नल सरोवर: गुजरात राज्यातील सर्वांत मोठे खारे सरोवर. हे अहमदाबादच्या नैर्ऋत्येस सु. ६० किमी., अहमदाबाद व सुरेंद्रनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असून क्षेत्रफळ सु. १२७ चौ. किमी. आहे. हे सरोवर छोटे रण व खंबायतचे आखात यांच्यामध्ये असलेल्या समुद्रफाट्याचा अवशेष आहे. एके काळी खंबायतचे आखात आणि कच्छचे आखात निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे. १८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी कायमचे जोडले गेले. या सरोवराचे पाणी मचूळ असून उन्हाळ्यात फारच खारट असते. याच्या काठी बोरू व इतर वनस्पती विपुल असून बदके, रानकोंबडे, हंसक व विविध प्रकारचे पक्षी राहतात. या सरोवरात अनेक लहानलहान बेटे असून त्यांपैकी पुष्कळ बेटांचा उपयोग कुरणांसाठी करतात.

कांबळे, य. रा.