भार : पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील धरणामुळे प्रसिद्धीस आलेले ठिकाण. हे भोरच्या उत्तरेस ६

भाटघरच्या धरणाचे दृश्य

किमी.वर येळवंडी नदीकाठावर बसले आहे. १९२८ साली येथे धरण बांधण्यात आले असून तत्कालीन मुंबई इलाख्याचा गव्हर्नर लॉइड याचे नाव धरणास देण्यात आले.

नीरा नदीच्या काठावरील दुष्काळी भागास पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने येळवंडी या नीरेच्या उपनदीवर भाटघर येथे दगडी बांधकाम असलेले १८मी. उंचीचे व १५० द. ल. घ. मी. जलधारणक्षमतेचे धरण बांधण्याचे ठरविण्यात आले. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी येथून प्रत्यक्ष कालावे न काढता पुढे सु. २५ किमी. अंतरावर नीरा नदीवर वीर येथे एक उदग्रहण बंधारा बांधण्यात आला व तेथून डावा कालवा काढण्यात आला. ही दोन्ही कामे १८८१-९२ या काळात पूर्ण झाली. हा पाणीपुरवठा कमी पडू लागल्याने १९१२ मध्ये नवी योजना आखण्यात आली व त्या योजनेत भाटघर येथे मूळ धरणाच्या खालच्या बाजूस ६८५.३० द. ल. घ. मी. क्षमता असणारे मोठे दगडी धरण बांधण्याची व नीरा नदीच्या उजव्या तीरावर नवा कालवा बांधण्याची तरतूद करण्यात आली. १९२८ पर्यत भाटघर येथील धरण बांधून पूर्ण करण्यात आले. या धरणातील पाणी नदीपात्रातून वीरच्या बंधाऱ्यात आणून तेथून कालव्यांद्वारा नदीच्या दोन्ही काठांवरील क्षेत्रास पुरविले जाते. पाण्याचा साठा वाढविण्याठी १९६६ मध्ये वीर येथेही मोठे धरण बांधण्यात आले आहे [⟶ वीर धरण].

भाटकर प्रकल्प बहूद्देशी असून लॉइड धरणाची एकूण लांबी १,६२५ मी. व उंची ५७.९१ मी.आहे. तळभागाची रुंदी ३७.८० मी. असून माथ्यावर ५.७ मी. रुंदीचा रस्ता बांधण्यात आला आहे. पूर्वी भोर-पुणे बसगाडयाची वाहतूक या मार्गानेच होई. त्या काळी दगडी बांधकाम असलेले हे एक मोठे धरण समजले जात असे. याच्या ‘येसाजी कंक’ या नावाने संबोधल्या जाणाऱ्या जलाशयाची लांबी ३३.८. किमी. असून त्यात ३३१.३७ चौ. किमी.पेक्षा जास्त क्षेत्रातून पाणी वाहून येते. जलाशयातील पाणी सोडण्यासाठी धरणाला एकूण ८१ झडपा (दरवाजे) ठेवण्यात आल्या असून त्यांपैकी ४५ स्वयंचलित आहेत. १९६८ साली धरणाची पाहणी करण्यात येऊन त्याला मजबुती यावी म्हणून नदीच्या प्रवाहाच्या दिशेने भिंती उभारून धरणाच्या मुख्य भिंतीला आधार देण्यात आले आहेत. वीजनिर्मितीसाठी धरणाच्या खालच्या बाजूस विद्युत् जनित्र बसविण्यात आले असून १९८२ अखेर त्याची जलविद्युत् निर्मिती क्षमता १६ मेवॉ. होती.

धरणाच्या परिसरात उद्याने, डाकबंगला तसेच जलविहाराच्या सुविधा असल्याने येथे अनेक पर्यटक येतात.

चौडे, मा. ल.