चिदंबरम् : तमिळनाडू राज्याच्या दक्षिण अर्काट जिल्ह्यातील सुप्रसिद्ध प्राचीन तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ४८,८११ (१९७१). हे कोळ्ळम् (कोलेरून) नदीकाठी, मद्रासच्या दक्षिण नैर्ऋत्येस रेल्वेने सु. २४६ किमी. आहे. प्राचीन काळी संस्कृत विद्या व वेदाध्ययन यांसाठी चिदंबरम् विख्यात होते. अठराव्या शतकात इंग्रज-फ्रेंचांच्या सत्तास्पर्धेत याला महत्त्व आले होते. हैदर अलीने येथील मंदिराच्या आवारात सैन्य ठेवले होते. सर आयरकूटने १७८१ मध्ये देवालयावर हल्ला केला, परंतु त्याला पिटाळून लावण्यात आले. चोल राजा पहिला परांतक याने दहाव्या शतकाच्या पूर्वार्धात बांधलेले शिवमंदिर हे येथील एकमेव आकर्षण आहे. वैशाख आणि मार्गशीर्ष महिन्यांतील उत्सवांस अखिल भारतातून आणि श्रीलंकेतूनही यात्रेकरू येतात. त्यांच्यासाठी गावात अनेक मठ व धर्मशाळा आहेत.

नटराज मंदिर, चिंदबरम्‌.

शिवमंदिराने नगराच्या ऐन मध्यातील सु. १६ हे. क्षेत्र व्यापले आहे. त्याच्या कोटाभोवती सु. १८ मी. रुंदीचा प्रशस्त मार्ग आहे. मंदिराच्या आवारात चित्सभा, कनकसभा, नृत्यसभा, देवसभा आणि राजसभा ही पाच मोठी भवने आणि गणेश, पार्वती, विष्णू, सुब्रह्मण्य यांची मंदिरे आहेत. चित्सभा हे प्रमुख भवन असून तेथे शिवाचे आकाशलिंग म्हणून गाभाऱ्यातील पडद्याआडची एक भिंत दाखवितात. चित्सभेचे व नृत्यसभेचे छत सोन्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. नृत्यसभेत शंकराची नृत्यावस्थेत कोरलेली प्रसिद्ध नटराजमूर्ती असून सभोवती उत्कृष्ट शिल्पकाम केलेले ५६ पाषाणस्तंभ आहेत. कनकसभेत व देवसभेत निरनिराळ्या पूजाअर्चा व उत्सव होतात. राजसभा ही भव्य वास्तू सु. १०४ मी. लांब आणि ५८ मी. रुंद असून तिला १,००० पाषाणस्तंभ आहेत. ती सु. ४६ मी. X ३१ मी.च्या चोहोबाजूंनी दगडी पायऱ्यांनी बांधून काढलेल्या खोल तलावाकाठी असून तेथे नटराजाला महाभिषेक होतो. मंदिराला चार महाद्वारे असून त्यांवर उंच गोपुरे आहेत. येथील कित्येक एकसंघ पाषाणस्तंभ सु. दहा मी. लांब व एक मी. औरसचौरस आहेत. मंदिराच्या भिंती, खांब, गोपुरे इ. ठिकाणी सर्वत्र नृत्यांचे व पौराणिक कथांचे अप्रतिम मूर्तिशिल्प कोरलेले असून आवारात दगडी फरसबंदी आहे.

चिदंबरम् हे दोन नद्यांदरम्यानच्या गाळप्रदेशात वसलेले असून आजूबाजूच्या ६०–६५ किमी. प्रदेशात बांधकामाचा दगड उपलब्ध नाही. असे असूनही त्या काळी तेथे एवढे मोठमोठे शिलाखंड आणले व त्यांवर इतके सुबक शिल्प कोरले, याचा प्रसिद्ध वास्तुशिल्पी फर्ग्युसन यालाही मोठा अचंबा वाटला. तो या मंदिराच्या काही भागांना द्रविड वास्तुकलेची रत्ने म्हणतो. त्याच्या मते पार्वती मंदिर व गोपुरे चौदाव्या शतकातील असावीत.

संकपाळ, ज. बा.