अनूपदेश : प्राचीन भारतातील एक देश. सागराच्या अथवा नदीच्या पाण्याने वेष्टिलेल्या, दलदलयुक्त अशा पाणथळ प्रदेशाला उद्देशून ‘अनूप’ वा ‘सागरानूप देश’ म्हणत. सौराष्ट्रातील गिरनारभोवतालच्या प्रदेश अथवा गोमती नदीच्याकाठच्या परिसरातील भागाला हे नाव असले, तरी प्राचीन साहित्यात सर्वांत अधिक प्रसिद्ध असलेला देश म्हणजे मध्य भारतातील नर्मदाकाठचा होय. माहिष्मती ही त्याची राजधानी होती. पराक्रमी हैहय राजे येथेच राज्य करीत. येथील नील राजा कौरव पक्षात सामील झाल्याचा उल्लेख मिळतो. हा देश अपरांत आणि विदर्भ यांच्या दरम्यान वसल्याचा उल्लेख नासिक येथील शिलालेखात मिळतो, तर जुनागढच्या रुद्रदामनच्या शिलालेखानुसार हा अवंति व आनर्त यांच्या दरम्यान असून तो सातवाहनांकडून जिंकल्याचा उल्लेख मिळतो. आजही भारतात उत्तर प्रदेशात बुलंदशहराजवळ गंगेकाठी अनूपशहर आणि राजस्थानमध्ये सोत्रा नदीकाठी अनुपगढ तसेच मध्यप्रदेशात शोण नदीकाठी अनूपपुर ही स्थळे आहेत.

शाह, र.रू. जोशी, चंद्रहास