हैती : (रिपब्लिक ऑफ हैती) . अटलांटिक महासागर आणि कॅरिबियन समुद्र यांमधील हिस्पॅनीओला बेटाचा पश्चिमेकडील ३३% भाग व्यापणारे प्रजासत्ताक. क्षेत्रफळ नजीकच्या लहानमोठ्या बेटांसह २७,७५० चौ.किमी. लोकसंख्या १,०३,१७,४६१ (२०१३). याचा अक्षवृत्तीय विस्तार १८?१?४२?? उ. ते २०?५?४४?? उ. व रेखावृत्तीय विस्तार ७१?३८? प. ते ७४?२८?४५?? प. यांदरम्यान आहे. हैतीच्या पूर्वेस डोमिनिकन प्रजासत्ताक, दक्षिणेस व पश्चिमेस कॅरिबियन समुद्र व उत्तरेस अटलांटिक महासागर आहे. हैती हे कृष्णवर्णीयांचे जगातील पहिले स्वतंत्र प्रजासत्ताक आहे. फ्रेंच राजवटीतून हैती १८०४ मध्ये स्वतंत्र देश झाला. पश्चिम गोलार्धातील या विभागातील अमेरिकेच्या संयुक्त संस्थानानंतर स्वातंत्र्य मिळविलेला हा पहिला देश आहे. हैतीचे पूर्व-पश्चिम कमाल अंतर २९० किमी. व दक्षिणोत्तर २१७ किमी. असून त्याच्या अखत्यारीतील लहानमोठ्या बेटांसह समुद्रकिनाऱ्याची लांबी १,७७१ किमी. आहे. ईल द ला गॉनाईव्ह, तॉर्तुगा, ईल आ व्हाश, ग्रांदे केमीत ही बेटे हैतीमध्ये समाविष्ट आहेत. यांशिवाय अ.सं.सं.च्या अखत्यारीतील नव्हासा बेटावर हैतीने आपला हक्क असल्याचे नमूद केले आहे. पोर्त-ओ-प्रिन्स ही देशाची राजधानी असून लोकसंख्या १२,३४,७४२ (२०१४) होती. 

 

भूवर्णन : देशाचा सु. ८०% भाग पर्वतीय व डोंगराळ आहे. देशात मैदानी प्रदेश कमी असून मैदानांस शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. याच प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त आहे. सागरकिनारी भागात प्रवाळखडक व नैसर्गिक बंदरे आहेत. 

 

देशामध्ये तॉर्तुगा बेटावर कॉर्डिलेरा पर्वत व मुख्य भूक्षेत्रात हिस्पॅनीओला बेटावर उत्तरेकडे मॅसिफ दू नॉर्द मध्यवर्ती भागात माँटॅनस नॉइरेस आग्नेय भागात ट्रू द एलाऊ, चेन देस मॅथेक्स व मॅसिफ दे ला सील नैर्ऋत्य भागात मॅसिफ दे ला ऑत इ. गिरिपिंड आहेत. यांची सरासरी उंची ९०० ते १,०५० मी. दरम्यान आहे. मॅसिफ दे ला सील या पर्वतरांगेतील ला सील हे २,६७४ मी. उंचीचे देशातील सर्वोच्च शिखर असून मॅसिफ दे ला ऑत या गिरिपिंडातील मकाया हे २,३४५ मी. उंचीचे शिखर आहे. देशामध्ये उपरोक्त पर्वतांदरम्यान लहानमोठी मैदाने असून त्यांचे क्षेत्र सु. १०,४०० चौ.किमी. आहे. या मैदानांत ईशान्य भागातील केप हेशन शहरालगतचे प्लेन दू नॉर्द (उत्तरेकडील मैदान) ईंश शहरालगतचे सेंट्रल प्लेन (मध्यवर्ती मैदान) आर्तिबनीत नदीकाठचे प्लेन द आर्तिबनीत (आर्तिबनीत मैदान) पोर्त-ओ-प्रिन्सलगतचे कुल दे-साक मैदान हीप्रमुख आहेत. 

 

हैतीच्या बहुतांश भागांत चुनखडक आहेत मात्र मॅसिफ दू नॉर्द भागात व अन्यत्र काही ठिकाणी अग्निजन्य खडक आहेत. कार्स्ट भूमिस्वरूपे (गुहा, भूमिगत नद्या इ.) येथे आढळतात. देशात वारंवार भूकंप होतात. पोर्त-ओ-प्रिन्स व केप ही शहरे अनुक्रमे १७५१ व १८४२ मधील भूकंपांमुळे उद्ध्वस्त झाली होती. राजधानी परिसरातील २०१० च्या भूकंपात शासकीय अंदाजाप्रमाणे सु. २,२०,००० लोक मृत्यू पावले, तर सु. ३,००,००० लोक जखमी झाले होते. तसेच इमारती व पायाभूत सुविधांचे अपरिमित नुकसान झाले. या भूकंपात किमान १,५०,००० लाख लोक बेघर झाले होते. 

 

उंच पर्वतीय प्रदेशातील मृदा हलकी व कमी प्रतीची असून लागवड करताच अल्पावधीत सुपीकता कमी होते. कमी उंचीच्या डोंगराळ भागात तांबडी व चिकणमाती आढळते. नदीखोऱ्यात व मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आहे. जंगलतोडीमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. 

 

देशात १०० पेक्षा जास्त नद्या आहेत. आर्तिबनीत ही देशातील प्रमुख नदी असून हिची लांबी २८० किमी. आहे. या नदीवर पेलिग्रे येथे पूरनियंत्रणासाठी १९५० मध्ये धरण बांधण्यात आले असून १९७१ पासून येथे जलविद्युत्निर्मिती करण्यात येत आहे. लेस ट्रॉइस, ग्रँड ॲन्से, मॅसॅक्रे, पेदरनालेस, एल् एस्त्रे या अन्य प्रमुख नद्या आहेत. या नद्यांचा जल-सिंचनासाठी उपयोग करण्यात आलेला आहे. देशात सोमात्र हे खाऱ्या पाण्याचे व मीराग्वाने हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. 

 

हवामान : हैतीचे हवामान उबदार, दमट, उष्ण कटिबंधीय आहे. येथे दैनिक तापमानांतील तफावत वार्षिक तापमानांतील तफावतीपेक्षा जास्त असते. उंचीनुसार तापमान कमी होत जाते. जानेवारीत सु. १,४३० मी. उंचीवरील केन्सकॉफ शहराचे सरासरी तापमान १६° से. तर, सस.वरील पोर्त-ओ-प्रिन्स शहराचे सरासरी तापमान २६° से. असते. देशाचा बहुतेक भाग पर्जन्यछायेत येत असल्याने आर्द्रतायुक्त व्यापारी वाऱ्यांचा परिणाम डोमिनिकन प्रजासत्ताकाप्रमाणे येथे होत नसल्याचे दिसून येते. उत्तरेकडील जास्त पावसाच्या प्रदेशातही पर्जन्यमान सु. २५४ सेंमी.पेक्षा जास्त नसते. देशाच्या काही भागांत वार्षिक सरासरी ७० सेंमी.पेक्षा कमी पाऊस पडतो. सर्वसाधारणपणे मे ते नोव्हेंबर या कालावधीत पावसाळा असतो. काही भागांत एप्रिल ते जून व ऑगस्ट ते ऑक्टोबर यांप्रमाणे दोन पावसाळे असतात. वार्षिक पर्जन्यमानातील मोठ्या प्रमाणातील तफावतीमुळे येथे दुष्काळ व अवर्षण या समस्यांना सामोरे जावे लागते. जून आणि ऑक्टोबरमध्ये उष्ण कटिबंधीय चक्री वादळांचा (हरिकेनचा) धोका देशास असतो. ॲलन (१९८०), गिल्बर्ट (१९८८), जॉर्जेस (१९९८) तसेच २००८ च्या हॅन व इके या हरिकेन वादळांमुळे देशाच्या बहुतेक भागांत जीवित व वित्तहानी झाली होती. 

 

वनस्पती व प्राणी : जास्त पावसाच्या पर्वतीय भागांत ओक, रोजवुड, मॅहॉगनी, पाइन वृक्षांची जंगले आहेत. कोरड्या प्रदेशात खुरटी, काटेरी झुडुपे, बाभूळ, निवडुंग आढळतात. किनारी भागात कच्छ वनस्पतींची जंगले आहेत. देशातील लोकसंख्यावाढीमुळे शेती, गुरेचराई व लाकडासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली आहे. मॅसिफ दे ला ऑत पर्वताच्या मकाया शिखराजवळील भागात मकाया नॅशनल पार्कमध्ये वनसंवर्धन करण्यात येत आहे. येथे रानडुक्कर, शेळ्या, मेंढ्या आहेत. फ्लेमिंगो पक्षी, सागरी कासव, व्हेल, लॉब्स्टर, टार्पन, क्रफिश इ. जलचर, आढळतात. देशात मुख्यत्वे फ्लेमिंगो हा पक्षी आढळतो. 

 

इतिहास : टॅनो आरावाक इंडियन व सीबने जमातीचे लोक हे हैतीतील मूळ रहिवासी होत. क्रिस्तोफर कोलंबस या समन्वेषकाने ६ डिसेंबर १४९२ रोजी सध्याचे हैती व डोमिनिकन प्रजासत्ताक ज्या बेटावर आहेत, त्या बेटाचा शोध लावला व बेटास ‘हिस्पॅनीओला’ असे नाव दिले. कोलंबसने या बेटावरील सध्याच्या केप हेशन शहराजवळ वसाहत केली. वसाहतीचे ‘ला नॅतीव्हिदाद’ असे नामकरण केले. मात्र ही वसाहत ताब्यात ठेवण्यात स्पॅनिशांना अपयश आले होते. हिस्पॅनीओला बेटावर कोलंबसला सध्याच्या डोमिनिकन प्रजासत्ताकात सोन्याचा शोध लागला व या बेटाकडे स्पॅनिशांचा ओढा सुरू झाला. त्यांनी डोमिनिकन प्रजासत्ताकातील इझाबेला येथे १४९३ मध्ये वसाहत केली. येथील सोन्याच्या खाणींतून व अन्य कामांत स्पॅनिशांनी स्थानिक शांतताप्रिय, शेती करणाऱ्या आरावाक इंडियनांना गुंतविले. अतोनात कष्टाचे काम, रोगराई इत्यादींमुळे आरावाक इंडियनांची लोकसंख्या १५३० च्या सुमारास काही शेकड्यांतच शिल्लक राहिली. तद्नंतर स्पॅनिशांनी आफ्रिकन लोकांना येथे गुलाम म्हणून आणले. येथील बहुतेक स्पॅनिश लोक हिस्पॅनीओला सोडून पेरू व मेक्सिकोतील स्पॅनिश वसाहतींत गेले. परिणामी १६०६ च्या सुमारास स्पॅनिश लोककमी झाले. 


इंग्रज, फ्रेंच व डच वसाहतकारांनी सु. १६२५ मध्ये हिस्पॅनीओलाच्या पश्चिम, उत्तर किनारी भागात वसाहती केल्या. यांमधील काही लोक चाचेगिरी करू लागले. त्यांनी तॉर्तुगा बेटावर तळ केला होता. हे चाचे स्पेनला जाणाऱ्या जहाजांतील सोने व चांदीची लूट करीत. १६६० मध्ये फ्रेंचांनी पोर्त-दे-पाइक्सची स्थापना केली. येथे स्पॅनिश व फ्रेंचांचे तंटे होऊ लागले होते. स्पॅनिशांनी रिजविक तहान्वये १६९७ मध्ये हिस्पॅनीओलाचा पश्चिम भाग म्हणजे सध्याच्या हैतीचा भूप्रदेश फ्रेंचांना दिला व या भागावरील त्यांचे आधिपत्य मान्य केले. फ्रेंचांनी या वसाहतीस सेंट डोमिग्वे असे नाव दिले. फ्रेंचांनी आफ्रिकन लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणून त्यांना गुलाम बनविले. त्यांच्याकडून कॉफी मळे, मसाल्याचे पदार्थ, ऊस यांची लागवड करून घेतली व या ठिकाणी काम करण्यास त्यांना भाग पाडले. येथील लोकसंख्या १७८९ मध्ये ५,५६,००० होती. यामध्ये ५,००,००० कृष्णवर्णीय गुलाम, ३२,००० श्वेतवर्णीय व २४,००० कृष्णवर्णीय मजूर (गुलामांव्यतिरिक्त) होते. १८ व्या शतकात फ्रेंचांची ही वसाहत भरभराटीस आलेली होती. येथून कॉफी, साखर, कोको, कापूस, नीळ यांची निर्यात होत होती. 

 

फ्रेंच राज्यक्रांतीमुळे (१७८९ ते १७९९) येथील गुलामांना प्रेरणा मिळाली. या काळात ऑझे व शॅव्हॅन या आफ्रिकन गुलाम नेत्यांना फाशी देण्यात आली. त्यामुळे २४ ऑगस्ट १७९१ रोजी गुलामांनी येथे बंड केले होते. बेटावर फ्रेंचांचा अंमल राहावा या हेतूने फ्रेंचांनी १७९४ मध्ये येथील गुलामगिरीची पद्धत बंद केली व १७९५ मध्ये बाझेलच्या तहान्वये स्पॅनिशांनी हिस्पॅनीओला या बेटावरील त्यांचे क्षेत्र फ्रेंचांना दिले. मात्र त्यावेळी यूरोपमधील युद्धामुळे प्रत्यक्षात हस्तांतर होऊ शकले नाही. प्रारंभीचा गुलाम व फ्रेंच सैन्यातील जनरल पदावरील ट्यूसँ लूव्हर्टर याने मे १८०१ मध्ये येथील वसाहतीचा ताबा घेतला व स्वतःस गव्हर्नर जनरल म्हणून घोषित केले. त्याने येथील वसाहतीसाठी संविधान तयार केले. मात्र या वेळी फ्रान्समध्ये पहिला नेपोलियन सत्तेवर होता. त्याने १८०२ मध्ये जनरल चार्ल्स लक्लेर याच्या नेतृत्वाखाली हिस्पॅनीओला येथे सैन्य पाठवून फ्रेंच सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. अनेक लहान-लहान चकमकींनंतर काही अटींवर लूव्हर्टर लक्लेरला मिळाला मात्र फ्रेंचसैन्याने लूव्हर्टरला कैद करून फ्रान्समध्ये तुरुंगात ठेवले. तेथे तो७ एप्रिल १८०३ रोजी मरण पावला. नेपोलियनने येथे पुन्हा गुलामगिरी सुरू करण्याचा प्रयत्न केला. या वेळी हेन्री क्रिस्तॉफ व झां झाक डेसॅलीन यांनी फ्रेंचांविरुद्ध १८०२ मध्ये लढा पुकारला. यादरम्यान फ्रेंच सैन्य पीतज्वराने ग्रासले होते. फ्रेंचांचा या वेळी पराभव झाला. त्यांनी ९ नोव्हेंबर १८०३ रोजी शरणागती पतकरली व १८ नोव्हेंबर १८०३ च्या तहान्वये फ्रेंचांनी येथून माघार घेतली मात्र हिस्पॅनीओलाच्या पूर्व भागात त्यांचे अस्तित्व १८०९ पर्यंत होते. 

 

जनरल झां झाक डेसॅलीनने १ जानेवारी १८०४ रोजी हैतीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व हैती स्वतंत्र देश झाला. डेसॅलीनने स्वतःस सम्राट पहिला झाक असे घोषित केले. येथील मुलॅटोच्या बंडात १७ ऑक्टोबर १८०६ रोजी डेसॅलीन मारला गेला. तद्नंतर हेन्री क्रिस्तॉफने सत्ता हस्तगत केली. क्रिस्तॉफ व ॲलेक्झांडर सॅबेस पेत्योन यांमध्ये यादवी सुरू झाली व उत्तर हैतीवर क्रिस्तॉफ व दक्षिण हैतीवर पेत्योनची सत्ता प्रस्थापित झाली. याच वेळी ब्रिटिशांच्या मदतीने हिस्पॅनीओलाच्या पूर्व भागात (सांतो दोमिंगो) स्पॅनिशांचे आधिपत्य सुरू झाले. 

 

हैतीच्या स्वातंत्र्यास फ्रान्सने १८२५ मध्ये, ब्रिटनने १८३३ व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांनी १८६२ मध्ये मान्यता दिली. 

 

हैतीमध्ये ब्वाएच्या पदच्युतीनंतर १८४३ ते १९१५ या कालावधीत राजकीय अस्थिरता होती. या कालावधीत २० निरनिराळे सत्ताधीश झाले. यांपैकी १६ सत्ताधीशांना पदच्युत करण्यात आले किंवा ठार करण्यात आले होते. येथील राजकीय अस्थिरतेमुळे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांनी येथे सैन्य पाठवून हैतीच्या राजधानीचा ताबा घेतला होता (२८ जुलै १९१५). १९३० मध्ये स्टेन्थो जोसेफ व्हिन्सेंट याची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. 

 

तद्‌नंतर १९४६ मध्ये डुमॅरसेस एस्तेन, १९५० व १९५६ मध्ये पॉल इ. मॅगलॉइरे या सैनिकी अधिकाऱ्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. यानंतर ॲक्टर फ्रँकॉइस डुव्हॅलिअर (पापा डॉक) याची सप्टेंबर १९५७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. याने स्वतःस तहहयात राष्ट्राध्यक्ष घोषित करून हुकूमशहाप्रमाणे राज्यकारभार केला. त्याने १९७१ मध्ये हैती संविधानात दुरुस्ती करून राष्ट्राध्यक्षास वारसदार निवडण्याची तरतूद केली. त्याच्या कार्यकाळात हैतीची अर्थव्यवस्था खालावली होती. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जीन क्लाउडी डुव्हॅलिअर (बेबी डॉक) हा राष्ट्राध्यक्ष झाला. याच्या कारकीर्दीत बेकारी, दारिद्र्य, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव इत्यादींमुळे त्याच्या विरुद्ध १९८६ मध्ये उठाव झाला. त्यामुळे त्याने परदेशात स्थलांतर केले. 

 

जनतेने डिसेंबर १९९० मध्ये जीन बर्टरँड ॲरीस्टीडची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. यास ३० सप्टेंबर १९९१ रोजी लष्कराने सत्तेवरून दूर करून प्रशासन ताब्यात घेतले. ॲरीस्टीड देश सोडून गेला. या वेळी अमेरिकेची संयुक्त संस्थाने व अन्य देशांनी हैतीच्या लष्करी प्रशासनावर दबाव आणला. यावेळी अनेक हैतीयन स्थलांतर करू लागले होते. अमेरिकेने शरणार्थींना आश्रय दिला. १९९३ मध्ये लष्करी प्रशासनाने ॲरीस्टीडकडे सत्ता सोपवण्याचे मान्य केले मात्र प्रत्यक्षात सत्ता सुपूर्द केली नाही. अमेरिकेने सप्टेंबर १९९४ मध्ये हैतीत सैन्य पाठविण्यास प्रारंभ केला. परिणामी ऑक्टोबर १९९४ मध्ये लष्कराने ॲरीस्टीडकडे सत्ता सोपविली. त्यानंतर देशात अनेक राजकीय घडामोडी होऊन सत्ताबदल झाले. अखेरीस मार्च २०११ मधील निवडणुकीत मिचेल जोसेफ मॅर्टेली राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले असून २४ फेब्रुवारी २०१२ पासून गॅरी कॉनिस्टे पंतप्रधानपदी कार्यरत आहेत. 

 

राज्यव्यवस्था : येथील राज्यकारभार १९८७ च्या संविधानाप्रमाणे सुरू आहे. त्यानुसार येथील संसद (नॅशनल असेंब्ली), सीनेट (वरिष्ठ सभागृह) व हाउस ऑफ डेप्युटीज (कनिष्ठ सभागृह) अशी द्विसदनीआहे. सीनेटचे ३० सदस्य व हाउस ऑफ डेप्युटीजचे ९९ सदस्यसार्वजनिक प्रौढ मतदानाने अनुक्रमे सहा व चार वर्षांसाठी निवडण्यात येतात. राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असतो. याची निवड सार्वजनिक प्रौढ मतदानाने पाच वर्षांसाठी होते. राष्ट्राध्यक्षाची सलग दुसऱ्या मुदतीसाठी निवड करता येत नाही. राष्ट्राध्यक्ष संसदेतील बहुमतप्राप्त पक्षातील नेत्याची पंतप्रधानपदी नियुक्ती करतो. पंतप्रधान हा शासन प्रमुख असतो. येथील न्यायव्यवस्था फ्रेंच नेपोलिओनिक कायद्यावर आधारित असून यामध्ये फ्रँकॉइस डुव्हॅलिअरच्या कारकीर्दीत काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या होत्या. कोर्ट ऑफ कॅसेशन (सर्वोच्च न्यायालय), कोर्ट ऑफ अपील, सिव्हिल कोर्ट, मॅजिस्ट्रेट कोर्ट यांप्रमाणे न्यायालये आहेत. न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतात. 

 

सैन्यदल १९९५ मध्ये बरखास्त करण्यात आले आहे. राष्ट्रीय पोलीस दल (हैतीयन नॅशनल पोलीस) कार्यान्वित असून यामध्ये सु. २,००० पोलीस होते (२०११). १९९६ पासून किनारा रक्षक दल कार्यान्वित आहे. हैतीमध्ये स्थिरता राहावी यासाठी यूनोची येथे जून २००४ पासून शांतिसेना आहे. 

 

आर्थिक स्थिती : हैती हा पश्चिम गोलार्धातील दरडोई एकूण राष्ट्रीय वस्तू उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत गरीब देश आहे. येथील सु. ८०% लोक दारिद्र्यात व जास्तीतजास्त सु. ६०%लोक बेकार होते (२००१). प्रारंभीच्या वसाहतवाद्यांची राजवट व नंतरच्या राजकर्त्यांची धोरणे व भ्रष्टाचार यांचा परिणाम येथील मर्यादित साधनसंपत्तीवर झालेला आहे. शेती हा येथील अर्थव्यवस्थेचा कणा असून कॉफी, साखर, कापूस, सिसम, काकाओ, केळी व तेल इ. प्रमुख उत्पादने आहेत. जागतिक बँकेच्या निर्देशानुसार २०१३ मध्ये हैतीचे निव्वळ राष्ट्रीय उत्पादने ८.४५९ अमेरिकन डॉलर होते. २००१ ते २०१० मध्ये लोकसंख्या वाढीचा सरासरी वार्षिक दर १.४% होता. जास्त लोकसंख्या, जंगलतोड, जमिनीची धूप या प्रश्नांबरोबरच देशास अवर्षण, दुष्काळ, हरिकेन वादळ, विशेषतः भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीस व वारंवारच्या राजकीय अस्थिरतेस सामोरे जावे लागते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने व दक्षिण अमेरिका यांमधील अवैध ड्रग व्यवसायाच्या तस्करीचे प्रमुख ठिकाण म्हणून हैती कुप्रसिद्ध आहे. तसेच भ्रष्टाचारविरोधी संघटनेमार्फत १८३ देशांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार २०११ मध्ये हैती सर्वांत जास्त भ्रष्टाचार असलेल्या पहिल्या दहा देशांत गणला गेला. 


शेती : हैती हा देश कृषिप्रधान आहे. जागतिक अन्न महामंडळाच्या अंदाजाप्रमाणे सन २०१३-१४ मध्ये कृषिक्षेत्रात (वन, मत्स्य व शिकार यांसह) एकूण कष्टकरी जनतेच्या सु. ५७.८% लोक गुंतले होते, तर एकूण राष्ट्रीय उत्पादनात कृषिक्षेत्राचा हिस्सा अंदाजे २४.७% होता. येथे मागणीपेक्षा अन्नधान्य उत्पादन कमी आहे. अरेबिका कॉफी हे येथील प्रमुख, तर ऊस हे दुसरे प्रमुख नगदी पीक आहे. बहुसंख्य शेतकरी निर्वाह पिकांवर लक्ष केंद्रित करीत असून कसाव्हा, मका, याम, बाजरी, भाजीपाला ही प्रमुख पिके व केळी तसेच इतर उष्ण तापमानातील फळांचे उत्पादन घेतले जाते. येथून कॉफी, आंबे, कोको, सौंदर्यप्रसाधने व औषधांसाठीचे तेल यांची निर्यात होते. दूध व मांस यांसाठी थोड्याफार प्रमाणात गुरे पाळण्यात येतात. तसेच कुक्कुटपालन व्यवसायही येथे केला जातो. १९८२ मधील आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे येथे डुकरांचा नायनाट केला होता मात्र तद्नंतर नवीन डुकरे येथे आणण्यात येऊन त्यांची पैदास केली आहे. 

 

खनिजसंपत्ती व उद्योगधंदे : सोने व तांबे ही खनिजे देशाच्या उत्तर भागात सापडतात. बॉक्साइट मोठ्या प्रमाणात मिळत होते व त्यापासून चांगला महसूल प्राप्त होत होता मात्र १९८३ पासून याचे उत्पादन कमीहोत आहे. देशास आवश्यक वीज ही देशातील जलविद्युत्निर्मिती आणि कोळसा व खनिज तेलावर आधारित औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांद्वारे करण्यात येते. याकरिता कोळसा व खनिजतेलाची आयात करण्यात येते. खाणकामाचा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील हिस्सा ०.१% होता (२०१०-११). देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात उद्योगक्षेत्राचा हिस्सा( खाणकाम, बांधकाम, ऊर्जा इ.) २०% सेवाक्षेत्राचा हिस्सा ५५.३%होता (२०१३-१४). देशातील लहानसे बाजारक्षेत्र, खनिजसंपत्ती कमतरता, राजकीय अस्थिरता यांचा परिणाम येथील उद्योगक्षेत्रावर झालेला आहे. येथे अन्नप्रक्रिया, कपडे, चामडी वस्तू, तेल, रसायने, तंबाखू, बेसबॉल, खेळणी, विद्युत्साहित्य इ. निर्मितिउद्योग चालतात. यांशिवाययेथे मद्यनिर्मिती करण्यात येते. यामध्ये क्लॅइरीन व बॅरबॅनफोर्ट या प्रसिद्ध रमचा समावेश आहे. उद्योगाच्या वाढीसाठी द. कोरियन निर्मार्त्यांशी हैती सरकारने जानेवारी २०११ मध्ये करार करून केप हेशन जवळीलकॅरकॉल येथे औद्योगिक पार्क तयार करण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये अंदाजे २०,००० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यटन हा सेवाक्षेत्राचा प्रमुख हिस्सा असून देशाला परकीय चलन मिळवून देणारा महत्त्वाचा स्रोत आहे. 

 

अर्थकारण : गुर्ड हे देशाचे चलन असून १ गुर्ड ⇨ १०० सेंटीम होतात. साधारणतः याचा या विनिमय दर १००० गुर्ड ⇨ १५.७८ पौंड ⇨ २४.४० अमेरिकी डॉलर ⇨ १८.८६ यूरो असा होता. देशातील द नॅशनल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ हैती ही अग्रगण्य बँक असून हिच्यामार्फत चलन वितरित होते. यांशिवाय देशात अनेक खाजगी व परकीय बँका असून अनेक विमा कंपन्याही आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांकडून व अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी या देशांकडून अर्थसाहाय्य होते. 

 

या देशाचा व्यापार प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, कॅनडा, जपान, डोमिनिकन प्रजासत्ताक, इटली, जर्मनी, ग्रेट ब्रिटन यादेशांशी चालतो. 

 

वाहतूक व संदेशवहन : हैतीमध्ये रस्ते वाहतुकीस महत्त्व आहे. पोर्त-ओ-प्रिन्स ते केप हेशन, लेस केयेस, जॅक्सेल हा रस्ता फरसबंदी आहे. देशांतर्गत वाहतुकीत खराब रस्त्यांमुळे अडथळा येतो व त्यातही वादळी हवामानात या रस्त्यांवरून वाहतूक जास्त दुर्गम होते. पोर्त--ओ-प्रिन्सपासून प्रांतीय शहरांपर्यंतची ट्रक व बस वाहतूक खर्चिक व अनियमित असते. देशात अंदाजे ४,१६० किमी.चे रस्ते असून यामध्ये १,०१० किमी. पक्के रस्ते होते (२००२). १९९० मध्ये येथील रेल्वेसेवा बंद करण्यात आली. पोर्त-ओ-प्रिन्स व केप हेशन येथील विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई वाहतूक चालते.पोर्त-ओ-प्रिन्स विमानतळाचे जानेवारी २०१० मध्ये भूकंपामुळे नुकसान झाले होते. यांशिवाय जॅक्सेल, झेरेमी, लेके, पोर्त-दे-पाइक्स येथे लहान विमानतळ आहेत. देशात पोर्त-ओ-प्रिन्स, केप हेशन या प्रमुख बंदरांशिवाय अन्य १२ लहान बंदरे आहेत. 

 

देशात टेस्को ही मुख्य दूरसंचार संस्था आहे. देशात चार दूरचित्रवाणी प्रक्षेपण केंद्रे आणि अनेक आकाशवाणी केंद्रे आहेत. २०१० च्या भूकंपामुळे या प्रक्षेपण केंद्रांचे नुकसान झाले होते. 

 

लोक व समाजजीवन : येथे प्रारंभी टॅनो आरावाक इंडियन व सीबने या जमातींचे लोक राहत होते. सध्याच्या हैतीतील ९५% लोक मूळचे आफ्रिकन कृष्णवर्णीय आहेत. यांशिवाय ५% मुलेटो, गौरवर्णीय यूरोपियन, अमेरिकन व सिरियन आहेत. येथील लोकसंख्येत वीसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. येथे लोकसंख्येची घनता दर चौ.किमी.स ३६६.६ होती (२००९). येथील लोकांचे १९६० च्या प्रारंभापासून प्रामुख्याने क्यूबा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, डोमिनिकन प्रजासत्ताक इ. देशांत स्थानांतर होत आहे. येथील जनन दर दरहजारी २७ व मृत्युदर दरहजारी ९ होता देशातील बालमृत्यूचे प्रमाण दरहजारी ८७ व प्रती स्त्री जननक्षमता ३.४ होती. येथील लोकांचे आयुर्मान सरासरी ६२ वर्षे असून पुरुषांत हे ६० वर्षे व स्त्रियांत ६३ वर्षे होते (२००९). 

 

देशात धार्मिक स्वातंत्र्य असले, तरी येथे रोमन कॅथलिक पंथास विशेष मान्यता आहे. येथे ६७% पेक्षा जास्त लोक रोमन कॅथलिक व सु. २५% लोक प्रॉटेस्टंट आहेत. आफ्रिकन रूढींचा येथील लोकांच्या धार्मिक श्रद्धा व आचरणावर परिणाम झालेला दिसून येतो. होदाउच्या पंथाचे अनेक लोक येथे आहेत. होदाउचे जे अनुकरण करतात, त्यांस येथे व्हदू म्हणतात. हैतीयन शेतकरी शेतात पेरणी, खुरपणी, पिकांची काढणी इ. मोठ्या प्रमाणातील कामांत अन्य शेतकऱ्यांची मदत घेतात. अशा प्रकारच्या सहकारी शेतीस येथे ‘कॉमबाइट’ म्हणतात. 


हैतीत गरिबी असल्याने बहुसंख्य लोकांचे राहणीमान तितकेसेचांगले नाही. लोकसंख्या ग्रामीण भागांत जास्त आहे. पायाभूत सुविधांची कमतरता असून बहुसंख्य लोक एक किंवा दोन खोल्यांचे शयनगृह असलेल्या घरात राहतात. वीज व पाण्याची कमतरता आहे. स्त्रियांना शिक्षण व मालमत्ता संपादण्याचे व घटस्फोटाचे अधिकार आहेत. कामगारांत ४३% स्त्रियांचे प्रमाण असते. मध्यमवर्गीय स्त्रिया आर्थिक गरजेनुसार नोकऱ्या करतात. प्रशासन, शिक्षण व परिचारिका क्षेत्रांत स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. उद्योगक्षेत्रात तसेच निवडणुकीसारख्या सामाजिक क्षेत्रातही त्यांंचा अंतर्भाव असतो मात्र त्यांना लष्करात दाखल होण्यास बंदी आहे. येथील लोकांचा पोशाख साधा असतो. स्त्रिया पायघोळ असे स्कर्ट परिधान करतात.

 

शिक्षण : हैतीमध्ये ६ ते १२ वर्षे वयोगटामधील मुलांना शिक्षण मोफत, सार्वत्रिक व सक्तीचे आहे. येथील अभ्यासक्रम हैतियन-फ्रेंचशालेय शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. शिक्षण फ्रेंच आणि क्रीओल भाषेत दिले जाते. सहा वर्षांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण असते. माध्यमिक शिक्षण प्रामुख्याने शहरी भागांत उपलब्ध आहे. सार्वजनिक शिक्षणसुविधा अपुरी आहे. ग्रामीण भागांतील शाळेत दाखल होण्यास पात्र सर्व मुले शाळेत दाखल होतील इतकी शाळांची उपलब्धता नाही. शाळेतील मुलांच्या गळतीचे प्रमाण जास्त आहे. सु. २०% शिक्षण शासनामार्फत व सु. ८०% शिक्षण हे खाजगी किंवा मिशन संलग्न शाळांतून देण्यात येते. त्यामुळे शालेय शिक्षणात खाजगी शाळांची भूमिका महत्त्वाची आहे. बहुतांशी खाजगी शाळा रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंट मिशनशी संलग्न आहेत. द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ हैती (१९२०) व क्वेसक्वेया युनिव्हर्सिटी (१९८८) ही विद्यापीठे पोर्त-ओ-प्रिन्स येथे आहेत. २०१० च्या भूकंपात येथील सु. १,३०० पेक्षा जास्त शाळा इमारतींची हानी झाली होती. २०११ पासून शिक्षणासाठी राष्ट्रीय निधीची स्थापना करण्यात आली असून यामधून सु. ५,००,००० पेक्षा जास्त मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. देशात प्रौढ साक्षरता प्रमाण ६२.१% होते. यामध्ये पुरुषांत साक्षरता प्रमाण ६०.१% व महिलांत ६४% होते (२००७). 

 

हैतीमध्ये पुरेसा अन्नपुरवठा, निवारा, शुद्ध पाणी, जलनिःसारण इ. सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक आजार पसरतात. येथे मलेरिया, एड्स या आजारांची राष्ट्रीय गंभीर आजारांत गणना होते. आरोग्यसुविधा पुरेशा नाहीत. 

 

भाषा व साहित्य : फ्रेंच व हैतियन क्रीओल या येथील प्रमुख भाषा आहेत तथापि सु. २०% लोक फ्रेंच भाषा तर बहुसंख्य लोक हैतियन क्रीओल भाषा बोलतात. १९६९ च्या कायद्याने क्रीओल भाषेस कायदेशीर दर्जा मिळाला आहे. देशाची राजधानी व काही शहरांत काही लोक इंग्रजी भाषा बोलतात. 

 

हैतियन साहित्यनिर्मिती प्रामुख्याने फ्रेंच भाषेत झालेली आहे मात्र काही कादंबऱ्या, कविता, नाटके क्रीओल भाषेत लिहिली आहेत. येथील प्रसिद्ध लेखकांत जीन प्राइस मार्स, झाक रूमेन, झाक स्टीफन-ॲलेक्सीस, रेने डेपेस्ट्रे, एमिले राउमेरे, मार्सेलेन बंधू, फ्रँक एटेन पेएर, फाउबेर्ट फेरी इ. प्रमुख आहेत. 

 

कला व क्रीडा : हैतीतील कलेवर फ्रेंच, स्पॅनिश व आफ्रिकन कलांचा प्रभाव आहे. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील डेविट पीटरने १९४४ मध्ये पोर्त-ओ-प्रिन्स येथे सेंटर द आर्टची (कलाकेंद्र) स्थापना केली. हे एक कला विद्यालय होते. या कलाकेंद्राच्या माध्यमातून एक्टॉर ईप्पॉलेट या चित्रकारास जगात प्रसिद्धी मिळाली. तसेच येथून जॅस्मीन जोसेफ व जॉर्जेस लिआउ हॅउड हे शिल्पकार तयार झाले. तसेच कॅथीड्रल ऑफ द होली ट्रिनिटीची भित्तिचित्रे फिलोमे ओबिनी, कॅस्टेरा बाझील, विल्सन बिगॅउदी, रिगाउड बेनॉइट यांनी १९४९–५१ मध्ये काढली आहेत. हैतीयनांच्या जीवनात संगीतास महत्त्व आहे. मेरिगे हे राष्ट्रीय नृत्य आहे. पोर्त-ओ-प्रिन्स हे प्रमुख सांस्कृतिक केंद्र असून येथील म्यूझीयम ऑफ द हैतीयन पीपल, फाइन आर्ट म्यूझीयम, नॅशनल लायब्ररी (१९४०) या वास्तू प्रसिद्ध आहेत. 

 

फुटबॉल हा देशाचा राष्ट्रीय खेळ आहे. कराटे, व्हॉलीबॉल, गोल्फ, टेनिस, सायकलिंग, जलतरण, कोंबड्यांच्या झुंजी, पत्ते हे येथील आवडते खेळ आहेत. 

 

पर्यटन : पर्यटनास महत्त्व असून परकीय चलन प्राप्त करून देणारा हा प्रमुख स्रोत आहे. येथील राजकीय अस्थिरता, आरोग्याबाबतचे प्रश्‍न, विशेषतः एड्स, यांमुळे पर्यटकांत मंदी आलेली होती मात्र येथील सांस्कृतिक जीवन, सुंदर पुळणी, जुगारगृहे इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. पोर्त-ओ-प्रिन्स ही राजधानी व केप हेशन शहरालगतचा हेन्री क्रिस्तॉफने बांधलेला किल्ला व यूनेस्कोने १९८२ मध्ये जागतिक वारसा म्हणून घोषित केलेला सॅन्स सोसी राजवाडा ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

 

देशातील पोर्त-ओ-प्रिन्स, केप हेशन या प्रमुख शहरांशिवाय सेले के, जॅक्केल, सेंट मार्क, पोर्त-दे-पाइक्स, गॉनाईव्ह, झेरेमी, मिरागोआने, फॉर लीबेर्टे ही अन्य मोठी व प्रसिद्ध शहरे आहेत.

गाडे, ना. स.


 

 

हैती
प्रसिद्ध समुद्रपर्यटन स्थळ : लाबादी. र्त-ओ-प्रिन्स शहराचे विहंगम दृश्य
   
२०१२ च्या भूकंपात पडझड झालेला हैतीयन राष्ट्राध्यक्षांचा राजवाडा हेन्र्रि ख्रिस्तोफे किल्ला, केप-हेशन.