दिनाजपूर : बांगला देशातील दिनाजपूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. हे पूर्णभवा नदीच्या पूर्व तीरावर रंगपूरच्या पश्चिम नैर्ऋत्येस ६६ किमी. आहे. लोकसंख्या ३७,७११ (१९६१). येथे तांदूळ, ताग, ऊस, मोहरी, मका आदींचा व्यापार चालतो. औष्णिक केंद्र, भातसडीच्या व तेल गाळण्याच्या गिरण्या व साबणाचे कारखाने येथे आहेत. बिहार व पश्चिम बंगाल राज्यांशी पूर्वी संलग्न लोहमार्ग होते व पुढे ते परत सुरू होण्याची शक्यता आहे. येथे १८६९ साली नगरपालिकेची स्थापना झाली. राजशाही विद्यापीठाशी संलग्न असलेली दोन शासकीय महाविद्यालये येथे आहेत.

ओक, द. ह. भागवत, अ. वि.