डनीडन : न्यूझीलंडमधील द. बेटाच्या आग्नेयीस अरुंद खाडीवर खुल्या समुद्रापासून २३ किमी. अंतरावर ओटागो बंदराच्या टोकाशी डनीडन हे शहर वसले आहे. लोकसंख्या ८२,७०० (१९७२). शहर क्राइस्टचर्चच्या नैर्ऋत्येस ३०६ किमी. अंतरावर आहे. उत्तरेकडील क्राइस्टचर्च व दक्षिणेकडील इन्व्हरकार्गिल यांच्याशी ते लोहमार्गाने जोडलेले आहे. ते उत्कृष्ट बंदर असून हवाई वाहतुकीचेही केंद्र आहे. १८४८ मध्ये स्कॉटिश फ्री चर्चची वसाहत म्हणून शहराची स्थापना झाली. १८६१ मध्ये मध्य ओटागो जिल्ह्यात सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यावर शहराची भरभराट झाली आणि देशातील चौथ्या क्रमांकाचे ते मोठे शहर बनले. शहरात पुस्तकालय, प्राणी व वनस्पती संग्रहालय या प्रेक्षणीय इमारती व ‘टाउन बेल्ट’ नावाचे मैदान आहे. येथे कोळसा व सोने यांच्या खाणी असून रसायने, खते, कापड, पादत्राणे, साबण, लोकर, मांस, लोणी या उत्पादनांचे तसेच जहाजे दुरुस्त करण्याचे ते महत्त्वाचे केंद्र आहे.

सावंत, प्र. रा.