दिल्ली : भारताची राजधानी व तिच्या भोवतालचा केंद्रशासित संघप्रदेश. विस्तार २८° २३ उ. ते २८° ५५ उ. व ७६° ५१ पू. ते ७७° २१ पू. या दरम्यान. याच्या दक्षिणेस हरयाणा राज्याचे गुरगाव, पश्चिमेस व उत्तरेस रोहटक हे जिल्हे आणि पूर्वेस उत्तर प्रदेश राज्याचे मीरत व बुलंदशहर जिल्हे आहेत. प्रदेशाचे क्षेत्रफळ १,४८५ चौ.किमी. (बृहत् दिल्ली १८१ चौ.किमी.). लोकसंख्या ४०,६५,६९८ (१९७१).

भूवर्णन : दिल्लीचे भौगोलिक स्थान अद्वितीय आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांतून येणारे मार्ग दिल्लीत एकत्र येतात. पश्चिमेस असलेले थरचे वाळवंट, उत्तरेकडील हिमालय पर्वत आणि दक्षिणेकडील भारताचा द्वीपकल्पीय भाग यांमुळे दिल्लीचे स्थान प्रवेशद्वारासारखे आहे. माळव्याचे संपन्न पठार व द. भारताकडे जाणारे मार्ग दिल्लीवरून जातात, त्यामुळे लष्करी दृष्ट्या दिल्ली शहर मोक्याच्या जागी वसलेले आहे. यमुनेच्या गाळाने तयार झालेल्या या प्रदेशाचा उत्तरेचा व पूर्वेचा बराच मोठा भाग सपाट आहे. सु. २०० मी. पर्यंत उंचीचा मध्यभाग खडकाळ व रूक्ष आहे. त्याच्यामधून अरवलीच्या दूरपर्यंत आलेल्या रांगेचा एक ठेंगणा फाटा गुरगाव जिल्ह्यातून शिरून आग्नेयीकडून ईशान्येकडे यमुनेच्या तीरापर्यंत उतरत गेला आहे आणि हाच दिल्लीचा इतिहासप्रसिद्ध ‘रिज’ अथवा डोंगरकणा. अरवलीचा दुसरा फाटा प्रदेशाच्या दक्षिण भागात पूर्वेकडे जाऊन परत गुरगाव जिल्ह्यात वळला आहे. या दक्षिण भागातील डोंगर–टेकड्या अलवर संहतीच्या स्फटिकजन्य खडकांच्या असून दिल्ली पठाराचा खडक भारताच्या द्वीपकल्पीय संक्रमण प्रस्तर समूहापैकी आहे. राज्यातील मृदांचे मुख्य प्रकार म्हणजे यमुनाकाठच्या ‘खादर’ भागातील रेतीमिश्रित माती, त्याहून उंचीवर ईशान्येकडील ‘बांगर’ भागातील चिकणमातीमिश्रित पण सुपीक जमीन आणि नजफ्फश व फतेपुरबेरीकडील सखल ‘डाबर’ भूमी हे आहेत. या प्रदेशात कंकर, चुनखडी व बांधकामाचा दगड यांखेरीज खनिजे उपलब्ध नाहीत. पूर्व भागातून उत्तर–दक्षिण वाहणारी यमुना ही एकच नदी या केंद्रशासित प्रदेशात असून उत्तर भागातील पश्चिम यमुना कालवा व नैर्ऋत्येकडील नजफगढ झीलनामक दलदल एवढेच इतर जलप्रवाह आहेत.

हवामान : दिल्ली प्रदेशाचे हवामान आत्यंतिक आहे. थंडीत तपमान ७·२° ते १०° से. आणि उन्हाळ्यात ३७·८° ते ४०·६° से. असून कधीकधी ते ४३·३° से. पर्यंतही जाते. वार्षिक सरासरी पर्जन्य ७५ सेंमी. असून बहुतेक पर्जन्य जून ते सप्टेंबर या काळात पडतो. प्रदेशाचा अवघा १,००० हे. भागच वनाच्छादित उरला आहे, त्यामुळे वरच्या गंगामैदानाच्या व ईशान्य राजस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती व मुद्दाम लावलेल्यांखेरीज अन्य वृक्ष अगदी तुरळक राहिले आहेत. त्याचप्रमाणे लांडगा, कोल्हा, हरिण, रानडुक्कर यांसारखे वन्य प्राणी दुर्मिळ झाले आहेत 

ओक, शा. नि.

इतिहास : आजच्या दिल्ली प्रदेशाच्या परिसीमेत महाभारतकाळापासून आजपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आख्यायिकांनुसार होऊन गेलेल्या १५ पैकी ८ राजधान्यांची स्थाने स्पष्ट दिसतात. सध्या ‘पुराना किला’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेवर ख्रि. पू. अंदाजे पंधराव्या शतकात पांडवांची इंद्रप्रस्थ राजधानी होती, असा परंपरागत समज आहे. त्यानंतर दंतकथेनुसार ख्रि. पू. पहिल्या शतकात दिलू राजाने हल्लीच्या कुतुबमीनारजवळ पहिली दिल्ली वसविली. त्याच्यामागून १०२० साली तोमरराजा अनंगपालाने सूर्यकुंड येथे स्थापिलेली राजधानी दिल्लीस आणली. तोमरवंशीयांनी तेथे लालकोट या नव्या नगरीत अनेक मंदिरे व अनंगतालनामक तलाव बांधून आजतागायत उभा असलेला लोहस्तंभ रोवला. तोमरांच्या जागी आलेल्या चौहानवंशीय पृथ्वीराजाने राजधानीचा विस्तार चौपट वाढवून कित्येक मंदिरे, एक उत्तुंग स्तंभ व भोवताली उंच परकोट उभारून रायपिठोरा किल्ला बांधला. ११९३ मध्ये मुहम्मद घोरीने पृथ्वीराजाला मारून दिल्लीची हिंदुसत्ता नष्ट केली. घोरीचा सेनापती कुत्बुद्दीन ऐबक याने दिल्लीची सुलतानी धारण करून गुलाम वंशाची स्थापना केली. पृथ्वीराजाची मंदिरे पाडून ‘कुव्वतुल इस्लाम’ ही भव्य मशीद बांधली व तिच्या स्तंभाचे रूप बदलून ७२·५६ मी. उंचीचा कुतुबमीनार उभा केला. गुलाम वंशामागून आलेल्या खल्‌जी घराण्यातील अलाउद्दीनने तेराव्या शतकात सिरी येथे नवी राजधानी बांधली. तिचे अवशेष हौझखास या विस्तीर्ण हौदाभोवतालच्या उद्ध्व‌स्त महालात व तटबंदीत दिसतात. चौदाव्या शतकात सत्तेवर आलेल्या तुघलकांपैकी घियासुद्दीनाने तुघलकाबाद, मुहम्मदाने जहाँपनाह आणि फिरूझशाहने फिरोझाबाद अशा तीन वेगवेगळ्या राजधान्या बांधल्या होत्या. त्यांचेही भग्नावशेष दिल्लीच्या परिसरात आढळतात. १३९८ मधील तैमूरलंगाच्या स्वारीत मूळच्या दिल्लीत लुटालूट व एक लाख नागरिकांची कत्तल झाली. त्यानंतर सु. अर्धशतक सय्यदांच्या राजवटीत दिल्ली राज्य नाममात्रच होते. लोदीवंशीयांनी आपली राजधानी आग्रा येथे नेली आणि १५२६ मध्ये इब्राहिम लोदीला मारून मोगल वंशाची स्थापना करणाऱ्या बाबराने ती तेथेच राहू दिली. त्याचा पुत्र हुमायून याने इंद्रप्रस्थाच्या जागी दीनेपनाह ही नवी राजधानी बांधण्यास सुरुवात केली पण त्याला हुसकावून देणाऱ्या शेरशाह सूर याने ती पुरी करून तिची तटबंदी केली आणि तिचेच अवशेष आजच्या ‘पुराना किला’ या रूपाने शिल्लक आहेत. हुमायूनने शेरशाह मेल्यावर आपले राज्य परत मिळविले. पण तोही लवकरच मरण पावला. त्याच्या मागून अकबराने राजधानी आग्रा व फतेपुर सीक्रीला ठेवली. त्यानंतर गादीवर आलेल्या जहांगिराने लाहोर ही राजधानी पसंत केली. पुढे शाहजहानने मात्र १६३८–५८ च्या दरम्यान शाहजहानाबाद ही नवी राजधानी बांधून दिल्लीचे पुनरुज्जीवन केले. संपूर्ण तटबंदीने वेढलेली तीच नगरी आज जुनी दिल्ली म्हणून उभी आहे. लाल किल्ला आणि त्यातील राजमहाल १६४८ मध्ये पूर्ण होताच शाहजहान तेथे राहण्यास आला व नंतर काही वर्षे मोगल साम्राज्याच्या वैभवाचे व सत्तेचे केंद्र म्हणून दिल्लीची कीर्ती जगभर पसरली. औरंगजेबाच्या कारकीर्दीतच दिल्लीला उतरती कळा लागली. त्याच्या मागून मोगल साम्राज्याचे तुकडे झाले व बादशाह नामधारी राहिले. १७३९ मध्ये नादिरशाहने आणि १७५७ मध्ये अहमदशाह दुर्रानीने दिल्ली लुटली. १७७१ मध्ये मराठ्यांनी शाहआलमला गादीवर बसवून दिल्लीचा कबजा घेतला. १८०३ मध्ये इंग्रजांचा सेनापती लेक याने मराठ्यांचा पाडाव करून दिल्ली ईस्ट इंडिया कंपनीच्या खाती जमा केली. १८५७ मध्ये बंडवाल्यांची सत्ता काही दिवस दिल्लीवर होती, पण १८५८ मध्ये इंग्रजांनी दिल्ली परत घेतली. १८७७ मध्ये इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिंदुस्थानची महाराणी म्हणून दिल्लीहून घोषित झाली. १९०३ साली सातव्य एडवर्डच्या आणि १९११ मध्ये पंचम जॉर्जच्या राज्यारोहणानिमित्त दिल्लीतच दरबार भरले. १९११ मध्येच हिंदुस्थानची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेण्याची घोषणा झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच दिल्लीचा संबंध लोहमार्गांनी व राजमार्गांनी देशांच्या चारही दिशांना जोडण्यास सुरुवात झाली होती. नवी दिल्ली राजधानीसाठी रायसीना या पठारी क्षेत्रावर सर एडविन लट्येन्झ या स्थापत्यविशारदाने आखलेल्या नगरयोजनेचे बांधकाम १९३१ मध्ये पुरे होऊन औपचारिक रीत्या तेथून राज्यकारभार चालू झाला. १९४७ मध्ये ब्रिटिश सत्तेची समाप्ती होऊन स्वतंत्र भारताची पहिली राजधानी म्हणून नवी दिल्ली जगाच्या नकाशावर आली. 


राज्यव्यवस्था : १ नोव्हेंबर १९५६ पासून दिल्ली ‘केंद्रशासित प्रदेशा’च्या वर्गात समाविष्ट करण्यात आली. केंद्रशासित दिल्ली प्रदेशाचा कारभार मध्यवर्ती सरकारच्या गृहमंत्रालयातर्फे प्रमुख आयुक्ताद्वारे चालत असे. दिल्लीत सल्लागार मंडळ असून ते गृहमंत्र्याच्या संमतीने काम पहात असे. या मंडळात दिल्लीचे संसदेतील प्रतिनिधी, महापौर, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, दिल्लीच्या महानगरपालिका मंडळाचे अध्यक्ष, पोलीस महानिरीक्षक, स्थानिक संसदीय सभासद आणि दोन सल्लागार असत. प्रमुख आयुक्ताला औद्योगिक बाबतीत व जनसंपर्क साधण्याच्या कामात दोन सल्लागार मंडळे सल्ला देत. पंजाबचे उच्च न्यायालय हेच पूर्वी दिल्लीचे न्यायालय असे. मे १९६६ मध्ये लोकसभा व राज्यसभा यांनी संमत केलेल्या विधेयकानुसार ९ सप्टेंबर १९६६ रोजी दिल्लीत नवीन पद्धतीचा राज्यकारभार सुरू झाला. दिल्लीच्या या केंद्रशासित राज्यात निवडून दिलेल्या ६१ सभासदांची एक महानगरीय परिषद असून तीमधील पाच सदस्य भारताच्या राष्ट्रपतींनी नेमलेले असतात. गृहमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी नेमलेला नायब राज्यपाल सर्व कारभार पाहतो. त्याच्या मदतीस चार कार्यकारी सभासदांचे एक मंडळ असते. या सभासदांची नियुक्ती गृहमंत्रालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात. त्यांतील एक सभासद मुख्य कार्यकारी परिषद सदस्य व बाकीचे तीन कार्यकारी सदस्य असतात. महानगरीय परिषदेचा मुख्य संचालक हा मंडळाचा अध्यक्ष असतो. या राज्यातून राज्यसभेत तीन आणि लोकसभेत सात सदस्य निवडून द्यावयाचे असतात. ५ सप्टेंबर १९६६ रोजी संमत झालेल्या ठरावानुसार या राज्यात उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. १९६८ मध्ये या न्यायालयाच्या अधिकारकक्षेत हिमाचल प्रदेश समाविष्ट करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर ७ एप्रिल १९५८ रोजी दिल्लीत महानगरपालिका स्थापन झाली. तीत १०६ सभासद असतात. २१५ पंचायती असून सामूहिक विकास गटात २७६ खेडी समाविष्ट केली आहेत. सध्याचे नायब राज्यपाल किशनचंद व मुख्य कार्यकारी अधिकारी राधारमण हे आहेत. यास स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. दिल्लीच्या केंद्रशासित प्रदेशात दिल्ली महानगरपालिका, नवी दिल्ली नगरपालिकीय समिती आणि दिल्ली कँटोनमेंट मंडळ असे तीन स्थानिक प्रशासकीय विभाग आहेत.

गोखले, कमल

आर्थिक व सामाजिक स्थिती : कृषि : ३१ ऑक्टोबर १९७४ रोजी दिल्ली प्रदेशातील एकूण सु. ३,५२,००० हे. जमिनीपैकी १,४९,००० हे. जमीन भौगोलिक क्षेत्राखाली १,४८,००० हे. लागवडीखाली १,००० हे. वनाच्छादित (जंगलव्याप्त) ३४,००० हे. बिगरशेतीच्या उपयोगासाठी १६,०० हे. नापीक व मशागतीस अयोग्य १,००० हे. कायमच्या चराई व कुरणांकरिता आणि ३,००० हे. मशागतयोग्य पडीत जमीन होती. १९७३–७४ मधील पिकांखालील क्षेत्र व उत्पादन पुढीलप्रमाणे होते : (अनुक्रमे हेक्टर व टन) तांदूळ : २,२०० १,८००गहू : ५१,१०० ८७,६०० ज्वारी : ९,४०० ३,७०० मका : १,५०० ८०० बाजरी : २२,४०० १७,००० जव (बार्ली) : ३,००० २,००० एकूण तृणधान्ये : ८९,६०० १,१२,९०० हरभरा : ५,४०० ३,२०० तूर : ४०० १०० एकूण कडधान्ये : ८,९०० ४,४०० एकूण अन्नधान्ये : ९८,५०० १,१७,३०० कापूस : ६०० ५,००० गासड्या (प्रत्येकी १८० किग्रॅ. च्या) ३,००० (सरकीमिश्रित कापूस) शिरसू व मोहरी : १,३०० २०० एकूण पाच प्रमुख तेलबिया : १,३०० २०० ऊस : १,००० ५,७०० (ऊसउत्पादन) ६०० (गूळ) मिरची : ७०० ८०० बटाटे: ४०० २,९०० तंबाखू : १००. दिल्ली सभोवतालच्या परिसरातील खेड्यांमध्ये द्राक्षोत्पादन मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होऊ लागले आहे. १९७४–७५ मध्ये दिल्ली प्रदेशातील भाजीपाल्याखालील क्षेत्र २३,१०० हे. (२२,३०० हे. १९७३–७४) एवढे होते.

दिल्ली प्रदेशात मोठा असा एकही जलसिंचन प्रकल्प नाही. लहानलहान सिंचनप्रकल्प व नलिकाकूप यांद्वारा जमीन भिजविली जाते. १९७४–७५ मध्ये २७३ मेवॉ वीजनिर्मितिक्षमतेची केंद्रे होती. १९५७ मध्ये २४ गावांचे विद्युतीकरण झाले होते. १९७४–७५ मध्ये प्रदेशातील सर्व गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. ३१ मार्च १९७४ रोजी जलसिंचनार्थ ७,७२१ पंप / नलिकाकूप कार्यान्वित होते. दिल्ली प्रदेशाच्या ग्रामीण भागात उभारण्यात यावयाच्या ७५ सहकारी दुग्धशाला प्रकल्पांपैकी पहिली सहकारी दुग्धशाला अलीपूर खंडातील गढी शहापूर खेड्यात ऑक्टोबर १९७६ मध्ये उघडण्यात आली. पाचव्या योजनेअखेरपर्यंत दिल्ली प्रशासन मत्स्योत्पादनावर २५ लक्ष रु. खर्च करणार असून त्यायोगे पाचव्या योजनेअखेर सध्याचे वार्षिक ३·५ लक्ष किग्रॅ. मत्स्योत्पादन ६ लक्ष किग्रॅ. वर जाईल. १९५४ च्या भूधारण सुधारणा अधिनियमान्वये भूस्वामित्वाचे अधिकार बदलून कसणाऱ्या ८,००० कुळांना १५,२०० हे. क्षेत्रात भूमिदारी हक्क प्राप्त झाले. ८ डिसेंबर १९७५ रोजी राष्ट्रपतींनी काढलेल्या दिल्ली भूधारण (कमाल मर्यादा) अध्यादेशानुसार दिल्ली प्रदेशातील भूधारणाची कमाल मर्यादा ९·७ हे. ते २४ हे. वरून ७·२ हे. ते २१·८ हे. पर्यंत उतरविण्यात आली. अपंगाखेरीज इतरांनी आपल्या जमिनी कुळांना कसण्यास देण्यास प्रतिबंध आहे. कसण्याची किमान कालमर्यादा ५ वर्षे झाली व कमाल जमीनधारा पिकाच्या पंचमांश ठरला. पशुपालनाचा विकास होत असून मिश्रशेतेही (पिके व पशुधन) वाढत आहेत.


उद्योगधंदे : दिल्ली प्रदेशात १९७४ साली ३४,००० उद्योगधंदे व २·६६ लक्ष कामगार होते. या उद्योगांतील एकूण भांडवल गुंतवणूक २४० कोटी रुपयांची, तर एकूण उत्पादनमूल्य ३८५ कोटी रुपयांचे होते. प्रमुख उद्योगांमध्ये पोलाद ओतकाम, औषधे व रसायने, रंग व रोगण, इलेक्ट्रॉनिकी, विद्युत् उपकरणे व उपसाधने, लेथयंत्रे व छिद्रणयंत्रे, प्रवर्धक, विद्युत्‌मोटरी, वातानुकूलन यंत्रसामग्री व प्रशीतक, दूरचित्रवाणी संच व रेडिओ आणि त्यांचे सुटे भाग, लहान हत्यारे व अवजारे, सायकली व त्यांचे सुटे भाग, रबरी वस्तू, प्लॅस्टिके, मोटारींचे सुटे भाग, विजेऱ्या, सूक्ष्म उपकरणे, सुती व लोकरी कापडाच्या गिरण्या, वनस्पती तुपाच्या गिरण्या, कृत्रिम जडजवाहीर, तांब्यापितळेची भांडी बनविण्याचे कारखाने, खेळसामग्री उत्पादनाचे कारखाने इत्यादींचा समावेश होतो. यांशिवाय वस्तऱ्याची पाती, अगंज पोलाद, तारजाळ्या, चिनी मातीची भांडी, चामड्याचा माल, विविध कृत्रिम धागे, विणमाल यांच्या निर्मितीचे अनेक कारखाने दिल्लीचा परिसर समृद्ध करीत आहेत. ओखला औद्योगिक वसाहतीत पहिल्या टप्प्यात ३५, दुसऱ्यात ४५ व तिसऱ्यात ४१ गाळे उभारून विविध उद्योगांसाठी ते देण्यात आले. ग्रामीण भागात बादली औद्योगिक वसाहत असून तीमध्ये कृषिअवजारे, इस्पितळसाहित्य, घड्याळे, विजेच्या केबली, लोहवेष्टित स्विच इ. वस्तूंचे उत्पादन चालते. १९७२ साली दिल्ली प्रदेशात ८२५ कामगारसंघटना होत्या. त्यांपैकी ३६४ संघटनांनी आपली विवरणपत्रे भरून देणाऱ्या संघटनांच्या कामगार सदस्यांची संख्या ३·५९ लक्ष होती. दिल्ली प्रशासनाने राजधानीसभोवती १९८९ पर्यंत १८ ग्रामीण औद्योगिक वसाहती उभारण्याची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली असून अलीपूर, कांझाव्ला, नजफगढ, नांगलोई जाट आणि पालम या पाच खेड्यांमधील औद्योगिक वसाहती मोठ्या असतील. प्रत्येक वसाहतीला ६५ हे. जमीन देण्यात येणार आहे. दिल्ली प्रदेशाकरिता पाचव्या पंचवार्षिक योजनेचा खर्च एकतीस कोटी साठ लाख दहा हजार रु. निर्धारित करण्यात आला आहे.

दिल्ली प्रदेशातील प्रसिद्ध कुटिरोद्योगांत हस्तिदंतीकाम, सोने व चांदी यांचे भरतकाम,जडजवाहिर, तांबे व पितळेची नक्षीदार व कलात्मक भांडी व वस्तू बनविणे इत्यादींचा समावेश होतो. दिल्ली लघुउद्योग विकास निगमाने बेकारांकरिता ८६२ औद्योगिक गाळे बांधावयाची योजना हाती घेतली असून त्यासाठी केंद्र सरकारने निगमास जमीन देऊ केली आहे.

दळणवळण : लोहमार्ग, राजमार्ग आणि आकाशमार्गाचे दिल्ली हे केंद्र असल्याने देशाच्या चारही दिशांना तिन्ही प्रकाराची वाहतुक सतत चालू असते. तीन राष्ट्रीय महामार्ग दिल्लीमधून जात असून कलकत्ता, मुंबई व मद्रास या भारतातील प्रमुख शहरांशी दिल्ली शहर रुंदमापी रेल्वेने जोडलेले आहे. दोन विमानतळ, महत्त्वाचे लोहमार्ग प्रस्थानक, राज्याबाहेर नियमित ये–जा करणाऱ्या उतारू गाड्या व मालमोटारी आणि राजधानीच्या परिसरात सु. ६० मार्गावरून अंदाजे दोन लाख किमी. रोज प्रवास करणाऱ्या दिल्ली वाहतूक निगमाच्या २,०३१ बसगाड्या सार्वजनिक वाहतुकीची कल्पना देतात. त्यांखेरीज शहरात भाड्याच्या टॅक्सी, रिक्षा, अंसख्य खाजगी मोटारी ट्रक राज्याच्या पक्क्या रस्त्यांवरून चौफेर फिरत असतात.१९७३ मध्ये शहरात १,५०,६७० मोटारसायकली १३,४६७ ऑटोरिक्षा ७५,८६० खाजगी मोटारी ४,८५७ टॅक्सी १९७०८ ट्रक ४,११० इतर सार्वजनिक सेवा वाहने होती. आकाशवाणीचे प्रधान कार्यालय नव्या दिल्लीत आहे. १९७५ मध्ये दिल्लीमधून १२ प्रमुख दैनिके व ६० प्रमुख नियतकालिके प्रसिद्ध होत असून त्यांच्या भाषा प्रामुख्याने इंग्रजी, उर्दू किंवा पंजाबी होत्या. नवी दिल्लीमधील दूरध्वनींची संख्या १९५० मधील ८ हजारांवरून १९७६ मध्ये १·२८ लक्षांवर गेली आहे. १९७६–७७ च्या अखेरीस दिल्ली शहर ग्राहक नगरांतर दूरध्वनिव्यवस्थेनुसार (एस्‌टीडी.) ५० शहरांशी जोडले जाईल. राजधानीमधील ३२ दूरध्वनिकार्यालयांपैकी सर्वांत मोठे कार्यालय (१०,००० दूरध्वनितारा असलेले) ऑगस्ट१९७६ मध्ये इदगा येथे कार्यान्वित झाले.

लोक व समाजातील : १९७१ च्या जनगणनेनुसार दिल्ली प्रदेशातील ४०,६५,६९८ लोकसंख्येपैकी हिंदू ३४,०७,८३५ शीख २,९१,१२३ मुसालमान २,६३,०१९ जैन ५०,५१३ खिस्ती ४३,७२० बौद्ध ८,७२० आणि ७६८ संकीर्ण असे धार्मिक विभाजन होते. अनुसूचित जातींची लोकसंख्या ६,३५,६९८ होती. दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे यांचे प्रमाण ८०२ होते. एकूण लोकसंख्येत दिल्लीच्या ग्रामीण क्षेत्रात पुरुष २२,५७,५१५ व स्त्रिया १८,०८,१८३ होत्या. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकसंख्या अनुक्रमे ३६,४७,०२३ (पुरुष २०,२८,०९१ स्त्रिया १६,१८,९३२) व ४,१८,६७५ (पुरुष २,२९,४२४ स्त्रिया १,८९,२५१) एवढी होती. साक्षरता प्रमाण ५६·६५% होते. दिल्लीच्या ग्रामीण क्षेत्रात ५ समुह विकास खंड असून त्यांमध्ये २५८ खेडी होती. प्रदेशाची लोकसंख्या-घनता दर चौ. किमी.स २,७३८ होती. १९०१–६१ या काळात प्रदेशाची लोकसंख्या सहापट झाली. १९६१–७० या दशकात लोकसंख्या वृद्धिप्रमाण  ५२·१२% होते. या वाढीची मुख्य कारणे १९४७ च्या फाळणीनंतर पंजाबमधून लोटलेला निर्वासितांचा लोंढा व स्वातंत्र्योत्तर या प्रदेशात अतिशय झपाट्याने झालेले औद्योगिकीकरण ही होती. नियोजन आयोगाने दिल्ली प्रशासनास १९७६–७७ साठी शक्तिउत्पादनात, पाणीपुरवठा, गृहनिवसन आणि उद्योग यांसारख्या महत्त्वाच्या बाबींकरिता ६३·३ कोटी रुपये मंजूर केले. नागरीकरण विकास कार्यक्रमांच्या कार्यवाहीसाठी दिल्ली विकास प्राधिकरण ही संस्था प्रशासनाने स्थापना केली असून तिच्यामार्फत २० वर्षाची ‘दिल्ली बृहत् योजना’ राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर भूमिसंपादन, विकास व वितरण योजनेखाली, प्राधिकरणाने निवास, उद्योगधंदे, व्यापारउदीम व संस्था यांकरिता नवीन विभाग उभारले. आतापर्यंत ३०,००० घरे व सदनिका प्राधिकरणाने बांधल्या असून १९७४-७५ मध्ये १८,००० नवी घरे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली. प्राधिकरणाने बांधलेल्या पुनर्वसन वसाहतींमध्ये दिल्लीमधील विविध भागांतील गलिच्छ वस्त्यांत राहणाऱ्या ६ लक्ष लोकांना १९७६ मध्ये हलविण्यात आले. १९७२-७३ मध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या २,४०३ आणि विद्यार्थिसंख्या ९,३५,२५० होती. उच्च माध्यमिक शाळांची संख्या त्याच वर्षी ५३७ होती. १९७३-७४ मध्ये कला व विज्ञान महाविद्यालयांची संख्या ६२, तर अभियांत्रिकी व तंत्रविद्या महाविद्यालये १६ होती (१९७२-७३). दिल्लीमध्ये दिल्ली विद्यापीठ हे अध्यापनात्मक व संलग्नकारी विद्यापीठ असून त्याचे माध्यम इंग्रजी आहे. १९७३-७४ मध्ये या विद्यापीठात १,२४,००० विद्यार्थी होते.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे अध्यापनात्मक व संशोधनात्मक विद्यापीठ असून त्याची सबंध भारतभर अधिकारिता आहे. यांशिवाय शहरात व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तिसांवर मोठ्या संस्था आहेत. त्यांपैकी ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषद’, ‘भारतीय तंत्रविद्या संस्था’, ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञानसंस्था’ या सुविख्यात आहेत.


दिल्ली भागातल्या लोकांची राहणी स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत हिंदू–मुस्लिम मिश्र पद्धतीची होती. घरे, पेहराव, खाणेपिणे या बाबतींत दोन्ही समाजांत फारसा फरक नव्हता. मुस्लिम स्त्रियांत पडदा पद्धत किंवा हिंदू घरांतून निरामिष भोजन अशा काही भिन्न चालिरिती वगळल्यास हिंदी, उर्दूमिश्र हिंदुस्थानी भाषा, समान आवडीनिवडी व करमणुकी यांमुळे दिल्लीची प्रजा बरीचशी एकजिनसी होती. स्वातंत्र्योत्तर सर्व बदलले आहे. दिल्लीच्या जीवनावरची इस्लामी छाप पुसली जाऊन ती महानगरी आता बहुरंगी, बहुभाषी आणि अनेक संस्कृतींची संगमभूमी बनली आहे. हिंदी, पंजाबी, उर्दू आणि इंग्रजी या राजधानीमधील प्रमुख व्यवहार-भाषा आहेत.

दिल्ली प्रदेशात ५८ रुग्णालये, २५४ दवाखाने व ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. १९७६ मधील एकूण खाटांची व नोकरीवरील डॉक्टरांची संख्या अनुक्रमे ११,२७९ व ३,३२१ होती. जननमान, मृत्युमान व बालमृत्युमान अनुक्रमे दर हजारी २३·६, ७·४ आणि ६६·०१ एवढे होते (१९७३). प्रदेशातील ॲलॉपथी डॉक्टरांची संख्या १९५४ मधील १,३५५ वरून १९७६ मध्ये ६,१७१ वर गेली. ‘अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञानसंस्था’, ‘वेलिंग्टन हॉस्पिटल’, ‘सफदरजंग हॉस्पिटल’, ‘इर्विन हॉस्पिटल’, ‘गोविंद वल्लभपंत हॉस्पिटल’ यांसारख्या मोठ्या व प्रसिद्ध वैद्यकीय संस्था आहेत. दिल्लीतून १४ दैनिके व सु. ७० नियतकालिके प्रसिद्ध होतात. १९७४ साली भारतात वृत्तपत्र–नियतकालिकांच्या संदर्भात दिल्लीचा तिसरा क्रमांक (१,४५२) होता. दिल्लीमधील प्रमुख दैनिके हिंदुस्तान टाइम्स (१,५३,००० प्रती), हिंदुस्तान टाइम्स ईव्हनिंग न्यूज, इंडियन एक्सप्रेस (९४,९००), नॅशनल हेरल्ड (३९,४२९–नवी दिल्ली आणि लखनौ), पॅट्रिअट (४८,७००), स्टेट्समन (१,९४,१०० – कलकत्ता नवी दिल्ली), मदरलँड (३०,०००), टाइम्स ऑफ इंडिया (९४,०००), इकॉनॉमिक टाइम्स (४२,९००– नवी दिल्ली व मुंबई) ही इंग्रजीतून हिंदुस्थान (१,५६,१६४), नवभारत टाइम्स (१,९८,३००) व वीर अर्जुन (२७,२२७) ही हिंदीमधून आणि मिलाप (३७,४९७), प्रताप (३२,४३७) ही उर्दूमधून प्रसिद्ध होतात.

दिल्ली बृहत् योजना सप्टेंबर १९६२ मध्ये तयार करण्यात आली. त्या योजनेमधील ‘राष्ट्रीय राजधानी प्रदेशा’ची उभारणी (नॅशनल कॅपिटल रीजन–एनसीआर) हा देशातील मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेल्या विशिष्ट नागरीकरण योजनेचा एक भाग समजला जातो. या राष्ट्रीय राजधानी प्रदेश योजनेचे वैशिष्ट्य असे : हा संकल्पित प्रदेश ३०,२९२ चौ.किमी. चा असून त्यात दिल्ली केंद्रशासित प्रदेश, उत्तर प्रदेश राज्याचे मीरत व बुलंदशहर हे दोन जिल्हे, हरयाणा राज्याचे रोहटक, गुरगाव व सोनेपत हे जिल्हे आणि पानिपत व रेवारी हे तहसील, राजस्थान राज्यातील अलवार जिल्ह्याचे अलवार, बेऱ्होर, किशनगढ, मंदावर व तिजारा हे तहसील येतात. राष्ट्रीय राजधानी प्रदेशाची लोकसंख्या १४२ लक्ष असून १९८१ च्या सुमारास त्याची प्रक्षेपित लोकसंख्या २१० लक्षांवर जाईल. राष्ट्रीय राजधानी प्रदेशाचा मूळ हेतू दिल्लीसभोवती वर्तुळाकारी शहरे वसवून दिल्लीवर होणारा आप्रवाशांचा आगमप्रवाह आघात कमी करणे हा होय. राष्ट्रीय राजधानी प्रदेशाची नागरी लोकसंख्या १९६१ मधील ३७ लक्षांवरुन १९७१ मध्ये ५५ लक्षांवर गेली. या दहा वर्षांत प्रदेशातील नागरी स्थानांची संख्या ५१ वरून ५८ वर गेली. बृहत् योजनाकारांच्या मते दिल्लीभोवतालच्या तीन राज्यांचे मिळून २९ तहसील विकसित करून दिल्ली शहराला बेकायदेशीर बांधकाम, अनधिवास इत्यादींपासून वाचविता येणे शक्य आहे. थोडक्यात म्हणजे, राष्ट्रीय राजधानी प्रदेशाची भविष्यकालीन भूमिका अशी राहील : नागरी पर्यावरणाची उपलब्धता, राष्ट्राच्या राजधानीला शोभेलसा दिल्ली शहराचा सुसूत्र विकास, निकोप नागरी–ग्रामीण संबंध प्रस्थापित करणे आणि वाहतूक व संदेशवहन, पाणीपुरवठा, पूरनियंत्रण, वीजनिर्मिती व जलनिकासव्यवस्था इ. सुविधांची उपलब्धता. योजनाकारांच्या मते १९८१ च्या सुमारास दिल्लीसभोवतालची पुढील किमान ११ गावे प्रथम दर्जाची शहरे बनतील : नारेला, गाझियाबाद, मोदीनगर, हापूर, खुर्जा, गुरगाव, फरिदाबाद, रोहटक, पानिपत, सोनेपत आणि बुलंदशहर. पाचव्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या विकासार्थ २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली आणि १९७४-७५ साली १५० लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी त्या वर्षी केवळ ४० लक्ष रुपयेच मंजूर करण्यात आले.


भारतातील अनेक महत्त्वाच्या शास्त्रीय व शैक्षणिक संस्था तसेच संशोधन संस्था व प्रयोगशाळा दिल्लीमध्ये आहेत. त्यांत राष्ट्रीय विज्ञान अकादमी, वैज्ञानिक व औद्योगिक अनुसंधान परिषद, राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, राष्ट्रीय अभिलेखागार, भारतीय वैद्यक अनुसंधान परिषद, राष्ट्रीय संग्रहालय, भारतीय मानक संस्था, भारतीय इतिहास संशोधन परिषद, निसर्गेतिहास संग्रहालय, राष्ट्रीय कुटुंबनियोजन संस्था, राष्ट्रीय संक्रमणीय रोग संस्था, राष्ट्रीय श्रम संस्था, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, वाडिया हिमालयीन प्राणिविज्ञान संस्था, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था, नॅशनल बुक ट्रस्ट, लाखांवर ग्रंथसंस्था असलेली ८० च्या वर ग्रंथालये आणि अभ्यास, संशोधन व प्रयोग कार्यासाठी अगणित इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय केंद्रे या त्यांपैकी काही संस्था होत. जवाहीरकाम, सोन्याचांदीची कलाकुसर, हस्तिदंती नक्षीकाम, तांब्या–पितळेची व चिनी मातीची भांडी, जरीकाम अशा दिल्लीच्या परंपरागत हस्तकला परदेशी पर्यटकांच्या आश्रयावर तग धरून आहेत. चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, संगीतादी आधुनिक कलांचा विकास शासकीय पुरस्काराने होत आहे. क्रीडांपैकी बुद्धिबळ, सोंगट्या असे बैठे खेळ किंवा पतंग व कबुतरे उडवण्याच्या मैदानी चढाओढी मागे पडल्या असून फुटबॉल, हॉकी, क्रिकेटची गोडी लोकांना लागली आहे. रामलीला मैदानावर रावणाची प्रतिमा जाळण्यासारखे अपवादात्मक जुने सामूहिक सोहळे वगळल्यास दिल्लीच्या जुन्या करमणुकी, नाचगाण्याच्या मैफली, मुशायरे वगैरे नाममात्रच उरल्या आहेत. जुन्या दिल्ली नगरीचे ऐतिहासिक अवशेष आणि नव्या दिल्लीचे शासकीय वैभव जगजाहीर असल्याने त्याच्या दर्शनार्थ देशातून व परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांची अखंड रीघ दिल्लीकडे लागल्यामुळे पर्यटक परिचर्या या नव्या व्यवसायाला दिल्लीत तेजी आहे. इतिहासकाळापासून आधुनिक काळापर्यंत दिल्लीचे महत्त्व टिकून राहिलेले आहे.

वास्तुकला : भारतातील कोणत्याही शहरापेक्षा दिल्लीमध्ये स्मारकशिल्पांची प्रचंड संख्या आहे. ही वास्तुशिल्पे १,६०० वर्षांपूर्वीच्या गुप्तकालीन वास्तुशैलीपासून ब्रिटिशकालीन वास्तुशैलीपर्यंतचे प्रकार प्रकट करतात. हिंदू–मुस्लिम वास्तुकलेच्या अभ्यासकास दिल्लीमध्ये पुष्कळच प्रकार अभ्यासण्यास वाव मिळतो. कुव्वतुल इस्लाम मशीद, कुतुबमीनार, अल्तमशची कबर आणि अलाई दरवाझा या प्रारंभीच्या पठाण शैलीतील (११९३–१३२०) वास्तूंवरून हिंदुशैली व साहित्य यांचा सार्सानिक प्रतिमाने आणि गरजा यांच्याशी मिलाफ झालेला आढळतो. यानंतरच्या पठाण शैलीतील वास्तू तुघलकाबाद आणि सय्यद राजे (१४१४–५१) व लोदी राजे (१४५१–१५८६) यांच्या कबरी, उत्कृष्ट घुमट व नक्षीकाम आणि उत्तम संगमरवर व फरसकाम यांनी विनटलेल्या आढळतात. लाल किल्ला व जामा मसजिद (प्रमुख मशीद) या मोगलकालीन वास्तुशिल्पांमध्ये संगमरवराचा अधिकाधिक वापर, श्रमकौशल्यनिर्मित पुष्पमय सजावट आणि फुगीर घुमट व उंच मनोरे यांचा आविष्कार आढळतो. १५७२ मध्ये हुमायूनची कबर बांधण्यात आली. एका भव्य चौथऱ्यावर बांधलेल्या अष्टकोनी वास्तूत लाल दगड व संगमरवरी दगड यांचा सुरेख समन्वय झालेला आढळतो. या वास्तूवर सु. १५ मी. व्यासाचा संगमरवरी घुमट असून त्याभोवती सुरेख लहानलहान छत्र्या आहेत. मुख्य प्रवेशद्वाराशी एक भव्य कमान असून तिच्या बाजूला तशाच लहान कमानी आहेत. या कमानींवर कुराणवचने कोरलेली आहेत. कबरीच्या सभोवती सुरेख बगीचा आहे. या वास्तुरचनेचा प्रभाव ताजमहालाप्रमाणेच इतर वास्तुंवरही पडल्याचे आढळते. लाल किल्ला ही शहरातील सर्वांत महत्त्वाच्या वास्तूंपैकी एक होय. या किल्ल्याच्या लाल वालुकाश्म भित्ती २२ मी. उंच असून किल्ल्यात अनेक राजवाडे (शीशमहल, रंगमहल),उद्याने व इतर इमारती (मोती मसजिद) आहेत. त्यांपैकी दिवाण–इ–आम (सार्वजनिक सभागृह )वदिवाण–इ–खास (खासगी सभागृह) या दोन विख्यात इमारती होत. दिवाण–इ–आम सभागृहात लाल वालुकाश्माचे ६० स्तंभ असून त्यांनी सपाट छत्र तोलले आहे. दिवाण–इ–खास सभागृह लहान असले, तरी त्यामध्ये एक श्वेतसंगमरवरी दालन आहे. रेखीव कमानी, नितळ संगमरवरी शिल्पकाम, प्रमाणबद्ध घुमटरचना, प्रशस्त बगीचे ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये होत. मोगल राजवटीनंतर विसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिश राजवटीत नव्या दिल्लीची रचना करण्यात आली. ब्रिटिशकालीन वास्तुशिल्पशैली केंद्रीय सचिवालय, संसदभवन,राष्ट्रपतिभवन यांसारख्या वास्तूंद्वारे दृगोच्चर होत असून त्यामध्ये आधुनिक इंग्लिश वास्तुकला संप्रदायामधील उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि पांरपरिक भारतीय वास्तुशिल्पप्रकार यांचा उत्कृष्ट मिलाफ झालेला आढळून येतो. सर एडविन लट्येन्झ या ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञाने नव्या राजधानीचा आराखडा काढून तीमधील राष्ट्रपतिभवन ही प्रमुख वास्तू निर्माण केली. राष्ट्रपतिभवनाजवळच सचिवालयाचे दोन विभाग आणि वर्तुळाकार संसदभवन यांची निर्मिती सर हर्बर्ट बेकर या ब्रिटिश वास्तुंशिल्पज्ञाने केली. स्वातंत्र्योत्तर काळात दिल्लीमधील सार्वजनिक इमारतींच्या बांधकामात, उपयुक्ततावादी दृष्टिकोन व भारतीय आणि पश्चिमी वास्तुशैलींचा संगम ही दोन्ही वैशिष्ट्ये अधिककरून आढळतात. सर्वोच्च न्याय मंदिर, विज्ञान भवन व शासकीय भवने ही या वैशिष्ट्यांची उदाहरणे होत. इंडिया इंटरनॅशनल सेंटर, अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था, अमेरिकन वकिलात, ओबेरॉय इंटर कँटिनेंटल आणि अशोक ही हॉटेल, तसेच आशिया ७२ या प्रदर्शनातील वास्तू ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.


बालभवन, रवींद्रभवन (ललित कलाकेंद्र) यांसारख्या इमारतींद्वारा एका नवीनच शैलीचा प्रत्यय येतो. सार्वजनिक व खाजगी इमारतींच्या बांधकामात वापरल्या जाणाऱ्या सध्याच्या वास्तुशिल्पशैलीमध्ये कार्यवाद व मानवतावाद या दोहोंवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. यमुना नदीच्या समोरील भागात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री या राष्ट्रीय नेत्यांसाठी पुष्पवाटिकांमध्ये स्मारके उभारण्यात आली आहेत.

भारतातून विविध प्रांतांतून आणि निरनिराळ्या देशांतून दिल्लीत येणाऱ्या लोकांच्या विविध सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या छटांनी दिल्लीचे सांस्कृतिक जीवन हे बहुढंगी व बहुरंगी बनले आहे. अद्यापही शहराच्या सांस्कृतिक जीवनात बदल होत असल्याचे दिसते. दिल्लीमध्ये पूर्वी चालू असलेले नृत्य, गाणे बजावणे, मुशायरे वगैरेंसारखे कार्यक्रम आता मागे पडत असल्याचे दिसून येते त्यांची जागा सिनेमा, कॅबेरे, क्लब या नवीन प्रकारांनी घेतली आहे. काही कलासंघ, मंच व संस्था स्थानिक कलाप्रकारांना व साहित्यांना उत्तेजन देतात. नृत्य, नाट्य, व संगीत यांसारख्या सांस्कृतिक कलाप्रकारांना प्रोत्साहन देणारी संगीत नाटक अकादमी, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला व अनुप्रयुक्त कला यांच्या अभ्यासास व संशोधनास प्रोत्साहन देणारी ललित कला अकादमी आणि सर्व भारतीय भाषांमधील वाड्मयीन कार्यास प्रोत्साहन देणारी व त्यांचा समन्वय साधणारी साहित्य अकादमी तसेच नाट्य कलेचे सर्वांगीण शिक्षण देणारी ‘राष्ट्रीय नाट्य संस्था’ या प्रमुख सांस्कृतिक संस्था होत.‘राष्ट्रीय आधुनिक चित्रकलावीथी’ ही सु. १०० चित्रकारांच्या कलाकृतींनी विनटली आहे.

दिल्ली हे उद्याने व कारंजे यांचे शहर असून मनोरंजनाची आणि विनोदनाची अनेक स्थाने येथे आहेत. यमुना नदीचा दर्शनी भाग आणि शहरातील प्रमुख हिरवळीची क्षेत्रे या भागांत मनोरंजनात्मक स्थांनांचा विकास करण्यात येत आहे. ओखला, होझ–इ–खास, कुतुब येथील उपवने प्रसिद्ध आहेत. जपानी शैलीत तयार केलेले रोशन आरा उद्यान व पटेलनगर भागातील शिला–उद्यान ही दोन्ही ख्याती पावली आहेत. १०१ हे. क्षेत्रामध्ये पसरलेले एक प्राणिउद्यानही दिल्लीमध्ये आहे. खेळांसाठी ‘राष्ट्रीय प्रेक्षागार’ आणि ‘फिरोझशाह कोटला मैदान’ ही प्रसिद्ध आहेत. पाेहण्याचे तलाव, प्रेक्षागार आणि क्रीडामैदाने बांधण्याची एक भव्य योजना दिल्ली प्रशासनाकडून राबविली जात आहे.

पर्यटन : दिल्ली प्रशासनाने दिल्ली पर्यटन विकास निगमाची स्थापना केली असून या निगमाने आंतरराष्ट्रीय पर्यटकांची निवास व भोजनसुविधा चांगली व माफक दरात करण्यासाठी एक योजना आखली आहे. एका सर्वेक्षणानुसार दिल्ली हे मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनत असून प्रतिवर्षी पर्यटकसंख्या १२% ते २०% नी वाढत आहे. १९७४ मध्ये ती ३३ लक्ष होती. सर्वेक्षणानुसार १९८४ पर्यंत पर्यटकसंख्या १२० लक्ष होईल. नवी दिल्ली महानगरपालिकीय समितीने ‘इंडिया गेट’ जवळ ५ कोटी रु. खर्चाचे १५ मजली हॉटेल बांधण्याच्या योजनेस मान्यता दिल्ली आहे. पहिले ‘अकबर हॉटेल’ (चाणक्यपुरीमधील) १९७१ मध्ये २ कोटी रु. खर्चून बांधण्यात आले. ते हॉटेल महानगरपालिकेने भारतीय पर्यटन विकास निगमाला परवाना–फी पद्धतीवर चालविण्यास दिले आहे.

ओक, शा . नि. गद्रे, वि. रा. देवभक्त, मा. ग.

संदर्भ : 1. Chopra, Prabha, Ed. Delhi : History and Places of Interest, Delhi, 1970.

           2. Majumdar, R. C. Ed.The Mughul Empire, Bombay. 1974. 

           3. Singh, R. L. Ed. India : A Reginal Geography, Varanasi, 1971.


इतिहासप्रसिद्ध लाल किल्ला उत्तुंग कुतुबमीनार  जामा मशीद लक्ष्मीनारायण मंदिर (बिर्ला मंदिर) पारंपरिक हस्तीदंती कोरीवकाम रामलीला मैदानावरील रावणदहन इंडिया गेट, दिल्ली. भारतीय संसदभवन मोगल गार्डन्स, राष्ट्रपतीभवन. अशोक हॉटेल म. गाधींची समाधी , राजघाट कॉनॉट प्लेस राष्ट्रीय भैतिकीय प्रयोगशाळा, दिल्ली.