुकाम, कापडधंदा व अन्नप्रक्रिया या धंद्यांची अनुक्रमे एकूण उत्पादनाच्या ३३%, १८·६% व १३·७% इतकी वाढ झाली. देशातील ९०% उद्योगधंदे शासकीय मालकीचे व १०% सहकारी आहेत. चंगजिन, किमचेक, साँगनिम व काँगसो ही लोखंड व पोलाद धंद्यांची प्रमुख केंद्रे आहेत. इतर ठिकाणी ॲल्युमिनियम, सिमेंट, चुना, मॅग्नेसाइट, ग्रॅफाइट, शिसे, जस्त, पेट्रोलियम वस्तू, काचा, यंत्रहत्यारे, वीजउपकरणे, ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचे उत्पादन होते. रासायनिक उद्योगात मूळ रसायने, कृत्रिम धागे व खते यांचे उत्पादन मुख्यत: हूंगनाम व पोंगूंग येथे होते.

दक्षिण कोरियात भारी उद्योगधंद्यांची वाढ १९६२–६६ च्या योजनेपासून झाली. त्यापूर्वी घरगुती व छोट्या उद्योगधंद्यांतून देशाची अंतर्गत गरज भागत होती. आता देशाच्या एकूण उत्पादनातील २५% वाटा कारखान्यांतील उत्पादनाचा आहे. शासनाने पूर्वीचे जपानी कारखाने खासगी कारखानदारांना विकले आणि अमेरिका व संयुक्त राष्ट्रे यांचीही विकासास मदत झाली. १९६४ मध्ये पहिला तेलशुद्धी कारखाना उल्सान येथे निघाला. ह्‌वांग हो येथे १९६४ मध्ये पोलाद कारखाना उभारला गेला. जानेवारी १९६५ मध्ये जपानी दात्सुनसारखी सिनसुंगहो ही पहिली कोरियन मोटारगाडी बाजारात आली. दरवर्षी अशा २,००० गाड्या तयार होतात. १९६५ मध्ये सिगारेट कारखाना निघाला. १९६९ मध्ये प्राथमिक, दुय्यम व तिय्यम उद्योगांचे प्रमाण एकूण औद्योगिक उत्पादनात अनुक्रमे २९·४%, ३२·२% व ३८·४% होते.

उत्तर कोरियात सर्व औद्योगिक कामगार आणि कचेऱ्यांतून काम करणारे लोक कामगार संघटनांचे सभासद असतात. अशा सर्व संघटनांची मिळून एक मध्यवर्ती कामगार संघटना आहे. तांत्रिक कौशल्य आणि उत्पादनक्षमता वाढविणे, कामगारांचे स्थलांतर नियंत्रित करणे, यांसाठी शासनाला या संघटनांचा उपयोग होतो. त्यांच्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचाही महत्त्वाचा भाग सोपविलेला असतो.१९४९ मध्ये लोकसंख्येच्या ६९·३% असलेले व्यक्तिगत शेतकरी आता नामशेष झाले आहेत. १९६३ मध्ये एकूण कामगारवर्गापैकी ४०·२% कारखान्यांत काम करणारे, १५·१% कचेऱ्यांतून काम करणारे, ४२·८%सहकारी शेतीवरील शेतकरी व १·९% सहकारी क्षेत्रातील कारागीर होते. १९६८ मध्ये कामगारांची एकूण संख्या ६५ लक्ष होती.

दक्षिण कोरियात १९६९ मध्ये एकूण कामगारसंख्या १,७४,३३,००० होती.१९६८-६९ मध्ये शासकीय व खाजगी प्रयत्नांनी १,०५,८५१ लोकांना रोजगार मिळाला. संविधानाने सामुदायिक वाटाघाटी व कृती यांची हमी घेतली आहे. १९६१ मध्ये मध्यवर्ती कामगार संघटना स्थापन झाली. १९६१ च्या कायद्याने पगारी सुट्टी, सुट्टीच्या व रात्रीच्या कामासाठीदीडपट वेतन, कामावरून काढून टाकण्यापूर्वी ३० दिवसांची नोटीस व नोकरीच्या प्रत्येक वर्षाला३० दिवसांच्या पगाराइतकी रक्कम निवृत्तीनंतर मिळण्याची तरतूद आहे. १९६५ मध्ये एकूण १ कोटी कामगारांपैकी सु. दोन तृतीयांश शेतीकामगार, १३% विविध सेवा, १०% व्यापार, वाहतूक इ., ८% उत्पादक उद्योगधंद्यांत व त्यांपैकी २५% कापडधंद्यांत अशी विभागणी होती. बेकारीचा प्रश्न दक्षिण कोरियात वाढता आहे. १९६५ मध्ये. सु. २५% कामगार बेकार किंवा अर्धबेकार होते. संप क्वचितच होतात आणि कामगारांची प्रमुख मागणी नेहमी वेतनवाढीचीच असते.

व्यापार : उत्तर कोरियात१९४६ मध्ये अंतर्गत व्यापाराचा ९६·५% भाग खाजगी व्यापाऱ्यांच्या हातात, ३·४% सहकारी क्षेत्रात व फक्त०·१% भाग शासकीय क्षेत्रात होता. १९६० मध्ये ७८·८% शासनाकडे, २०·४% सहकारी क्षेत्राकडे, ०·८% शेतकऱ्यांच्या व्यापारी संस्थांकडे होता आणि खाजगी क्षेत्राचे संपूर्ण उच्चाटन झालेले होते. परदेशी व्यापाराचा सर्व व्यवहार शासनाकडे असतो. सु. ८६% आयात भारी उद्योग व वाहतूक यांसाठी यंत्रे, उपकरणे, यंत्रहत्यारे, विजेच्या मोटारी, मालमोटारी, तेल, कच्चे रबर अशा स्वरूपाची असते. १४% सूत, कापड वगैरेंची असते. सु. ७३·३% निर्यात लोखंड व इतर खजिने, अन्नपदार्थ, रसायने यांची असते. उत्तर कोरियाचे रशिया, चीन, क्यूबा, अल्बेनिया, रूमानिया, पोलंड या कम्युनिस्ट देशांशी व्यापारी करार आहेत तथापि जपान, भारत, इंडोनेशिया, ईजिप्त, नेदर्लंड्स, ऑस्ट्रिया यांच्याशीही व्यापार होतो. १९६८ मध्ये उत्तर कोरियाने जपानमधून ७२८·३ कोटी येन किंमतीची आयात केली व जपानला ४०६·२ कोटी येनची निर्यात केली.

दक्षिण कोरियात अंतर्गत व्यापार छोट्या व्यापाऱ्यांच्या हातीच आहे. घराच्याच पुढच्या भागात सकाळपासून रात्रीपर्यंत बसणारे दुकानदार, फेरीवाले, जत्रेत माल विकणारे हेच दृश्य अद्याप दिसते. मोठी दुकाने, जाहिराती यांचा प्रसार अलीकडे होत आहे. परदेशी व्यापार वाढता आहे. १९६०मध्ये ३·३कोटी डॉलरचा परदेशी व्यापार १९६९ मध्ये ६२·३कोटी डॉलरपर्यंत वाढला. प्लायवुड, खनिजे, कापड, सागरी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक भाग हे प्रमुख निर्यात पदार्थ आहेत. धान्य, औद्योगिक महत्त्वाचे पदार्थ, औषधे, वाहतूक साधने, पेट्रोलियम वस्तू व इतर ग्राहकोपयोगी वस्तू हे प्रमुख आयात पदार्थ होते. व्हिएटनामी युद्धाने परदेशी व्यापारास थोडाबहुत हात दिला तथापि निर्यातीपेक्षा आयात फार जास्त होत असल्याने अमेरिकेच्या मदतीवर फार विसंबून रहावे लागते. अमेरिका व जपान यांच्याशीचमुख्यतः ७५% व्यापार होतो. तथापि ब्रिटन, हाँगकाँग, पश्चिम जर्मनी, कॅनडा व इतर अनेक देशांशी व्यापार वाढत आहे.

उत्तर कोरियाचे चलन वॉन हे आहे. १९५८ अखेर १ रूबल =३० वॉन असे प्रमाण होते. १९५९ मध्ये १०० जुन्या वॉनबरोबर१ नवा वॉन असे नवे चलन सुरू झाले. एका वॉनचे १०० चाँग असतात. दक्षिण कोरियाने १९५३ मध्ये वॉनऐवजी व्हान हे चलन सुरू केले.१९६२ मध्ये १ वॉन = १०० व्हान असे प्रमाण ठरविण्यात आले. सु. २९० वॉन = १ अमेरिकी डॉलर असा तात्पुरता विनिमय दर आहे.

उत्तर कोरियात मध्यवर्ती बँक सर्व आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण करते. १९५९ मध्ये परदेशी व्यापार बँक स्थापन झाली. कोरियन औद्योगिकबँक सहकारी शेती व उद्योग यांस मदत करते. पोस्टातील बचतखाती बंद करण्यात आली आहेत. त्याऐवजी उद्योगधंद्यांत व सहकारी शेतीत बचतीची व्यवस्था केलेली आहे. तिचा उपयोग मोठी सहकारी शेते, मत्स्य सहकारी संस्था यांस होतो. दक्षिण कोरियात बँक ऑफ कोरियाकडे चलन, सहकारी पैसा व परदेशी चलन यांची व्यवस्था असते. पुनर्रचनाबँकेकडे लांब मुदतीच्या कर्जाची व्यवस्था असते तर शेती, उद्योगधंदे, बचत इत्यादींसाठी नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह फेडरेशन आहे.

उत्तर कोरियात खाजगी विमाकंपन्या नाहीत. सरकारच विमाव्यवस्था पाहते. आग व नैसर्गिक आपत्तींसाठी विम्याची सरकारी व्यवस्था आहे. पशुधन, सागरी प्रवासी यांना विमा आवश्यक आहे. व्यक्तींना मालमत्ता, जीवित व प्रवास विमा घेता येतो.

दक्षिण कोरियात खासगी विमाकंपन्या सर्व प्रकारच्या विम्याचे काम करतात. सरकारी आयुर्विमा कंपनी आहे.

उत्तर कोरियाचा १९६५, ६६ व ६७ या वर्षांचा आय-व्यय कोटी वॉनमध्ये अनुक्रमे ३५७·३, ३६७·१, ४१०·६ व ३४७·६, ३७५·१,३९४·८ होता. त्यामुळे अनुक्रमे ९.७, ८ व १५·८ कोटी वॉनची शिल्लक राहिली. दक्षिण कोरियाची १९७० च्या आर्थिक वर्षासाठी ४३२·४ अब्ज वॉन व्यय व ४२९·७ अब्ज वॉन आय अशी तरतूद होती. १·३ अब्जांची तूट बाहेरची कर्जे व सरकारी कर्जरोख्यांची विक्री यांनी भरून काढावयाची होती.

उत्तर कोरियाचे आर्थिक धोरण नियोजनपूर्वक औद्योगिक विकासाचे आहे. १९४७ पासून वार्षिक, द्विवार्षिक, त्रिवार्षिक, पंचवार्षिक व १९६१ मध्ये सप्तवार्षिक योजना आखण्यात आल्या. १९६५ मध्ये त्या वर्षाचे सु. ७० ते ७५ टक्के लक्ष्य साध्य झाले होते.

दक्षिण कोरियानेही पंचवार्षिक योजनांच्या द्वारे आर्थिक उन्नतीचे धोरण आखले आहे. औद्योगिक विकासावर भर देण्यात येत आहे.

उत्तर कोरियात प्रत्यक्ष करांना विशेष महत्त्व नाही. ‘सोशॅलिस्ट सेक्टर’कडून ९८% वसूल होतो.१९६१ नंतर अर्थसंकल्पात परकीय मदतीचा समावेश नाही. दक्षिण कोरियात सीमाशुल्क आणि जकात, विक्रीकर, प्राप्तिकर, अबकारी कर ही वसुलीची साधने आहेत. दहा लक्ष वॉनहून कमी औद्योगिक उत्पन्नावर २५% व त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर ३०% निगम कर आहे. तथापि परकीय चलन मिळविण्याच्या उद्योगांस करांत सवलती आहेत.

दळणवळण : उत्तर कोरियात लोहमार्ग हेच वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. सु. ११,२०० किमी. लांबीचे लोहमार्ग असून एंजिने व डबे देशातच बनविले जातात. सु. ५,६०० किमी. लांबीचे हमरस्ते आहेत. हवाई वाहतुकीला विशेषसे महत्त्व नाही.

दक्षिण कोरियातही लोहमार्ग वाहतूकच महत्त्वाची आहे. सु. ५,१९५ किमी. लोहमार्ग आहेत. १९६८ मध्ये सु. ६·९% प्रवाशांची आणि ३५·८% मालाची वाहतूक लोहमार्गांनी झाली. ३४,७५० किमी. हमरस्ते अपुरे पडतात. १९६८ अखेरीस एकूण ८०,९५१ मोटारवाहने होती. महत्त्वाच्या गावांना जोडणारे बसमार्ग आहेत. सागरी वाहतूक थोड्या प्रमाणात आहे. सेऊलच्या किंपो विमानतळावरून टोकियो, हाँगकाँग व अमेरिकेला नियमित विमाने जातात.

उत्तर कोरियात पोस्ट, तार, टेलिफोन, रेडिओ ही सर्व संपर्कसाधने शासनाच्या हाती आहेत. प्यंगयांगहून सर्व कम्युनिस्ट देशांच्या राजधान्यांशी टेलिफोन संपर्क आहे. खासगी रेडिओसेट क्वचितच आहेत. तथापि आकाशवाणीचे कार्यक्रम देशाच्या कोनाकोपऱ्यापर्यंत ८,६६,००० ध्वनिक्षेपकांच्या साहाय्याने पोहोचविले जातात.

दक्षिण कोरियात १९६८ अखेर ४,५१,५२९ शहरांतील अंतर्गत व ५,०१३ दूरच्या ठिकाणंचे टेलिफोन उपलब्ध होते. सर्व महत्त्वाच्या शहरी नभोवाणी केंद्रे आहेत. परंतु सेऊलचे ‘हिका’ केंद्रच मुख्य आहे. काही खासगी केंद्रेही आहेत. १९६७ अखेर २२,५८,००० रेडिओसेट होते. १९६९ अखेर २,२०,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती. १९६१ मध्येच येथे दूरचित्रवाणी सुरू झाली. १९६९ मध्ये अमेरिकी सैनिकांनी चालविलेली सात केंद्रे होती.

लोक व समाजजीवन : कोरियन लोक मुळचे मंगोलॉइड वंशाच्या तुंगुइसिक लोकांचे वंशज आहेत. दुसऱ्या वंशाचे मिश्रण त्यांच्यात क्वचित दिसते. बिगर कोरियन असे काही थोडे चिनीच फक्त आहेत. जपानी होते ते दुसऱ्या महायुद्धानंतर परत पाठविण्यात आले. उत्तर कोरियात कोरियन युद्धानंतर लोकसंख्येची वाढ दरवर्षी ३% इतकी झाली. लोकवस्तीची घनता दर चौ.किमी. ११ आहे. दक्षिण कोरियाची लोकसंख्या १९६० ते १९६६ या काळात १३ टक्क्यांनी वाढली. लोकवस्तीची घनता दक्षिण कोरियात दर चौ. किमी. २९२ इतकी मोठी आहे.

जपानी सत्तेच्या १९१० ते १९४५ च्या काळात सु. ३० लक्ष लोकमँचुरियात व चीनमध्ये, ७ लक्ष सायबीरियामध्ये, ३० लक्ष जपानमध्ये व ७,००० हवाई बेटांत गेले. १९४५ ते १९५० पर्यंत सु. ३० ते ४० लक्ष लोक उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात गेले. जपानमधील ६ लक्ष कोरियनांपैकी ८८,००० उत्तर कोरियात परत पाठविण्यात आले. देशांतर करून गेलेल्यांपैकी बरेच लोक दक्षिण कोरियात परत आले. आता उत्तर कोरियातून क्वचित पळून आलेले किंवा जपानमधील कोरियनांपैकी काही परत येतात. काही कोरियन लोक कायमचे अमेरिकेत राहिले आहेत व सु. ५०० कुटुंबे दक्षिण अमेरिकेत ब्राझील, पॅराग्वाय व अर्जेंटिना या देशांत गेली आहेत.

कोरियात पूर्वी यांगबान या उच्चवर्गीय लोकांच्या हाती सर्व सत्ता असे. शिक्षण व अधिकाराच्या जागा फक्त त्यांनाच मिळत. सांगमिन या वर्गात शेतकरी, कोळी, व्यापारी, कारागीर इत्यादींचा समावेश असे व त्यांच्याच कष्टांवर व करांवर आर्थिक व्यवस्था अवलंबून असे. छानमिन या दासांच्या वर्गात सरकारी व खासगी गुलाम, कीसेंग (जपानी गेशाप्रमाणे) या मनोरंजन करणाऱ्या दासी व खाटिक यांचा समावेश असे. १८९४ मध्ये कायद्याने हे वर्ग नष्ट झाले असले, तरी अद्यापही दक्षिण कोरियात यांगबानशी पूर्वजसंबंध सांगण्यात पुष्कळांना धन्यता वाटते. विवाह, चालीरिती यांत जुन्या कल्पनांचा पगडा बराच दिसतो.

बहुतेक कोरियन लोक बौद्धधर्मीय किंवा कन्फ्यूशस मतप्रणालीचे आहेत. ग्रामीण भागात शामो पंथाचाही पगडा दिसतो. ख्रिस्ती व स्थानिक चाँडोग्यो मताचे लोक अल्पसंख्य परंतु सुसंघटित आहेत.

ग्रामीण कोरियन घरे मातीच्या भिंतींची व गवती छपरांची असतात. काचेऐवजी पातळ कागदाचा उपयोग खिडक्यांसाठी करतात. हिवाळ्यात जमिनीखालून उष्णता मिळण्याची उंदोल नावाची विशिष्ट व्यवस्था असते. घरात जाताना पादत्राणे बाहेर काढून ठेवतात. भात, कोबीचा रस्सा, मासे, सूप, मांस यांचे मसालेदार जेवण जमिनीवर किंवा चटयांवर बसून बुटक्या मेजांवर घेतात. कोरियन स्त्रिया विजारीवरून पायघोळ परकर व वर चोळीवजा पोलकी वापरतात. पायात रबरी बूट वापरतात. खेड्यांतून वीज क्वचित असते व पाण्यासाठी विहिरी असतात. अलीकडे घरे, वेश, खेळ इ. सर्वच बाबतींत वेगाने परिवर्तन होत आहे व आधुनिक, पाश्चात्त्य पद्धती लोकप्रिय होत आहेत. धनुर्विद्या, पतंग उडविणे व कुस्ती या पारंपरिक खेळांच्या जागी, पाश्चात्त्य क्रीडाप्रकार लोकप्रियहोत आहेत व ऑलिंपिक सामन्यांतही कोरियन खेळाडू चमकतआहेत. आकीदो हा खास कोरियन कुस्तीचा प्रकार आहे. जपानी जूदो व आकीदो यांत बरेच साम्‍य आहे. विवाहास आईबापांची संमती असावी लागते, ते बहुधा मध्यस्थांमार्फत जुळविले जातात. मुलींची लग्ने बहुधा विशीच्या आत होतात. मुलाचे विवाहवय मात्र पूर्वीपेक्षा वाढले आहे. उपस्त्रियांची चाल कमी झाली आहे. तथापि घटस्फोट किंवा पुनर्विवाह यांबाबत कोरियन स्त्रियांना सामाजिक व आर्थिक दडपणास तोंड द्यावे लागते. उत्तर कोरियात मात्र पूर्ण स्त्रीस्वातंत्र्य आहे.

जुन्या चांद्रवर्षास अनुसरून अनेक पारंपरिक सण व उत्सव साजरे केले जातात. एप्रिल ८ रोजी बुद्धजयंती, मे ५ रोजी पूर्वजांच्या दफनभूमीस भेट, ऑगस्ट १५ रोजी चुसौंक हा कृतज्ञतेचा दिवस– थँक्सगिव्हिंग– आणि चिनी नववर्षदिन हे मेजवान्या व उत्सव यांचे दिवस असतात.

आरोग्य व समाजकल्याण : उत्तर कोरियाचेअलीकडचे आकडे उपलब्ध नाहीत, तथापि १९६४ च्या अहवालाप्रमाणे १०,००० लोकांमागे १९ डॉक्टर उपलब्ध होते. कामगार संघटनांच्या सभासदांस वैद्यकीय मदत विनामूल्य मिळते आणि पगारी सुट्ट्या, पगारी प्रसूती रजा, वार्धक्यवेतन व पंगुत्ववेतन यांचा लाभ मिळतो.

दक्षिण कोरियात १९६८ मध्ये २,४०० लोकांमागे एक डॉक्टर, १६,५२५ लोकांमागे एक दंतवैद्य व २,४७२ लोकांमागे एक नर्स असे प्रमाण होते. कोरियन युद्धामुळे आरोग्य व समाजकल्याण यांबाबत कोरियन लोकांची फारच परवड झाली. लढाईमुळे ३,४८,००० स्त्रिया विधवा झाल्या. त्या बहुतेकांवर मुले अवलंबून होती. १,००,००० मुले अनाथ, पोरकी झाली. ५,९५,२६० घरांचा विध्वंस झाला. ५,००० गावे नष्ट झाली व बरीच मोठी शहरे उद्ध्वस्त झाली. रोगराई व मृत्यू यांना तोड देण्यास सरकारी, परकीय, खासगी इ. सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. १,४५,३७८ कुटुंबांना जमीन, बीबियाणे, शेतीअवजारे आणि घरांचे सामान पुरविण्यात आले. १९६९ मध्ये आवश्यकतेच्या २५·३% इतकी घरांची टंचाई होती. उत्तर कोरियात राहण्याच्या घरांपेक्षा औद्योगिक बांधकामावर भर होता, परंतु कोरियन युद्धानंतर राहण्याच्या घरांची टंचाई दूर करण्यासाठी खास योजना हाती घ्याव्या लागल्या आहेत.

भाषा व साहित्य : कोरियाची कोरियन ही भाषा उरल-अल्ताइक गटातील समजली जाते. ती तुर्की, मंगोल व जपानी या भाषांशी दृढसंबंधित आहे. सातव्या शतकात देशाचे राजकीय ऐक्य प्रस्थापित झाले, तेव्हाच भाषिक ऐक्यही झाले. कोरियाची हांगल ही उच्चारानुसारी लिपी १४४६ मध्ये सेजोंग राजाच्या कारकिर्दीत त्याच्याच प्रयत्नाने अस्तित्वात आली. प्रचलित कोरियन भाषेत ५ मुख्य स्वर व २५ व्यंजने आहेत. पूर्वीपासून कोरियात चिनी भाषा व लिपीच प्रचारात होती. तिचा प्रभाव एवढा जबरदस्त होता, की सुशिक्षित लोक विसाव्या शतकापर्यंतही हांगलपेक्षा चिनीत लिहिणे भूषणावह मानीत. जपानी अंमलात जपानी भाषेची सक्ती झाली. १९४५ नंतर मात्र कोरियन भाषा व लिपी प्रचारात आली. दक्षिण कोरियात अजूनही चिनी लिपीचा वापर आहे. छापण्याच्या दृष्टीने मात्र हांगल इंग्रजीप्रमाणे सुलभ नाही, ती चिनी वळणावरच आहे.

अकराव्या-बाराव्या शतकांतील किम फूशिक व तेराव्या शतकातील इर्योन यांनी ‘तीन राज्यांच्या’ इतिहासावर लिहिलेले ग्रंथ हे प्राचीन कोरियन इतिहासाची साधने आहेत. तीच प्रथा पुढेही चालू राहिली. कारभारविषयक नियम व ज्ञानकोशवजा गॅझेटीअर, संगीतविषयक ग्रंथ इत्यादींची रचना पंधराव्या शतकापर्यंत झाली. सोळाव्या शतकातयी ह्‌वांग व युल्गोक हे नव-कन्फ्यूशस वादावर लिहिणारे तत्त्ववेत्ते झाले. काव्य, कथा इत्यादींची वाढही त्यानंतर झाली. विसाव्या शतकापासून कोरियन साहित्यावर पाश्चिमात्यांचा परिणाम स्पष्ट दिसू लागला. यि हन्जिक, यी क्वांग-सू, किम थाँगइन, पाक चाँगाह्‌वा, आन सु-गिल हे कादंबरीकार, किम सेल्वाक हा कवी, किम चिन-सॉप हा निबंधकार, ओयांग जिन आणि यु चिजिन हे नाटककार आणि पेक चॉल हा टीकाकार हे दक्षिण कोरियात प्रसिद्ध असलेले साहित्यिक होत.

उत्तर कोरियात १९४५ पासून १९६० पर्यंत ग्रंथालयांची संख्या ७ पासून १८५ पर्यंत वाढली. प्यंगयांगमधील मध्यवर्ती ग्रंथालय हे त्यांत प्रमुख होय. संग्रहालये १८ आहेत. महत्त्वाची सर्व संग्रहालये प्यंगयांगमध्ये आहेत.

दक्षिण कोरियात सेऊल राष्ट्रीय विद्यापीठाचे ग्रंथालय सर्वांत मोठे आहे. त्यात कोरियन इतिहास व संस्कृती यांवर सर्व प्रकारचे ग्रंथ आहेत. सार्वजनिक ग्रंथालये थोडी व अपुरी आहेत. कोरियन राष्ट्रीय संग्रहालयाच्या शाखा सेऊल, कीआँगजू, पूयो, गाँगजू येथे आहेत. त्यांत चार हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास दाखविणाऱ्या मूर्ती, मृत्तिकापात्रे, चित्रे इ. वस्तू आहेत. जुने राजवाडे, बौद्ध मंदिरे, विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये येथेही सांस्कृतिक महत्त्वाच्या वस्तूंचे संग्रह आहेत.

उत्तर कोरियातील सर्व वृत्तपत्रे व नियतकालिके शासन, पक्ष किंवा संघटना यांमार्फत पूर्वतपासणीनंतर प्रसिद्ध होतात. १९६८ मध्ये २० वृत्तपत्रे होती व त्यांचा खप २५ कोटींच्यावर होता. उत्तर कोरियाची मध्यवर्ती वृत्तसंस्था ही एकमेव वृत्तसंस्था आहे. प्रांताचे एक वृत्तपत्र असते व मोठाल्या संघटनांचीही मुखपत्रे असतात.

दक्षिण कोरियात १९६१ च्या लष्करी क्रांतीपूर्वी ११० दैनिके, ४८६ साप्ताहिके आणि ३१६ वृत्तसंस्था होत्या. लष्करी अंमलात सर्व वृत्तपत्रे वगैरे बंद करण्यात आली. सध्याच्या शासनाने अनेक मुद्रणनियंत्रणे जारी केली आहेत. सेऊलमध्ये सहा प्रमुख दैनिके प्रसिद्ध होतात. इतर नियतकालिके बरीच आहेत.

शिक्षण : उत्तर कोरियात तीन ते सहा वर्षांची मुले पूर्वप्राथमिक शाळांत जातात. १९५६ मध्ये सहा वर्षांचे प्राथमिक व १९५८ मध्ये तीन वर्षांचे माध्यमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले. १९५९ मध्ये माध्यमिक शिक्षणाचे तांत्रिक शिक्षणात व त्यानंतर दोन वर्षे उच्च तांत्रिक शिक्षणांत रूपांतर केले गेले.१९६४-६५ मध्ये ११,३३,००० प्राथमिक शाळा विद्यार्थी व २५,२२१ शिक्षक, माध्यमिक शाळांतून ७,०४,००० विद्यार्थी आणि २७,१६२शिक्षक, धंदेशिक्षण शाळांत ४,४१,०००विद्यार्थी व १७,१७६शिक्षक व उच्च शिक्षणात १,८६,०००विद्यार्थी व ९,०१३ शिक्षक होते. दक्षिण कोरियात शिक्षणमंत्रालयाच्यानियंत्रणाखाली शिक्षणव्यवस्था असून सहा वर्षांचे प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे.१९६७-६८मध्ये प्राथमिक शाळांतून ५३,८२,५००विद्यार्थी व ८९,२७७शिक्षक, माध्यमिक शाळांतून ११,७१,०२२विद्यार्थी व २९,६२६शिक्षक, धंदेशिक्षण शाळांतून २,०३,९९७विद्यार्थी आणि ८,४४१शिक्षक, १ विद्यापीठांसह उच्च शिक्षणात १,७०,९४१विद्यार्थी, ७,७८५शिक्षक होते. कोरियन युद्धात ७५% शाळा उध्वस्त झाल्यामुळे वर्गांसाठी जागेची मोठीच टंचाई अद्यापही आहे. माध्यमिक व उच्च शिक्षण विनामूल्य नाही. शासकीय शाळांबरोबरच मान्य खासगी संस्थाही महत्त्वाचे शैक्षणिक कार्य करतात. धंदेशिक्षण किंवा तांत्रिक शिक्षणापेक्षा सर्वसामान्य (लिबरल) शिक्षणावरच जास्त भर आहे. १९६०मध्ये दक्षिण कोरियात ८०विद्यापीठे व महाविद्यालये होती, त्यांत १,४२,०००विद्यार्थी शिकत होते. सेऊल, पुसान आणि इतर चार प्रांतिक राजधान्यांत राष्ट्रीय विद्यापीठे आहेत. सेऊलमध्ये पाच खासगी विद्यापीठे आहेत. एह्‌वा या मुलींच्या महाविद्यालयात ८,१२२विद्यार्थिनी असून ते जगातील एक मोठे मुलींचे विद्यालय आहे.

कोगुर्योकालीन चिनी पद्धतीची भित्तिचित्रे आणि कीआँगजूजवळच्या सोक्कुराम गुहेतील दगडी शिल्प ही प्राचीन कोरियन कलावैभवाची साक्ष देतात. फुलगुक-सा देवालयाजवळील स्तूप व सोक्कुरामच्या बौद्ध मूर्ती शिल्पकालीन कलाकौशल्य दाखवितात. यी घराण्याच्या अंमलात चित्रकला जास्त विकसित झाली. आधुनिक काळात चिनी कलेबरोबरच पाश्चात्त्य कलेचा प्रभाव जाणवतो. यी सांग-बॉम हा जुन्या परंपरेचा व किम इन सुंग आणि यी इन साँग हे आधुनिक वास्तववादी कलाकार आहेत. किम पोकचिन हा आधुनिक शिल्पकार व ओसेचांग हा उत्कृष्ट हस्ताक्षर कलाकार आहे.

मातीची व धातूंवरील कारागिरी कोरियात प्राचीन काळापासून उच्च दर्जाची आहे. जुने सोन्याचे मुकुट व ब्राँझचे पुतळे व जगप्रसिद्ध फिक्या हिरव्या रंगाची उत्तम नक्षीकामांची चिनी मातीची भांडी तसेच लाख, शिंपा व पितळी नक्षीकाम यांनी लाकूडकामास शोभा आणण्यात कोरियन कारागीर वाकबगार होते. प्राचीन चिनी व अर्वाचीन पाश्चात्त्य संगीत येथे उच्च दर्जाचे आहे. प्राचीन संथ नृत्यप्रकारांना लोकांत फार मान आहे. ग्रामीण जलद लयीची नृत्ये आणि नृत्यनाट्येही लोकप्रिय आहेत. आधुनिक पाश्चात्त्य धर्तीची नृत्यगृहे, चित्रपटगृहे, नाट्यगृहे वाढत आहेत. उत्तर कोरियात नाट्यगृहे, चित्रपटनिर्मिती, कोरियन व पाश्चात्त्य पद्धतीचे नृत्य, संगीत इ. सर्वांस शासनाचा आधार असतो व त्यांवर शासनाचे नियंत्रणही असते.

महत्त्वाची स्थळे : उत्तर कोरियात प्यंगयांग राजधानीशिवाय सरहद्दीजवळील केसाँग, यालू नदीच्या मुखाजवळील शिनईजू, चिन्नांपो हे प्यंगयांगचे बंदर व पूर्व किनाऱ्यावरील वनसान, हामहुंग व चंगजिन ही बंदरे आणि औद्योगिक केंद्रे आहेत.

दक्षिण कोरियात सेऊल ही राजधानी, इंचॉन हे तिचे बंदर, पुसान हे दक्षिणेकडील प्रमुख शहर व बंदर आणि चिनजू, क्वांगजू, मॉकपॉ, शूनसेन, ताएगू, तॅजॉन व चंगजू ही प्रमुख शहरे आहेत. कीआँगजू हे एक मोठे औद्यागिक केंद्र आहे. चेजू बेटावर चेजू हे मुख्य शहर आहे.

लेखक : कुमठेकर, ज. ब.

कोरिया
कोरिया नकाशा
(१) बाजारपेठ, सेऊल. (२) फ्रीडम व्हिलेज : एक दृष्य. (३) कोरियाचे प्रवेशद्वार : पुसान बंदर. (४) भातलावणीचे दृष्य. (५) फ्रीडम हाउस, पानमून्जम. (६) उ. कोरियन शेतकरी. (७) क्यँबॉक राजप्रासादातील राष्ट्रीय वास्तुसंग्रहालय, सेऊल. (८) प्राचीन संगमरवरी पॅगोडा, सेऊल. (९) आधुनिक प्यांगयांग, उ. कोरिया.