बाल्कन राष्ट्रे : यूरोप खंडातील सर्वांत आग्नेयीकडील बाल्कन द्वीपकल्पातील राष्ट्रे. क्षेत्रफळ ५,१८,००० चौ.किमी. यूगोस्लाव्हिया,अल्बेनिया, ग्रीस व बल्गेरिया

यांना बाल्कन राष्ट्रे म्हणतात. रूमानियाच्या काही भागाचा अंतर्भाव ऐतिहासिक कारणास्तव येथे होतो, तर भौगोलिक दृष्ट्या व ऑटोमन साम्राज्य असताना यूरोपीय तुर्कस्तानचा समावेश यात होत असला,तरी आता ते बाल्कनेतर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. तुर्की भाषेत ‘बाल्कन’ म्हणजे ‘पर्वत’. बल्गेरिया आणि यूगोस्लाव्हिया यांच्या सीमेवर या प्रदेशाला नाव देणारे बाल्कन पर्वत आहेत. उत्तरेस डॅन्यूब व साव्हा नद्या, पूर्वेस काळा समुद्र व मार्मारा समुद्र, आग्नेयीला इजीअन समुद्र, दक्षिणेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस आयोनियन व एड्रिअँटिक समुद्र या बाल्कन द्वीपकल्पाच्या सीमा आहेत.

हे द्वीपकल्प प्रामुख्याने डोंगराळ असून शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी आहे. कार्पेथियन, दिनारिक, बाल्कन व रॉडॉपी या चार प्रमुख पर्वतरांगा या प्रदेशात आहेत.द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील किनाऱ्याला समांतर दिनारिक पर्वतश्रेणी सर्वांत लांब,रुंद व ओबडधोबड आहे. पिंडस पर्वत या नावाने ही रांग ग्रीसमध्ये ओळखली जाते. कार्पेथियन-ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्स ही येथील दुसरी प्रमुख पर्वतश्रेणी उलट्या इंग्रजी S अक्षरासारखी द्वीपकल्पाच्या मध्यभागी पसरलेली आहे. बल्गेरियात पूर्व-पश्चिम धावणारी बाल्कन पर्वतश्रेणी ट्रान्सिल्व्हेनियन आल्प्सचाच विस्तार आहे. रॉडॉपी ही चौथी पर्वतश्रेणी बाल्कन पर्वताच्या दक्षिणेस नैर्ऋत्य बल्गेरियात पसरलेली आहे. द्वीपकल्पावरील मैदानी प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत : एड्रिअँटिक व आयोनियन समुद्र किनाऱ्यांवरील मध्य अल्बेनिया व वायव्य ग्रीसमधील अरुंद मैदान तिसा, डॅन्यूब, द्रावा व साव्हा नद्यांच्या खोऱ्यांतील व्हॉयव्हॉदिना मैदान उत्तर ग्रीसमधील अरुंद मैदान मध्य ग्रीसमधील थेसाली काळा समुद्र व मार्मारा समुद्र यांच्या किनारपट्टीतील थ्रेस उत्तर बल्गेरियातील डॅन्यूबचे मैदान रूमानियातील बनात, वालेकिअन व मॉल्डेव्हिअन मैदाने. डॅन्यूब ही आंतरराष्ट्रीय नदी वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

बाल्कन राष्ट्रांतील हवामानात प्रदेशानुसार भिन्नता आढळत असली, तरी बऱ्याचशा भागांत खंडीय प्रकारचे हवामान आढळते. या हवामानात गहू, राय, ओट, मका व जवस यांचे पीक चांगले येते. गुरांची व डुकरांची पैदासही चांगली होते. द्वीपकल्पाच्या इजीअन, एड्रिअँटिक व आयोनियन समुद्रकिनारी आणि त्या समुद्रांतील बेटांवर भूमध्य सागरी हवामान आढळत असून ऑलिव्ह, द्राक्षे, अंजीर व लिंबू जातीची फळे ही येथील प्रमुख उत्पादने आहेत.

येथील भूरचनेचा इतिहासावरील परिणाम विरोधाभासी जाणवतो. डोंगराळ प्रदेशामुळे स्थानिक रहिवाशांचे वेगळे गट पडले, ते एकमेकांपासून अलग पडले व लहान राज्ये स्थापिली गेली. पण डॅन्यूब व तिच्याउपनद्या यांच्यामुळे बाहेरच्या आक्रमकांना येथे सहज प्रवेश मिळत होता व डोंगराळ भागाचा त्यांच्या चलनवलनावर काही प्रतिकूल परिणाम होत नव्हता. बाल्कन द्वीपकल्पावर इ. स. पू.सु.६००० वर्षांपासून मानववस्ती असावी. हे द्वीपकल्प म्हणजे प्राचीन ग्रीक संस्कृतीचे केंद्रस्थान तसेच रोमन साम्राज्याचा एक भाग होता. इ. स. पू. चौथ्या शतकात मॅसिडोनियाचा राजा फिलिप दुसरा व सम्राट अलेक्झांडर द ग्रेट यांचे या प्रदेशावर स्वामित्व होते. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर ग्रीकांच्या आपापसांतील भांडणामुळे इ. स. पू.तिसऱ्या व दुसऱ्या शतकांत येथे रोमनांचा शिरकाव झाला. रोमनांनी आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील रस्ते, नगरे, वेगवेगळ्या संस्था तसेच लोकांच्या विचारांत सुधारणा व प्रगती घडवून आणली आणि ग्रेको-रोमन संस्कृतीचा प्रसार केला. रोमन संस्कृतीच्या परंपरांचा ठसा अजूनही रूमानियात पहावयास मिळतो. इ. स. २८५ मध्ये रोमन साम्राज्याचे विभाजन होऊन बाल्कन द्वीपकल्पातील फार मोठा भाग ईस्टर्न रोमन (बायझंटिन) साम्राज्यात गेला व कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) ही त्याची राजधानी झाली. सुमारे हजार वर्षे सैनिकी, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्या बायझंटिन साम्राज्याचा बराच प्रभाव टिकून राहिला होता. पाचव्या शतकात पश्चिमेकडील भाग अल्पकाळ बर्बर हल्लेखोरांच्या ताब्यात गेला. याच शतकात स्लाव्ह लोकांनी डॅन्यूब नदी पार करून बाल्कन द्वीपकल्पातील बराच प्रदेश आपल्या ताब्यात आणला. सातव्या शतकात आलेले तुर्की भाषीय बल्गर लोक स्लाव्ह लोकांमध्येच मिसळून गेले. १०५४ नंतर पूर्वेकडील व पश्चिमेकडील ख्रिस्ती समाजांत दुफळी निर्माण होऊन त्यांच्यात कॅथलिकवादी व ऑर्थोडॉक्सवादी असे दोन गट पडले.

मध्ययुगीन काळ हा बायझंटिन, बल्गेरियन, लॅटिन, ग्रीक व सर्बीयन या साम्राज्यांच्या सत्तास्पर्धेचा होता. चौदाव्या शतकात ऑटोमन सैन्याने बाल्कनचे एकामागून एक असे प्रदेश काबीज करून थोड्या कालावधीतच ही ख्रिश्चन राष्ट्रे ऑटोमन साम्राज्याखाली आणली आणि पुढे सु. ५०० वर्षे त्यांचा प्रभाव या राष्ट्रांवर राहिला. कॉन्स्टँटिनोपल १४५३ साली तुर्कांच्या हाती पडल्यावर तर जगाच्या इतिहासाला वेगळेच वळण लागले. निकृष्ट प्रशासन व राज्यकारभारातील भ्रष्टाचार यांसारख्या कारणांमुळे अठराव्या शतकात ऑटोमन साम्राज्य राजकीय व लष्करी दृष्ट्या खिळखिळे बनले. दरम्यान ख्रिश्चन धर्मीयांत मात्र एकजूट निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकात अनेक लहानमोठी युद्धे व करार झाले. तथापि तुर्की सत्तेपासून बाल्कनला स्वातंत्र्य मिळविण्याची पावले बरीच संथ गतीने पडली. यामध्ये रशिया व ग्रेट ब्रिटनचे बरेच हितसंबंध गुंतलेले होते. बाल्कनमधून ऑटोमन साम्राज्य गेले, तर या प्रदेशावर रशियाचे आधिपत्य येण्याची भीती ब्रिटनला वाटत होती. रशियाला येथील ऑर्थोडॉक्स व स्लाव्ह लोकांना प्रत्यक्ष मदत करण्यात रस होता. तथापि ऑटोमन साम्राज्याचा दिवसेंदिवसऱ्हासच होत गेला. १९१३ मध्ये तर बाल्कनमधील कॉन्स्टँटिनोपल-भोवतालच्या थ्रेस प्रदेशापुरताच ऑटोमन तुर्कांचा अंमल राहिला. १९१२ मध्ये ‘बाल्कन लीग’ची स्थापना होऊन दरम्यान ⇨ बाल्कन युद्धे झाली.

पहिल्या महायुद्धामुळे बाल्कनच्या राजकीय नकाशात महत्त्वाचे बदल घडून आले : आधुनिक यूगोस्लाव्हिया व रूमानिया यांची निर्मिती आणि बल्गेरियाचा इजीअन समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशाचा ग्रीसमध्ये करण्यात आलेला समावेश. अतिरिक्त लोकसंख्या, उद्योगांचा अभाव, कमी कृषि-उत्पादकता, कनिष्ठ दर्जाचे राहणीमान, ग्रामीण व नागरी संघर्ष, राजकीय अस्थिरता इ. घटकांमुळे पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांदरम्यानचा काळ बाल्कन राष्ट्रांना फारच खडतर गेला. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला बल्गेरियाशिवाय अन्य बाल्कन राष्ट्रांनी तटस्थतेचे धोरण अवलंबिले. युद्धोत्तर काळात जर्मनीच्या पाडावानंतर या क्षेत्रात रशियाचा प्रभाव वाढला आणि ग्रीस वगळता इतर राष्ट्रांत कम्युनिस्ट राजवट आली. ग्रीसमध्ये राजेशाही होती. अजूनही राजेशाही जाऊन हुकूमशाही आली, तरी राजकीय अस्थिरता आहेच.

यूरोपातील इतर देशांच्या मानाने बाल्कन राष्ट्रे आर्थिक दृष्ट्या मागासलेलीच आहेत. या मागासलेपणाला येथील राजकीय व ऐतिहासिक स्थिती कारणीभूत ठरलेली आहे. कमी क्षेत्रफळाची राष्ट्रे, औद्योगिक विकासासाठी लागणाऱ्या मूलभूत साधनसंपत्तीचा अभाव, अगदी अलीकडे मिळालेले राष्ट्रीयस्वातंत्र्य हेदेखली येथील विकासाचे प्रमुख अडथळे ठरले आहेत. प्रथमपासूनच ही राष्ट्रे कृषिप्रधान आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात येथील औद्योगिक विकासास सुरुवात झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र आर्थिक परिस्थितीत बरेच बदल घडून आले. कम्युनिस्ट शासनपद्धतीचा अवलंब झाल्यावर अवजड उद्योग, वाहतूक व दळणवळण, विद्युत् शक्तिनिर्मिती, उत्पादित वस्तूंची निर्यात, शिक्षण, व्यवस्थापन, शेतीचे सामूहिकीकरण इ. घटकांच्या विकासावर भर देण्यात आला. त्यामुळे परंपरागत कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाचे बदल घडून आले. रूमानिया व यूगोस्लाव्हिया औद्योगिक विकासात अधिक यशस्वी झाले. ग्रीस हे एकमेव कम्युनिस्टेतर बाल्कन राष्ट्र अजूनही कृषिप्रधानच आहे. युद्धोत्तर शीतयुद्धाच्या वेळी अल्बेनिया, बल्गेरिया, रूमानिया व यूगोस्लाव्हिया या राष्ट्रांवर रशियाचा, तर ग्रीस व तुर्कस्तान यांच्यावर अमेरिकेचा प्रभाव पडला. ग्रीस नाटो, तर तुर्कस्तान नाटो व सेंटो या संघटनांचा सदस्य होता. पुढे यूगोस्लाव्हियाने रशियाखेरीज अमेरिका व इतर भांडवलदार पश्चिमी राष्ट्रांशी आपले व्यापारी संबंध प्रस्थापित केले व तटस्थ राष्ट्रांचा गट स्थापन करण्यात पुढाकार घेतला. अल्बेनियाची रशियाशी फारकत होऊन त्याने चीनबरोबर राजकीय व व्यापारी संबंध जुळविले.

बाल्कन राष्ट्रांत रोमन कॅथलिक, ऑर्थोडॉक्स व इस्लाम या तीन प्रमुख धर्मांशिवाय प्रॉटेस्टंट व ज्यू धर्मीय लोकही काही प्रमाणात आढळतात. गेल्या काही शतकांपासून येथे अनेक वंशांच्या व धर्मांच्या लोकांचे वास्तव्य असून द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात बायझंटिन संस्कृती, ऑर्थोडॉक्स पंथ व ग्रीक भाषेचा प्रभाव होता. गेल्या शतकापर्यंतही येथे बहुराष्ट्रीय व बहुधर्मीय साम्राज्य होते. भाषा, वंश व राष्ट्र भिन्नत्वामुळे, इस्लामी-ख्रिस्ती संघर्षामुळे यूरोप, आशिया व आफ्रिका या तीन खंडांच्या दरम्यान अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या विभागात अनेक युद्धे व राजकीय स्थित्यंतरे झाल्याने ‘यूरोपचे दारूगोळ्याचे कोठार’ हे बाल्कनचे वर्णन यथार्थ वाटते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांनंतर मात्र बाल्कन राष्ट्रांतील लोक आपापल्या मातृभूमीत परत गेल्याने आज येथील राष्ट्रे, विशेषत: अल्बेनिया, बल्गेरिया व ग्रीस, वांशिक आणि धार्मिक दृष्ट्या बरीच एकसंध झाली आहेत.

संदर्भ : Wolff, Robert Lee, The Balkans in our Times, Cambridge (Mass.).1956.

चौधरी, वसंत