राजपलायम् : तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम् जिल्हयातील एक औद्योगिक शहर, लोकसंख्या १,०१,६३३(१९८१). हे मदुराईच्या नैर्ऋत्येस सु. ८० किमी.वर असून दक्षिण लोहमार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.

‘राजू पलायम्’ म्हणजे ‘राजाचा किल्ला’ या अर्थाच्या तमिळ शब्दांवरून या शहराला ‘राजपलायम्’ हे नाव देण्यात आले. विजयानगरच्या पराभवानंतर चौदाव्या शतकात तेथील राजांनी दक्षिणेकडे स्थलांतर केले. त्यांच्याच वंशातील चिन्न राजाने १४८३ मध्ये हे शहर वसविले. या भागात राजा शिकारीला आला असताना सशांनी त्याच्या शिकारी कुत्र्यांचा पाठलाग केलेला पाहून या मातीचा हा गुण असावा असे मानून राजाने येथे वसाहत स्थापन केली, अशी आख्यायिका आहे. या शहराच्या पूर्वेस ‘संजीवी मलाई’ नावाचा डोंगर आहे. राम-रावण युध्दात लक्ष्मणाला बाण लागल्यावर हनुमंताने आणलेल्या संजीवनीचा उर्वरित भाग येथे टाकला व त्यामुळे या डोंगराला हे नाव पडले, असे सांगितले जाते.

औद्योगिक दृष्ट्या शहराचा विकास झपाट्याने होत आहे. शहरात व त्याच्या परिसरात कापूस पिंजणे, कापड विणणे तसेच फर्निचर, यंत्रसामग्री, लोखंडी खिळे, विजेच्या मोटारी, काड्यापेट्या, रुग्णालयांना लागणाऱ्या वस्तू, सायकलीचे सुटे भाग इ. तयार करण्याचे कारखाने आहेत. यांशिवाय भात सडणे, सरकी व इतर खाद्य तेले गाळणे, छपाई इ. उद्योगही मोठ्या प्रमाणात चालतात. राजपलायम् ही जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ असून येथून मुख्यत्वे कापूस, धान्य, लोणारी कोळसा, जळाऊ लाकूड यांचा व्यापार चालतो. शहरात एक अभियांत्रिकी कर्मशाळाही आहे. १९४० साली येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली व १९५२मध्ये राजपलायम्ला शहराचा दर्जा मिळाला. हे शहर जातिवंत शिकारी कुत्र्यांच्या पैदाशीसाठीही प्रसिद्ध आहे.

पर्यटनदृष्ट्याही शहराला महत्त्व आहे. शहराच्या परिसरात अनेक तलाव व दाट जंगल असून या भागात हत्तींचे कळप आढळतात. संजीवी डोंगरावरील संजीवीनाथ व कुमारस्वामी यांची मंदिरे तसेच याच्या परिसरातील वनश्री रामस्वामी, शिव, विष्णू इ. मंदिरे, सु. ८ किमी.वरील अय्यनार मंदिर व त्याजवळील धबधबा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

चौंडे, मा. ल.