सूतगिरणीतील एक दृश्य, लुधियाना.लुधियाना : भारताच्या पंजाब राज्यातील एक औद्योगिक शहर व लुधियाना जिल्ह्याचे मुख्यालय. लोकसंख्या ६,०७,०५२ (१९८१). दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावरील (ग्रँड ट्रंक रोड) हे शहर दिल्लीच्या वायव्येस सु. २७० किमी. व विद्यमान सतलजच्या प्रवाहापासून दक्षिणेस १३ किमी.वर वसले आहे. ते सुनेत या प्राचीन पौराणिक स्थळाच्या पूर्वेला ६ किमी. वर आहे. 

दिल्लीला राज्य करणाऱ्या लोदी घराण्यातील दोन सुलतानांनी सु. १४८०-८१ दरम्यान या शहराची स्थापना केली. त्यामुळेच त्याचे नाव लुधियाना पडले. त्यावेळी लोदी घराण्याची ही जवळजवळ दुसरी राजधानीच होती. मोगलकाळात ते सरहिंद सुभ्याचे ठाणे झाले. पुढे १७६० मध्ये रायकोटच्या राजांनी ते जिंकले, त्यानंतर रणजितसिंग व इंग्रज यांत अमृतसरचा तह झाला (१८०९). त्यानुसार हा प्रदेश कर्नल ऑक्टेर्लोनी या पोलिटिकल एजंटच्या अखत्यारीत गेला आणि तो जींदच्या महाराजांकडे सोपविण्यात आला. जींदच्या महाराजांनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिशांची मैत्री संपादिली. ब्रिटिशांनी येथे लष्करी छावणी केली. जींदच्या महाराजांच्या मृत्यूनंतर कंपनीने संस्थानचा काही प्रदेश बळकाविला (१८३७). इंग्रज-शीख युद्धांत शहराचे नुकसान झाले. त्यात लुधियाना शहर आपाततः इंग्रजांच्या ताब्यात आले. पुढे ते अखेरपर्यंत त्यांच्या अखत्यारीत होते.  

लुधियाना येथे शेतमालाची मोठी बाजारपेठ असून अनेक लघुउद्योग चालतात. त्याच्या परिसरातील ८०% जमीन सरहिंद कालव्यामुळे ओलिताखाली आली आहे. शहरात विणमालाचा पंरपरागत व्यवसाय असून लोकरी व रेशमी कपडे तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालते. प्रारंभी काश्मीरमधील मुसलमान हेच प्रमुख कारागीर असत पण फाळणीनंतर (१९४७) त्यांतील अनेक मुस्लिम पाकिस्तानात गेले आणि या धंद्यावर थोडा परिणाम झाला पुढे निर्वासित आल्यानंतर या परिस्थितीत बदल झाला. हिमालयातील मेंढ्यांपासून पैदा होणारी लोकर, नैसर्गिक व कृत्रिम रेशीम यांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर वस्त्रोद्योग चालतो. घोंगड्या, सुती रग, पश्मीना शाली, बिल्यर्ड्सचे हस्तिदंती चेंडू आणि लुधियाना पगडी ही वैशिष्ट्ये असून कापडावरील (सुती व रेशमी) सुबक कशिदाकामासाठी येथील कारागीर प्रसिद्ध आहेत. रेशीम व लोकर यांना रंग देण्याच्या बाबतीत अमृतसरच्या खालोखाल याचा क्रमांक लागत असे. शहरात सु. १,६०० पेक्षा जास्त लघुउद्योग केंद्रे आहेत आणि विणमालाच्या वस्तूंची परदेशांतही निर्यात होते. विणमाल उत्पादनात त्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योगाबरोबरच धातुकाम, कृषी अवजारे, छोटी यंत्रे, सायकली, क्रीडा साहित्य, शिवणयंत्रे, दूरचित्रवाणी संच, लाकडापासून प्लायवूड, आगपेट्या, फर्निचर तयार करणे इ. विविध प्रकारचे उद्योगधंदे चालतात. यंत्रांचे सुटे भाग तयार करण्याच्या अनेक कार्यशाळा येथे आढळतात. ब्रिटिश अमदानीत १८६७ मध्ये येथे नगरपालिका स्थापण्यात आली. तिचे लुधियाना महानगरपालिकेत रूपांतर झाले असून ती शहराला नागरी सुविधा पुरविते. महामार्गामुळे शहराचे दोन भाग झाले आहेत. उत्तरेला जुनी वस्ती असून दक्षिणेस आधुनिक इमारती व उद्योगधंदे विकसित झाले आहेत. या ठिकाणी उत्तर-पश्र्चिम, लुधियाना-धुरिजारवाल व लुधियाना-फिरोझपूर या तीन रेल्वे मार्गांचा संगम होतो. त्यामुळे ते प्रमुख शहरांशी जोडले गेले आहे.

येथील पंजाब कृषी विद्यापीठ (स्थापना १९७०) हे निवासी आणि अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या लँड ग्रँट इन्स्टिट्युटच्या धर्तीवर उभारलेले आहे. याशिवाय शहरात दोन अभियांत्रिकी, दोन वैद्यकीय महाविद्यालये असून एक तंत्रनिकेतन संस्था आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील एक महाविद्यालय अमेरिकेतील प्रेस्बिटेरियन मिशनद्वारे चालविले जाते. त्यांचे एक मोठे रुग्णालयही आहे. यांशिवाय शासकीय विणमाल-निर्मितिसंस्था किल्ल्यात आहे. जुना किल्ला, त्याजवळील पिरी-इ-दस्तगीर हा दर्गा, उद्याने, चौराबाजार आणि कँप ही पर्यटकांची काही खास आकर्षणे होत. 

संदर्भ : Spate, O. H. K. and Learmonth, A. T. A. India and Pakistan : A General and Regional Geography, London, 1967. 

फडके, वि. श.