सुलेमान पर्वत : पाकिस्तानातील एक पर्वतरांग. मध्य पाकिस्तानात सिंधू नदीच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर पसरलेली ही रांग गुमलखिंड ते जाकोबाबादच्या उत्तरेपर्यंत सु. ५०० किमी. लांबीची आहे. रांगेची सर्वसाधारण उंची १,८०० मी.–२,१०० मी. असून तख्त-इ-सुलेमान किंवा सॉलोमन्स थ्रोन हे या रांगेतील जुळे शिखर सर्वोच्च (५,६३३ मी.) आहे. या रांगेमुळे वायव्य सरहद्द प्रांत व पंजाब हे बलुचिस्तानपासून वेगळे झाले आहेत. सॉलोमनच्या हिंदुस्थान भेटीमुळे यास सदरचे नाव पडले असे सांगितले जाते. हे शिखर एक पवित्र स्थळ मानले जात असून दरवर्षी अनेक यात्रेकरु याला भेट देतात. या रांगेचा पूर्व उतार अत्यंत तीव्र असून त्यामानाने पश्चिम उतार मंद आहे. रांगेच्या उत्तर भागात पाइन, जूनिपर तर मध्य भागात ऑलिव्ह इ. वनस्पती आढळतात. घाट, झाओ, चूहर, खेल-धाना, साखी-सखार इ. या रांगेतील प्रसिद्घ खिंडी आहेत. या पर्वतरांगेच्या दक्षिण भागात, डेस व गाझीखानच्या पश्चिमेस फोर्ट मन्रो (उंची १,९२१ मी.) ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

गाडे, ना. स.