ब्रह्मगिरीवरील गोदावरीचा उगम, त्र्यंबकेश्वर.

त्र्यंबकेश्वर : नासिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असून नासिकच्या नैर्ऋ‌त्येस सु. २९ किमी. वर ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. लोकसंख्या ५,४९५ (१९७१). या क्षेत्राच्या उत्पत्तिविषयक अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ब्रह्मगिरी डोंगरमाथ्यावर किल्ला असून गोदावरी नदीचा उगम याच डोंगरातून झाला आहे. सध्याचे त्र्यंबकेश्वराचे मंदिर बाळाजी बाजीराव पेशव्यांनी बांधले. मंदिराभोवती चिरेबंदी तट असून त्याचा विस्तार ८०·७७ X ६६·४५ मी. आहे. या मंदिरातील शिवलिंग शाळुंकेच्या आत असून त्यातून सतत पाणी झिरपत असते. शिवलिंगासाठी सोन्याचा पंचमुखी मुखवटा व रत्‍नखचित किरीट आहे. या मंदिराभोवती श्रीकृष्ण, परशुराम, लक्ष्मीनारायण इत्यादींची मंदिरे आहेत. येथे कुशावर्त तीर्थकुंड आहे. ब्रह्मगिरीच्या उतारावर नाथ पंथीयांचा मठ असून कुंभमेळ्याचे वेळी नाथ पंथाचे जोगी येथे जमतात. १८६६ पासून येथे नगरपालिका आहे. येथे प्राथमिक, माध्यमिक शाळा, वेदशाळा, वाचनालय तसेच दवाखाने इ. आहेत. कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमा, पौष वद्य एकादशीची निवृत्तिनाथांची पुण्यतिथी व माघातील महाशिवरात्र या दिवशी येथे मोठ्या यात्रा भरतात.

साळवेकर, मीरा