माँटेव्हिडिओ : यूरग्वायची राजधानी. प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या १३,४५,८५८ (१९८० अंदाज). पोर्तुगीजांनी शहराजवळच्या एका टेकडीवर किल्ला बांधला (१७१७). स्पॅनिशांशी तो १७२४ मध्ये जिंकला व ब्वेनस एअरीझचा स्पॅनिश गव्हर्नर ब्रूनो झाबाला याने पोर्तुगीजांना शह देण्यासाठी १७२६ मध्ये याची  स्थापना केली. प्लेट नदी खाडीच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचे हवामान सौम्य व नैसर्गिक स्थान अत्यंत सुरक्षित आहे. त्यामुळे यूरोपातील अनेक लोक, विशेषतः कुशल कामगार, येथे स्थायिक झाले, यूरग्वाय १८२५ मध्ये स्पॅनिश जोखडातून मुक्त झाला तेव्हा ही त्याची राजधानी झाली. यूरग्वायमधील यादवी युद्धात १८४३–५१ यांदरम्यान शहराची नाकेबंदी करण्यात आली होती.

शासकीय कार्यालये, व्यापारी पेढ्या, अनेक संस्था, बँका यांची कार्यालये येथेच आहेत. बंदर व जवळचाच कारॅस्को विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय वाहतूक होते. चार प्रमुख लोहमार्ग व सडका यांनी देशांतर्गत दळणवळण चालते. 

विस्तृत कुरण प्रदेशातून गुरे, मेंढ्या, मांस, लोकर, कातडी, धान्ये, भाजीपाला, फळे , फुले इ. माल शहरात येतो. त्यावर प्रक्रिया करण्याचे अनेक उद्योगधंदे शहरात आहेत. कत्तलखाने, मांस, संवेष्टन, पीठगिरण्या यांच्या जोडीला वस्त्रोद्योग, अन्नपदार्थप्रक्रिया, तेलशुद्धीकरण, सिमेंट, वीज, खते, पादत्राणे, साबण, आगपेट्या, मद्ये, दूध-दुभत्याचे पदार्थ, रेल्वेसामान, मासेमारी इ. उद्योग येथे चालतात. 

१८४९ मध्ये स्थापन झालेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिक’ मध्ये उच्‍च शिक्षण मिळते. तेथे आता विविध विद्याशाखा सुरू आहेत.

नाट्यगृहे, संग्रहालये, रूग्णालये, ग्रंथालये इ. आधुनिक विकसित शहराची वैशिष्ट्ये येथेही आढळतात. येथून पाच वृत्तपत्रे प्रकाशित होतात. नभोवाणी व दूरचित्रवाणी यांची जोड त्यांना मिळाली आहे.

‘ओल्ड सिटी’ या जुन्या भागात अरुंद रस्ते व वसाहतकालीन इमारती असल्या, तरी प्रमुख व्यापारी तसेच राजकीय उलाढाली येथेच चालतात. नव्या भागात रुंद रस्ते, प्रशस्त दुकाने, कॉफीपानगृहे, करमणूक केंद्रे, हॉटेल इ. आहेत. ‘इंडिपेन्डन्स प्लाझा’ हा शहरातील विस्तृत चौक असून त्याच्या परिसरातच राष्ट्रवीर आर्टीगास याचा अश्वारूढ पुतळा, जुने कॅथीड्रल, नगरपालिका गृह साल्वो राजवाडा-पहिली गगनचुंबी इमारत, तसेच संगमरवरी व ग्रॅनाइटी बांधकामाचा भव्य विधानसौध ही प्रेक्षणीय स्थळे आहेत. बंदरात शिरताना दिसणारी १५० मी. उंचीची टेकडी, तिच्यावरील दीपस्तंभ व किल्ला, विस्तृत व विपुल पुळणी, अत्याधुनिक आरामगृहे यांमुळे येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. एक सुंदर व स्वच्छ शहर म्हणून माँटेव्हिडिओची ख्याती आहे.

कुमठेकर, ज. ब.