मलेशिया : आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. क्षेत्रफळ ३,३३,५५६ चौ.किमी. आणि लोकसंख्या १,४७,४०,००० (१९८३ मध्य अंदाज). १६ सप्टेंबर १९६३ रोजी स्वतंत्र झालेल्या या देशात प्रारंभी मलाया, सिंगापूर व सारावाक, साबा (बोर्निओ बेटाचा उत्तर भाग) यांचा समावेश होता. परंतु १९६५ मध्ये सिंगापूर हा स्वतंत्र देश झाला व मलाया हा पश्चिम मलेशिया (क्षेत्रफळ १,३१,५८७ चौ. किमी.) आणि सारावाक (१,२१,४४९ चौ. किमी.) व साबा (८०,५२० चौ. किमी.) हे दोन्ही मिळून पूर्व मलेशिया म्हणून ओळखले जाऊ लागले. हे दोन्ही विभाग एकमेकांपासून ६४० किमी. लांबीच्या द. चिनी समुद्राने अलग झालेले आहेत. प. मलेशियाच्या उत्तरेस थायलंड, दक्षिणेस सिंगापूर, नैर्ऋत्येस मलॅका सामुद्रधुनी, पूर्वेस दक्षिण चिनी समुद्र व पश्चिमेस अंदमान समुद्र आहे तर पूर्व मलेशियाच्या उत्तरेस चिनी समुद्र व सूलू समुद्र, पूर्वेस सेलेबीझ समुद्र (पॅसिफिक महासागर), दक्षिणेस व पश्चिमेस इंडोनेशिया आहे. जगाच्या प्रमुख सागरी व हवाई मार्गांवरील मध्यवर्ती स्थानामुळे यास महत्त्व आहे. क्वालालुंपुर ही देशाची राजधानी (लोकसंख्या ९, ३७, ८७५-१९८०) आहे.

भूवर्णन :  मलेशियाचा बहुतांश भाग डोंगराळ आहे. मात्र किनारी  भागात व पर्वतरांगांदरम्यान लहानलहान मैदाने आहेत. प. मलेशिया हा विभाग साधारणतः त्रिकोणाकृती असून त्याची कमाल लांबी ३२० किमी. व किमान रुंदी ९५ किमी. आहे. या विभागात पर्वतरांगा उत्तर-दक्षिण या दिशेत पसरलेल्या असून त्यांपैकी सहा-सात रांगांची उंची १,५०० मी. पेक्षाही जास्त आहे. या पर्वताची उंची दक्षिणेकडे कमीकमी होत जाऊन दक्षिण भागातील जोहोर टेकड्यांत उंची १५० मी. आढळते. या रांगांत सु. ४८२ किमी. लांबीची मध्य पर्वतरांग (सेंट्रल रेंज) ही सर्वांत लांब आहे. हिची उंची ९१४ मी. पेक्षा जास्त असून, तिच्यात २,१३४ मी. हून जास्त उंचीची शिखरे आहेत. गूनुंग ताहान (२,१९० मी.) हे या भागातील सर्वोच्च शिखर आहे. पर्वतरांगांमुळे पूर्व व पश्चिम भागांतील दळणवळण अवघड झाले आहे. किनारी भागात व पर्वतांदरम्यान काही सपाट मैदानी भाग आहे. किनारी मैदानांची रुंदी पश्चिम भागात ८ ते ६४ किमी., तर पूर्व भागात ३२ किमी. पर्यंत आढळते.

पूर्व मलेशियाचा भाग हा सु. १,०७८ किमी. लांबीचा व २५८ किमी. रुंदीचा आहे. या विभागास २,२५३ किमी. लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे. या विभागाचे प्रामुख्याने तीन भागांत विभाजन होते. सारावाक हा सागरी सपाट मैदानी भाग ३२ ते ६४ किमी. रुंदीचा असून येथील मैदाने सलग आहेत तर साबा भागात मैदानांची रुंदी १६−३२ किमी. आहे. मात्र ही मैदाने काहीकाही ठिकाणी विच्छिन्न झालेली आहेत. दुसरा भाग हा डोंगर-दऱ्यांचा असून काही डोंगर ३०५ मी. उंचीचे आहेत. मात्र काहीकाही टेकड्यांची उंची ७६२ मी. किंवा त्यापेक्षाही जास्त आढळते. सारावाक भागातील गूनुंग मुरूड (२,४२३ मी.) हे सर्वोच्च शिखर याच विभागात येते. तिसर्या  भागात इंडोनेशियाच्या लगतच्या प्रदेशाचा समावेश होत असून येथील भागाची उंची इतर भागांपेक्षा जास्त आहे. सारावाकपेक्षा साबा भागात याचा विस्तार अधिक आहे. या भागात पर्वतरांगा, दऱ्या, घळ्या, पठारे यांचा समावेश होतो. येथील शिखरांची उंची १,२१९ ते १,२३४ मी.  पर्यंत असून किनावालू (४,१०१ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर साबामध्ये आहे.

मलेशियातील नद्या या प्रामुख्याने कमी लांबीच्या आहेत. प. मलेशियातील पाहांग (लांबी ४३५ किमी.) व पेराक (लांबी ४०६ किमी.) या दोनच प्रमुख नद्या आहेत. या भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने येथील नद्यांद्वारे पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणात वहन होते. पूर्व मलेशियात सारावाक भागातील राजांग (लांबी ५६३ किमी.) ही नदी प्रमुख असून तिच्यातून मुखापासून आत सु. २६० किमी. पर्यंत जलवाहतूक चालते तर साबा भागात किनबतान्गान नदी प्रमुख असून तीतून सु. १९३ किमी. जलवाहतूक चालते. किनारी  भागाचा अंतर्गत भागाशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने नद्यांस महत्त्व आहे.

अतिपर्जन्यवृष्टीमुळे पश्चिम व पूर्व मलेशियात जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होऊन येथील मृदा शेतीच्या दृष्टीने कमी प्रतीची बनली आहे. प. मलेशियात ११% जमीन सुपीक व शेतीयोग्य आहे. येथील मृदेत पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांचे प्रमाण कमी आहे. मात्र नदीखोऱ्यात व किनारी भागात जमीन काळी व गाळाची आढळते. शेतीच्या दृष्टीने कमी प्रतीची मृदा असली, तरी हवामान व भरपूर पर्जन्य यांमुळे रबराची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कथिल हे देशातील प्रमुख खनिज असून त्याचे किंता खोऱ्यात मोठ्या प्रमाणात साठे आहेत. तसेच लोह खनिज, कोळसा, बॉक्साइट, इल्मेनाइट तांबे, सोने यांचे तसेच सागरकिनारी भागात खनिज तेलाचे साठे सापडले आहेत.

हवामान :  मलेशियाचे हवामान उष्ण कटिबंधीय पावसाळी, दमट आहे. येथील मैदानी भागात तपमान दिवसा व रात्री अनुक्रमे ३२ से. व २१से. पर्यंत असते, मात्र डोंगराळ भागात ते उंचीनुसार कमीकमी होते. येथील हवेत आर्द्रतेचे प्रमाण नेहमीच जास्त आढळते. येथील पर्जन्यावर नैर्ऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव असून वार्षिक सरासरी वृष्टी १९० सेंमी. असते. प. मलेशियाच्या पूर्व किनारी भागात वार्षिक सरासरी पर्जन्य ३२० सेंमी., तर प. भागात १५० ते ३२० सेंमी. असते. साबा भागात १५० ते ३०० सेंमी., तर सारावाक भागात २५० ते ४०० सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी :  पूर्व मलेशियाचा सु. ७७% भाग, तर प. मलेशियाचा सु. ६०% भाग हा विषुववृत्तीय सदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे. येथे ओक, शेलॉक तसेच डोंगराळ भागात बांबू, एबनी, साग, रबर, मॅहॉगनी वगैरे वनस्पती आहेत. किनारी भागात कच्छ वनश्री मोठ्या प्रमाणात आहेत.

येथील घनदाट जंगलांत विविध प्राणी आढळतात. त्यांत प्रामुख्याने हत्ती, वाघ, हरणे, रानडुकरे, माकडे, गेंडे, अस्वले इत्यादींचा समावेश असतो. तसेच सुसरी, अजगर व इतर साप मोठ्या प्रमाणात आहेत. सु. ५०० प्रकारचे विविध पक्षीही आढळतात.

गाडे, ना. स.

इतिहास व राज्यव्यवस्था :  मलेशियाचा इतिहास फार प्राचीन असून उपलब्ध पुराव्यांवरून तेथील सांस्कृतिक व राजकीय घडामोडींचे केंद्र मलाया द्वीपकल्प (पश्चिम मलेशिया) असल्याचे दिसून येते. पूर्व मलेशियाचा इतिहास म्हणजेच बोर्निओचा इतिहास असून त्याविषयीची माहिती फार त्रोटक मिळते. सु. ६,००० वर्षांपूर्वीपासून मलाया द्वीपकल्पीय भागात वसाहती असाव्यात असे मानले जाते. येथील पुरातत्वीय उत्खननांत अश्मयुगीन व ताम्रपाषाण युगातील संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. इ. स. पू. २,००० वर्षांपूर्वीपासून दक्षिण चीनच्या प्रदेशातून येथे वसाहतीसाठी आलेले लोक, मलेशियनांचे पूर्वज मानले जातात. या प्रदेशातील भारतीयांच्या वसाहतींबद्दल चिनी इतिहासात, पुराणांत अनेक उल्लेख आढळतात. पुराणांत मलाया द्वीपकल्पाचा ‘सुवर्णद्वीप ’ असा उल्लेख आढळतो. काही धाडसी भारतीयांनी व्यापाराच्या उद्देशाने या प्रदेशात येऊन इ.स.पू. दुसऱ्या शतकात वसाहती स्थापन केल्या असाव्यात. त्यानंतर सु.१,००० वर्षांपर्यंत या प्रदेशावर भारतीय संस्कृतीचा बराच प्रभाव असल्याचे दिसून येते. या भागातील जमीन फारशी सुपीक नसल्याने येथे काही अपवाद वगळता फार मोठी साम्राज्ये स्थापन होऊ शकली नाहीत. द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात इ.स.पू. दुसऱ्या शतकात ‘लंकाशुक’ या नावाने भारतीयांचे राज्य स्थापन झाले होते. काही वर्षांतच या राज्याची भरभराट होऊन त्याने या द्वीपकल्पाचा जवळजवळ सर्व उत्तर भाग व्यापला परंतु तिसऱ्याच शतकात इंडोचायनामधील फूनान राज्याने हे राज्य जिंकून घेतले. पुढे सहाव्या शतकात ते पुन्हा स्वतंत्र झाले. उत्तर भागातील तुन सुन या राज्यात तिसऱ्या शतकात ५०० पेक्षाही जास्त भारतीय व्यापारी व धर्मप्रसारक होते, असा उल्लेख आढळतो. या राज्याशिवाय द्वीपकल्पाच्या पूर्व भागात चिह्-तू, तान-तान तर पश्चिम भागात कदारम, वायव्य भागात को-लो (कलाह-सांप्रत केदाह) इ. राज्ये स्थापन झाली. यांपैकी कदारम राज्य इ.स. पाचव्या शतकात भारतीय व्यापाराचे व बौद्ध धर्म प्रभावाचे या प्रदेशातील प्रमुख केंद्र होते. केलांतान वा ट्रेंग्गानू नदीकाठी विस्तारलेल्या चिह्-तू (रेड अर्थ लॅंड) राज्यावरही सहाव्या शतकात भारतीयांचे आधिपत्य होते. याच शतकात या भागात शैवपंथाचा खूपच प्रचार झाला. सातव्या आणि आठव्या शतकांच्या सुमारास द्वीपकल्पाच्या दोन्ही किनारी प्रदेशांत (पूर्व आणि पश्चिम) आणखी काही लहानलहान राज्यांची निर्मिती झाली. काही चिनी लिखित पुराव्यांवरून या काळात या प्रदेशात सु. ३० राज्ये होती.


सातव्या शतकात श्रीविजयच्या (सुमात्रा) शैलेंद्रांची सत्ता या प्रदेशावर आली. या काळात या प्रदेशातील केदाह व पाट्टानी शहरांची खूपच प्रगती होऊन श्रीविजयच्या पालेंबांग राजधानीशी त्यांची स्पर्धा सुरू झाली.पुढे इ. स. अकराव्या शतकात दक्षिण भारतातील चोलांनी मध्य व दक्षिण मलायाचा प्रदेश पादाक्रांत केला. चोलांशी झालेल्या झगड्यात श्रीविजयचे साम्राज्य खिळखिळे झाले. तेराव्या शतकात जावा व थाई घराण्यांनी आपल्या राज्यांचा विस्तार करण्यास सुरूवात केली. जावा बेटावरील मजपहित या हिंदू साम्राज्याने आपल्या राज्याचा विस्तार मलायापर्यंत वाढविला. या काळात आग्नेय आशियातील ते एक बलाढ्य राष्ट्र होते. थाई व जावा या दोहोंनी श्रीविजयचे राज्य नष्ट केले (चौदावे शतक). याच काळात टेमासिक येथून हद्दपार केलेल्या परमेश्वर व त्याच्या अनुयायांनी मलॅका येथे  एका नवीन घराण्याची स्थापना केली. पंधराव्या शतकात जावातील मजपहित राज्याच्या ऱ्हासामुळे आपोआपच मलॅका राज्याला महत्त्व प्राप्त झाले. १४१४ मध्ये परमेश्वरने मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. याच्या कारकीर्दीत मलॅकाचे चीन, भारत व इस्लाम धर्मीय राष्ट्रांशी राजकीय व व्यापारी संबंध बरेच वाढले. त्यामुळे मलॅका शहर प्राश्चात्त्य व पौर्वात्य देशांमध्ये बरेच प्रसिद्ध झाले. परमेश्वरच्या राज्याला चीनकडूनही संरक्षण मिळाले होते. व्यापाराच्या प्रगती बरोबरच बोर्निओ व इतर आग्नेय आशियायी प्रदेशांत इस्लाम धर्माचा खूपच प्रसार झाला. पुढे १५११ मध्ये पोर्तुगीजांनी या प्रदेशावर ताबा मिळविला. सु. १३० वर्षांच्या त्यांच्या कारकीर्दीनंतर १६४१ मध्ये डचांनी हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. १७८६ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केदाहच्या सुलतानाकडून पिनँग घेतले व हळूहळू आपले वर्चस्व वाढविण्यास सुरूवात केली. १८२४ मध्ये त्यांनी डचांच्या ताब्यातील प्रदेश जिंकून डचांचा मले द्वीपकल्पावरील प्रभाव संपुष्टात आणला. १८७४ पासून ब्रिटिशांनी या प्रदेशातील इतर लहानलहान राज्यांशी तहाची बोलणी सुरू केली आणि संरक्षणाच्या दृष्टीने राज्यांनीही ती मान्य केली. त्यामुळे ब्रिटिशांनी अनेक लहानलहान राज्यांचे संरक्षित राज्य स्थापन केले. १८९५ मध्ये या प्रदेशातील पेराक, सलांगॉर, नग्री संबीलान व पाहांग या राज्यांनी एकत्र येऊन ‘फेडरेटेड मले स्टेट्‌स’ (एफ्एम्एस्) या संघराज्याची स्थापना केली. १९०९ मध्ये थायलंड (सयाम) व मले द्वीपकल्प यांदरम्यानची सरहद्द निश्चित करण्यात येऊन थायलंडने केलांतान, ट्रेंग्गानू, पेर्लिस व केदाह ही आपल्या अधिकाराखालील राज्ये ब्रिटिशांना उदारपणे दिली.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बोर्निओ बेटाचा उत्तर भाग व हल्लीचा साबा (उ. बोर्निओ) हे भाग १८८० मध्ये ब्रिटिशांनी आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर १८८८ मध्ये सारावाक आणि ब्रूनाई हे ब्रिटिशांचे रक्षित भाग म्हणून व १९४६ मध्ये ब्रूनाई वगळता साबा व सारावाक या ब्रिटिश वसाहती बनल्या. १९४१ ते १९४५ (दुसऱ्या महायुद्धकाळात) मलाया आणि बोर्निओ प्रदेश जपानच्या ताब्यात होते. महायुद्धानंतर एप्रिल १९४६ मध्ये ‘ब्रिटिश संरक्षित प्रदेश’ असलेल्या मलायाच्या एकूण अकरा राज्यांनी मिळून ‘मलायन युनियन’ ची स्थापना केली. १९४८ मध्ये त्याचेच रूपांतर ‘फेडरेशन ऑफ मलाया’ मध्ये (मलाया संघ) झाले. त्यानंतर ३१ ऑगस्ट १९५७ मध्ये फेडरेशन ऑफ मलायाच्या स्वतंत्र लोकसत्ताक राज्याची घोषणा करण्यात आली. या स्वतंत्र मलाया संघाला १६ सप्टेंबर १९६३ रोजी साबा व सारावाक या ब्रिटिश वसाहती जोडण्यात येऊन ‘मलेशिया’ ची निर्मिती झाली. मलेशियात त्यावेळी अंतर्गत स्वायत्तता असलेल्या सिंगापूरचा समावेश होता परंतु १९६५ मध्ये या संघातून सिंगापूर बाहेर पडले. १९६६ पासून मलायाला ‘पश्चिम मलेशिया’ व नंतर ‘द्वीपकल्पीय मलेशिया’ तर साबा, सारावाक यांना ‘पूर्व मलेशिया’ अशी नावे रूढ झाली. मलेशिया ‘कोलंबो योजने’ चा तसेच आग्नेय       आशियाई राष्ट्रसंघटनेचा (ॲसोसिएशन ऑफ साउथ-ईस्ट एशियन नेशन्स-आसिआन) व राष्ट्रकुलाचा सभासद आहे.[⟶ बृहद्‌भारत बोर्निओ ब्रूनाई]. 

 

प्रशासनाच्या सोयीसाठी मलेशियाची एकूण १३ राज्यांत विभागणी करण्यात आली असून क्वालालुंपुर हा वेगळा ‘संघीय प्रदेश’ (फेडरल टेरिटरी) करण्यात आला आहे. देशात संविधानात्मक राजेशाही  लोकशाही पद्धती आहे. संविधानात्मक तरतुदीनुसार देशाचा सर्वसत्ताधीश राजा असतो. तो द्वीपकल्पीय मलेशियातील नऊ राज्यांच्या वंशपरंपरेने आलेल्या संस्थानाधिपतींमधून निवडला जातो.‘राजा व डेप्युटी सुप्रीम हेड ऑफ द स्टेट’ यांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते. राजा संसद व मंत्रिमंडळ (कॅबिनेट) यांच्या सल्ल्याने राज्यकारभार पाहतो. देशाची संसद द्विसदनी आहे. ‘देवन रक्यत’ (कनिष्ठ गृह) हे संपूर्ण लोकनियुक्त प्रतिनिधींचे सभागृह असून याची सभासदसंख्या १५४ (१९८२) आहे. हे सभासद ५ वर्षांसाठी प्रौढ मतदान पद्धतीने गुप्त मतदानांद्वारे निवडले जातात. यांपैकी ११४ द्वीपकल्पीय मलेशियातून (पैकी ५ संघीय प्रदेशांतून) , २४ सारावाकमधून व १६ साबामधून निवडले जातात. ‘देवन नेगर’ (वरिष्ठ गृह) या दुसऱ्या गृहाची सभासदसंख्या ५८ असून त्यांपैकी तीन वर्षांसाठी ३२ सभासद राजाने नियुक्त केलेले व २६ सभासद राज्य विधिमंडळांनी निवडलेले असतात. राजा पंतप्रधानाची नियुक्ती करतो, तसेच त्याच्या सल्ल्या ने इतर मंत्र्यांची निवड करतो. पंतप्रधान हा कनिष्ठ गृहाचा सभासद आणि मलेशियाचा नागरिक असावा लागतो. याशिवाय त्याच्यावर संसदेचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक असते. मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असते.  

 

देशात १९८२ मध्ये प्रमुख ४ राजकीय पक्ष होते. २२ एप्रिल १९८२ रोजी लोकप्रतिनिधींच्या झालेल्या निवडणुकांत प्रमुख राजकीय पक्षांची सभासद संख्या पुढीलप्रमाणे होती : नॅशनल फ्रंट १३२ डेमॉक्रॅटिक ॲक्शन पार्टी ९ पॅन-मलायन इस्लामिक पार्टी ५ व स्वतंत्र ८. 

 

न्याय व संरक्षण : मलेशियाच्या संविधानानुसार येथील न्यायदानाचे काम उच्च आणि दुय्यम न्यायालयांकडे सोपविण्यात आले आहे. पश्चिम आणि पूर्व मलेशियात प्रत्येकी एक अशी दोन उच्च न्यायालये असून, त्यांच्या निर्णयांवर फेरविचार करण्यासाठी व अंतिम निर्णयासाठी ‘फेडरल कोर्टा’त अपील करता येते. याचा प्रमुख राजा (प्रेसिडेंट) असून यात उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर सहा न्यायाधीशांचा समावेश असतो. उच्च न्यायालयात प्रत्येकी एक प्रमुख न्यायाधीश व पश्चिम मलेशियात १२, तर पूर्व मलेशियात ४ इतर न्यायाधीश असतात. फौजदारी व दिवाणी अशी दोन्ही कामे या न्यायालयात पाहिली जातात. या न्यायालयांच्या खालोखाल दुय्यम न्यायालये असून त्यांत सत्र न्यायालये (सेशन्स कोर्ट) व दंडाधिकारी न्यायालयांचा समावेश असतो. यांशिवाय देशात धार्मिक खटल्यांसाठी वेगळी न्यायालये असून ती मुसलमानी कायद्यावर आधारित आहेत. त्यांचे कामकाज राज्यशासनाकडून पाहिले जाते. देशात महान्यायवादीचीही तरतूद आहे.  

 

मलेशियाच्या निर्मितीनंतर (१९६३) देशाच्या संरक्षण दलात वाढ व सुधारणा हे महत्त्वाचे बदल करण्यात आले. १९७० च्या सुरूवातीच्या काळात थाई सरहद्दीवरील लढाया, देशातील कम्युनिस्ट पक्षाच्या हालचाली व गनिमी कावा इ. संकटांना तोंड देणे संरक्षणदलाला भाग पडले. १९७२ नंतर मात्र हे लढे संपुष्टात आले. संरक्षणविषयक सल्लामसलतीसाठी मलेशिया, सिंगापूर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, व ग्रेट ब्रिटन यांच्यात ‘फाइव्ह-पॉवर डिफेन्स ॲरेंजमेंट’ विषयीचा करार १९७१ च्या अखेरीस करण्यात आला आहे. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी मलेशियन आर्मी (भूदल), रॉयल मलेशियन नेव्ही (नौदल व मलेशियन एअर फोर्स (हवाईदल) यांनी सांभाळली आहे. १९८२ साली देशात ९९,१०० सैन्यबळ होते. यांपैकी भूदलात ८०,००० नौदलात ८,१०० व हवाईदलात ११,००० सैनिक होते. सैनिकीसम (पॅरामिलिटरी) संघटनेत १९,००० पोलीस व ३,५०,००० स्वयंसेवक होते.  

चौंडे, मा. ल. 


आर्थिक स्थिती : आग्‍नेय आशियातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे वैपुल्य असलेल्या राष्ट्रांमध्ये मलेशियाचा अंतर्भाव होत असून तो सबंध जगामध्ये कथिल, रबर व ताडतेल यांच्या निर्यात व्यापारात अग्रेसर ठरला आहे. उष्ण कटिबंधीय कठिण लाकडाची निर्यात करणारेही ते एक प्रमुख राष्ट्र असून त्याच्याजवळ खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे मोठे साठे आहेत. १९६१−७६ या कालावधीत या देशाचा प्रतिवर्षी सरासरी सात टक्के विकासदर असून तिसऱ्या पंचवार्षिक योजनाकाळात (म्हणजेच १९७६−८० या काळात ) हा दर ८.५% एवढा झाला. १९८० पासून मात्र ओईसीडीच्या सदस्य देशांतील दीर्घकाळ मंदीमुळे मलेशियाचा विकासदरही मंदावला. १९८२ मध्ये या देशाचे वास्तविक स्थूल राष्ट्रीय उत्पादन फक्त २.८% नी वाढले, हेच प्रमाण गतवर्षी (१९८१) ७% होते. तथापि १९८२ मध्ये दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन ४,०८८ मलेशियन डॉलर झाले गतवर्षी ते ३,९०२ म. डॉ. एवढे होते.

मूलतः मलेशिया हा ग्रामीण देशच समजला पाहिजे कारण एकूण लोकसंख्येपैकी ८२.९% लोक द्वीपकल्पीय मलेशियात, तर ९.६% आणि ७.५% लोक अनुक्रमे सारावाक व साबामध्ये रहात असल्याचे आढळते. १९५७−७० या काळात द्वीपकल्पीय मलेशियातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण फारच थोडे म्हणजे, २७% वरून २९% वर वाढले. १९७० पासून मात्र नागरी लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे १९७६ मध्ये ते एकूण लोकसंख्येच्या ३२% एवढे होते. विस्तृत प्रमाणातील दारिद्य व उत्पन्नाचे विषम प्रमाण या दोन अनुत्तरित समस्या देशाला भेडसावत आहेत. याचे एक प्रमुख कारण म्हणजे, कृषिक्षेत्राचे द्विदलीय (दुहेरी) स्वरूप हे असून मलेशियन अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मितीचे ते प्रमुख क्षेत्र मानले जाते. मळेक्षेत्र हे उच्च उत्पादकतेशी निगडीत असून बहुतेक परंपरागत शेतकरी कुटुंबे लहान प्रमाणावरील भातशेती व रबर लागवड यांसारख्या कमी उत्पन्नाच्या व कमी उत्पादकतेच्या व्यवसायांत गुंतलेली आढळतात. कृषिक्षेत्राच्या या द्विदलीय स्वरूपाचे पडसाद देशाच्या सामाजिक स्तरावरही पडलेले दिसून येतात. मले लोक आपल्या इतर स्थानिक जातिबांधवांबरोबर ‘भूमिपुत्र’ म्हणून ओळखले जातात हे पारंपारिक शेती व्यवसायातच राहिले आहेत. बाहेरून आलेले चिनी व भारतीय हे मात्र कथिलाच्या खाणी, मळेउद्योग, व्यापार व निर्मितिउद्योग अशा गतिमान क्षेत्रांत यशस्वी झाल्याचे आढळते. मलेशियाच्या गरिबीचे दुसरे कारण म्हणजे, १९६० पासून देशाच्या लोकसंख्येत झालेली जलद वाढ, हे होय. याशिवाय देशाला १९६० च्या पुढे आंतरराष्ट्रीय व्यापारदरात गंभीर स्वरूपाची आणि दीर्घकाळ टिकणारी अशी घट सोसावी लागली.

कृषी : देशातील प्रमुख निर्वाह पीक भात हे असून किनारी प्रदेशात मासेमारी, तर अंतर्भागात (उदा., सारावाक व साबा) मृगया हे महत्त्वाचे व्यवसाय चालतात. द्वीपकल्पीय मलेशियात भातशेतीचे केंद्रीकरण झालेले आहे. १९८२ मध्ये देशातील भातपीक १३,१३,५१० टन झाले गतवर्षीपेक्षा १.५% नी वाढ झाली. द्वीपकल्पीय मलेशियात ७८.१% ,तर सारावाक व साबा या विभागांत अनुक्रमे १५.१% व ६.७% उत्पादन झाले. १९८२ मध्ये भात शेतीखाली ७,७१,०८० हे. क्षेत्र होते (१९८१ : ७,६७,६४० हे.). मलेशियास ४५% तांदुळाची आयात करावी लागत होती तेव्हापासून भात उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्याच्या दृष्टीने देशाने जोरदार प्रयत्न केले : उदा., जलसिंचन प्रकल्प, दुबार पीक पद्धतीची तसेच भाताच्या अधिकतर उत्पादनक्षम जातींच्या लागवडीची कार्यवाही आणि शासनाची किमान भाव हमी योजना. या प्रयत्नांमुळे १९८२ साली एकूण भाताच्या गरजेपैकी ८१.८% गरज अंतर्गत उत्पादनातून भागविण्यात आली, तर उर्वरित भाताची थायलंड, चीन व अमेरिकेतून संयुक्त संस्थाने या देशांतून आयात करण्यात आली. १९८३ मध्ये देशात भाताचे एकूण उत्पादन १३,७९,५६० टन होण्याची अपेक्षा व्यक्तविण्यात आली याचे कारण, शासनाने अधिक प्रमाणात उपलब्ध केलेल्या जलसिंचन सुविधा, तसेच खतांचा करण्यात आलेला विस्तृत वापर, हे होय. मलेशियन सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात राबविलेले अधिक भात-उत्पादन धोरण हे स्वयंपूर्णता व उत्पन्नाचे फेरवितरण या दोन सूत्रांवर अवलंबून होते. त्यांपैकी स्वयंपूर्णता हे ईप्सित सिद्ध झाल्याचे दिसत असले, तरी उत्पन्न फेरवाटप मोठ्या प्रमाणावर अद्यापि सिद्ध होऊ शकलेले आढळत नाही. रबराची लागवड करणाऱ्या लहान शेतकऱ्यांप्रमाणेच भात पिकवणारे शेतकरी हे द्वीपकल्पीय मलेशियामधील दारिद्र्याव्यस्थेत राहणारा मोठा समूह आहे. हे दारिद्र्याचे प्रमाण १९७० मध्ये ८८.१% होते, १९७५ मध्ये ते ७७%, तर १९७० मध्ये ५५.१% वर आले. याची कारणे पुढीलप्रमाणे : (१) भूधारणक्षेत्राचा लहान आकार−(एकूण भूखंडांपैकी ५५% भूखंडांचा आकार १.२ हे. खाली, तर ८०% भूखंडांचा आकार २ हे. खाली असा आहे), (२) दुबार पीक पद्धतीसाठी आवश्यक अशा जलनिःसारण व जलसिंचन प्रकल्पांचा अभाव व त्यामुळे कमी प्रतीचे पीकउत्पादन, (३) कुळवहिवाट.

मासेमारी (१९८२ मधील उत्पादन : सु. ६,८१,७०० मे. टन), पशुपालन, बागायती उत्पादने, कोको आणि नारळ उत्पादन हे सर्व कृषिनिगडित व्यवसाय लहान प्रमाणावर चालत असले, तरी त्यांच्यामध्ये सबंध कृषिव्यवसायाला एक बळकट व विस्तृत असा आधार घ्यावयाचे सामर्थ्य असल्याने त्यांना उत्तेजन दिले जाते. १९८२ मध्ये कोको, तंबाखू, अननस, खोबरेल तेल, पशुधन व मासे उत्पादन यांत वाढ झाल्याचे आढळते. कोकोच्या किंमतींमध्ये जागतिक मंदी असली, तरी मलेशियात, विशेषतः साबा प्रांतात, कोकोबियांचे उत्पादन वाढत गेले. एकूण जागतिक मिरी उत्पादनापैकी मलेशियामध्ये ४२% उत्पादन होत असून निर्यात व्यापारात मिरीला महत्त्वाचे स्थान आहे. जवळजवळ ९५% उत्पादन निर्यात केले जाते. सारावाकमध्ये ९०%, तर उर्वरित उत्पादन जोहोरमध्ये होते.

ब्रिटिशकालीन वसाहत असल्यापासून रबर हा मलेशियन अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो अर्थातच रबराखालील क्षेत्र व उत्पादन या दोहोंत बरीच घट होत गेल्याचे आढळते. १९८२ मध्ये रबराच्या लागवडीखालील क्षेत्र २०,१०,१३५ हे. एवढे असून त्यापैकी ८४.६% क्षेत्र द्वीपकल्पीय मलेशियामध्ये होते. लहान भूधारकांनी केलेल्या रबराच्या लागवडीखालील क्षेत्र पुढीलप्रमाणे आढळते : द्वीपकल्पीय मलेशिया ७२.२%, साबा व सारावाक ६४.७%. १९८२ मध्ये रबराचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले :  १५.२९ लक्ष मेट्रिक टन (द्वीपकल्पीय मलेशिया : १४,९१,३०० टन साबा २१,५०० टन व सारावाक १६,२०० टन). रबर उत्पादनाबाबत मलेशियन सरकारपुढे तीन प्रमुख समस्या आहेत : (१) रबर पिकविणाऱ्या अल्प भूधारकांमध्ये आढलून येणारी कमालीची गरिबी. १९८० मध्ये या अल्पभूधारकांमधील दारिद्र्यभार ४१.३% एवढा होता. १९८२ मध्ये ‘रबर उद्योग अल्पभूधारक विकास प्राधिकरणा’ मार्फत २९,९६० हे. अल्प-भूधारण क्षेत्रे विकसित करण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि प्रमाणानुसारी काटकसरीपासून मिळणारे फायदे, प्रगत तंत्रविद्या, कार्यक्षम व्यवस्थापन, मोठ्या प्रमाणावरील भांडवलसाधने आणि सम्यक्‌विकसित अधःसंरचनात्मक सुविधा या सर्वांच्या अभावामुळे अल्पभूधारकांची प्रगती अतिशय मंद होत आहे.

 

(२) दिवसेंदिवस रबराच्या लागवडीखालील कमी होत जाणारे क्षेत्र व त्यामुळे होणारे कमी उत्पादन आणि रबराला येणारी वाढती जागतिक मागणी, या दोहोंचा मेळ घालणे केंद्र शासनाला अवघड होऊन बसले आहे. याकरिता रबराच्या वृक्षांची पुनर्लागवड आणि ती जोमाने वाढण्याकरिता त्यांना मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांची भर देण्याचा शासनाचा निकराचा प्रयत्नप चालू आहे. ‘केंद्रीय भूविकास प्राधिकरणा’ने नवीन रबराच्या जमिनी विकसीत करण्याचे प्रयत्न जारी केलेले आहेत. १९७२ च्या अखेरीस या प्राधिकरणाने १,८५,०७५ हे. जमिनीचा विकास केला आहे.

(३) रबराच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर सतत होत जाणारे चढ-उतार, यांवर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरांवर किंमत स्थिरीकरण योजना आखण्यात आली आहे.


पामतेल :  १९६० पासून पामतेलाचे उत्पादन जलद गतीने वाढत गेल्याचे आढळते. १९७४-७५ ची मंदीची लाट सावरणे व अर्थसंकल्पात समतोल राखणे ही गोष्ट पामतेलाला मिळालेल्या अनुकूल किंमती व निर्यात परिमाणांत सातत्याने होत जाणारी वाढ यांमुळे शक्य झाली. उत्पादनात प्रतिवर्षी १९.६% दरांनी वाढ झाली. १९८२ मध्ये तेल उत्पादनासाठी ११,७०,७०० हे. क्षेत्रात पामची लागवड करण्यात आली होती. यांपैकी ८९.४% क्षेत्र द्वीपकल्पीय मलेशिया, ८.३% साबा व उर्वरित २.३% क्षेत्र सारावाक भागात लागवडीखाली आणण्यात आले होते. १९८२ मध्ये पामतेलाचे ३५.१० लक्ष टन उत्पादन झाले. १९८२ साली एकूण जागतिक अशुद्ध पामतेलाच्या उत्पादनापैकी ५९.४% उत्पादन एकट्या मलेशियात झाले. १९७२ पासून पामतेलाच्या उत्पादनामध्ये सबंध जगात मलेशिया हा अग्रेसर उत्पादक देश आहे. १९८२ मध्ये देशात ३१ लक्ष टन प्रक्रियित पामतेलाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या प्रक्रियित पामतेलाची १९८२ मध्ये आयात करणारे प्रामुख्याने  सिंगापूर (२७.२%), ईईसी राष्ट्रे (यूरोपीय आर्थिक समुदायातील राष्ट्रे) (१०.८%), भारत (९.८%), जपान (५.३%) व अमेरिकेची संयुक्त संस्थाने (३.१%) हे देश होते. पाम मगजतेलाची निर्यातही मलेशियातून वाढत्या प्रमाणात होत आहे. १९८२ मध्ये ४२% तेलाची निर्यात यूरोपीय सामाईक बाजारपेठीय राष्ट्रांना, २५% अमेरिकेला व ६% कॅनडाला करण्यात आली. मलेशियाच्या पामतेल उद्योगापुढे व्यापारी अडथळे, तसेच आयात करणाऱ्या देशांनी अवलंबिलेली व्यापार संरक्षणात्मक धोरणे, या जटिल समस्या उभ्या आहेत. आयात शुल्कदर कमी करणे वा रद्द करणे तसेच संभाव्य व्यापारपेठांत (चीन, कोरिया, प. आशियाई राष्ट्रे) आक्रमक व उठावदार विपणन कार्यवाही करणे इ. सारखे उपाय मलेशियन सरकार नेटाने अवलंबीत आहे. १९८२ मध्ये देशात प्रामुख्याने कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (आकडे लक्ष मे. टनांत) : रबर १५.२९ भात १३.१३ पामतेल (अशुद्ध) ३५.०९ पाम मगज (गर) ३.२० (आकडे हजार मे. टनांत) खोबरे (सुके) १८.४ खोबरेल ६९.२ मिरी २५.५ कोको ६६.२. याच वर्षी पशुधनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती (आकडे हजारांत) : गुरे ५३८ म्हशी १८१ बकर्याज ३२८ मेंढ्या ६९ व डुकरे २,१११.

जंगल संपत्ती : इमारती लाकूड (कापीव) उत्पादन हा मलेशियन अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आधारभाग समजला जातो. साबा, सारावाक व द्वीपकल्पीय मलेशिया या भागांतून अनुक्रमे एकूण उत्पादनाच्या ३७.३%, ३२.२% व ३०.५% एवढे लाकूड उत्पादन केले जाते. निर्यातीवर तसेच अंतर्गत बाजारपेठ विकसित करण्यावर सरकारचे लक्ष असते. १९७१−८० या दशकात सरासरीने प्रतिवर्षी लाकूड उत्पादनात ३.४% नी वाढ होत गेली. १९८२ मधील कापीव ओंडक्यांचे उत्पादन २९५ लक्ष घ.मी. होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच वर्षी कापीव इमारती लाकडाचे उत्पादन ६४० लक्ष घ.मी. होईल, असा अंदाज होता. १९८२ मध्ये कापीव ओंडके व कापीव इमारती लाकूड यांची निर्यात अनुक्रमे १६० लक्ष घ.मी. व २८ लक्ष घ. मी. एवढी करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. अंतर्गत लाकूड पुरवठा अबाधित राहण्याच्या दृष्टीने १९७८ मध्ये राष्ट्रीय वननीती (धोरण) कार्यवाहीत आणली गेली. या वननीतीची उद्दीष्टे अशी होती : कायमस्वरूपी वनप्रदेश निर्माण करणे, वनपुनर्वसन, वनप्रदेशातील वृक्षलागवडीचे दर कमी आणि नियंत्रित करणे, परिणामकारक वनव्यवस्थापन आणि वन साधनसंपत्तीचे इष्टमय उपयोजन. वननीतीनुसार १९८२−८५ या काळात प्रतीवर्षी १.६० लक्ष हे. वनभूमीची लागवड करण्यात येणार होती. पुनर्वनरोपणास उत्तेजन देण्याच्या दृष्टीने केंद्रशासनाने १९८० मध्ये अनेक कर सवलती जाहीर केल्या. १९८० मधील द्वीपकल्पीय मलेशियातील लाकूड उत्पादन पुढीलप्रमाणे झाले : (आकडे हजार घ. मी.) : कापीव ओंडके ९,२८२ खांब ९९ लोणारी कोळसा ४५९ जळाऊ लाकूड ७२ कापीव लाकूड ४,९५३.

 

खनिज संपत्ती : परदेशी हुंडणावळ मिळविणारे म्हणून रबराप्रमाणेच कथिल हेही मलेशियाच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक समजेल जात होते. तथापि आता त्याचे स्थान लाकूड व खनिज तेल यांच्यामागे पडले आहे. १९७७ मध्ये पामतेलाच्याही ते मागे पडले. बहुतेक कथिल हे मलेशियाच्या पश्चिम किनारी असलेल्या पेराक व सलांगॉर या राज्यांत सापडते. कथिल सांद्रितांचे खाणीतील उत्पादन १९७७ मध्ये ५८,७०३ मे. टन झाले. औद्योगिक देशांकडून कथिलाची कमी झालेली मागणी लक्षात घेता, १९८२ मध्ये कथिलाची निर्यात ५०,६०० टनांपर्यंतच राहण्याची शक्यता व्यक्तविण्यात आली. १९८२ मधील मलेशियाचे कथिल उत्पादन जागतिक संदर्भात २४.४% एवढे होते. जागतिक खनिज तेल उत्पादनाच्या दृष्टीने मलेशियाचा वाटा अत्यल्प असला, तरी १९७६ पासून रबरानंतर मोठी परदेशी हुंडणावळ मिळविणारा म्हणून अशुद्ध खनिज तेलाचा दुसरा क्रमांक आला आहे. १९८१ मध्ये अशुद्ध खनिज तेलाचे उत्पादन प्रतिदिनी २,५८,११३ पिंपे एवढे झाले. १९८२ साली खनिज तेल पदार्थांची निर्यात ३.४५ लक्ष मे. टन एवढी होईल असा अंदाज होता. खनिज तेलाची निर्यात प्रामुख्याने जपान, सिंगापूर व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांना केली जाते. पेट्रोनास कॅरिगाली या ‘पेट्रोनास’ कंपनीच्या दुय्यम कंपनीला (स्था. १९७८) र्ट्रेग्गानूच्या किनारी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खनिज तेल व नैसर्गिक वायू सापडला. सारावाकमधील बिंतूल येथे उभारण्यात आलेल्या द्रवरूप  नैसर्गिक वायू प्रकल्पांद्वारा १९८३ च्या प्रारंभी जपानला द्रवरूप नैसर्गिक वायूचे पहिले उत्पादन निर्यात करण्यात आले. नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करणारा प्रकल्प १९८४ मध्ये र्ट्रेंग्गानू येथे, तर बिंतूल येथे १९८५ मध्ये अमोनिया-युरिया प्रकल्प उभारण्यात यावयाचा आहे. निर्यात केल्या जाणाऱ्या इतर खनिंजामध्ये तांबे, बॉक्साइट व लोहधातुक यांचा समावेश होतो. साबा राज्यातील मॅमत येथे देशातील तांब्याची एकमेव खाण असून तिच्यामधून १९८० च्या सुमारास १.१३ लक्ष टन तांब्याच्या सांद्रितांचे उत्पादन झाले. खाणउद्योग हा भांडवल-सधन उद्योग असल्याने त्यात रोजगारीला फारसा वाव राहात नाही. १९८२ मध्ये या क्षेत्रात (खाणकाम व दगडफोड उद्योग) १.५% एवढाच रोजगार उपलब्ध होता. १९८२ मधील खाणउद्योगातील उत्पादनाची आकडेवारी अशी होती (आकडे लक्ष मे. टनांत) : कथिल सांद्रिते ०.५२३ लोहधातुक ३.४०३, तांबे १.२८७ बॉक्साइट ५.८९, अशुद्ध खनिज तेल १४५.४०. सारावाक आणि द्वीपकल्पीय मलेशिया या दोहोंच्या किनारापार-क्षेत्रात नैसर्गिक वायूचे व्यापारी स्वरूपात प्रचंड साठे सापडले आहेत (४८ लक्ष घ.मी.). राष्ट्रीय वीज मंडळाकडून वीज पुरविली जाते. 

 

मलेशियाच्या इंधनासाधनांमध्ये दगडी कोळसा, पीट, लाकूड, खनिज तेल व जलविद्यूत्‌ यांचा अंतर्भाव होतो. दगडी कोळशा व पीट यांचे साठे आढळले असले, तरी आर्थिक दृष्ट्या त्यांचे उत्पादन किफायतशीर नाही. लाकूड व लोणारी कोळसा ही पारंपरिक इंधनसामग्री होय. तथापि नागरी भागांत त्यांची जागा वायूने घेतलेली आढळते. पूर्व मलेशियात (साबा व सारावाक या प्रदेशांत) जलविद्युत्‌ उत्पादन अतिशय थोडे होते, परंतु भरपूर पाऊस व अंतर्गत भागात असणारे नद्यांचे तीव्र उतार यांमुळे या भागांत जलविद्युत्‌निर्मितीस मोठा वाव आहे. द्वीपकल्पीय मलेशियातील महत्त्वाच्या जलविद्युत्‌ योजना कॅमरन हायलँड्‌स, बाटांग पाडांग, पेराक नदीवरील कंट्रो येथे आहेत. यांशिवाय ऊलू लांगात, सेपांग व रहमान या ठिकाणी लहान प्रमाणावरील जलविद्युत्‌प्रकल्प आहेत. 

 

उद्योग : मलेशिया अस्तित्वात आले, तेव्हा बहुतेक विकसनशील राष्ट्रांप्रमाणेच त्याचे औद्योगिक क्षेत्र प्राथमिक स्वरूपातील होते तथापि चिनी प्रवर्तकांचे कौशल्य आणि परदेशी भांडवल गुंतवणूकीला मोठ्या प्रमाणात मिळालेले प्रोत्साहन यांमुळे १९६०−७० व १९७०−७५ या अवधीत औद्योगिक क्षेत्राची अतिशय जलद वाढ होत गेली १९७५ च्या सुमाराला औद्योगिक क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा १४.४% व एकूण निर्यात व्यापारातील निर्मितिउद्योगाच्या उत्पादनाचा वाटा २०% (२१० कोटी मलेशियन डॉ.) एवढा झाला. द्वीपकल्पीय मलेशियामध्ये बहुतेक सर्व निर्मितिउद्योग एकवटलेले आढळतात. आतापर्यंत आयात करण्यात येत असलेल्या उपभोग्य वस्तूंची निर्मिती देशातच करावयाचे प्रयत्न जारी असून निर्यातक्षम वस्तूंची निर्मिती करण्याकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. आयात पर्यायतेऐवजी निर्याताभिमुख व नैसर्गिक साधनसामग्रींनी युक्त अशा रबर, लाकूड, पामतेल यांसारख्या प्रक्रिया उद्योगांवर तसेच इलेक्ट्रॉनिकी व कापडउद्योग यांसारख्या उद्योगांवर भिस्त  ठेवून औद्योगिकीकरणाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट साधण्यावर अधिककरून भर देण्यात आला आहे. औद्योगिकीकरणाचा विस्तार वाढण्याकरिता शासनाद्वारा नवीन उद्योजकांना काही  निवडक उद्योगांबाबत अनुकूल व उत्तेजनात्मक सवलती, उदा., करसूट वा पूर्ण करकपात लागू करणे देशी बाजारपेठेला संरक्षण देण्याकरिता जकातपद्धती कार्यवाहीत आणणे आणि उद्योगांना अर्थसाहाय्य करण्याकरिता वित्तसंस्था स्थापन करणे यांसारख्या योजना राबविल्या जातात. सर्वकष औद्योगिकीकरण होण्याकरिता अल्पविकसित भागात आणि प्रदेशांत शासनाने औद्योगिक वसाहती उभारण्यास उत्तेजन दिले आहे. १९८० च्या अखेर ७६ औद्योगिक वसाहतींपैकी २८ वसाहती केदाह, केलांतान, साबा, सारावाक, र्ट्रेग्गानू यांसारख्या राज्यांमध्ये उभारण्यात आल्या आहेत. कृषिउत्पादने, बांधकामसामग्री व साहित्य, विद्युत्‌यंत्रे, इलेक्ट्रॉनिकीय वस्तू व पदार्थ यांसारख्यांच्या उत्पादनात वाढ होत असल्याचे, तर कापडवस्त्रउद्योग, वाहतूक सामग्री व रबर उत्पादन या उद्योगांत तुलनेने कमी वाढ होताना दिसते. कमी मागणी, उत्पादन किंमतींमध्ये होत जाणारी वाढ त्याचप्रमाणे श्रमबलाचा, विशेषतः कुशल कामगारांचा, तुटवडा या घटकांमुळे निर्मितिउद्योगांची प्रगती बाधित झाल्याचे आढळून येते. मध्यम व भाडवली वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या  साहाय्यभूत उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषीवर आधारित तसेच निर्याताभिमुख अशा श्रम-सधन उद्योगांना उत्तेजन देण्याच्या शासनाच्या धोरणामागे अशा प्रकारच्या उद्योगांचे जाळे कमी विकसित प्रदेशांमध्ये वा भागांमध्ये पसरविण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट दिसते. त्याचबरोबर, नवीननवीन बाजारपेठा मिळविणे आणि उद्योगांचे विविधांगीकरण करणे हीही उद्दिष्टे अंमलात आणण्याचे प्रयत्नो केले जात आहेत.


देशातील महत्त्वाच्या उद्योगांमध्ये प्रक्रियाउद्योग (रबर, कथिल, लाकूड, मासे, भात सडणे, नारळ आणि पामतेल, पेये व तंबाखू), अभियांत्रिकी उद्योग (रेल्वे व वाहन यंत्रशाळा, गोद्या, ओतभट्‌ट्या, घडवणउद्योग), हस्तोद्योग इत्यादींचा समावेश होतो. इतर निर्मितिउत्पादनांत सिमेंट, साबण, रबर वस्तू, फर्निचर इत्यादींचा अंतर्भाव होतो. १९८० मधील उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (मे. टनांत): रबर वस्तू-क्रेप रबर १८,३४८ रबर शीट ७६,००५ फोम रबर ३,७१७ फोम रबर गाद्या ३,८४८ रबर संयुगे १२,१७२ रबर नळ्या व नळ १,०४७ सिमेंट २३,४९,००० सिगार, सिगारेटी, चिरूट वगैरे १४,७११ कथिल सांद्रिते ७१,३१८ पादत्राणे ३१९.२९ लक्ष जोड्या.

मलेशियातील आर्थिक दृष्ट्या काम करणारे श्रमबल १९७० च्या जनगणनेनुसार पुढीलप्रमाणे होते. कृषी, वन, मृगया व मासेमारी १५,७९,३०३ खाणकाम व दगडफोडउद्योग ५७,२७३ निर्मितिउद्योग २,७६०२१ बांधकाम ७१, ४३३ वीज, वायू, जल आणि आरोग्यसेवा २२,५६१ व्यापार ३,०३,६९० सेवा उद्योग ५,४३,३२१ इतर ३,३३,४९४ एकूण ३२,९५,०७८. १९८२ मध्ये एकूण आर्थिक दृष्ट्या क्रियाशील श्रमबल ५६.९० लक्ष होते. मले लोक बव्हंशी कृषिक्षेत्रात गुंतलेले असून चिनी, भारतीय व पाकिस्तानी नागरी विभागातील उद्योगधंद्यांत कामे करतात.

 

देशात कामगार संघटना प्रगतीपथावर असून १९७९ अखेर नोंदलेल्या कामगार संघटना व सदस्य यांची संख्या अनुक्रमे ३८५ आणि ५,६८,४१९ होती. ‘मलेशियन ट्रेड्‌स युनियन काँग्रेस’ (स्था. १९४९) ही सर्वांत मोठी कामगार संघटना असून तिच्याशी १११ संबद्ध कामगार संघटना व २.९० लक्ष कामगार सदस्य आहेत. १९८२ साली गृहनिर्माण, शेती व उद्योग या क्षेत्रांत नोंदणी झालेल्या २,३२६ सहकारी संस्था होत्या व त्यांची सदस्य संख्या १८.६० लक्ष होती.

अर्थकारण, बँकिंग : मलेशियाच्या लोकवित्तव्यवस्थेवर−लेखापरीक्षण व लेखासंघटन, सांसदीय नियंत्रण तसेच महसूल संकलन-ब्रिटिश वित्तव्यवस्था तत्वांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते. देशाची लोकवित्तव्यवस्था आर्थिक विकासाचा वेग, रोजगारपातळी किंवा किंमतपातळी यांचे नियंत्रण करण्याऐवजी अधिककरून सरकारी खर्च भागविण्याकरिता महसूल संकलित करणारी यंत्रणा म्हणून कार्य करते. महसुली उत्पन्न गोळा करण्यासाठी प्राप्तिकर व इतर प्रत्यक्ष कर यांवर अधिक भिस्त ठेवली जाते.(५०% हून अधिक). सीमा शुल्क व अबकारी कर यांपासून ३३% हून अधिक महसूल मिळतो.

मलेशियाच्या १९८३ च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली उत्पन्न व खर्च यांचे अनुक्रमे १,८५०.३० कोटी व २,८३४.९० कोटी मलेशियन डॉलर असे आकडे होते. महसुली उत्पन्नात करांवाटे ८४% रकमेची भर पडत असून खर्चाच्या बाबींमध्ये अग्रहक्काने शिक्षण, ऋणभार, संरक्षण, वाहतूक व संदेशवहन, कृषी व ग्रामीण विकास, सामान्य प्रशासन, लोकसेवा या बाबींचा प्रामुख्याने समावेश होता. ‘रिंग्गिट’ अथवा ‘मलेशियन डॉलर’ हे मलेशियाचे अधिकृत चलन असून एका रिंग्गिट वा मलेशियन डॉलरचे १०० सेन होतात. १५, १०, २०, ५० सेनची नाणी, तर, १, ५, १०, ५०, १०० व १,००० रिंग्गिटांच्या नोटा प्रचारात आहेत. ३० जून १९८३ रोजी १ स्टर्लिंग पौंड = ३.५५ मलेशियन डॉ. व १ अमेरिकी डॉलर = २.३१ मलेशियन डॉलर अले प्रमाण असून  विदेश विनिमय दर १०० मलेशियन डॉलर = २८.१३ स्टर्लिंग पौंड = ४३.१५ अमेरिकी डॉलर असा होता. ‘बँक नेगारा मलेशिया’ ही मलेशियाची मध्यवर्ती बँक आहे (स्था. १९५९). १९८० च्या अखेरीस देशात ३८ बँका कार्यवाहीत असून त्यांपैकी २१ देशी बँका आपल्या ३९८ शाखांसमवेत कार्य करीत होत्या. पाच बँका सिंगापूरमध्ये स्थापन झाल्या असून त्यांच्या ६३ शाखा, तर १२ परदेशी बँका ८५ शाखांसहित कार्य करीत होत्या. यांशिवाय राष्ट्रीय बचत बँक (पूर्वीची डाकघर बचत बँक) आपल्या अनेक शाखांसहित कार्य करीत आहे. क्वालालुंपुर येथे शेअरबाजार (स्था.१९७६) आहे. १९८२ मध्ये देशात ४६ सर्वसाधारण विमा, पाच आयुर्विमा व १३ आयुर्विमा व सर्वसाधारण विमा व्यवहार करणाऱ्या अशा एकूण ६४ विमाकंपन्या होत्या.

स्वातंत्र्योत्तर काळात मलेशियाने ब्रिटिशांपासून चालू असलेल्या मुक्त अर्थव्यवस्था पद्धतीत बऱ्याच सुधारणा केल्या. सर्वसामान्यतः सर्वच लोकांचे आणि त्यांतल्या त्यांत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावणे, हे उद्दिष्ट पुढे ठेवून शासनाने नियोजनबद्ध आर्थिक वाटचालीस प्रारंभ केला. १९८१−८५ ही चौथी योजना मार्च १९८१ मध्ये कार्यान्वित झाली. १९७० मध्ये उद्‌भवलेल्या वर्गसंघर्षानंतर, ‘नव आर्थिक नीती’ शासनाने जाहीर केली.

 

मलेशियाच्या निर्यात व्यापारात प्रामुख्याने अशुद्ध खनिज तेल, रबर, लाकूड, पामतेल व कथिल या पाच पदार्थांचा अंतर्भाव होत असून एकूण निर्यातमूल्यांपैकी सु. ७५ टक्के मूल्य पाच पदार्थांपासून देशाला मिळते. आयात व्यापारातील अत्यंत महत्त्वाचे पदार्थ म्हणजे वाहतूक साहित्य व यंत्रसामग्री, निर्मितिउद्योगांची उत्पादने, अन्नधान्ये हे असून त्यांचा एकूण आयातमूल्यामध्ये ६६ टक्के हिस्सा असतो. निर्यात व्यापारातील महत्त्वाचे सहभागी देश ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, प.जर्मनी, भारत, जपान, नेदर्लंड्‌स, सिंगापूर, थायलंड, रशिया, ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने हे असून आयात व्यापारातील सहभागी देश ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, प.जर्मनी, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड, ग्रेट ब्रिटन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने आहेत. १९८२ मधील मलेशियाची निर्यात व आयात अनुक्रमे २,६६४ कोटी मलेशियन डॉ. व २,८२७.६० कोटी मलेशियन डॉ. एवढी होती. संयुक्त राष्ट्रे व त्यांच्या विशेष संस्था−संघटना, राष्ट्रकुल, कोलंबो योजना, आग्नेय आशियाई राष्ट्र संघटना (आसिआन) इ. संघटनांचा मलेशिया सदस्य आहे.

वाहतूक व संदेशवहन : द्वीपकल्पीय मलेशियात रस्ते व लोहमार्ग  यांचा साबा व सारावाक पेक्षा अधिक चांगल्या प्रमाणात विकास झाल्याचे आढळते. सारावाकमध्ये रस्त्यांची फारच कमी प्रमाणात प्रगती झालेली आहे. द्वीपकल्पीय मलेशियात १९८१ साली २३,७१४ किमी. लांबीचे रस्ते होते. उत्तरेकडील थायलंडच्या सरहद्दीपासून दक्षिणेकडील सिंगापूरपर्यंत द्वीपकल्पीय मलेशियातून एक प्रमुख मार्ग जातो. केंद्रीय मार्ग क्वालालुंपुर व केलांग ही दोन शहरे जोडतो. केलांतानमधील जेली व पेराकममधील ग्रीक ही दोन शहरे जोडणारा पूर्व-पश्चिम महामार्ग १९८२ मध्ये वाहतुकीस खुला करण्यात आला. पिनँग बेट व द्वीपकल्पीय मलेशिया हे दोन भाग जोडणाऱ्या या पूर्व-पश्चिम महामार्गाच्या अखेरच्या भागाच्या बांधकामास (१३.५ किमी. लांबीचा पूल) १९८२ मध्येच सुरुवात झाली. साबामध्ये २,७२० किमी. लांबीच्या खडीच्या रस्त्यांचे जाळे असून त्यांची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असते. सारावाकमध्ये १,६०० किमी. लांबीच्या खडीच्या रस्त्यांची देखभाल राज्यशासनाकडून पाहिली जाते. महत्त्वाचा मुख्य हमरस्ता कूचिंग व सीबू ही दोन शहरे जोडतो. साबा व सारवाक ही दोन राज्ये जोडणारा रस्ता १९८१ मध्ये वाहतुकीस खुला झाला. १९८२ मध्ये देशात खाजगी मोटारसायकली, खाजगी प्रवासी गाड्या अनुक्रमे १८,५०,२५२ व १०,३९,४६५ एवढ्या होत्या. त्याच वर्षी बसगाड्या १६,७६५ मालवाहू २,३०,०८४ टॅक्सी २३,२९६ आणि इतर १,२४,९४६ वाहने होती. 

 

द्वीपकल्पीय मलेशियातील ७८७ किमी. लांबीचा प्रमुख लोहमार्ग पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेकडील सिंगापूरपर्यंत उत्तरेकडील बटरवर्थ शहरापर्यंत जातो. बटरवर्थजवळील बूकिट मार्ताजाम या शहराजवळ या लोहमार्गाचा एक फाटा थायलंडच्या सरहद्दीपर्यंत जातो व तेथे थायलंडच्या राष्ट्रीय लोगमार्गाला जाऊन मिळतो. पूर्व मलेशियातील ५२६ किमी. लांबीचा लोहमार्ग गेमास ते कोटाबारूजवळील टुंपाट या गावापर्यंत जातो. टुंपाटच्या दक्षिणेला २७ किमी. वरील पासीरमास या शहरापासून निघणारा २१ किमी. लांबीचा फाटा थायलंडच्या राष्ट्रीय लोहमार्गाला सुंगाई गॉलॉक येथे मिळतो. बटरवर्थ ते सिंगापूर या अतिजलद आगगाडीशिवाय बटरवर्थ, क्वालालुंपुर व सिंगापूर यांच्यामध्ये जलद रेल्वेगाड्या धावतात. १९८४ अखेरपर्यंत लोहमार्गाचे आधुनिकीकरण पूर्ण करण्यात येणार होते. ‘मलायन रेल्वे अँड मिनिस्ट्रेशन’ द्वारा (स्था. १८८५) रेल्वेचे प्रशासन केले जाते. साबा राज्यातील लोहमार्गाची एकूण लांबी १४० किमी. (१९८२) असून हा मीटरमारी लोहमार्ग कोटा किनाबालू व टेनॉम ही शहरे जोडतो. सारावाकमध्ये लोहमार्ग नाहीत. 

 

मलेशियातील बंदरांचे संघशासित व राज्यशासित असे वर्गीकरण करण्यात येते. केलांग (प्रमुख बंदर), पिनँग, जोहोर बारू, क्वांटान ही द्वीपकल्पीय मलेशियातील प्रमुख बंदरे होत. तांजुंस बारिसा या मलेशियातील सर्वांत मोठ्या बंदराची उभारणी चालू असून ते १९८४ च्या अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. खनिज तेल व अनुषंगी पदार्थांची ने-आण या बंदरातून केली जाणार आहे. साबा राज्यातील कोटा किनाबालू, संडकान, टाआऊ, लाआड डाटू, कूडाट, सेम्पोर्ना व कुनाक ही प्रमुख बंदरे असून त्यांचे व्यवस्थापन ‘साबा बंदर प्राधिकरणा’ मार्फत केले जाते. सारावाक राज्यातील बिंतूल बंदर १९८३ मध्ये कार्यान्वित झाले. १९८१ मध्ये मलेशियात एकूण ४१७ व्यापारी जहाजे (स्थूल नोंदणीकृत टनभार ७,८३,३७० टन) असून जहाज उद्योग तसेच व्यापारी जहाजसंख्या यांची मोठ्या प्रमाणात प्रगती व वाढ करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने आखला आहे. ‘मलेशियन इंटरनॅशनल शिपिंग कॉर्पोरेशन’ ही देशाची अधिकृत राष्ट्रीय जलवाहतूक कंपनी असून १५ लक्ष टनांचा स्थूल टनभार असलेल्या एकूण ४५ जहाजांच्या ताफ्यानिशी तिची मध्य पूर्वेकडील देश, अतिपूर्वेकडील देश, अमेरिका व यूरोप यांच्याशी जलवाहतूक चालू असते. 

 

क्वालालुंपुर, कोटा किनाबालू, पिनँग, जोहोर बारू व कूचिंग येथे मलेशियाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून अंतर्देशीय विमानतळ आलॉर सेटार, ईपो, कोटाबारू, कोटा र्ट्रेग्गानू, क्वांटान, मलॅका (द्वीपकल्पीय मलेशिया), सीबू व मिरी (सारावाक) आणि संडकान, टाआऊ व सेटार, ईपो, कोटाबारू, कोटा र्ट्रेग्गानू, क्वांटान, मलॅका (द्वीपकल्पीय मलेशिया), सीबू व मिरी (सारावाक) आणि संडकान, टाआऊ व लाबूआन (साबा) या ठिकाणी आहेत. वाढत्या हवाई वाहतुकीचा ताण तसेच मोठ्या आकाराच्या विमानांचा अधिक वापर करण्याच्या दृष्टीने पुढील विमानतळांचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने चौथ्या मलेशियन योजनेमध्ये ५० कोटी मलेशियन डॉलर रकमेची तरतूद केली आहे : बिंतूल, सीबू, टाआऊ, कूचिंग, कोटाबारू, क्वाला र्ट्रेग्गानू, मिरी व संडकान. ‘मलेशियन एअरलाईन सिस्टम’ ही पूर्वीच्या ‘मलेशिया सिंगापूर एअरलाइन्स’ ची १९७१ मध्ये रूपांतरीत राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून ती ३७ अंतर्गत व २२ आंतरराष्ट्रीय ठिकाणांना हवाई वाहतूकसेवा उपलब्ध करते.

 

मलेशियात १९७९ अखेर ४४५ डाकघरे, १,३८१ टपाल अभिकरणे आणि एक नदीकाठावरील डाकघर आणि १७७ फिरती डाकघरे कार्यान्वित होती. १ जानेवारी १९८० रोजी ५,९८,९४४ दूरध्वनी यंत्रे व ३९८ दूरध्वनिविनिमय केंद्रे होती. १९८२ मध्ये २,५८,२६२ रेडिओ परवानाधारक व १३,००,७६१ दूरचित्रवाणी परवानाधारक होते. मलेशियाचा पर्यटन उद्योग अतिजलद विकास पावणारा असून येथील अनेक संस्कृतींचे प्रतिबिंब हे पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण आहे. कॅमरन हायलँड्‌स, फ्रेझर्स हिल व पिनँग हिल ही पर्यटकांची थंड हवेची प्रसिद्ध ठिकाणे आहेत. १९८२ मध्ये मलेशियाला २०,९३,१२१ पर्यटकांनी भेट दिली.

गद्रे, वि. रा.


लोक व समाजजीवन : १९८१ मध्ये मलेशियाची एकूण लोकसंख्या १,३७,८५००० एवढी होती. त्यापैकी पश्चिम किंवा द्वीपकल्पीय मलेशियात १,१४,२८,००० साबामध्ये १०,३४,००० व सारावाकमध्ये १३,२३,००० असून १९८० मध्ये लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ. किमी. ला द्वीपकल्पीय मलेशियात १०२.१ साबामध्ये १३.५ व सारावाकमध्ये १०.४ होती. १९८३ मध्ये देशाची सरासरी घनता दर चौ. किमी.स ४४.७ होती. प. मलेशियातील लोकसंख्येची घनता तुलनेने अधिक वाटत असली, तरी ती सर्वत्र सारख्या प्रमाणात आढळत नाही. अंतर्गत भागातील वनाच्छादित दऱ्यांत व पर्वतीय प्रदेशांत ती फारच विरळ आहे. तेथे केवळ काही भटक्या जमाती आढळतात. किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशात मात्र घनता जास्त आहे. पश्चिम किनारपट्टीवर तर ७०% पेक्षा अधिक लोकसंख्या असून पूर्व किनारपट्टीवरील केलांतान त्रिभुज प्रदेशातील कोटाबारू येथे व र्ट्रेग्गानू नदीच्या मुखावरील क्वाला र्ट्रेग्गानू येथे बरीच लोकसंख्या एकवटलेली आढळते. साबा-सारावाकमध्येही पश्चिम किनाऱ्यावरच लोकवस्ती अधिक आढळते. प. मलेशियात ५०,००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली १० शहरे असून साबा-सारावाकमध्ये ती प्रत्येकी दोन आहेत (१९८०). बहुतेक शहरे किनाऱ्यावरच आढळतात. पूर्व मलेशियातील ७५% लोकसंख्या ग्रामीण आहे. प. मलेशियाच्या नागरी लोकसंख्येत प्रामुख्याने चिनी अधिक आहेत. भारतीय मात्र ग्रामीण व नागरी अशा दोन्ही भागांत आढळतात. स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरूषांमागे प. मलेशियात ९९९.५, साबामध्ये ९१२, सारावाकमध्ये ९८१ असून संपूर्ण देशाच्या बाबतीत हेच प्रमाण ९९१ इतके आहे (१९८०). प. मलेशियात जन्मप्रमाण दर हजारी ३४.५, तर साबा-सारावाकमध्ये ते सु. ४८ होते (१९७१).

पश्चिम मलेशियातील एकूण लोकसंख्येपैकी ५४% मले, ३५% चिनी, १०% भारतीय व १% इतर होते (१९८१). साबा-सारावाकमध्ये मले व मुस्लिम लोक किनाऱ्यावर, तर इतर वांशिक गटांचे लोक अंतर्गत भागात आढळतात. तेथे स्थलांतरित चिनी लोक अधिक असून साबामध्ये त्यांचे प्रमाण १८% (१९७८), तर सारावाकमध्ये हेच प्रमाण ३०% (१९७९) होते. या दोन्ही प्रदेशांतील एकूण लोकसंख्येत स्थानिक जमातीचे लोक निम्मे आढळतात. इबान, दायाक व मेलनाऊ हे सारावाकमधील, तर बाजाऊ आणि मुरूत हे साबामधील प्रमुख स्थानिक लोक आहेत. सेमंग जमातीचे लोक प. मलेशियाच्या उत्तरेकडील जंगलांत, तर साकाई या अर्धभटक्या जमाती पर्वतीय प्रदेशात आढळातात. प्राचीन काळापासून जमीन व समुद्रमार्गे झालेल्या स्थलांतरामुळे मलाया द्वीपकल्पात भिन्न भाषांचे आणि वंशांचे लोक आढळतात. इस्लाम हा मलेशियातील लोकांचा प्रमुख धर्म असून सर्व मले इस्लामधर्मीय आहेत. देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. बरेचसे चिनी बौद्धधर्मीय, तर काही चिनी ख्रिस्ती आहेत. भारतीय लोकांमध्ये ७०% हिंदू, २०% मुस्लिम, ५% ख्रिस्ती, २% शिख व बाकीचे इतर धर्मांचे आहेत. 

 

मलेशियात वेगवेगळ्या वंशांचे, धर्मांचे, व संस्कतींचे लोक आढळत असले, तरी बौद्ध व हिंदू धर्माचा ठसा अधिक उमटलेला दिसतो. तरीसुद्धा प्रत्येक मुख्य जमातीचे सांस्कृतिक जीवन, सांस्कृतिक परंपरा व आर्थिक स्थिती वेगवेगळी आढळते. एकमेकांमध्ये बेटीव्यवहार क्वचितच होतात. मले लोकांत भाषिक, धार्मिक व सांस्कृतिक एकता आढळते. चिनी लोकांचे बौद्ध व ताओ हे प्रमुख धर्म आहेत. ७५% पेक्षा अधिक चिनी जन्माने मलेशियन असले, तरी त्यांनी आपली चिनी परंपरा जतन केलेली दिसते. मलेशियातील बरेचसे भारतीय तमिळ भाषिक हिंदू आहेत. बरेचसे शेतमजूर असले, तरी इतर सर्व आर्थिक क्षेत्रांमध्येही काही भारतीय लोक आढळतात. मलेशियातील कामगार चळवळीतही भारतीयांचा पुढाकार आढळतो. भारतीयांचीसुद्धा आपली स्वतंत्र समाजरचना आढळते. अशा विभिन्न जमातींच्या लोकांमध्ये सुसंवाद व एकता टिकविणे, हा मलेशियापुढील एक प्रश्न आहे. मले व भारतीय यांना आर्थिक क्षेत्रात सुसंधी मिळविण्याच्या खूप अपेक्षा आहेत तर चिन्यांना व भारतीयांना सांस्कृतिक वेगळेपणा राखूनच राजकीय सत्तेत मोठा वाटा हवा आहे. पूर्व मलेशियाच्या अविकसित अंतर्गत भागात मले वगळून इतर जमातींचे लोक असून ते कोरडी भातशेती व त्याबरोबरच शिकार, मासेमारी, वनोत्पादने गोळा करणे हे व्यवसाय करून आपली उपजीविका करतात. ते वेगवेगळ्या भाषा बोलतात. तेथील बरेचसे लोक जडप्राणवादी व परंपरागत धार्मिक रूढींना चिकटून असल्याचे दिसते. 

 

मलेशियातील सांकृतिक भिन्नता त्यांच्या घरांमध्येही दिसते. ग्रामीण भागात डांबांवरील घरे मोठ्या प्रमाणावर आढळतात. घराच्या बांधकामाचे साहित्य प्रामुख्याने जंगलातून मिळविलेले असते. शहरी भागात आधुनिक पद्धतीची घरे आढळतात. वाढत्या नागरीकरणाबरोबरच लोकांचे राहण्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्या दृष्टीने १९५० मध्ये शासनाने गृहनिर्माण विश्वास्त मंडळाची स्थपना  केली. १९६८ मध्ये १४७ योजना हाती घेऊन या मंडळाच्या कामास सुरूवात झाली. खाजगी रीतीने घरे बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणारी ‘मलाया-बोर्निओ बिल्डिंग सोसायटी’ ही संस्था प्रमुख आहे. 

शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे गरजू लोकांना अर्थसाहाय्य दिले जाते. याशिवाय स्वेच्छ संघटनांकडूनही काही सेवा पुरविल्या जातात. या संघटनांना सरकारी आर्थिक मदत मिळते. पूर्व मलेशियापेक्षा पश्चिम मलेशियात आरोग्यसेवा अधिक उपलब्ध आहेत. पश्चिम मलेशियात दर ४,००० लोकांमागे १ डॉक्टर असे प्रमाण असून साबामध्ये ८,६०० व सारावाकमध्ये ७,३०० लोकांमागे १ डॉक्टर असे प्रमाण पडते. तसेच ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात आरोग्यसेवा अधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. अलीकडे बहुतेक आरोग्यसेवा शासनाकडून पुरविल्या जातात. प. मलेशियातील ६५ सार्वजनिक जिल्हा रूग्णालयांत २९,७१२ खाटा, दोन हेनसेनच्या रोग उपचार केंद्रांत २,६८८ खाटा, दोन मनोरूग्णालयांत ६,५७७ खाटा व एका क्षयरोग रूग्णालयात २९३ खाटांची सोय आहे. ग्रामीण लोकांसाठी ३,१३१ वैद्यकीय व आरोग्यकेंद्रे असून त्यांपैकी ६५ मुख्य आरोग्यकेंद्रे, २५४ उपआरोग्यकेंद्रे, १,३७५ प्रसाविका चिकित्सालये, ४१४ कायमचे व २८४ फिरते दवाखाने, ७३९ दंतचिकित्सालये, ४१ माता व बाल आरोग्य चिकित्सालये आहेत. यांशिवाय शासनातर्फे ईपो व पिनँग येथे प्रत्येकी एक वैद्यकीय संशोधन संस्था चालविली जाते (१९८१). सारावाकमध्ये १५ सरकारी व खाजगी रूग्णालये (२,५७६ खाटा), ११९ कायमचे व ५३ फिरते दवाखाने, १ नागरी आरोग्यकेंद्र, ८८ सार्वजनिक व शालेय दंतचिकित्सालये, १८० माता व बाल आरोग्यकेंद्रे आणि १५१ नोंदणीकृत डॉक्टर होते (१९८०). साबामधील १६ रूग्णालयांत २,३८१ खाटांची सोय आहे. तसेच तेथे ७८ कायमचे दवाखाने आहेत. संडकान व कोटा किनाबालू येथे मनोरूग्णालये आहेत. यांशिवाय १७ जिल्हा आरोग्यकेंद्रे, ४५ फिरती चिकित्सालये आहेत (१९८१). मलेरिया, क्षय, आंत्र पर्याक्रमण इ. रोगांचा प्रादुर्भाव येथे आढळतो.

 

भाषा व साहित्य : मले (ब्‌हाशा मलेशिया) ही मलेशियाची राष्ट्रभाषा आहे. १९६७ पासून ही प्रशासनाची प्रमुख भाषा बनली. तोपर्यंत इंग्रजी ही प्रशासनाची मुख्य भाषा होती. देशात इंग्रजी, चिनी, अरबी, तमिळ व इतर भारतीय भाषाही बोलल्या जातात [⟶ मले भाषा]. बरेचसे साहित्य इंग्रजीत असून अलीकडे लघुकथा, कविता तसेच बरेचसे राजकीय व सामाजिक साहित्य मले भाषेतून निर्माण होत आहे. ‘देवन बहासा’ या भाषाकेंद्राकडून मले भाषेतील साहित्य प्रकाशनास प्रोत्साहन व आर्थिक मदतही दिली जाते.

 

देशात मले, इंग्रजी, चिनी, तमिळ व पंजाबी या भाषांमधून एकूण ३९ दैनिके प्रकाशित होतात. त्यांपैकी चिनी भाषेतील दैनिकांची संख्या सर्वाधिक असून त्यांखालोखाल इंग्रजी व मले भाषांतील दैनिकांचा क्रम लागतो. यांशिवाय आठ रविवार पत्रिका, २८ नियतकालिके प्रकाशित होतात. देशात ‘बेर्नामा’ (मलेशियन राष्ट्रीय वृत्तसंस्था) ही वृत्तसंस्था, मलेशियन वृत्तपत्र प्रकाशनांचा संघ तसेच १३ प्रकाशक संस्था व आठ परदेशी वृत्तसंस्था आहेत. देशात ग्रंथालय सुविधा विशेष उपलब्ध नाहीत. क्वालालुंपुर येथील शासनाच्या कृषिखात्याचे ग्रंथालय, मले विद्यापीठातील ग्रंथालय, पिनँग येथील सार्वजनिक ग्रंथालय व विद्यापीठ ग्रंथालय ही उल्लेखनीय आहेत. बऱ्याच ठिकाणी माहिती केंद्रे व वाचनालये चालविली जातात.

 

शिक्षण : सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांना सहा वर्षाचे शिक्षण मोफत व सक्तीचे आहे. शिक्षणासाठी मले, इंग्रजी, चिनी व तमिळ या भाषा माध्यमांचा वापर होत असला, तरी १९८० पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षणाचे प्रमुख माध्यम म्हणून मले भाषेचा वापर करण्याचे ठरले आहे. तसेच दुय्यम आवश्यक भाषा म्हणून इंग्रजीला महत्त्व दिले जाते. खाजगी व सरकारी अनुदान घेणाऱ्या अशा दोन प्रकारच्या शाळा चालविल्या जातात. सरकारच्या एकूण वार्षिक अंदाजपत्रकापैकी २०% खर्च शिक्षणावर केला जातो. १९७९ मध्ये शिक्षणावरील एकूण खर्चाचा अंदाज १९४.२० कोटी मलेशियन डॉलर एवढा होता. सरकारी प्राथमिक शाळांमधून किंवा मले माध्यमाच्या माध्यमिक शाळांमधून कसल्याही प्रकारची फी घेतली जात नाही. मात्र इतर माध्यमिक शाळांमध्ये फी घेतली जाते. शिक्षणासाठी सर्व शैक्षणिक स्तरांवर, देशात व देशाबाहेर शिष्यवृत्या देण्यात येतात. १९८२ मध्ये ४९,००० मलेशियन विद्यार्थी देशाबाहेर शिक्षण घेत होते. प्राथमिक शिक्षण ६ वर्षांचे, तर माध्यमिक शिक्षण एकूण पाच वर्षांचे असते. याच तिसऱ्या वर्षी कनिष्ठ प्रमाणपत्र परीक्षा होते. त्यानंतर दोन वर्षांचा उच्च प्रमाणपत्र परीक्षेचा अभ्यासक्रम असतो. कनिष्ठ प्रमाणपत्र परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यावसायिक, शैक्षणिक इ. वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रमांकडे वळता येते. एकूण पाच वर्षांच्या माध्यमिक शिक्षणानंतर विद्यापीठीय शिक्षण घेता येते. १९८२ मध्ये मलेशियात पाच विद्यापीठे व त्यांत २६ हजारांवर विद्यार्थी होते. दुय्यम व्यावसायिक शाळांमध्ये दोन वर्षांचे व्यावसायिक शिक्षण दिले जाते. तीन वर्षांचा कनिष्ठ माध्यमिक अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या कोणाही विद्यार्थ्यास या शिक्षणासाठी प्रवेश घेता येतो. ईपो व क्वांटान या दोन ठिकाणी दोन तंत्र निकेतन आहेत. शिक्षण प्रशिक्षण हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून दरवर्षी ६०० विद्यार्थी असे शिक्षण घेतात. 


प. मलेशियातील ६,४५४ प्राथमिक शाळांत ७२,३४७ शिक्षक व २०,३३,८०३ विद्यार्थी असून त्यांपैकी ४,४८८ मले माध्यमाच्या, १,३८७ चिनी माध्यमाच्या व ५७५ तमिळ माध्यमाच्या शाळा आहेत. १,४३४ माध्यमिक शाळांत ५२, ३३६ शिक्षक व ११,९१,२९१ विद्यार्थी असून त्यांपैकी ४६४ खाजगी शाळा आहेत. ४५ व्यवसाय व धंदेशिक्षण विद्यालयांत ५,७२१ शिक्षक व ६२,००४ विद्यार्थी आणि २६ शिक्षक प्रशिक्षण विद्यालयांत १,१९८ शिक्षक व १३,०२८ विद्यार्थी आहेत. साबामधील ८२१ प्राथमिक शाळांत १,४८,२८० विद्यार्थी, ९५ माध्यमिक शाळांत ६१,२६१ विद्यार्थी, तर सारावाकमधील १,२७६ प्राथमिक शाळांत २,१०,१८३ विद्यार्थी आणि ९९ माध्यमिक शाळांत ९६,२५२ विद्यार्थी शिक्षण घेत असून साबा व सारावाकमध्ये प्रत्येकी तीन शिक्षक प्रशिक्षण विद्यालये आहेत (१९८१). तांत्रिक, व्यवसाय आणि धंदेशिक्षणावर शासनाने अधिक भर दिलेला दिसतो. मुस्लिमांसाठी धार्मिक शिक्षण सक्तीचे असून तेथे एक इस्लामी महाविद्यालयही आहे. क्वालालुंपुर, आलॉर सेटार व कूचिंग येथे प्रसिद्ध वस्तुसंग्रहालये असून त्यांत पुरातत्वीय व ऐतिहासिक संशोधन कार्य चालते. कूचिंग वस्तुसंग्रहालये तर इबान लोकसाहित्य संग्रहाचे जगातील सर्वांत मोठे केंद्र आहे.

 

कला व क्रीडा :  मलेशियन समाजातील संगीत, नृत्य, साहित्य व सजावट कला यावर बाहेरच्या संस्कृतींचा विशेष परिणाम झालेला आढळत नाही. पूर्व मलेशियातील वेगवेगळ्या संस्कृतींच्या कलाविषयक पार्श्वभूमीचा लेखी इतिहास वा साहित्य आढळत नाही. वास्तुशिल्पाचा विकास फारच कमी झाला आहे. नृत्य व हस्तव्यवसाय हे प्रमुख कलाप्रकार प्रामुख्याने पूनान जमातींनी हातावर विणलेल्या वस्त्रांमधून, बाजाऊ लोकांनी तयार केलेल्या कापडांमधून तसेच वेताच्या चटया, टोपलीकाम व लाकडावरील कोरीवकामामधून दिसून येतात. प. मलेशियातील कलाविष्कार प्रामुख्याने साहित्य, संगीत, नृत्य व सजावट कला यांमधून दिसून येतात. सुरूवातीच्या काळात इस्लामधर्मीयांनी प्रोत्साहन न दिल्यामुळे येथे रंगचित्रकला व शिल्पकला यांचा विशेष विकास होऊ शकला नाही. विशिष्ट तंत्राचा वापर करून हाताने रंगविलेले बाटिक कापड, चांदीच्या वस्तू, लाकडावरील कोरीवकाम, टोपलीकाम व हाताने तयार केलेला ‘क्रीस’ (लहरीमय पाते असलेला जड खंजीर किंवा आखूड तलवार) हे मलेशियन सजावट कलेचे उत्कृष्ट व वैशिष्ट्यपूर्ण नमुने आहेत. मलेशियातील काही मले, चिनी व भारतीय कलाकारांनी मुख्यतः रंगचित्रकला व शिल्पकला यांमध्ये नवीन कलाविष्कार निर्मिण्यास प्रारंभ केला आहे. क्वालालुंपुर येथील राष्ट्रीय मशीद, राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, संसदभवन, परराष्ट्र कार्यालय व देवन बहाशा इमारत हे आधुनिक वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट नमुने आहेत. क्वालालुंपुर येथे राष्ट्रीय कलावीथी आहे.

 

सॉकर व घोड्यांच्या शर्यती हे देशातील विशेष लोकप्रिय खेळ असून त्यांशिवाय बॅडमिंटन, क्रिकेट, टेनिस, गोल्फ, बास्केटबॉल, टेबलटेनिस, पतंग उडविणे इ. खेळही आवडीने खेळले जातात. सेपक रागा हा सॉकरप्रमाणेच खेळला जाणारा आग्निय आशियाई खेळही येथे लोकप्रिय आहे. छोट्याशा पटांगणात सहा खेळाडूंनी खेळावयाचा हा खेळ आहे. ‘फिलेम नेगारा’ शासकीय चलचित्र कलामंदिर शैक्षणिक चित्रपटांची आणि अनुबोधपटांची निर्मिती करते. मलेशियातील छोट्याछोट्या नगरांमधूनही चिनी, मले, इंग्रजी व तमिळ  भाषांतील परदेशी चित्रपट दाखविले जातात. १९७४ मध्ये मलेशियात ५०० चित्रपटगृहे होती.

महत्त्वाची स्थळे : क्वालालुंपुर (लोकसंख्या ९,३७,८७५−१९८०) हे देशातील सर्वांत मोठे शहर देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. खाणकामाचे शहर म्हणून १८५७ मध्ये याची स्थापना झाली. व्यापाराचे आणि उद्योगधंद्यांचे केंद्र म्हणून यास महत्त्व आहे. पश्चिम किनाऱ्यावरील पिनँग बेटावरील पिनँग किंवा जॉर्जटाउन (२,५०,५७८) शहर व बंदर, कथिल व रबर उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या किंता खोऱ्यातील ईपो (३,००,७२७), मलेशियाच्या दक्षिण टोकावरील जोहोर बारू (२,४९,८८०), क्वालालुंपुर पश्चिमेस ३२ किमी. वर असलेल्या सलांगॉर राज्याची जुनी राजधानी केलांग तसेच सलांगॉरची नवीन राजधानी शाह आलम (२४,१३८), क्वालालुंपुरच्या नैर्ऋत्येस ११ किमी.वरील पेटलिंग जया हे नव्याने वसविलेले शहर इत्यादी प. मलेशियातील प्रमुख शहरे आहेत. ७०,००० लोकवस्तीसाठी म्हणून १९५४ मध्ये पेटलिंग जया शहराची आखणी करण्यात आली. त्यामध्ये औद्योगिक, व्यापारी, शासकीय कार्यालये व इतर उपयुक्त घटकांसाठी स्वतंत्र जागांचे नियोजनही होते. परंतु त्याची वाढ इतक्या झपाट्याने झाली की, १९७० पर्यंत तेथे ९२,६०० एवढी लोकसंख्या झाली. कोटा किनाबालू−पूर्वीचे जेसेलटन (५९,५००), संडकान (७३,८१५), टाआऊ (४५,२४९) आणि कूडाट (१०,९३८) ही साबामधील प्रमुख शहरे आहेत. कोटा किनाबालू हे साबाच्या राजधानीचे ठिकाण आहे. सारावाकच्या राजधानीचे ठिकाण कूचिंग (७४,२२९), सीबू (७६,०००) व मिरी (४५,०००) ही सारावाकमधील महत्त्वाची शहरे आहेत. (चित्रपत्रे ९).

चौधरी, वसंत

संदर्भ :    1. Ali, H.S. Peasant Society and Leadership, London, 1977.

               2. Fisher, C. A. South-East Asia : A Social Economic and Pollitical Geography, London, 1966.

               3. Kanapathy, V. The Malaysian Economy : Problems and Prospects, Singapore, 1970.

               4. Miller H. The Story of Malaysia, London, 1967.

               5. Milne, R. S. Government and Polisics in Malaysia, Boston, 1967.

               6. Snodgrass, D. R. Inequalisy and Economy Development in Malaysia Kuala Lumpur, 1980.


मलेशिया


पिनॅंग येथील पॅगोड़ा

क्वालालंपूरजवळील सैनिकी महाविद्यालय, एक दृश्य

क्लांग नदीकाठावरील भव्य मशीद, क्वालालंपूर

वैशिष्टपूर्ण बांबू वाद्यांच्या तालांवर नृत्य करणारी आदिवासी बालिका
क्वालालंपूर येथील नवा राजवाडा सितावानच्या शाळेचे व त्यातील गांधीस्मारकाचे दृश्य
मलेशियाच्या जंगलप्रदेशातील वैशिष्ट्यपूर्ण झोपडी रबर उत्पादनासाठी लॅटेक्स गोळा करणारी तमिळ महिला