लेगॅश : आग्नेय इराकमधील मुंताफिक प्रांतातील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले एक प्राचीन नगर. ते टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांच्या दोआबात नासिरिया व शात्रा यांच्या उत्तरेस अनुक्रमे ६३ व १६ किमी.वर वसले आहे. ‘शिरपुर्ला’ या नावाने ते परिचित असून आधुनिक टेलॉहजवळच लेगॅशचे उत्खनित स्थळ आहे. १८७७ साली बसरा येथील फ्रेंच वाणिज्यदूत (कॉन्सल) सार्झी याने हे स्थळ शोधून काढले. सुमेरियन संस्कृतीच्या आधिपत्याखालील हे नगरराज्य इ. स. पू. तिसऱ्या सहस्त्रकात-विशेषतः इ. स. पू. २७०० ते २४०० च्या दरम्यान-बलशाली व समृद्ध होते. या ठिकाणी फ्रेंच पुरातत्वज्ञ अर्नेस्ट द सार्झी, आन्द्रे पॅरट,जेनॉलॅक वगैरेंनी १८७७ ते १९३३ दरम्यान अनेक उत्खनने केली आणि वैविध्यपूर्ण अवशेष उजेडात आणले. त्यांत क्यूनिफॉर्म लिपीत मृण्वटिकांवर लिहिलेले सु. पन्नास हजार इष्टिकालेख असून त्यांशिवाय अनेक पुतळे अपोत्थित शिल्पे, बाहुल्या, शस्त्रे, चांदीची व इतर भांडी, राजवाडा-मंदिरे यांचे वास्तू-अवशेष आढळले. मृण्वटिकांवरील लेखांमुळे सुमेरचा सुसंगत व इतिहास जुळविणे पुरातत्त्वज्ञांना शक्य झाले आहे. हे लेख ओल्या मातीच्या त्रिकोणाकृती, चौकोनी व शंक्वाकार वटिकांवर बोरूने टोचून उमटविले असून काही दगडांवर कोरलेले आहेत. यांतील काही दानपत्रे वा अर्पण-लेख असून काही मंदिरांच्या इतिहासाबाबत व प्रशासकीय व्यवस्थेसंबंधी तपशीलवार माहिती देणारे व शिल्पासंबंधी आहेत.

या भूप्रदेशात अश्मयुगीन मानवाचे अवशेष क्वचित मिळतात परंतु साधारणपणे सहा ते सात हजार वर्षांपूर्वीपासूनच्या म्हणजे इ.स.पू. ४५०० च्या आसपासच्या प्रगत मानवी वसाहतींचा पुरावा मिळतो. वसाहतींचे नागरीकरण ऊबाइड काळात (इ. स. पू. ४००० ते ३५००) झाले असावे. सुरुवातीच्या पूर्व-राजवंश काळात लेगॅशचे सत्ताधीश स्वतःला राजा (लुगाल) म्हणवून घेत मात्र लेगॅश अधिकृत रीत्या सुमेरियाच्या अखत्यारीत कधीच नव्हते. सुमेरियन काळात इ. स. पू. (२६३७-२४००) येथे स्वतंत्र राज्यपाल (पटेझी) असत. यांपैकी अरनन्ना, एन्नटम्, उरूकाजिना या काही राज्यपालांनी स्वतंत्र राजाप्रमाणे सत्ता उपभोगली. या काळात लेगॅशने सभोवतालच्या चार प्रतिस्पर्धी नगरराज्यांवर स्वामित्व मिळवून नैॠत्य इराणपर्यंत आपला प्रदेशविस्तार केला. यांपैकी अमा हे लष्करी दृष्ट्या बलवत्तर नगरराज्य एन्नटम् याने जिंकून त्या विजयाप्रीत्यर्थ ‘स्टील ऑफ द व्हल्चर्स’ (गिधाडांचा शिल्पपट) हे विख्यात शिल्प खोदवून घेतले यात बलदंड राजा दाखविला असून त्याच्या उजव्या हातात राजदंड व डाव्या हातात पंख पसरलेले गिधाड कोरलेले आहे. उरूकाजिना हा त्या काळातील शेवटचा राज्यपाल. त्याने काही मौलिक सुधारणा करून प्रागतिक कायदे केले. त्याच्या एका कोरीव लेखात ‘स्वातंत्र्य’ हा शब्द प्रथमच वापरलेला दिसून येतो. यानंतर सेमिटिक वंशातील अक्कड लोकांनी सुमेरिया पादाक्रांत केला (इ.स.पू. २४००-२१८०). पहिला सारगॉन (सु. इ. स. पू. २३३४-२२७९) हा त्यांचा पराक्रमी राजा. पुढे इराणमधील ‘गूडी’ नावाच्या भटक्या लोकांनी सुमेरिया जिंकला. (इ.स.पू. २१८०). त्यावेळी नाममात्र वर्चस्व असलेल्या लेगॅशमध्ये पुढे गूडेआ (इ. स. पू. २१४४-२१२४) हा राज्यपाल झाला. लेगॅशच्या इतिहासातील सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा हा कालखंड मानला जातो. गुडेआने कला, साहित्य व व्यापार यांना राजाश्रय देऊन मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि स्वतःचे अनेक पुतळे उभारले. तत्कालीन धर्मावर त्याचा प्रभाव होता. त्याच्या पुतळ्यांची पुढे पूजा होऊ लागली. एनिन्नू मंदिर त्याने दुरूस्त केले. त्याच्याविषयीची माहिती शेकडो कोरीव लेखांतून मिळते. त्यांत त्याचे व्यापारविषयक धोरण आणि त्याने बांधलेल्या वास्तूंचीही तपशीलवार माहिती आहे. त्यांच्यानंतर त्याचा मुलगा अर-र्निगिर्सू राज्यपाल झाला. तो विशेष कलाप्रेमी नव्हता. त्याचा एक सुरेख पुतळा उत्खननात उपलब्ध झाला आहे. या प्रदेशात पुढे बॅबिलनचे महत्त्व वाढल्यावर लेगॅश मागे पडले (इ. स. पू. १९५०) आणि सुमेरियन नगरराज्ये हळूहळू संपुष्टात आली तथापि पार्थियन काळापर्यंत येथे वस्ती होती. ग्रीक अथवा सिल्युसिडी काळात येथे तटबंदी बांधण्यात आली परंतु लेगॅशला प्राचीन वैभव प्राप्त झाले नाही.

लेगॅशच्या उत्खननांत सापडलेले बहुतेक अवशेष फ्रान्समधील लूव्हर् संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. इतर काही कैरो, लंडन व बगदाद येथील संग्रहायलयांतही आहेत. त्यांत गूडेआचे पुतळे, बाहुल्या, मूर्ती, अपोत्थित शिल्पे, दंडगोलाकार मुद्रा, मृत्पात्रे असून त्यांतील बाऊ देवता, गूडेआचा मद्यप्याला, त्याचे मुख असलेली गदा, पुत्रवल्लभा, प्रेमी युगुल, दाढीवाला योद्धा, सिंहशीर्षधारी राक्षस ही काही शिल्पे/मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. दंडगोलाकार मुद्रा आणि मृद्भांडी यांवरही चित्रकारी असून त्यांतून विविध पौराणिक विषय चित्रित केले आहेत. त्यांतील संगीतकार, वाद्ये, रानटी प्राण्यांच्या झुंजीया तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकतात.

पहा : सुमेरिया.

संदर्भ : 1. Gilbert, Stuart Emmons, James, Trans. The Arts of Mankind : Sumer, London, 1960.    

           2. Kramer, S. N. History Begins at Sumer, London, 1958.

           3. Lloyd, Seton, Twin Rivers, Oxford, 1961.

देशपांडे, सु. र.