सेवाग्राम : महाराष्ट्र राज्याच्या वर्धा जिल्ह्यातील महात्मा गांधींच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध झालेले गाव. लोकसंख्या १,०५,५४३ (२०११). हे वर्धा शहरापासून ५ किमी. वर्धा-नागपूर लोहमार्गावर आहे. याचे मुळ नाव सेगाव असे होते. सामाजिक राष्ट्रीय सेवांचे मुख्यालय येथे होते. त्यामुळे याचे नाव १९४० मध्ये सेवाग्राम असे करण्यात आले. येथे गांधीजींच्या आगमनापूर्वी मॅडेलिन स्लेड (मिराबेन) यांचे वास्तव्य होते. हरिजनसेवेचे व्रत घेतलेल्या मीराबेनचे कार्य बघून गांधीजींनी तेथे वास्तव्य करण्याचा निर्धार केला व ३० एप्रिल १९३६ रोजी महात्मा गांधीजी सेवाग्रामला आले. भारताचे भवितव्य घडविणारे अतिशय महत्त्वाचे निर्णय/ठराव येथे घेण्यात आले होते. देशाच्या बहुसंख्य प्रमुख नेत्यांनी व जगातील असंख्य महान राजकीय व्यक्ती व विचारवंतांचे येथे आगमन झालेले होते. काँग्रेसच्या कार्यकारी समितीची सभा १९४१ मध्ये येथे झालेली होती. गांधीजींनी येथून अस्पृश्य, पददलित, दरिद्री यांचे उद्धारासाठी अविरत परिश्रम केले.

सेवाग्राम आश्रम

आजारी गरजूंना वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने १९३७ मध्ये येथे ‘कस्तुरबा’ या नावे लहानसा दवाखाना सुरू केलेला होता. त्याचे आता मोठे रुग्णालय झाले असून ते बिर्ला भवन मध्ये कार्यरत आहे. तसेच येथे सुशिला नायर यांनी १२ ऑगस्ट १९६९ पासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलेले आहे. गांधीजींच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने तरुणांमध्ये आत्मनिर्भरता व त्यांचे शारीरिक व सांस्कृतिक कौशल्य वृद्धिंगत होण्यासाठी हिंदुस्थान तालीम संघाची १९२८ मध्ये येथे स्थापना झाली होती. यामुळे नई तालीम शिक्षण पद्धतीच्या विस्तारास मदत झाली होती. हिंदुस्थान तालीम संघासाठी आचार्य अरण्यकम व आशादेवी अरण्यकम यांचे योगदानही महत्त्वाचे होते. गांधीजींनी येथून चर्मोद्योग, सुतारकाम, कुंभारकाम, तेलघाण्या, मधुमक्षिका पालन इ. ग्रामोद्योग सुधारित पद्धतीने करण्याचे प्रोत्साहन दिले. त्यांनी येथे वनमहोत्सव सुरू केला होता. आश्रमातील सर्व वास्तू स्मारक म्हणून सुरक्षित राहाव्यात यासाठी ‘सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान’ नावाची संस्था १९६८ पासून कार्यरत आहे. त्यात गांधी सेवा संघ, चरखा संघ, नई तालिम संघ, गोसेवा संघ, हरिजन सेवक संघ, कुष्ठरोग सेवा समिती, ममन संग्रहालय, कस्तुरबा ट्रस्ट, निसर्गोपचार आश्रम या प्रमुख होत.

येथील आदिनिवास, बापू कुटी, बा कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी, रुस्तुम भवन या वास्तू लोकांची श्रद्धास्थाने आहेत. यामुळे भारतातून व जगातून अनेक पर्यटक येथे येतात.

गाडे, ना. स.