ग्रिनिच वेधशाळेचा एक भाग

ग्रिनिच : ग्रिनिज्. ग्रेटर लंडनचा एक मेट्रोपॉलिटन बरो. लोकसंख्या २,३५,५४९ (१९७१). हे लंडनच्या ११ किमी. दक्षिण–आग्नेयीस, टेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असून याच्या औद्योगिक विभागाच्या ब्रिटनच्या नाविक विभागाशी दीर्घकालीन संबंध आहे. येथील ५५ मी. उंच टेकडीवर १६७५ मध्ये बांधलेल्या रॉयल ग्रिनिच ऑब्झर्वेटरीत १८३८ पासून वातावरणीय व चुंबकीय निरीक्षणे नियमित चालत असत व १८७३ पासून बहुधा दररोजन सूर्याची छायाचित्रे घेतली जात. लंडनमधील दिव्यांमुळे निरीक्षणे नीटशी होईनात म्हणून १९५४ पासून वेधशाळेचे काम ससेक्समधील हर्स्टमन्सू येथे नेण्यात आले. १८८४ च्या वॉशिंग्टन मेरिडियन कॉन्फरन्सपासून ग्रिनिचचे रेखावृत्त हे मूळ (शून्य) रेखावृत्त मानले जाऊ लागले. ग्रिनिच पार्कमधील फ्लॅम्स्टीड हाउसच्या अंगणात व भिंतीवर मूळ रेखावृत्त एका पितळी पट्टीने दर्शविलेले आहे. जागतिक व्यवहारांसाठी वापरली जाणारी–ग्रिनिच मध्यम वेळ–ग्रिनिच मीन टाइम – जी. एम्. टी. याच मूळ रेखावृत्तावरून ठरविली जाते. जुन्या वेधशाळेच्या जागेत आता नॅशनल मेरिटाइम म्यूझियम आहे. रॉयल नेव्हल कॉलेज, मॉडर्न कॉलेज, प्लॅसेंटिया पॅलेस इ. अनेक महत्त्वाच्या वास्तू येथे आहेत. येथील कोरड्या गोदीत कटीसार्क ही शेवटची क्लिपर नौका व सर फ्रान्सिस चिचेस्टरने १९६६–६७ मध्ये एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा केलेली जिप्सी मॉथ–४ या नौका जतन करून ठेवल्या आहेत.

कुमठेकर, ज. ब.