संसदभवन, पॅरामॅरिबो.पॅरामॅरिबो : सुरिनामची राजधानी व प्रमुख बंदर, लोकसंख्या १,५१,५०० (१९७१). हे द. अमेरिकेच्या ईशान्य किनारी सुरिनाम नदीकाठी, नदीमुखापासून आत सु. २४ किमी. वर वसले आहे. स्वच्छता, टुमदार घरे, रूंद व वृक्षरेखांकित पथ आणि कालवे यांमुळे आकर्षक बनलेले हे शहर नेदर्लंडसमधील शहरांची आठवण करून देते.समुद्र व हवाई मार्गांनी हे ब्राझील, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नेदर्लंड्‌स यांस जोडले असून, लोहमार्गाचेही अंतिम स्थानक आहे. येथील हवामान विषुववृत्तीय प्रकारचे पण आरोग्यदायक आहे. फ्रेंचांनी येथे सु. १६४० मध्ये वसाहत स्थापन केली. हे काही काळ अनुक्रमे डच व ब्रिटिश यांच्या अंमलाखाली होते.१८१५ पासून मात्र हे डचांच्या अंमलाखाली आहे. येथे दारू गाळणे, आगपेट्या इ. उद्योग चालत असून पर्यटन आणि लघुउद्योग यांचा विकास झपाट्याने होत आहे. हे एक व्यापारकेंद्र असून बॉक्साइट,रम, कॉफी, सोने, साखर यांची येथून निर्यात होते. येथे दोन रेडिओ प्रक्षेपण केंद्रे असून शासकीय भवन, सुरिनाम ग्रंथालय, सुरिनाम म्यूझीयम, वनस्पतिउद्यान व फोर्ट झीलँडीया ही प्रवाशांची आकर्षणे आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.