पाटणा : प्राचीन पाटलिपुत्र. आधुनिक पाटणा हे भारतातील बिहार राज्याच्या राजधानीचे शहर असून ते गंगा व गंडक ह्यांच्या संगमावर, गंगेच्या पूरबांध असलेल्या दक्षिण तीरावर वसले आहे. महानगरीय लोकसंख्या ४,९१,२१७ (१९७१). या नगरसमूहात जुनी व नवी वस्ती, पाटलिपुत्र वसाहत आणि फूलवारी ह्यांचा समावेश होतो. गंगेस येणाऱ्या पुरांमुळे इतिहासकाळात पाटण्याचे स्थान कमीअधिक प्रमाणात वारंवार बदलत राहिले. पुराचा धोका हा पाटण्याचा नैसर्गिक दुबळेपणा होय.

पाटणा येथील गोलधरभात, गहू, तीळ, मोहरी, जवस, तसेच ऊस, मका, बार्ली या पिकांनी समृद्ध असलेल्या जिल्ह्यांचे पाटणा हे महत्त्वाचे विपणनकेंद्र आहे. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १११ सेंमी. असून, येथील उद्योगांत हातमाग कापड, काचसामान, तांब्याची व चिनी मातीची भांडी, गालिचे, बांगड्या, पादत्राणे, तंबाखू व सिगारेटी, खेळणी हे प्रमुख होत. शहरातील मुख्य रस्ता नदीकाठाने पूरबांधाच्या जवळूनच जातो. शहरात अनेक शासकीय कार्यालये, वैद्यकीय, अभियांत्रिकी इ. महाविद्यालये आणि १९१७ साली स्थापन झालेले पाटणा विद्यापीठ आहे. काशीप्रसाद जयस्वाल संशोधन संस्थाही पाटण्यातच आहे. 

शहराच्या जुन्या व नव्या भागांत अनेक सुंदर उद्याने आहेत. बंकीपूर भागात १७८६ साली कॅप्टन जॉन गार्स्टिनने बांधलेली ‘गोलघर’ ही भव्य वास्तु आहे. दुष्काळात धान्यसाठ्यासाठी बांधलेली ही इमारत मधमाशांच्या पोळ्यासारखी गोलाकार असून तिची उंची २९ मी. व भिंतींची जाडी ३·६ मी. आहे. शिखांचा दहावा गुरू गोविंदसिंग याचे हे जन्मस्थान रणजितसिंगाने त्याप्रीत्यर्थ बांधलेला ‘हरमंदिर’  नामक गुरुद्वारा हा शीखजगतातील चार मोठ्या तख्तांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा मानण्यात येतो. येथील बिर्लांचे प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिर उल्लेखनीय आहे. पाटणा रेल्वे स्थानकाजवळच नबाब सिराजुद्दौल्याने वडिलांच्या स्मरणार्थ बांधलोला नबाब शहीदका मकबरा आहे. याशिवाय इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये पश्चिम दरवाजा, शेरशाहचा किल्ला, पाद्री की हवेली (अठराव्या शतकाच्या अखेरील बांधलेले जुने रोमन कॅथलिक चर्च) यांचा अंतर्भाव होतो. शेरशाहच्या किल्ल्यात मौल्यवान, दुर्मिळ कलावस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो. ‘सदाकत आश्रमा’त १९२१ मध्ये राष्ट्रीय विद्यालय म्हणून स्थापण्यात आलेल्या बिहार विद्यापीठाचे प्रधान कार्यालय होते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा निवास येथे असे. या आश्रमात ‘राजेंद्र संग्रहालय’ असून त्यात राजेंद्र प्रसादांच्या व्यक्तिगत व त्यांना मिळालेल्या वस्तूंचा संग्रह करण्यात आला आहे. पाटण्यातील सर्वांत जुनी मशीद म्हणून शेरशाहची मशीद प्रसिद्ध आहे. 

पाटणा वस्तुसंग्रहालयाची इमारतप्राचीन पाटलिपुत्र सध्याच्या पाटणा शहराच्या पश्चिमेस गंगा व शोण ह्यांच्या संगमावर होते. या नगरीला सु. २,५०० वर्षांचा प्रदीर्घ इतिहास आहे. प्राचीन मगध साम्राज्याची ही राजधानी. पाटलिपुत्राची ‘कुसुमपुर’, ‘पुष्पपुर’, ‘कुसुमध्वज’ अशी इतरही नावे आढळतात. नंद साम्राज्याच्या काळात ‘पद्मावती’ असेही नाव रूढ असल्याचे दिसते. मौर्य, शुंग, गुप्त या राजघराण्यांनी पाटलिपुत्राचे वैभव वाढविले. वैदिक, बौद्ध, जैन या तीनही धार्मिक परंपरांनी पाटलिपुत्र संपन्न बनविले. कथासरित्सागर  व वायुपुराण  यांतून या नगरीचे उल्लेख आढळतात. इ. स. पू. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात अजातशत्रूच्या सुनिधी आणि वस्स्कार या दोन मंत्र्यांनी वज्जींच्या आक्रमणापासून संरक्षण व्हावे, म्हणून हे शहर वसविले असे म्हणतात. मेगॅस्थिनीझने पाटलिपुत्राचा उल्लेख ‘पोलीबोश्रा’ असा केलेला असून ‘नगराच्या चोहोबांजूंनी ४५ हात खोल व ४०० हात रुंद खंदक आहेत. नगराभोवतीच्या लाकडी तटबंदीत ६४ दरवाचे व ५७० बुरूज आहेत’ असेही म्हटले आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील निर्देशांनुसार पाटलिपुत्रातील रस्ते खूपच रुंद होते. सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म संगीता (परिषद) पाटलिपुत्र येथे भरविली होती (इ. स. पू. २४०). मौर्यकालीन पाटलिपुत्र अत्यंत समृद्ध होते व त्याची लोकसंख्या अंदाजे चार लाख असावी. नगरातील मौर्यकालीन राजवाडा लाकडी होता.

शुंगांचीही पाटलिपुत्र हीच राजधानी होती. गुप्तकाळात (३२१–५५०) पाटलिपुत्रास पुन्हा वैभव प्राप्त झाले. पाचव्या शतकाच्या सुरुवातीस फाहियान हा चिनी प्रवासी येथे राहिला होता. त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास करून अनेक ग्रंथांची हस्तलिखते बरोबर नेली. गुप्त साम्राज्याच्या अस्ताबरोबर पाटलिपुत्राचे वैभव कमी झाले. 

बौद्ध परंपरेप्रमाणेच येथील जैन परंपराही मोठी आहे. येथील संप्रती नावाच्या राजाने जैन धर्माचा स्वीकार करून तीर्थंकरांची अनेक मंदिरे बांधली. गुप्तकाळात विद्येच्या क्षेत्रात पाटलिपुत्रास महत्त्व प्राप्त झाले होते. कौटिल्यासारखे थोर अर्थशास्त्रज्ञ येथेच होऊन गेले. प्रसिद्ध भारतीय ज्योतिषशास्त्रवेत्ता आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म कुसुमपुर (पाटलिपुत्र) येथेच ४७६ मध्ये झाला, असे सांगितले जाते. 

प्राचीन पाटलिपुत्राच्या परिसरात १९१२–१६ यांदरम्यान केलेल्या उत्खननांतून अनेक मौर्यकालीन आणि गुप्तकालीन अवशेष उपलब्ध झाले. त्यांपैकी ८४ स्तंभ असलेली राजदरबाराची वास्तू उल्लेखनीय आहे. डॉ. अ. स अळतेकरांना शोण नदीच्या काठी नाल्याजवळ एक जिना, एक विटांचा स्तूप व आरोग्यविहार यांचे अवशेष आढळले. १९५३ पासूनच्या उत्खननांतही अनेक मौर्यकालीन व गुप्तकालीन अवशेष मिळाले. त्यांतील मौर्यकालीन बहुस्तंभी प्रासाद, नगराच्या तटबंदीचा लाकडी साचा, चमक असलेली उत्कृष्ट शिल्पे व मृत्पात्रे, शुंगकालीन मृण्मूर्ती व नाणी आणि कुशाणकालीन चांदीची व तांब्याची नाणी तसेच अनेक विहार उल्लेखनीय आहेत. या परिसरात भूमिगत पाणी फार वर असल्याने सखोल उत्खनन करणे व उत्खनित अवशेषांचे जतन करणे, या गोष्टी अवघड ठरतात. 

या नगरीचा इ. स. सातव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंतचा इतिहास विशेष उल्लेखनीय नाही. १५४१ मध्ये शेरशाहने पाटणा शहराची पुन्हा स्थापना केली. मोगल काळात बिहार सुभ्याचे राजधानीचे शहर म्हणून त्यास महत्त्व प्राप्त झाले. औरंगजेबाने आपला नातू अझीम याच्या स्मरणार्थ पाटण्याचे ‘अझीमाबाद’ असे नाव ठेवले. १८६५ मध्ये पाटणा ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १९१२ मध्ये बंगाल इलाख्यातून बिहार–ओरिसा असा एक स्वतंत्र प्रांत बनविण्यात आला व पाटणा ही त्याची राजधानी करण्यात आली. १९३६ मध्ये ओरिसा हा स्वतंत्र प्रांत केल्यापासून पाटणा ही फक्त बिहारची राजधानी राहिली.

संदर्भ : Patil, D. R. The Antiquarian Remains in Bihar, Patna, 1963.

गद्रे, वि. रा. देव, शां. भा. परळीकर, नरेश