गदग : प्राचीन ऋतुक. कर्नाटक राज्याच्या धारवाड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या बेटगेरी उपनगरासह ९५,४२६ (१९७१). हे धारवाडच्या पूर्वेस ६७ किमी. आहे. हुबळी-गुंटकल आणि होटगी-गदग या रेलमार्गाचे हे प्रस्थानक असून सडकांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. ज्वारी, गहू, भुईमूग व प्रामुख्याने कापसाची ही बाजारपेठ असून येथे कापूस उद्योगाच्या अनेक गिरण्या आहेत. गदग व बेटगेरी येथील पातळे प्रसिद्ध आहेत. विड्या, कातडी कमावणे, धातुकाम, जंतुनाशके इ. उद्योगही येथे असून दोन महाविद्यालये व बऱ्याच शैक्षणिक-सांस्कृतिक संस्था आहेत.

प्राचीन काळापासून गदग मोक्याचे ठिकाण असल्याची प्रचीती येथील पडक्या किल्ल्यावरून येते. आठव्या व नवव्या शतकांपासूनचे अनेक शिलालेख गदगमध्ये मिळाले असून गदगच्या प्राचीन वैभवाची साक्ष त्रिकूटेश्वर, वीर नारायण, सरस्वती तसेच १३ किमी. आग्‍नेयीकडील लकंडी येथील मंदिरे देतात. काही पाश्चात्त्य तज्ञांच्या मते गदगच्या काही देवळांवरील वास्तुशैली अवर्णनीय आहे.

शाह, र. रू.