होशंगाबाद : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या १,१७,९५६ (२०११). हे भोपाळच्या दक्षिणेस सु. ७० होशंगाबाद : सेठानी घाट. किमी.वर, नर्मदा नदीकाठी दोहोबाजूंनी वसलेले आहे. हे राज्यातील महत्त्वाचे दळणवळण केंद्र असून रस्ते व लोहमार्ग यांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. 

 

होशंगाबादची स्थापना माळव्याचा सुलतान होशंग शहा घोरी याने १५ व्या शतकात केली असे मानतात. त्याच्या नावावरून या शहरास होशंगाबाद या नावाने संबोधण्यात येते. हे शहर १८०९ ते १८१७ पर्यंत मराठ्यांच्या आधिपत्यात होते. तदनंतर हे शहर इंग्रजांच्या अंमलात आले. १८६९ पासून येथे नगरपालिका आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हे शहर आसमंतातील शेतमालाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्धीस आले. शहरात कागद कारखाना आहे. या शहरात नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर अनेक घाट असून येथील सेठानी घाट प्रसिद्ध आहे. हे शैक्षणिक केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील नर्मदा मंदिर, जगदीश मंदिर, जैन मंदिर, शनीमंदिर, होशंगशहा किल्ला, हनुमान मंदिर, चर्च, मशिदी, नगरभवन इत्यादींना दरवर्षी पर्यटक भेटी देतात. येथे रामजी दास बाबा मेळा दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत भरतो. 

 

सैंदाणे, एम्. एम्.