ग्रेट लेक्स : उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्याची पंचमहासरोवरे. यांपैकी मिशिगन पूर्णपणे अमेरिकेच्या हद्दीत असून सुपीरियर, ह्यूरन, ईअरी व आँटॅरिओ यांतून अमेरिका -कॅनडा सरहद्द जाते. ही सरोवरे मुख्यतः हिमानी क्रियेमुळे निर्माण झाली असावी. जगातील सर्वांत मोठा गोड्या पाण्याचा साठा व सर्वांत मोठा अंतर्गत जलमार्ग म्हणून ती प्रसिद्ध आहेत. त्यांचे एकूण जलपृष्ठ २,४६,४९० चौ. किमी. असून त्याच्या परिसरात सव्वातीन कोटींहून अधिक लोक राहतात. १८३ मी. उंचीवरील सुपीरियर सर्वांत मोठे व खोल असून आँटॅरिओ सर्वांत लहान व ईअरी सर्वांत उथळ आहे. ईअरीखेरीज सर्वांचे तळ समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. सुपीरियर व ह्यूरन सेंट मेरी नदीने, ह्यूरन व मिशिगन मॅकिनेक सामुद्रधुनीने, ह्यूरन व ईअरी सेंट क्लेअर नदी व सरोवरे आणि डीट्रॉइट नदी यांनी, ईअरी व आँटॅरिओ नायगारा नदीने जोडलेली असून तिच्यावर जगप्रसिद्ध नायगारा धबधबा आहे. आँटॅरिओतून निघणारी सेंट लॉरेन्स नदी अटलांटिक महासागराला मिळते. सेंट मेरीचे  द्रुतवाह व नायगारा धबधबा टाळून अनुक्रमे सू व वेलंड हे कालवे काढले असून उंचीतील फरक पार करण्यासाठी त्यांत पाणशिड्यांची योजना केलेली आहे. १९५९ च्या सेंट लॉरेन्स सी वे मुळे अटलांटिकमधून पूर्वीपेक्षा मोठी जहाजेही थेट सुपीरियरमध्ये जाऊ शकतात. या सरोवरांच्या मार्गाने त्यांच्या परिसरातील लोखंड, तांबे, निकेल, युरेनियम इ. धातू ॲपालॅचिअनकडून येणारा कोळसा, चुनखडी, इमारती लाकूड, धान्ये, फळे, भाज्या, बीट, तंबाखू इत्यादींची मोठी वाहतूक होते. शिकागो, मिलवॉकी, डीट्रॉइट, टोलीडो, टोराँटो, बफालो इ. शहरी लोखंड व पोलाद, धातू व तेलशुद्धी, मोटारी, यंत्रे. रबर, रसायने, काच वगैरे हरतऱ्हेचे कारखाने आहेत. पाणी, उष्णता व अणुशक्ती यांवर मोठ्या प्रमाणात वीज उत्पन्न होते. नायगारा व इतर अनेक सौंदर्यस्थळे यांमुळे प्रवाशांसही या प्रदेशाचे मोठे आकर्षण आहे.

कुमठेकर, ज. ब.