पोर्तुगाल : यूरोप खंडातील एक स्वतंत्र देश. या खंडाच्या नैर्ऋत्येकडील आयबेरिया द्वीपकल्पावर तो पश्चिम भागात वसलेला आहे. विस्तार ३६° ५८’ उ. ते ४२° ९’ उ. अक्षांश व ६° ११’ प. ते ९° ३०’ प. रेखांश. क्षेत्रफळ (अझोर्स व मादीरा बेटांसह) ९२,०७२ चौ. किमी. लोकसंख्या ९७,३५,९०० (१९७७ अंदाज). या आयताकृती देशाच्या दक्षिणेस व पश्चिमेस अटलांटिक महासागर तसेच उत्तरेस व पूर्वस स्पेन हा देश आहे. देशाच्या पश्चिमेस सु. १,२०० किमी.वरील ⇨अझोर्स आणि त्यांच्या नैर्ऋत्येस व मोरोक्कोच्या पश्चिमेस ५६० किमी.वरील अटलांटिक महासागरातील ⇨ मादीरा बेटे पोर्तुगालची आहेत. चीनच्या आग्नेय भागातील कँटन नदीमुखाजवळील माकाऊ ही वसाहतही पोर्तुगालची आहे. लिस्बन (लोकसंख्या ८,२९,९००–१९७५ अंदाज) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन : आयबेरिया द्वीपकल्पाचा १५ टक्क्यांहून अधिक भाग व्यापणाऱ्या या देशाच्या भूस्वरूपात, टेगस (तेझू) नदीच्या उत्तरेकडील अतिउंच डोंगराळ प्रदेश व दक्षिणेकडील अतिसखल प्रदेश अशी टोकाची विषमता आढळ्ते. देशाला सु. ८०० किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. भूरचनेच्या दृष्टीने पोर्तुगालचा प्रदेश स्पॅनिश मेसेटा या पश्चिमेकडे उतरत गेलेल्या पठाराच्या पश्चिम कडेला आहे. देशातील ७१·४% पेक्षा जास्त भूमी ३९६ मी.पेक्षा कमी उंचीची व ११·६% भूमी ७०० मी.पेक्षा जास्त उंचीची असून तिच्यातील ३९६ मी.पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशापैकी ९०% भाग टेगस नदीच्या उत्तरेस आहे. पोर्तुगालमधील उंच डोंगराळ प्रदेश व सागरी प्रदेश याच्यांत फारच अंतर असून १,००० मी.पेक्षा जास्त उंचीचे डोंगर समुद्रापासून सु. ५० किमी. अंतरावर आढळतात. देशाच्या उत्तर भागात ईशान्य–नैर्ऋत्य दिशेने पसरलेल्या पेनेदा, लारुको, नुगेरा, मारँओं, कारामूलू, मोंतिमूरू, इश्त्रेला, ॲकॉर, लोझँ इ. महत्त्वाच्या पर्वतरांगा असून इश्त्रेला (१,९९१ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर होय. ते बेहरा प्रदेशातील इश्त्रेला पर्वतरांगेत आहे. ही पर्वतरांग म्हणजे ईशान्य-नैर्ऋत्य वाहणाऱ्या नद्यांच्या झीज कार्यामुळे, त्यांच्या दोन्ही बाजूंस राहिलेले उंचवटे होत. पोर्तुगालचा दक्षिण भाग बव्हंशी लहरीतुल्य मैदानाचा (रोलिंग प्लेन) असून या भागात मोंशीकी व कल्देरँओं या दोन पर्वतरांगा महत्त्वाच्या आहेत. मोंशीकी पर्वतरांगेतील फॉइआ (९०२ मी.) हे सर्वोच्च शिखर आहे. या प्रदेशाचा पूर्व भाग शिस्ट खडकाचा असून पश्चिम भाग मेसोझोइक काळातील चुनखडक व वालुकाश्मांचा बनलेला आहे. टेगस नदीलगतचा दक्षिण भाग शिस्ट, ग्रॅनाइट व संगमवरी खडकांचा बनलेला आहे. या भागाची सरासरी उंची २१२ मी. ते ४८५ मी. यांदरम्यान असून तो पश्चिमेस व दक्षिणेस उतरत जातो. किनारपट्टीपासून डोंगररांगा जवळच असल्याने किनारपट्टीच्या भागात मोठमोठे कडे (सु.१०० मी. उंचीचे) व सुळके आढळतात. देशाच्या आग्नेय सरहद्दीवरील ग्वाद्याना नदीपासून नैर्ऋत्य कोपऱ्यातील सँओं व्हीसेंती भूशिरापर्यंतचा दक्षिण किनारा मुख्यतः सरळ उभ्या कड्यांचा आहे. या भूशिराच्या उत्तरेस टेगस नदीच्या मुखापर्यंतचा किनारा कमी उताराचा आहे. टेगस नदीमुखाच्या उत्तरेकडे किनारी प्रदेश सींत्रा टेकड्यांपर्यंत एकदम चढत जातो. त्यांच्या उत्तरेस वाळूच्या लहान टेकड्यांचा किनारा व त्यांदरम्यानच आव्हेरू दलदली आहेत. डोरू नदीमुखाच्या उत्तरेस स्पेनच्या सरहद्दीवरील मीन्यो नदीमुखापर्यंतचा किनाराही सरळ उभ्या कड्यांचा आहे. या किनारी भागातच देशातील लिस्बन, ओपोर्तो, सितूबल यांसारखी बंदरे आहेत. मीन्यो, डोरू, टेगस व ग्वाद्याना या देशातील चार प्रमुख नद्या असून त्या सर्व स्पेनमध्ये उगम पावून पश्चिमेस अटलांटिक महासागरास मिळतात. डोरू ही पोर्तुगालमधील सर्वात लांब नदी असून तिची या देशातील लांबी ३२० किमी. आहे. यांशिवाय देशातील इश्त्रेला पर्वतरांगेत उगम पावणारी मोंदेगू (सु. २२९ किमी.), व्होगा (१३६ किमी.), सादू व टोगस नदीची उपनदी झेझिरी इ. नद्या महत्त्वाच्या आहेत. त्यांपैकी काही जलवाहतुकीस उपयुक्त आहेत.

हवामान : समुद्रसान्निध्यामुळे पोर्तुगालचे हवामान सम बनले आहे. हवामानदृष्ट्या देशाचे वायव्य, ईशान्य व दक्षिण असे तीन विभाग होतात. वायव्य भागात पावसाचे प्रमाण जास्त असून हिवाळा अतिथंड असतो. तेथील पर्वतशिखरांवर बर्फ कित्येक महिने असते. उन्हाळा मात्र शीतल असतो. ईशान्य भागात हिवाळा कडक आणि दीर्घकालीन असून उन्हाळा तीव्र असतो. दक्षिण भागात सर्वसाधारणपणे हवामान भूमध्यसामुद्रिक असून पाऊस कमी, हिवाळा सौम्य व उन्हाळा दीर्घकालीन असतो. जानेवारीत वायव्य व ईशान्य भागांत सरासरी तपमान अनुक्रमे ११° से. व ७° से. असते. इश्त्रेला या पर्वतीय भागात तपमान ०° से.पेक्षाही कमी आढळते. ऑगस्ट हा येथील कमाल उष्णतेचा महिना असून या महिन्यात सरासरी तपमान २०° से. असते. लिस्बन येथे जानेवारी व ऑगस्ट या महिन्यांतील सरासरी तपमान अनुक्रमे ८° से. व २८° से. असते. उत्तर भागात पावसाचे प्रमाण १२५ ते १५० सेंमी., मध्य भागात ५० ते ७० सेंमी. व दक्षिण भागात ५० सेंमी. पेक्षा कमी पाऊस पडतो. देशाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८७·५ सेंमी. आहे.


वनस्पती व प्राणी : पोर्तुगालला ‘यूरोपची बाग’ असे म्हटले जाते कारण देशात वृक्षवेलींची तसेच फुलाफळांची विविधता व वैपुल्य आढळते. २,७०० च्यावर वनस्पतिप्रकार आढळतात. त्यांत अटलांटिक पानझडी, आफ्रिकन सदाहरित आणि भूमध्यसामुद्रिक यांची मिसळ आहे. उत्तर विभागात पाइनचे दोन व ओकचे तीन प्रकार आढळतात. ओक, पाइन, चेस्टनट, एल्म, लिंडन, पॉप्लर, युकॅलिप्टस या वनस्पती सर्वत्र आढळतात. पश्चिम आलेंतेझू भागात बूच ओक, तर सादू खोऱ्यात छत्री पाइन आहे. दक्षिणेत बदाम, अंजीर, तर देशभर ऑलिव्हची फळझाडे आहेत. टेगस-सादू नदीखोऱ्यांत तसेच आव्हेरूजवळील दलदलीत पाणथळ वनस्पतिप्रकार असून पर्वतीय भागात अल्पाइन वनस्पतिप्रकार आढळतात.

येथे रानशेळी, रानडुक्कर, हरिण, लांडगा, लिंक्स, कोल्हा, ससा, पाली, सरडे, साप इ. प्राणी आढळतात. दयाळ, कोकिळ, बलाक, लाल तितर, गिधाड, ससाणा, स्नाइप, क्केल असे विविध पक्षी असून उन्हाळ्यात स्थलांतर करणारे आफ्रिकन पक्षीही देशाच्या किनारी भागात आढळतात. सागरात ट्यूना, सार्डीन, कालवे इ. मासे सापडतात.

ओक, शा. नि.; फडके, वि. शं.

इतिहास : इ. स. पू. आठव्या शतकात आयबेरियाच्या द्वीपकल्पात राहणाऱ्या लोकांस आयबेरियन म्हटले जाई. त्यानंतर तीन शतकांनी टेगस नदिच्या मुखाजवळ ग्रीकांनी वसाहती उभारल्या. इ. स. पू. दुसऱ्या शतकात रोमन सत्ता येथे स्थापन झाली. रोमन साम्राज्याच्या ल्यूसिटेनीया प्रांतात आधुनिक पोर्तुगालच्या बहुतेक प्रदेशाचा समावेश होता. सु. चारशे वर्षांच्या रोमन अंमलात येथे अनेक शहरे विकसित झाली. सर्वत्र पक्क्या सडका बांधल्याने दळण-वळण सुलभ झाले. रोमन संस्कृतीचा सर्वत्र प्रसार झाला. आयबेरियन लोकांच्या बोलीभाषा लुप्त होऊन लॅटिन भाषेचा प्रसार झाला.

इ.स. पाचव्या शतकात जर्मन रानटी टोळ्यांच्या स्वाऱ्यांनी अन्य यूरोपीय देशांप्रमाणे पोर्तुगालही त्रस्त झाला. त्यांपैकी व्हिसिगॉथांचे राज्य या प्रदेशात स्थापन झाले. नंतर इ. स. सातव्या शतकाच्या अखेरीस येथे अरब व मूर यांची इस्लामी राजवट स्थापन झाली. पुढील दोन शतकांत त्यांना विरोध करणारी लहानलहान ख्रिस्ती राज्ये स्पेन-पोर्तुगालमध्ये उदयास आली. त्यांपैकी डोरू आणि मीन्यो नद्यांच्या दोआबातील ओपोर्तो हे एक होते. ओपोर्तोच्या प्राचीन पोर्ट्‌स नावावरूनच ह्या देशाला पोर्तुगाल म्हणू लागले. पुढे लेऑन आणि कॅस्टीलचा राजा फर्डिनँडच्या आवाहनावरून बर्गंडीचा काँत आंरी इस्लामविरोधी युद्धात सामील झाला. अफांसोने आपली कन्या सेंट तेरेसा त्याला अर्पण करून आंदण म्हणून ओपोर्तो व कोईंब्रा जिल्हे देऊन त्याला पोर्तुगालचा सरदार केले. हेंरी व तेरेसाचा मुलगा पहिला अफांसो (कार. ११३९–८५) पोर्तुगालचा पहिला स्वतंत्र राजा. त्याने आलगार्व्हा सँटरेम जिंकून आपल्या राज्याचा झपाट्याने विस्तार केला. ११४७ मध्ये लिस्बन मिळविले व पोर्तुगीज सत्तेची भक्कम पायावर उभारणी केली.

एंरीकिश अफांसोचा निपणतू दों दिनीश (कार. १२७९–१३२५) याने राज्याची आर्थिक स्थिती व न्यायव्यवस्था सुधारून आरमार उभारले आणि विद्या-कलांना उत्तेजन दिले. साहजिकच त्याची गणना पोर्तुगालच्या श्रेष्ठ शासकांत होते. यानंतर पोर्तुगालची कॅस्टीलविरुद्ध युद्धे सुरू झाली. त्यांत इंग्लंडच्या साहाय्याने पोर्तुगालची सरशी होऊन १३८५ च्या आल्‌जुबार्रोतच्या विजयाने पोर्तुगीज सत्ता अधिकच दृढ झाली.

चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सोळाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पोर्तुगालची सर्व प्रकारे भरभराट झाली. पहिल्या दों जुआंवच्या कारकीर्दीत देशाची राज्यघटना तयार होऊन कारभाराची घडी व्यवस्थित बसली, व्यापार-उदीमाला उत्तेजन मिळाले व अनेक महाविद्यालये स्थापन झाली. त्या वेळी आरमाराची वाढ करण्यात येऊन समुद्रपर्यटनाला उत्तेजन देण्यात आले. दों जुआंवचा मुलगा दर्यावर्दी दों एंरीकिश याच्या उत्तेजनाने धाडसी दर्यावर्दी पुढे आले व त्यांनी अनेक सफरी करून मादीरा, पोर्तु सांतु, कानेरी बेट, अझोर्स बेट इत्यादींचा शोध लावला. दुसऱ्या जुआंवच्या कारकीर्दीतही धाडसी सफरींची ही परंपरा चालू राहिली. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेकडे सफर करताना १४८८ मध्ये बारथॉलोम्यू डीअश हा केप ऑफ गुडहोपला पोहोचला. १४९२ मधील कोलंबसच्या अमेरिका खंडाच्या शोधाने साहसी दर्यावर्दी लोकांना अधिकच उत्तेजन मिळाले. परिणामतः १४९८ मध्ये वास्को द गामा आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात उतरला. १५०० मध्ये पेद्रो काब्रालने ब्राझीलचा शोध लावून दक्षिण अमेरिकेतील पहिली पोर्तुगीज वसाहत स्थापन केली. हळूहळू द. अमेरिकेप्रमाणेच आशिया, आफ्रिका या खंडांतही पोर्तुगालच्या वसाहती स्थापन झाल्या. पूर्वेकडील मसाल्याचा व्यापार ताब्यात आल्याने पोर्तुगालला अमाप फायदा होऊ लागला व लिस्बनची गणना यूरोपातील प्रसिद्ध शहरांत होऊ लागली. आर्थिक सुबत्तेमुळे विद्या, कला, साहित्य, शास्त्र इत्यादींना उत्तेजन मिळून पोर्तुगालचे एकूण जीवन समृद्ध झाले.

व्यापार व वसाहतींच्या सुरक्षिततेसाठी सैन्य व आरमार आवश्यक झाले. वसाहतींच्या शासनासाठी कार्यक्षम यंत्रणा उभारणेही अपरिहार्य झाले. या उपायांनी भारतात वा अन्यत्रही पोर्तुगीज वसाहती झपाट्याने वाढल्या. पण पोर्तुगालसारख्या लहान देशाला हा विस्तार पेलण्यासारखा नव्हता. इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड आदींच्या स्पर्धेने पोर्तुगालच्या अडचणी वाढल्या. त्यांनी अंगीकारलेल्या धर्मप्रसाराच्या धोरणाने भारतात हिंदु-मुसलमानांनी त्यांना कडवा विरोध केला. त्यामुळे भारतातील त्यांच्या सत्तेस उतरती कळा लागली व गोवा, दीव, दमण एवढाच प्रदेश फक्त पोर्तुगालच्या ताब्यात राहिला. अन्यत्रही पोर्तुगीजांना कडवा विरोध होऊन मसाल्याच्या बेटांत डचांचा व चीनमध्ये इंग्रज-फ्रेंचांचा प्रभाव वाढला. अशा रीतीने सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून पोर्तुगीज सत्तेच्या ऱ्हासास सुरुवात झाली. शेती व अन्य उत्पादक व्यवसायांकडे दुर्लक्ष, अवाढव्य साम्राज्यव्यवस्थेस आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाचा व समर्थ आरमाराचा अभाव, ही पोर्तुगालच्या ऱ्हासाची प्रमुख कारणे होत. स्पेन-पोर्तुगालमधील वितुष्टामुळेही ह्या दुर्बलतेत भरच पडली.

दों सबाश्तियांव (कार. १५५७–७८) हा अल्पवयी राजा १५५७ मध्ये गादीवर आल्याने शासन दुबळे झाले. वयात येताच त्याने मोरोक्को जिंकण्याचा साहसी प्रयत्न केला परंतु १५७८ च्या आल्‌कासारकीव्हीरच्या लढाईत दों सबाश्तियांवसह पोर्तुगीजांची सबंध तरुणपिढीच कापली गेली. यानंतर दोनच वर्षांनी ११३९ मध्ये सुरू झालेली आव्हिश घराण्याची सत्ता संपुष्टात आली व पोर्तुगालचे राज्य स्पेनच्या दुसऱ्या फिलिपला (कार. १५८०–९८) मिळाले.

फिलिपने पोर्तुगालमधील महत्त्वाच्या जागा पोर्तुगीजांनाच देण्याचे धोरण ठेवल्याने त्याला फारसा विरोध झाला नाही. परंतु पुढे हे धोरण सुटल्याने पोर्तुगाल म्हणजे स्पेनची वसाहत असे पोर्तुगीजांस वाटून स्पेनच्या शासनाला तीव्र विरोध होऊ लागला. त्या काळी अवघ्या यूरोपात स्पेनविरोधी वातावरण होते. स्पेनच्या विविध युद्धांत भाग घ्यावा लागल्याने पोर्तुगालच्या अर्थव्यवस्थेवरही बेसुमार ताण पडला आणि लोकमत स्पेनविरुद्ध खवळले. परिणामतः डिसेंबर १६४० मध्ये लिस्बनला बंड होऊन ब्रागॅन्सचा ड्यूक चौथा जुआंव (कार. १६४० – ५६) पोर्तुगालच्या गादीवर बसला. यावेळी शेजाऱ्याकडून उपद्रव चालू होताच. चौथ्या जुआंवनंतर सहावा अफांसो (कार. १६५६–६७) गादीवर आला. त्याच्या अकार्यक्षम प्रशासनव्यवस्थेमुळे दुसरा पेद्रो (कार. १६६७–१७०६) या त्याच्या भावाकडे राज्याची सूत्रे सोपविण्यात आली. तत्पूर्वी १६६२ मध्ये राजकन्या कातारीनचा विवाह इंग्लंडच्या दुसऱ्या चार्ल्‌सशी होऊन इंग्लंड व पोर्तुगालमधील संबंध अधिकच निकटचे बनले. १७०३ च्या मिथूएन तहाने दोन्ही देशांत आर्थिक सवलतींचा करार होऊन पोर्तुगीज मद्यावरील जकात इंग्लंडने व इंग्लिश यंत्रादी मालांवरील जकात पोर्तुगालने कमी केली.

पोर्तुगाल राजकीय दृष्ट्या अठराव्या शतकात इंग्लंडचे व सांस्कृतिक दृष्ट्या स्पेनचे अंकित होते. १७५५ चा लिस्बनचा प्रचंड भूकंप व ⇨ मार्केज् द पोंबालची कार्यक्षम कारकीर्द या अठराव्या शतकातील महत्त्वाच्या घटना होत.

फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ पोर्तुगालला फारच हलाखीचा गेला. १८०७ मध्ये फ्रेंच सेना पोर्तुगालमध्ये उतरल्या, तेव्हा राजघराणे ब्राझीलला गेले आणि तेथुन पोर्तुगालचे शासन काही वर्षे चालले. नेपोलियनच्या पराभवानंतर पोर्तुगाल पुन्हा स्वतंत्र झाला.

पोर्तुगालमध्ये लोकशाहीच्या कल्पनांनी एकोणिसाव्या शतकात मूळ धरले. संविधानात्मक लोकशाहीविरुद्ध निरंकुश राजेशाही हा वाद विकोपाला जाऊन देशात अराजकता माजली. १८१५ मध्ये ब्राझीलचे स्वतंत्र राज्य होऊन राजपुत्र दों पेद्रोला तेथाल राजपद मिळाले.


राजा दों कार्लूश यास १९०६ मध्ये काढून टाकण्यात येऊन मुख्यप्रधान जुआंव फ्रँकूला सर्वाधिकारी नेमण्यात आले. नव्या राजवटीत अनेक प्रकारच्या शासकीय सुधारणांच्या योजना आखल्या जात असतानाच दि. १ फेब्रुवारी १९०८ रोजी राजा व राजपुत्र दोघांचेही खून झाले आणि दुसरा मॅन्युएल याला गादीवर बसविण्यात आले. ब्रागॅन्स घराण्याची सत्ता १९१० पर्यंत टिकली. या काळात सु. दीडशे वर्षे स्पेनने पोर्तुगाल जिंकण्याचे अनेक प्रयत्न केले तथापि इंग्लंडने पोर्तुगालची सतत बाजू घेऊन स्पेनचे हे प्रयत्न निष्फळ ठरविले. या घराण्याच्या अंतानंतर दोनच वर्षांनी राज्यक्रांती होऊन पोर्तुगीज प्रजासत्ताकाची स्थापना झाली. या प्रजासत्ताकाचा वीस-बावीस वर्षांचा इतिहास पक्षोपपक्षांतील भांडणे, राजेशाहीस विरोध आणि अंतर्गत कारस्थाने यांनी भरलेला आहे. प्रजासत्ताकाच्या धर्मपीठाविरुद्धच्या धोरणाने पोपशी तंटा सुरू झाला. त्याचे पर्यवसान १९१३ मध्ये पोपशी संबंध तोडण्यात झाले.

पहिल्या महायुद्धात पोर्तुगालने इंग्लंडचा पक्ष घेतला व पोर्तुगीज सेना जर्मनीविरुद्ध अनेक आघाड्यांवर लढल्या. या युद्धाने पोर्तुगालवर फारसा ताण पडला नाही पण अंतर्गत अराजकामुळे देश अगदी  खिळखिळा झाला होता. १९११ ते १९१५ या दरम्यान शासनात सात वेळा सत्तांतर झाले. १९१५ मध्ये जनरल पिमेंत द कास्त्रूने लष्करी हुकूमशाही स्थापण्याचा प्रयत्न केला पण तो फासला. त्यानंतर दोनच वर्षांनी सिदोन्यू पाइश पोर्तुगालचा अध्यक्ष झाला. त्याच्या शासनाला अनेक राष्ट्रांनी मान्यता दिली व त्यानेही देशहिताच्या अनेक योजना अंमलात आणल्या. १४ डिसेंबर १९१८ रोजी त्याचा खून झाला व सर्वत्र अंदाधुंदी माजली. हिंसाचाराला ऊत येऊन ऑक्टोबर १९२१ मध्ये पंतप्रधानांसह अनेक उच्चपदस्थांचे खून झाले. यानंतरच्या पाच वर्षांत ४३ मंत्रिमंडळे गडगडली. साहजिकच देशाची अर्थव्यवस्था कोलमडली व दोनदा लष्कराने बंड केले. जून १९२६ मध्ये सर्व कारभार लष्कराकडे जाऊन जनरल अँतॉन्यू कर्मोना (१८६९–१९५१) पोर्तुगालचा पंतप्रधान झाला. १९५१ पर्यंत त्याने हे पद भूषविले. लष्करी अधिकाऱ्यांना देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे मार्ग सापडेनासे झाल्याने कोईंब्रा विद्यापीठातील अर्थशास्त्राचा प्राध्यापक ⇨ अँतॉन्यू सालाझारला अर्थमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

लवकरच सालाझार पोर्तुगालचा सर्वाधिकारी झाला. १९३३ च्या घटनेनुसार भाषण, मुद्रण इ. स्वातंत्र्यांवर त्याने अनेक नियंत्रणे बसविली. आर्थिक व्यवहारांवरही कडक निर्बंध लादण्यात आले. याच काळात स्पेनमध्ये अंतर्गत यादवी सुरू असल्याने सालाझारला जागरूक रहावे लागले. डाव्या गटाशी पटणे शक्य नसल्याने स्पेनमध्ये सालाझारने जनरल फ्रँकोच्या पक्षाला साह्य केले.साहजिकच स्पेनच्या फ्रँको सरकारशी पोर्तुगालचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस पोर्तुगाल तटस्थ राहिला पण दोस्त राष्ट्रांच्या सरशीची चिन्हे दिसताच सालाझारने इंग्लंड-अमेरिकेला पोर्तुगालच्या तर्सेइरा, सांता मारीआ इ. बेटांत हवाई व नाविक तळ उभारण्यास अनुमती दिली. अतिपूर्वेकडील तिमोर जपानने हस्तगत केल्याने पोर्तुगीज लोकमत साहजिकच प्रक्षुब्ध झाले. त्यामुळे सालाझारला तटस्थ राहणे कठीण झाले.

युद्वोतर काळात रशियाच्या विरोधामुळे पोर्तुगालला संयुक्त राष्ट्रे या संघटनेचे सभासदत्व १९५५ पर्यंत मिळू शकले नाही. तत्पूर्वी १९४९ मध्ये पोर्तुगाल नाटो संघटनेत सामील झाला. १९६० मध्ये यूरोपीय खुल्या व्यापार संघटनेत पोर्तुगालला स्थान मिळाले.

अंगोला, मोझँबीक, गिनी, भारत येथील पोर्तुगीज वसाहतींत सालाझारशाहीविरुद्ध प्रक्षुब्ध लोकमत युद्वोत्तर काळातील पोर्तुगीज इतिहासाचे मुख्य सूत्र झाले. भारत स्वतंत्र होताच फ्रेंच-पोर्तुगीजादी परकीयांनी भारतातील वसाहती सोडाव्यात, अशी भारताची इच्छा होती पण शांततेच्या कोणत्याही मार्गाने गोवा मुक्त होणे अशक्य झाल्याने १९६१ मध्ये पोलीस कारवाईने गोवा, दीव, दमण मुक्त करणे भारताला भाग पडले. खुद्द पोर्तुगालमध्येही सालाझारशाहीविरुद्ध लोकमत असल्याचे १९६१ पासून त्याविरुद्ध पडलेल्या मतांवरून दिसते. १९६२ मध्ये बेहरा प्रांतात प्रत्यक्ष बंडाळी झाली.

सालाझारनंतर मर्सेलू कातानू हा पंतप्रधान झाला (१९६८). त्याने सामान्यतः सालाझारची बहुतेक सर्व धोरणे पुढे चालविली. कामगार संघटनांचे गुप्त पोलीस संघटनेच्या साहाय्याने खच्चीकरण केले. तेव्हा २५ एप्रिल १९७४ रोजी लष्करी दलाच्या संघटनेने (आर्मड फोर्सिस मुव्हमेंट) अँतॉन्यू स्पीनुलाच्या नेतृत्वाखाली रक्तहीन अवचित सत्तांतर घडवून आणले. स्पीनुला पाच महिने राष्ट्राध्यक्ष होता. या काळात समाजवादी व कम्युनिस्ट पक्ष अधिक प्रबल झाले. याच काळात आफ्रिकेतील अंगोला, गिनी बिसाऊ, मोझँबीक व रीओमुनी या पोर्तुगीज वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात आले. त्याचप्रमाणे जुन्या मंत्र्यांना काढून टाकण्यात आले व गुप्त पोलीस संघटना रद्द करण्यात आली. मोठ्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. स्पीनुलाचा राजीनामा आणि त्यानंतर त्याचा देशत्याग यांचा लष्करी चळवळीच्या प्रभावावर काहीच अनिष्ट परिणाम झाला नाही. उलट झूझेअ अझव्हेदू याच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाकडे त्या पक्षाचे नेते आकृष्ट झाले. राष्ट्रीय संविधान समितीच्या निवडणुका एप्रिल १९७५ मध्ये घेण्यात आल्या. कोणतेही सरकार सत्तारूढ झाले तरी त्यावर आपले वर्चस्व राहावे, म्हणून लष्करी दलाच्या चळवळीने या निवडणुकांस परवानगी दिली. माऱ्यू स्वारशच्या समाजवादी पक्षाला या निवडणुकीत ३८% फ्रांसिश्कू कार्नीरोच्या पॉप्युलर डेमॉक्रटिक पक्षाला २५% मते मिळाली. तथापि या पक्षांच्या कोणत्याही नेत्यास सैनिकी शासनाने सत्तेत सहभागी करून न घेतल्याने हे राजकीय पक्ष प्रक्षुब्ध झाले. १९७६ मध्ये अँतॉन्यू यॅनिश याची राष्ट्राध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यावर हा प्रक्षोभ कमी झाला व स्वारश याची पंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्या नेतृत्वाखालील शासनाला आर्थिक व राजकीय परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. यातूनच अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन डिसेंबर १९७७ मध्ये विधिमंडळात स्वारश सरकारचा पराभव झाला परंतु राष्ट्राध्यक्षाने त्यास पुन्हा पाचारण करून पंतप्रधान केले. त्याचे संयुक्त सरकार सहा महिने अधिकारावर होते तथापि संयुक्त मंत्रिमंडळातील पक्षांच्या संघर्षात स्वारशला बडतर्फ करण्यात येऊन आल्फ्रेदा कॉश्ता यास पंतप्रधान करण्यात आले परंतु त्याला स्थिर सरकार स्थापण्यात अपयश आल्यामुळे चौथ्या काळजीवाहू सरकारचा पंतप्रधान म्हणून कार्लूश दी पींतू याची नियुक्ती झाली (१९७८) तथापि १९७९ मध्ये काळजीवाहू सरकारचे नेतृत्व कु. मारिया द लूर्दिश पिन्तासिल्गू या महिलेकडे सोपविण्यात आले.

ओक, द. ह.

राजकीय स्थिती : पोर्तुगालची राजेशाही १९१० मध्ये संपुष्टात आली आणि तेथे प्रजासत्ताक शासन स्थापन झाले तथापि पक्षोपक्षांतील भांडणे व बेबंदशाही यांमुळे अखेर सत्ता लष्कराच्या हाती केंद्रित झाली. १९२६ मध्ये जनरल अँतॉन्यू कर्मोना हा राष्ट्राध्यक्ष झाला व त्याने लष्करी हुकूमशाही जारी केली. १९३२ मध्ये अँतॉन्यू सालाझारची पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली. त्याने १९३३ मध्ये नवीन संविधान जाहीर केले.


या नव्या संविधानानुसार पोर्तुगाल हे श्रेणीसत्ताक प्रजासत्ताक (कार्पोरेटिव्ह स्टेट) झाले तथापि या संविधानास प्राधिकारवादी तत्त्वांची बैठक होती. पोर्तुगीज वसाहती या पोर्तुगालच्या साम्राज्याचा एक अविभाज्य घटक आहेत, अशी धारणा या संविधानात गर्भित होती. उदारमतवादी राजकीय पक्षांच्या हालचालींवर शासनाचे नियंत्रण होते. १९७४ पर्यंत सार्वमताने मान्य झालेले १९३३ चे संविधानच अंमलात होते. २५ एप्रिल १९७४ च्या रक्तहीन अवचित सत्तांतरानंतर हे संविधान रद्द करण्यात आले. जवळजवळ हुकूमशाहीच्या स्वरूपाची असलेली केंद्रशासनसंस्था अधिक उदारमतवादी धोरणांचा अवलंब करू लागली. व्यक्तिस्वातंत्र्य व मूलभूत अधिकार नागरिकांना प्राप्त झाले. डाव्या पक्षांना राजकरणात हस्तक्षेप करणे सोयीचे झाले. सैनिकी दलाच्या चळवळींचा प्रभाव वाढून राजकीय पक्षांवरील विविध निर्बंध दूर करण्यात आले व खुल्या वातावरणात संविधान समितीच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यांत समाजवाद्यांना बहुमत मिळून नवीन संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. एप्रिल १९७६ मध्ये समाजवादी तत्त्वांवर आधारलेले नवीन संविधान जाहीर करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी मंडळ (कौन्सिल ऑफ द रेव्हल्यूशन), विधिमंडळ (असेंब्ली ऑफ द रिपब्लिक) यांच्या तरतुदी या नव्या संविधानात होत्या. राष्ट्राध्यक्षाची निवड पाच वर्षांकरिता प्रत्यक्ष मतदानाने होते. राष्ट्राध्यक्ष हा क्रांतिवादी मंडळाच्या सल्ल्याने, निवडून आलेल्या पक्षांपैकी एका पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून व त्याच्या साह्याने मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.

क्रांतिकारी मंडळात चार उच्च लष्करी अधिकारी व १४ निवडलेले अधिकारी असतात. त्यांचे काम अध्यक्षाला सल्ला देणे व संविधानाचे संरक्षण करणे हे आहे.

संविधानानुसार विधिमंडळात कमीत कमी २४० व जास्तीत जास्त २५० सभासद प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने निवडले जातात. या विधिमंडळाची मुदत चार वर्षे  असून १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क असतो. राष्ट्राध्यक्षास रोधाधिकाराचा (व्हेटोचा) हक्क असून तो पूर्णतः क्रांतिकारी मंडळाच्या सल्ल्याने वागतो. पंतप्रधान हा कार्यकारी मंडळाचा प्रमुख असून प्रशासकीय जबाबदारी तो आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या व सचिवांच्या सहकार्याने पार पाडतो.

विधिमंडळाच्या १९७६ साली निवडणूका झाल्या. त्यांत समाजवाद्यांना ३५ टक्के मते मिळाली. त्यांनी अल्पमताचे सरकार बनविले तथापि शासनावर क्रांतिकारी मंडळाचा प्रभाव अधिक आहे. याच निवडणुकीत १४ पक्षांनी भाग घेतला. त्यांपैकी सोशॅलिस्ट, डेमॉक्रटिक पॉप्युलर, सोशल डेमॉक्रटिक सेंटर व कम्युनिस्ट हे महत्त्वाचे पक्ष होते. पोर्तुगालच्या प्रशासनात पॅरिश, नगरपालिका व प्रशासकीय विभाग यांसारख्या महत्त्वाच्या स्थानिक संस्था आहेत.

देशाच्या न्यायव्यवस्थेत दंड, नागरी, प्रशासकीय, कामगार आणि आर्थिक अशी विविध प्रकारची न्यायालये आहेत. न्यायदानासाठी देशाचे एकूण १७१ कॉमार्कस (स्वतंत्र विभाग) पाडले असून त्या प्रत्येकाचे एक कनिष्ठ न्यायालय आहे. लिस्बन, कोईंब्रा आणि ओपोर्तो येथे प्रत्येकाचे एक अपील न्यायालय असून उच्चतम न्यायालय लिस्बन येथेच आहे. न्यायदानात फाशीची शिक्षा रद्द केली आहे.

संरक्षणव्यवस्था : प्रत्येक नागरिकाला किमान दोन वर्षे सक्तीची लष्करी सेवा करावी लागते. १९७८ च्या अर्थसंकल्पात २१,७०० दशलक्ष एस्क्यूदोंची (एकूण खर्चाच्या १७ टक्के) तरतूद संरक्षणासाठी मुक्रर केली होती. एकूण सैन्यापैकी भूसेना ३७,३०० नौसेना १२,४१८ व हवाई सेना ९,६०० असून छत्रीधारी सैन्य संख्या ३,३०० होती. १९७८ मध्ये सैनिकी संघटनेची पुनर्रचना करण्याची योजना हाती घेण्यात आली. पोर्तुगाल नाटोचा सभासद आहे.

देशपांडे. सु. र.

आर्थिक स्थिती : पोर्तुगाल हा बव्हंशी कृषिप्रधान देश असून निम्म्या प्रजेची उपजीविका शेतीवर होते. १९२६ च्या क्रांतीनंतर देश शंभर वर्षांच्या आर्थिक अराजकातून बाहेर पडू लागला. १९३३ पासूनचा सर्वाधिकारी सालाझार हा अर्थशास्त्रज्ञच असल्यामुळे पोर्तुगालमध्ये संथ पण निश्चित आर्थिक प्रगती दिसून येत आहे. १९५३ पासून चार षड्‌वार्षिक योजना हाती घेण्यात आल्या. पहिलीमध्ये विद्युत् शक्तिसाधनांचा विकास आणि नौकाबांधणी उद्योगाची सामग्री उपलब्ध करण्यावर भर होता आणि दुसरीत (१९५९– ६४) मच्छीमार उद्योगाला आधुनिक स्वरूप देणे, नवे कारखाने सुरू करणे आणि आलेंतेझू विभागातील कृषिउद्योगाला पाटबंधाऱ्यांसारख्या सोयींनी मदत करणे ही उद्दिष्टे होती. पहिल्या योजनेत भांडवल मुख्यतः सरकारी होते. दुसऱ्या योजनेत शेतीत व कारखानदारीत स्पष्ट प्रगती दिसून आली. तथापि प्रमाण व उत्पादनक्षमता या बाबतींत कृषिउद्योग अद्यापि विकास पावत नाही, ही गोष्ट अनेक वर्षे देशाच्या प्रगतीआड येत आहे. जमीनसुधारणा हीच मुख्य समस्या आहे.

कृषी : पर्वतप्रदेशापासून किनाऱ्यापर्यंत जमिनीचे अनेक प्रकार आढळतात. गवताळ डोंगर, कुरणांखालील जमीन, चुनखडीमिश्रित उतारावरची जमीन, कोरड्या प्रदेशातील कमी कसाची जमीन, नदी खोऱ्यांतील गाळमाती, रेतीमिश्रित किनारी प्रदेशातील जमीन आणि दलदलींचा प्रदेश इ. जमिनीचे अनेक प्रकार देशात आहेत. सु. ४५% जमीन लागवडीखाली असून सु. २८% श्रमबल कृषिउद्योगात गुंतले आहे. १९७७ मध्ये शेती, जंगले व मृगया ह्या क्षेत्रांत ७·८९ लक्ष लोक गुतंलेले होते. टेगस नदीमुखाकडे मर्यादित क्षेत्रात पाटाच्या पाण्यावर शेती होते. लहान शेतांतून ५ मी.पर्यंत खोलीच्या विहिरींतून तरफेच्या यंत्रणेने पाणी शेंदून पिकांना देण्यात येते. काही ठिकाणी गाढवाच्या फेऱ्यांनी चालणारी प्रचंड रहाटगाडगी प्रवाहांतून पाणी उचलून पाटातून सोडतात. उत्पादनक्षम भूमीपैकी एकदशांश जमिनीवर वृक्षलतांपासून, विशेषतः ऑलिव्ह, बूच वृक्ष आणि द्राक्षवेलींपासून, उत्पन्न काढण्यात येते. ४०% द्राक्षमळे दारूसाठी प्रसिद्ध असलेल्या मादीरा प्रांतात आहेत. डोरू खोऱ्यातील ‘पोर्टवाइन’व ‘मादीरा’हे मद्यप्रकार जगप्रसिद्ध आहेत. १९७६ मध्ये दारूचे उत्पादन ९·५८ लक्ष मे. टन झाले. दारूखालोखाल पोर्तुगालचे महत्त्वाचे उत्पादन ऑलिव्ह तेल हे असून त्याच्या उत्पादनात पोर्तुगालचा जगात तिसरा क्रम लागतो. १९७५ मध्ये ऑलिव्ह तेलाचे उत्पादन ५·२५ लक्ष हेक्टोलिटर झाले. ऑलिव्ह वृक्षांच्या रांगा देशभर पसरलेल्या असूनही इश्त्रेला, मादीरा, आलेंतेझू या विभागांत मिळून ऑलिव्ह तेलाची ६०% निर्मिती होते. १९७७ मध्ये मुख्य शेतीउत्पन्न पुढीलप्रमाणे होते (हजार मेट्रिक टनांत) : मका ४४२, गहू २२४, तांदूळ ११२, राय १०३, ओट ६०, बार्ली ३९, बटाटे १,२०१, दूध (गाई-मेंढ्या-बकऱ्या) अनुक्रमे ५७७, ८१ व ३७, लोकर ३८, अंडी ५२२, कोंबड्यांचे मांस १२५. दक्षिणेतील आलगार्व्ही प्रांतात बदाम व अंजीर या सुक्या फळांचे उत्पादन महत्त्वाचे. १९७५ मध्ये निरनिराळ्या फळांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे हजार मे. टनांत) : अंजीर १९५, सफरचंदे १५८, संत्री १२३, ऑलिव्ह फळे २५७. लागवडीखाली नसलेली जमीन वनाच्छादित किंवा कुरणांची. टेगसच्या उत्तरेस शेतकामासाठी बैल वापरतात. वायव्येकडील नदीखोऱ्यांतून गाईंची जोपासना होते, रिबा तेजो प्रदेशात घोड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते. दक्षिणेत चराईचे दुर्भिक्ष असल्यामुळे कामाला खेचरे वापरतात. आलेंतेझू विभागात देशातील ३३% मेंढ्या व शेळ्या आहेत. या जनावरांच्या उन्हाळी चराईसाठी इश्त्रेला टेकड्यांना महत्त्व आहे. दुसऱ्या योजनेत पशुपालन धंद्याच्या विकासावर भर देण्यात आला आहे. १९७७ मध्ये पुढीलप्रमाणे पशुधन होते (आकडे हजारांत) : गुरे १,०७० मेंढ्या ३,८५० डुकरे १,९८० बकरे ७४० घोडे ३० गाढवे-खेचरे २६४ कोंबड्या १७,५००. पोर्तुगीज कृषीच्या मुख्य समस्या जमीनसुधारणा, यांत्रिकीकरण आणि स्वयंपूर्णता या म्हणता येतील. शेतजमिनीचे लहानलहान तुकडे आर्थिक दृष्ट्या किफायतशीर ठरत नाहीत.


शक्तिसाधने : जलविद्युत्‌शक्ती केवळ एकतृतीयांश आणि उर्वरित औष्णिक वीजनिर्मितीपैकी ८०% आयात केलेल्या कोळशावरची, अशी स्थिती १९४५ पर्यंत होती. त्यानंतर डोरू, झेझिरी, पॉन्सुल व सादू या नद्यांवर नवी धरणे बांधण्यात आल्यावर चित्र पूर्णपणे बदलले व सांप्रत ८०% वीजपुरवठा जलविद्युत्‌शक्तीवर, तर उर्वरित २०% औष्णिक विद्युत् निर्मितीकेंद्रांकडून होतो. १९७४ मध्ये वीजवापर दर माणशी १,२४९ किवॉ. तास झाला. यावरून कारखानदारीचा विकास दिसून येतो. १९७६ मध्ये वीजउत्पादन पुढीलप्रमाणे झाले : जलविद्युत् : ४८३·६ कोटी किवॉ. ता. औष्णिक विद्युत् ५२०·९ कोटी किवॉ. ता.

खनिज संपत्ती, जंगले, मच्छीमारी : खाणउद्योग सर्वस्वी शासनाच्या ताब्यात. थोड्याथोड्या प्रमाणात खनिज उत्पादन व शुद्धीकरण ही कामे चालू असतात. टंगस्टन, कथिल व लोह यांची धातुके उत्तर पोर्तुगालमध्ये, अँथ्रॅसाइट व लिग्नाइट कोळसा मध्य भागात, तर तांब्याची पायराइटे दक्षिण भागात आढळतात. टंगस्टन, कथिल व बेरिल यांची निर्यात केली जाते. कोळसा व पायराइटे यांचा वापर केला जातो. पोलाद उद्योगाचा विकास करण्याच्या प्रयत्नात शासन आहे. १९७६ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे होते (आकडे हजार मे. टनांत) : लोहधातुक ४८, अशोधित पोलाद ३९१, कथिल ०·३७९, केओलीन ७२·८, तांब्याचे धातुक १·४, संगमरवर २६६·६ अँथ्रॅसाइट १९५·२, सोने व चांदी २·०, खनिजउद्योगात १९७७ मध्ये १०,८०० लोक गुंतलेले होते. देशाची २८% भूमी वनाच्छादित. महत्त्वाचे वृक्ष पाइन, बूच ओक, चेस्टनट, यूकॅलिप्टस (ऑस्ट्रेलियन निलगिरी). जगातील एकूण बूच उत्पादनाच्या ५०% उत्पादन पोर्तुगालमध्ये होते. त्यावर निर्यातीच्या २०% उत्पन्न मिळते. टर्पेटाइन व राळ यांचेही उत्पादन महत्त्वाचे आहे. १९७७ मधील उत्पादन पुढीलप्रमाणे होते : बूच उत्पादने २·६९ लक्ष मे. टन कागदलगदा ६·६१ लक्ष मे. टन पिच व टर्पेटाइन १·०२ लक्ष मे. टन. पोर्तुगालचा मत्स्योद्योग हा मोठा उद्योग होय. माशांच्या सु. २०० जाती पकडण्यात येतात. मासेमारीची तीन क्षेत्रे असून किनारी क्षेत्रात सार्डिनची मासेमारी महत्त्वाची समजली जाते. भर समुद्रात मच्छीमारी विशेष बोटींमधून केली जाते. तिसऱ्या क्षेत्रात ग्रँड बँक्स येथे कॉड मासे सापडतात. १९७७ मध्ये एकूण मत्स्योत्पादन २·९०८ लक्ष मे. टन झाले. त्यापैकी सार्डिन ७९,८२३ मे. टन: हॉर्स मॅकरेल ५४,५९६ मे. टन कॉड ३४,८१३ मे. टन हे मासे प्रमुख होते. ह्या उद्योगात १९७७ मध्ये २७,१०० लोक गुंतलेले होते. मतुझीन्युश, लिस्बन, सितूबल व पॉर्तीमँओ ही पोर्तुगालची प्रमुख मासेमारी बंदरे होत. फेब्रुवारी १९७७ मध्ये पोर्तुगालचे प्रादेशिक सागरी क्षेत्र ३७० किमी. पर्यंत वाढविण्यात आले.

उद्योग : १९७०–७५ दरम्यान उद्योगांमध्ये ४२% लोक गुंतलेले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर नवीननवीन उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. औद्योगिक विकासाच्या संदर्भात दक्षिण यूरोपीय देशांमध्ये पोर्तुगालचे मध्यम स्थान आहे. १९३० पासूनच देशाचा औद्योगिक पाया विस्तारण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. भांडवलाचे प्रमाण उद्योगानुरूप बदलत असून अतिवेगाने विकास पावणाऱ्या व त्यामुळे भरभराटीस येणाऱ्या उद्योगांचे लिस्बन, ओपोर्तो यांसारख्या मोठ्या शहरांभोवती केंद्रीकरण झाल्याचे आढळते. साशाल येथे बांधण्यात येत असलेला पोलाद कारखाना, कासील्यश बारेरू येथे उभारण्यात येत असलेले नवीन जहाजकारखाने, सकव्हेन येथे उभारलेले प्रचंड रसायन कारखाने आणि लिस्बन व ओपोर्तो येथे कार्यान्वित झालेले तेलशुद्धीकरण कारखाने यांमुळे या केंद्रीकरणाला अधिक गती मिळाली आहे.

खाद्यान्ने व पेये, कापड व वस्त्रोद्योग आणि धातुउद्योग असे देशातील तीन प्रमुख औद्योगिक गट आहेत. हे तिन्ही गट मिळून देशातील एकूण औद्योगिक उत्पादनाच्या निम्म्याहून अधिक उत्पादन करीत असून ५५% औद्योगिक श्रमबळ त्यांत गुंतले आहे. यांशिवाय कागद व लगदा, खते, पोलाद, तांब्याच्या वस्तू, शिवणयंत्रे, टंकलेखन यंत्रे, औद्योगिक विद्युत् उपकरणे, मोटरगाड्या, टायर व खनिज तेल रसायने यांच्या निर्मितीचे कारखानेही आहेत. हिऱ्यांना पैलू पाडण्याचा एक नवीनच उद्योग उदयास आला आहे. बांधकाम सामग्री, सुती व लोकरी कापड-वस्त्रे, मृत्स्नाशिल्पे, बुचाची उत्पादने व डबाबंद मासे या उद्योगांमध्ये श्रमबलाचे प्रमाण सर्वाधिक आहे. अझोर्स, मादीरा, मीन्यो हे उत्तर पोर्तुगालमधील विभाग भरतकाम व मद्यनिर्मिती ह्या परंपरागत व्यवसायांसाठी प्रसिद्ध आहेत. १९७७ मधील काही वस्तूंचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे मे. टनांत) सिगारेटी १३,२४२, सुती वस्त्रे ५५,१९९, कापड २७,८२४, बुचाची उत्पादने २·७० लक्ष, कागद लगदा ६·६२ लक्ष, कागद व कार्डबोर्ड ४·५ लक्ष पिच व टर्पेटाइन १·०२ लक्ष, खते १५·८३ लक्ष, सिमेंट ४२·९६ लक्ष, पोलाद पिंडक ३·५४ लक्ष, वेल्लित पोलाद ५·६१ लक्ष.

कामगार व कामगार कल्याण : एकाच आर्थिक, सामाजिक वा व्यावसायिक कार्यातील मालक व कर्मचारी यांचे संघ मिळून एक कायदेशीर संयुक्त निगम बनतो. मालकांच्या संस्थांना श्रेणी (गिल्ड) आणि कर्मचाऱ्यांच्या संस्थांना व्यवसायसंघ (सिंडिकेट) अशा संज्ञा असून दोन्ही शासकीय नियमांनी नियंत्रित असतात. शेतीकामावरील व मच्छीमारी धंद्यातील बहुसंख्य लोकांचे संघ अद्यापि झाले नाहीत. १९५६ मध्ये दुरुस्त केलेल्या कामगार सनदेनुसार १११ राष्ट्रीय संघांचे ८ लाखांवर सभासद होते. सर्व संयुक्त संस्था, संघ व श्रेणींवर शासकीय नियंत्रण असते. श्रेणी व संघांदरम्यानच्या सर्व सांघिक सौद्यांना शासकीय मान्यता लागते. सामाजिक विमा, वार्धक्यलाभ, किमान पगार, कामाचे तास, सुट्ट्यांची सोय, किमान वेतन यांसंबंधी कायदे नसले, तरी लिस्बन व ओपोर्तो येथील रोजंदारीचे दर देशात सर्वाधिक आहेत. स्त्रियांना पुरुषांपेक्षा २५% कमी दराने वेतन मिळते. आठवड्याला सहा दिवसांत ४४ तास काम, जादा कामाला वेतनाच्या दीडपट आणि रविवारी व सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाला दुप्पट दर असतो. संप, धीमे काम, टाळेबंदी अशा प्रकारांना मनाई आहे. १९७७ मध्ये विविध क्षेत्रांतील श्रमबल पुढीलप्रमाणे होते (आकडे लक्षांत) : एकूण श्रमबल ३१  कृषी, वन व मृगया : ७·८९ मच्छीमारी : ०·२७ खाणकाम : ०·१० निर्मितिउद्योग : ८·२८ बांधकाम: २·७६वीज, गॅस व पाणी : ०·२२ व्यापार, बँकिंग, विमा इ. ३·७४ वाहतूक-संदेशवहन : १·८२ सार्वजनिक प्रशासन व संरक्षण: १·७६ आरोग्यसेवा व शिक्षण : १·११ सेवा १·९५. १९७४–७६ च्या दरम्यान देशात ‘इंटरसिंडिकल’हा एकच कामगार महासंघ होता. हा कम्युनिस्टनियंत्रित असून त्याच्याशी २८७ कामगार संघटना संलग्न होत्या. तो ८०% संघटित कामगारांचे प्रतिनिधित्व करतो.

व्यापार व अर्थकारण : अंतर्गत व्यापाराची लिस्बन व ओपोर्तो ही मुख्य केंद्रे. ६०% ते ७०% मालाची आयात लिस्बनमधून होते. आयात परवाना असल्याखेरीज बँका व्यापारी कर्ज देत नाहीत व हुंडी अगोदर मिळाल्याखेरीज माल निर्यात करता येत नाही. शासनाच्या मालकीची, शासकीय देखरेखीखालील खाजगी व जकातखात्याची अशी तीन प्रकारची गुदामे लिस्बनमध्ये उपलब्ध आहेत. नव्या विकास बँकेने व्यापारी कर्जाच्या सोयी अधिक केल्या आहेत. परदेशी व्यापारात निर्यातीच्या कमाईपेक्षा आयातीचे मूल्य अधिक ही परिस्थिती चालू आहे. पोर्तुगालच्या आयात व्यापारात प्रतिवर्षी १० टक्क्यांनी, तर निर्यात व्यापारात प्रतिवर्षी १२ टक्क्यांनी वाढ होत असूनही व्यापार शेषात घट येत राहते. तथापि देशांतरितांकडून येणाऱ्या रकमा आणि वसाहतींमधील उत्पन्न, त्याचप्रमाणे परदेशी पर्यटकांपासून मिळणारे उत्पन्न या ‘अदृश्य कमाई’ ने तूट भरून येते. अशा तऱ्हेने गेल्या काही वर्षांत व्यापार शेषातील घट हळूहळू भरून येऊ लागली आहे. निर्यात मुख्यतः कच्चा व तयार बूच-माल, डबाबंद मासे, कापड, ऑलिव्ह तेल, पाइन वृक्षजन्य पदार्थ, धातुके तसेच खाद्यान्ने, पेये आणि हिरे यांची आहे. आयात मुख्यत्वे अन्नपदार्थ, कच्चा माल, जळण, यंत्रसामग्री व वाहतूक साधने, रसायने व इंधने यांची होते. ‘एफ्‌टा’ (यूरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन) या यूरोपीय खुला व्यापार संघटनेचा पोर्तुगाल सदस्य आहे. पोर्तुगालचा सर्वांत महत्त्वाचा व्यापारी भागीदार ग्रेट ब्रिटन असून त्या देशाकडे पोर्ट वाइन ही मुख्य निर्यात होते व त्याकडून कारखानदारी मालाची सर्वाधिक आयात होते. बूच व बूचपदार्थ बव्हंशी अमेरिकेस निर्यात केले जातात. फ्रान्स, पश्चिम जर्मनी व इटली यांच्याशीही पोर्तुगालचा बराच व्यापार होतो. १९६४ पासून सागरपार वसाहतींशी होणाऱ्या आयात-निर्यातीवर जकातकर नसल्यामुळे पुष्कळसा व्यापार त्यांच्याशीही होतो. व्यापारातील ब्रिटनचा वाटा त्यामुळे सापेक्षत: कमीकमी होत आहे. १९७७ मध्ये पोर्तुगालचा निर्यात-आयात व्यापार अनुक्रमे ७,७६८·५ कोटी व १९,०६८·४ कोटी एस्क्यूदो होता. देशात १८४६ साली स्थापन झालेली मध्यवर्ती ‘बँक ऑप पोर्तुगाल’ ही चलन काढणारी एकच अधिकृत बँक आहे. सुवर्ण व परकीय चलन नियंत्रण, वटाव दर निर्णय वगैरे तीच करते. तिचे भांडवल खाजगी, पण संचालन शासकीय आहे. १९३१मध्ये तिच्या कायद्यांमध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. विनियोग व विकास बँका दोन असून (स्था. १९५९ व १९६९) विशेष कर्ज पुरविणाऱ्या दोन पतसंस्था आहेत. त्यांपैकी एक (१८७६) दीर्घमुदती व अल्पमुदती कर्ज देते. ती शेती, उद्योग व अन्य क्षेत्रांना वित्तपुरवठा करते. दुसरी संस्था (१८६४) औद्योगिक, व्यापारी व गृहनिवसनविषयक गरजांसाठी कर्ज उपलब्ध करते. १० व्यापारी बँका (त्यांपैकी लिस्बनमध्ये ६) आपल्या ६९५ शाखांद्वारा कार्य करीत असतात. ‘बँको दो ब्राझील’, ‘बँक ऑफ लंडन अँड साउथ अमेरिका लि.’व ‘क्रेडिट-फ्रँको पोर्तुगेस’ या तीन परदेशी बँका आहेत. यांशिवाय देशात १९ बचतबँका आहेत. १९७४–७५ मध्ये तीन परदेशी बँकांखेरीज अन्य सर्व बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. लिस्बन येथे एक शेअरबाजार आहे. देशात ४० विमाकंपन्या असून १९७५ मध्ये बहुतेकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. एस्क्यूदो हे पोर्तुगालचे चलन परिमाण असून एका एस्क्यूदोचे १०० सेंटॅव्हो होतात. १,००० एस्क्यूदोंचा एक काँतो बनतो. १०, २० व ५० सेंटॅव्हो आणि १, २/२, ५ व १० एस्क्यूदो यांची नाणी असून २०, ५०, १००, ५०० व १,००० एस्क्यूदोंच्या नोटा असतात. विदेश विनिमय दर १ स्टर्लिंग पौंड = ९०·६० एस्क्यूदो, १ अमेरिकी डॉलर = ४३·१७ एस्क्यूदो त्याचप्रमाणे १ रु. = ५·२० एस्क्यूदो असा होता (ऑक्टोबर १९७८). इतर यूरोपीय देशांच्या तुलनेने उद्योगधंदे व प्राप्ती (मिळकती) यांवरील करांचे प्रमाण सौम्य असते. १९७८च्या अर्थसंकल्पानुसार महसुली उत्पन्न आणि खर्च यांचे आकडे अनुक्रमे २१,९५७·१० कोटी व २१,९५२·१० कोटी एस्क्यूदो एवढे होते. भांडवल, मालमत्ता, उत्पन्न, कारखाने, उत्पादन, नफा, वैयक्तिक कमाई या सर्वांवर कर वसूल करण्याची पद्धत आहे. देशातील परदेशी गुंतवणुकीस साधारणतः प्रोत्साहन दिले जाते. पश्चिम जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, नेदर्लंड्स या देशांमधील ग्रुंडिग, आयटीटी., ओटिस, फिलिप्स यांसारख्या बड्या उद्योगसमूहांनी पोर्तुगालमध्ये इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे, शिवणयंत्रे व धातुपदार्थ, एलिव्हेटर, रेडिओ व दूरचित्रवाणी यांच्या निर्मितीसाठी भांडवल गुंतविले आहे.


वाहतूक व संदेशवहन : १९७६ च्या अखेरीस देशात ४६,९४५ किमी. रस्ते होते, त्यांपैकी १८,४६२ किमी. मुख्य वा राष्ट्रीय मार्ग होते. लिस्बन–ओपोर्तो या मोटारमार्गाचे बांधकाम चालू आहे. १९७७ मध्ये मोटारगाड्या १०·३४ लक्ष, मालमोटारी १·११ लक्ष, बसगाड्या ७,१४० व मोटारसायकली ८८,७७८ होत्या. एकूण लोहमार्गांची लांबी २,८२९ किमी. असून १९७५ मध्ये त्यांचे राष्ट्रीयीकरण झाले. ‘मेट्रो’ नावाची भुयारी लोहमार्गवाहतूकही आहे. खाणकंपन्यांच्या मालकीचे ४८·५ किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत. १९७७ मध्ये १,९६२·५६ लक्ष प्रवाशांनी रेल्वेने ५२,३४८·३९ लक्ष किमी. प्रवास केला, तसेच ३६·६३ लक्ष टन मालाची सु. ८·८५ लक्ष किमी. वाहतूक झाली. पोर्तुगालचा व्यापारी नौदलाचा स्थूल वस्तु-टनभार सु. ११·२७ लक्ष टन होता (१९७६). देशातील प्रमुख बंदरे म्हणजे लिस्बन, ओपोर्तोचे उपनगर लेशाँइश, सितूबल व फूंशाल ही होत. व्ह्याना दू कश्तेलू बंदराचा विकास करण्यात येत आहे. पॉर्तीमँओ व अझोर्स या बंदरांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजे थांबतात. डोरू, टेगस व ग्वाद्याना या नद्यांतून थोडी अंतर्गत जलवाहतूक चालते. लिस्बन येथील पोर्तेला व अझोर्स बेटावरील सांता मारीआ विमानतळांना त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष महत्त्व आहे. यूरोपमधून उत्तर व दक्षिण अमेरिका आणि आफ्रिका यांच्याकडे जाण्यास लिस्बन ही वेस असून अझोर्सवर सोयीचा टप्पा आहे. १९६५ मध्ये देशाच्या दक्षिण भागात फारू (आलगार्व्ही ) येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाला. फूंशाल येथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय व अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी सरकारी मालकीच्या दोन स्वतंत्र विमानकंपन्या आहेत. १९७७ मध्ये त्यांनी ३४६·१४ लक्ष किमी. उड्डाण करून, ३०३·६१ कोटी प्रवासी-किमी., ८५६·४३ लक्ष टन-किमी. माल व ६१·५७ लक्ष टन-किमी. टपाल वाहतूक केली. देशात ११,७४,८५३ दूरध्वनी व ११,३७,१०० दूरचित्रवाणी संच (१९७७) १५,१०,७०३ रेडिओ संच (१९७५) होते.

लोक व समाजजीवन : नवाश्मयुग व ताम्रयुग ह्यांमधील मानववस्तीच्या टेकड्यांवरील खेड्यांचे अवशेष पोर्तुगालमध्ये सापडतात. प्राचीन काळापासून फिनिशियन, ग्रीक, केल्ट अशा वंशांच्या लोकांनी एकामागून एक येऊन या भागात वस्ती केली व ते तेथील लोकांत मिसळून गेले. त्यांनीच २०० वर्षे रोमन आक्रमणाचा प्रतिकार केला. रोमनांखेरीज स्वेबियन, व्हिसिगॉथ, मूर, अरब आणि यहुदी यांचा प्रभाव वेळोवेळी या प्रदेशावर होता. पोर्तुगाल आयबेरियन द्वीपकल्पावर वसल्यामुळे जमिनीवरून येऊन स्वाऱ्या करणारे आणि समुद्रांवरून येऊन वस्ती करणारे असे दोन्ही प्रकारचे लोक या देशात जमा झाले. देशात पोर्तुगीजांखेरीज थोडे ब्राझीलियन व स्पॅनिश लोक आहेत पण खुद्द पोर्तुगालचे लोक मूलतः विविधवंशीय असूनही त्यांचे स्वरूप एकजिनसी आहे. ते भूमध्य समुद्राभोवतालच्या इतर देशीयांशी पुढीलप्रमाणे मिळते-जुळते आढळते : मध्यम उंची, तपकिरी रंगाचे डोळे, कुरळे काळे केस, गौरवर्ण. १ जुलै १९७७ च्या अंदाजानुसार पोर्तुगालची लोकसंख्या ९७,३५,९०० वार्षिक जननमान हजारी १८·८० मृत्युमान हजारी ९·७४ लोकवस्तीची घनता दर चौ. किलोमीटरला सु. ९४ होती (१९७०). देशांतर मुख्यतः ब्राझीलला व अमेरिकेस होते. सामाजिक वर्ग सामान्यतः व्यवसायानुसार आहेत. बहुसंख्य कृषिवल, त्यांखालोखाल श्रमिक, खाजगी व सरकारी नोकरवर्ग, मध्यम वर्गांतील बुद्धिजीवी, व्यावसायिक थोड्या प्रमाणात आणि सर्वांत लहान सामाजिक वर्ग मालमत्तेचे धनी, सरंजामदार, उद्योगपती व सत्ताधारी यांचा. राज्यघटनेने धर्मस्वातंत्र्य दिले आहे आणि तुरळक प्रॉटेस्टंट पंथीय व यहुदी धर्माचे लोकही देशात आहेत, पण बहुसंख्य प्रजा रोमन कॅथलिक. १९७६ मध्ये देशात ८४,८५,७७५ रोमन कॅथलिक होते. राज्यसंस्थेपासून धर्म वेगळा ठेवण्यात आलेला आहे. शेजारच्या स्पेनशी कित्येक बाबतींत साधर्म्य असले, तरी पोर्तुगीज समाजाची पृथगात्म वैशिष्ट्येही आहेत. पोर्तुगीज हे प्रामाणिक, कष्टाळू, गंभीर, सौजन्यशील व भावनाप्रधान असतात. नाच व गाणे ही लोकजीवनाची खास वैशिष्ट्ये होत. प्रत्येक खेड्यात चोपलेल्या मातीच्या जमिनीवर यांसाठी जागा राखलेली असते. समूहनृत्यांचे अनेक प्रकार आहेत आणि देशाच्या प्रत्येक विभागात ते वेगळे आहेत. जत्रांसारख्या उत्सवांतून धार्मिक सोहळ्यांबरोबर नाचाचीही मौज लोक लुटतात. साथीला हार्मोनियम, गिटार, फिडल, ढोलके, लोखंडी त्रिकोण अशी वाद्येही असतात. बैलझोंबी हा पोर्तुगालचा एक राष्ट्रीय खेळ असून तो स्पेनमधील खेळापेक्षा थोडा वेगळा आहे. त्यात बैलाला ठार न मारता घोडेस्वार त्याला घेरून नुसते कुंठित करतात. देशात स्थलपरत्वे घरांच्या बांधणीत आणि लोकांच्या वेषभूषेत फरक दिसतो. डोंगरभागातील लोक डोक्यापर्यंत असलेला ‘कापुआ’ नामक डगला वापरतात, तर डोरू नदीखोऱ्यातील लोक पावसात काम करावे लागते म्हणून गवताच्या काड्यांचा ‘पॅल्होकास’ नावाचा झगा घालतात. आहारात सार्डीन किंवा कॉड मासा, भाज्या व फळे असतात सणासुदीला डुकराचे मांसही असते. सामान्यतः पोर्तुगीज धार्मिक वृत्तीचे आहेत. दारिद्र्यामुळे तरुणांची ओढ देशांतराकडे दिसते. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान असले, तरी पुरुषांशी बरोबरी नाही.


शासनाने १९३३ च्या राज्यघटनेनुसार व राष्ट्रीय श्रमिकविषयक कायद्याप्रमाणे भविष्यनिर्वाहव्यवस्था करण्याऱ्या संस्था चालू कराव्यात व त्यांना उत्तेजन द्यावे असे सुचविण्यात आले. १९३५ पासून प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली. १९६० नंतर चार प्रकारच्या सामाजिक विमासंस्थांना मान्यता मिळाली. : (१) व्यापार उद्योगांतील नोकरदारांना व कामगारांना सक्तीचा विमा, लोककेंद्रांद्वारे ग्रामीण प्रजेला मदतीची सोय, कल्याण केंद्रांमार्फत मच्छीमारांना शिक्षण, प्रशिक्षण व इतर गरजांसाठी साहाय्य (२) विविध धंद्यांसाठी निवृत्तिवेतन व अडचणींत मदत, (३) मुलकी व लष्करी सरकारी नोकरांसाठी मदतसंस्था, (४) स्वयंपूर्ण परस्पर-सहकारी संस्था. वरील सर्व यंत्रणांद्वारा आजार, पंगुत्व, बाळंतपण, विशेष धोके अशा प्रसंगी कमी-जास्त प्रमाणात मदतीची तरतूद, त्याचप्रमाणे कुटुंबभत्ता आणि वार्धक्य व वैधव्य वेतनाची व्यवस्था होते. प्रत्येक उद्योगधंद्याच्या किंवा व्यवसायाच्या कल्याणसंघटना असून श्रमिकन्यायमंडळात त्या आपापल्या सदस्यांतर्फे बोलणी करतात. अशा संघटनांत मालक व कामगार यांना प्रतिनिधित्व व सार्वजनिक प्रकरणांत संस्थांना संघटनेद्वारा प्रतिनिधित्व मिळते. सामाजिक व्यवहार मंत्रालय नावाचे एक स्वतंत्र खाते असून त्याच्या अखत्यारीत ‘आरोग्य’ व ‘सामाजिक सुरक्षा’ अशी दोन सचिवालये उघडण्यात आली आहेत. नव्या संविधानानुसार शासनातर्फे सामाजिक सुरक्षा पद्धती व संपूर्ण आरोग्य सुविधा सर्वांना पुरविल्या जातात. यानुसार ‘राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा पद्धती’ व विनामूल्य ‘राष्ट्रीय आरोग्य सेवा’ यांची स्थापना करणे हे शासनापुढील प्रमुख उद्दिष्ट आहे. कुटुंबभत्ते, वार्धक्य व निवृत्तिवेतने, पंगूंसाठी निवृत्तिवेतने यांमध्ये वाढ व सांविधिक किमान वेतनाची कार्यवाही यांसारख्या योजना अंमलात आणण्यात आल्या आहेत.

आरोग्य : लिस्बन, ओपोर्तो व कोईंब्रा ही केंद्रे धरून देशाचे तीन आरोग्यविभाग, त्यांचे लहानलहान उपविभाग आणि त्यांतून सामान्य व विशेष रुग्णालये, आरोग्यधामे आणि दवाखान्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. १९६० नंतर ८०% रुग्णांवर मध्यवर्ती रुग्णालयांतून मोफत उपचार होऊ लागले असून त्यांतील सु. ८०% खर्च शासन करते. देशात दहा प्रमुख इस्पितळे असून त्यांपैकी सात लिस्बनमध्ये, दोन ओपोर्तोमध्ये व एक कोईंब्रा येथे आहे. विभागीय इस्पितळे प्रत्येक प्रांताच्या मुख्य केंद्रात असून लहानलहान केंद्रांत छोटी इस्पितळे आहेत.

 

शिक्षण : काही वर्षांपूर्वी यूरोपमधील सर्वांत कमी साक्षरतेचे प्रमाण पोर्तुगालमध्ये होते, पण नंतर ही स्थिती बरीच सुधारली. देशात १९७८ मध्ये सु. ७०% लोक साक्षर होते. १९११ पासून प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. पण त्याची अंमलबजावणी जास्त कसोशीने गेल्या काही वर्षांतच झाली आहे. प्राथमिक शाळेत चार वर्षे, तंत्रशाळेत पाच किंवा महाविद्यालयप्रवेशासाठी माध्यमिक शाळेत सात वर्षे, असा सामान्य शिक्षणक्रम आहे. पोर्तुगीज युवक संघटना शासननिर्मित असून तिच्याद्वारा नैतिक व राजकीय शिक्षणाचे बहिःशाल कार्यक्रम प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आखलेले असतात. शाळा शासकीय तशाच खाजगीही आहेत. १९७५–७६ मध्ये देशात ९३६ पूर्व प्राथमिक शाळांतून ६१,८६८ विद्यार्थी व २,९१० शिक्षक होते १२,४०५ प्राथमिक शाळांत १२,०७,९०२ विद्यार्थी व ६३,६४७ शिक्षक होते ५७१ माध्यमिक शाळांतून ६,४९,९०९ विद्यार्थी व ३०,४९७ शिक्षक होते ८९ उच्च माध्यमिक शाळांतून ८६,१८९ विद्यार्थी व ७,१८१ शिक्षक, तर २१८ शिक्षक-प्रशिक्षण शाळांतून ९,८४३ विद्यार्थी व १,४७६ शिक्षक होते. देशातील ११ विद्यापीठांमधून ५७,५२५ विद्यार्थी व १,९१६ प्राध्यापक होते. लिस्बन येथे चार विद्यापीठे असून त्यांपैकी एक व कोईंब्रा येथील विद्यापीठ ही दोन फार जुनी म्हणजे १२९० मधील आहेत. आव्हेरू (१९७३), ब्रागा (१९७३), ओपोर्तो (१९११), एव्हुरा (१९७३), पाँता देल्‌गादा (१९७६) व फूंशाल (१९७६) येथे प्रत्येकी एक विद्यापीठ आहे. यांशिवाय देशात लष्करी, नाविक, कलाविषयक व संगीतविषयक शाळा आहेत. प्रौढ शिक्षणासाठी शासकीय मदतीने नाट्य व चित्रपटद्वारा प्रचार, गावे व खेडी सुशोभित करण्याचे कार्यक्रम, ग्रामीण लोकसभांतून संध्याकाळचे शिक्षणक्रम इ. उपक्रम चालतात. तंत्रविषयक प्रशिक्षणाची सोय लिस्बन व ओपोर्तो येथील तांत्रिक विद्यापीठांतून व इतर तंत्रविद्यालयांतून होते. इतर विद्या-कलाशास्त्रांच्या संस्था, ग्रंथालये व वस्तुसंग्रहालये ज्ञान व संस्कृती यांचे संवर्धन करतात. लिस्बनमधून १० दैनिके, ब्रागा २, कोईंब्रा १, एव्हुरा २, ओपोर्तो ३, सँतारेम १, फूंशाल २, अझोर्स ४, पाँता देल्गादा ३ अशी प्रमुख २८ दैनिके पोर्तुगालमध्ये प्रसिद्ध होतात. बहुतेक वृत्तपत्रसमूहांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे. देशात १,३०० हून (एकट्या लिस्बनमध्ये निम्म्याच्यावर) अधिक नियतकालिके प्रसिद्ध होतात.

फडके, वि. शं गद्रे, वि. रा.

कला व क्रीडा : यूरोपीय कलापरंपरेत पोर्तुगीज कलेचे स्थान फार महत्त्वाचे मानले जात नाही. बाराव्या शतकापासून सतत पोर्तुगीज कलेची परंपरा दिसून येते. वास्तुकला, मृत्पात्री, लोकसंगीत व लोकनृत्य इ. थोडक्या क्षेत्रांतच पोर्तुगीज कलेचे वेगळेपण विशेषत्वाने दिसून येते. तत्पूर्वीच्या प्राचीन रोमन काळातील वास्तूंचे कलावशेष येथे आढळतात. उदा., एव्हुरा येथील डायना देवतेच्या मंदिराचे अवशेष, कोईंब्रा येथील रोमन नगरीचे अवशेष इत्यादी. पूर्वापार चालत आलेल्या वास्तुकलेचा प्रभाव बाराव्या शतकानंतरच कमी झाल्याचे दिसून येते. मध्ययुगीन पोर्तुगालमध्ये लिस्बन, ब्रागा, कोईंब्रा, ओपोर्तो येथे फ्रेंच नमुन्यांवर अतिशय अलंकृत व भव्य अशा कॅथीड्रल वास्तू बांधण्यात आल्या. गॉथिक वास्तुकलेचे नमुने एव्हुरा, आल्कुबास आणि बताल्या येथे आढळतात. पहिल्या इमॅन्यूएलच्या कारकीर्दीत (१४९५–१५२१) ‘मॅन्यूएलाइन’ ही खास पोर्तुगीज वास्तुशैली उदयास आली. अतिसजावट हे या शैलीचे वैशिष्ट्य होते. वसाहतवादाच्या काळात पोर्तुगीज कलाक्षेत्रात अनेक परदेशी कलापरंपरांचे परिणाम कमीअधिक प्रमाणात दिसून येतात. चित्रकलेत, विशेषतः सुरुवातीला, फ्लेमिश-इटालियन प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीज कलाक्षेत्र स्पॅनिश प्रभावाखाली होते. आशियाई देशांच्या संपर्कातून पोर्तुगालमध्ये, विशेषतः मृत्तिकाशिल्पे, फर्निचर, वस्त्रे इ. बाबतींत,इराणी, भारतीय व चिनी आकृतिबंधांचे अनुकरण करण्यात येऊ लागले. सतरावे-अठरावे शतक बरोक वास्तुकलेच्या प्रभावाचे होते. १७५५ च्या भूकंपानंतर लिस्बनची जी पुनर्रचना झाली, तीत मात्र नवअभिजात वास्तुरचनेला महत्त्व देण्यात आले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वच्छंदतावादी कलासंप्रदायाचा प्रभाव इतर यूरोपीय देशांप्रमाणे पोर्तुगालवरही पडलेला दिसतो. या काळातील दूमींगगूश अँतॉन्यू दे सिकेरा (१७६८–१८३७) हा कलावंत आणि विसाव्या शतकात मारीया व्ह्येईरा दे सिल्व्हा हा अप्रतिरूप चित्रकार उल्लेखनीय आहे.


पोर्तुगीज संगीताची परंपरा प्रबोधनकाळापासून चालत आलेली आहे. नॅशनल ब्रॉडकास्टिंग सिंफनी ऑर्केस्ट्रा ही या क्षेत्रातील महत्त्वाची संस्था होय. गुल्बेन्‌कियन फाउंडेशन या संस्थेतर्फे संगीतादी कलांना विशेष प्रोत्साहन दिले जाते. लोकसंगीत आणि लोकनृत्ये ही पोर्तुगालमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. धार्मिक उत्सवांतून आणि जत्रांतून ती सादर केली जातात. लिस्बनमध्ये लोककलांचे नमुने एका स्वतंत्र संग्रहालयात जतन केले आहेत.

उत्कृष्ट मृत्पात्रे, भरतकाम, कलात्मक विणलेल्या पट्ट्या (लेसेस), गालिचे या पारंपारिक पोर्तुगीज कला वैशिष्ट्यपूर्ण आहेत. नॅशनल ॲकॅडमी ऑफ फाइन आर्ट्‌स, म्यूझिक ॲकॅडमी आफ सँता ससील्या या कलाक्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था होत. गुल्बेन्‌कियन संस्थेच्या कार्यालयात त्याचा संस्थापक कॅलॉउस्ते गुल्बेन्‌कियन यांचा खाजगी कलावस्तुसंग्रह ठेवलेला आहे. लिस्बनमध्ये यूरोपातील प्राचीन वाहनांचे नमुने एक स्वतंत्र संग्रहालयात ठेवेलेले आढळतात.

फुटबॉल हा पोर्तुगालचा विशेष लोकप्रिय खेळ होय. बैलांच्या झुंजी तेथे लोकप्रिय आहेत. त्या विशेषतः दक्षिणेकडे रीबातेझू आणि लिस्बनच्या उपनगरांतून आयोजित केल्या जातात.

जाधव, रा. ग.

भाषा आणि साहित्य : पोर्तुगीज ही इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबाच्या लॅटिन शाखेची, म्हणजे रोमान्स बोली आहे. तिच्यातील अगदी आरंभीचे साहित्य बाराव्या – तेराव्या शतकांतले असून त्यांत मुख्यतः भावकविता आणि धार्मिक गद्य ह्यांचा समावेश होतो. इतिवृत्तेही लिहिली गेली. चौदाव्या शतकात पोर्तुगीज कवितेला एक प्रकारची अवनतावस्था प्राप्त झाली होती परंतु पंधराव्या शतकात ती पुन्हा बहरली. फेर्नांउ लॉपिश हा पोर्तुगालचा पहिला थोर इतिहासकार. त्याचे कर्तृत्व पंधराव्या शतकात झाले. लुझीअड्स हे पोर्तुगालचे कवी कामाँइशकृत राष्ट्रीय महाकाव्य सोळाव्या शतकात लिहिले गेले. झ्यील व्हिसेंत ह्या नाटककाराचे नाट्यलेखनही ह्याच शतकातले. ह्या शतकात चांगले इतिहासलेखन झाले. झ्युआंउ द बार्रुश ह्या सर्वश्रेष्ठ पोर्तुगीज इतिहासकाराच्या ‘डेकेड्स ऑफ एशिया’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाच्या ग्रंथाचा त्यात समावेश करावा लागेल. बॅर्नार्दीं रिबैरु ह्या श्रेष्ठ भावकवीने पोर्तुगीज साहित्यातील पहिली गोपकादंबरी लिहिली. फ्रांसीश्कु रोद्रीगिश लोबु, दाँ फ्रांसीश्यु मानुयॅल द मॅलु (दोघेही कवी), फ्रेइ बॅर्नार्दु द ब्रीतु (इतिहासकार) हे सतराव्या शतकातले काही उल्लेखनीय साहित्यिक. अठराव्या शतकात इतिहास, विज्ञान आदी विषयांना वाहिलेल्या ज्ञानसंस्था स्थापन झाल्या. कवितेच्या क्षेत्रात बार्‌बॉझा द्यू बुकाज्य आणि फ्रांसीश्कु मानुयॅल नाशसिमेंतू ह्या दोन कवींची कामगिरी ह्या शतकात उल्लेखनीय ठरली. एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध स्वच्छंदतावादाचा. आल्मैदा गार्‌रॅ हा ह्य चळवळीचा अध्वर्यू. आलेशांद्रि येर्कुलानु हा कवी, कादंबरीकार आणि इतिहासकार.  अँतॉन्यू फेलिसिआनु द काश्तील्यु आंतेरु द क्यँताल, गॅर्रा झ्युंकैरू हे कवी ओलिव्हैरा मार्तींश हा इतिहासकार आणि झ्यूलिउ दान्ताश हा नाटककार हे ह्या शतकातील उल्लेखनीय साहित्यिकांत अंतर्भूत आहेत. हुकूमशाही राजवटीमुळे विसाव्या शतकातील पोर्तुगीज साहित्यावर प्रतिकूल परिणाम झालेला असला, तरी फॅर्रैरा द काश्त्रु (कादंबरीकार) ज्यूझॅ रॅझ्यिउ (कवी, कादंबरीकार आणि नाटककार), मिगेल तॉर्गा (कवी, कथाकार आणि नाटककार) ह्यांनी केलेली साहित्यनिर्मिती महत्त्वाची आहे. [→ पोर्तुगीज भाषा पोर्तुगीज साहित्य].

कालेलकर, ना. गो रॉड्रिग्ज, एल्. ए. (इं.) कुलकर्णी, अ. र (म.)

प्रेक्षणीय स्थळे : पर्यटन हा पोर्तुगालचा वाढता उद्योग आहे. १९७७ मध्ये पोर्तुगालला ३०,५५,२३८ पर्यटकांनी भेट दिली. लिस्बन हे राजधानीचे शहर, देशातील प्रमुख औद्योगिक, सांस्कृतिक व व्यापार यांचे केंद्र होय. ब्रागा (लोकसंख्या ४८,७३५–१९६७ अंदाज) हे शहर पुरातन वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे. त्यांपैकी बाराव्या शतकातील कॅथीड्रल, सतराव्या शतकातील सांताक्रूझ चर्च, दुर्मिळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे ग्रंथालय, बॉम जीझस दो माँतेचे टेकडीवरील चर्च इ. उल्लेखनीय आहेत. कोईंब्रा (५५,९८५) हे पोर्तुगालमधील सर्वांत जुन्या विद्यापीठाचे शहर (१२९०). तेथील बरोक शैलीत बांधलेली ग्रंथालय वास्तू प्रेक्षणीय आहे. सितूबल (४९,६७०) येथील मूरिश किल्ला व पंधराव्या–सोळाव्या शतकांतील राजवाडा प्रसिद्ध आहे. ओपोर्तो (३,३५,७००) हे व्यापारी व औद्योगिक शहर असून तेथील रोमनेस्कगॉथिक शैलीतील कॅथीड्रल, बिशपचा राजवाडा, कस्टम हाउस, क्रिस्टल पॅलेस (१८६५) यांसारख्या भव्य वास्तू प्रसिद्ध आहेत. ‘टॉवर ऑफ द क्लर्जी ’ (उंची सु. ७५ मी.) ही येथील त्याच नावाच्या चर्चलगतची प्रेक्षणीय वास्तू आहे. येथील पोट वाइन जगप्रसिद्ध आहे. (चित्रपत्रे)

गद्रे, वि. रा.

संदर्भ : 1. Bruce, N. Portugal, The Last Empire, New York, 1975.

2. Hammond, R. J. Portugal and Africa, 1815-1910, Stanford, 1966.

3. Livermore, H. V. Portugal : A Short History,Edinburgh, 1973.

4. Nowell, C. E. Portugal, Englewood Cliffs, 1973.

5. Oliveira, Marques, A. H. R. History of Portugal, Vols 2, New York, 1972.

6. Scares, Mario, Portugal‘s Struggle for Liberty, London, 1975.


पोर्तुगाल


देवमाता चर्चचा अंतर्भाग, लिस्बन लिस्बनचे विहंगम दृश्य
इश्तुरील पुळण, लिस्बन : यूरोपातील हद्दपार राजकुटुंबांचे आश्रयस्थान. रीबातेझू : पोर्तुगीज प्रादेशिक नृत्यप्रकार
बैलाशी झुंजणारा घोडेस्वार : लोकप्रिय पोर्तुगीज क्रीडाप्रकार. प्राचीन विद्यापीठाचा आधुनिक परिसर, कोईब्रा
डोरू प्रांतातील कापणीच्या हंगामातील एक दृश्य पोर्तुगालमधील प्रगत टोमॅटो उद्योगाचा कारखाना, एक दृश्य.
ताग गिरणीतील एक दृश्य आधुनिक यंत्रसज्ज तेलघाणा