काल्पी : उत्तर प्रदेश राज्याच्या जालौन जिल्ह्यातील तालुक्याचे ठाणे आणि ऐतिहासिक गाव. लोकसंख्या १,७७,३८० (१९७१). झांशीच्या पूर्वेस १४७ किमी., यमुनेच्या उजव्या तीरावर हे एका खिंडीत वसलेले आहे. चौथ्या शतकात कनौजच्या वासुदेवाने स्थापन केल्यानंतर बाराव्या शतकापासून हे ठाणे मुसलमानांकडे होते. बिरबलाचे हे जन्मस्थान. मराठ्यां‌नी बुंदेलखंड घेतल्यावर त्यांचेही हे मुख्य ठाणे होते. अठराशे सत्तावनच्या उठावात येथील लढाईत झांशीची राणी आणि सेनापती तात्या टोपे यांचा सर ह्यू रोझ याने काल्पीजवळच पराभव केला. काल्पीत `चौऱ्यांशी गुंबज’ आणि इतर १२ कबरी प्रेक्षणीय आहेत. येथे उत्तम प्रतीचा हातकागद तयार होतो तसेच हरबरा, गहू, तूप, तेलबिया, कापूस, ज्वारी इत्यादींचा व्यापार चालतो.

ओक, शा.नि.