पॅसाडीना : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील प्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,१२,९५१ (१९७०). हे लॉस अँजेल्सच्या ईशान्येस सु.१६किमी. सॅन गाब्रीएल पर्वतपायथ्याशी वसले आहे. टॉमस बी. एलियटने १८७४ मध्ये येथे वसाहत स्थापन केली. पॅसाडीना म्हणजे चिपेवा इंडियन बोलीभाषेत ‘दरीचे भूषण’. १८८६ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. लिंबू जातीच्या फळांचे केंद्र असलेले पॅसाडीना सँता फे लोहमार्गामुळे भरभराटले. कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व नासाशी संलग्न अशी जेट परिचालन प्रयोगशाळा, मौंट विल्सन आणि मौंट लो या वेधशाळाही येथे आहेत. इलेक्ट्रॉनिकी, क्षेपणास्रे व अवकाश घटक यांचे हे संशोधन केंद्र असून, येथे इलेक्ट्रॉनिकीय व वैज्ञानिक उपकरणे, मृत्तिकाशिल्पे इत्यादींची निर्मिती होते. येथील कॅलिफोर्निया तंत्रनिकेतन, फुलर धार्मिक पाठशाळा, कम्युनिटी रंगमंदिर, कलासंग्रहालय इ. प्रसिद्ध आहेत. बुश उद्यान व जवळच्या सॅन मारीनो येथील हेन्ऱी हंटिंग्टन ग्रंथालय, कलावीथी इ. प्रेक्षणीय आहेत. रोझ बाउल या प्रेक्षागृहात नववर्षदिनी होणारे आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल सामने व गुलाबपुष्पांचे देखावे (१८९०) ही येथील खास वैशिष्ट्ये होत. 

लिमये, दि. ह.