बरेली : उत्तर प्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्याचे प्रमुख शासकीय ठाणे. लोकसंख्या ३,२६,१२७ (१९७८ अंदाज). हे रामगंगा नदीजवळील छोट्याशा पठारावर दिल्लीच्या आग्नेयीस सु. २४० किमी. वर वसले असून ही जिल्ह्याची प्रमुख बाजारपेठ व लोहमार्ग प्रस्थानक आहे. अलीगढ, मुरादाबाद, लखनौ, काठगोदाम वगैरे शहरांकडून येणारे लोहमार्ग येथे एकत्र येतात. रेल्वे वसाहत आणि कँटोनमेंट यांची बरीच वाढ झाल्यामुळे ती शहराची उपनगरेच बनली आहेत.

सोळाव्या शतकाच्या पर्वार्धात या शहराची स्थापना झाली. मोगल बादशहा शाहजहान याचा सुभेदार मकरंद राय याने नवीन शहराची वाढ केली. १७०७ ते १७२० या काळात बरेली ही रोहिल्यांची राजधानी होती. १८०१ मध्ये येथे इंग्रजी अंमल प्रस्थापित झाला. १८५७ च्या उठावात मराठ्यांचे हे एक ठाणे होते. येथील बांबूवृक्षांच्या विपुलतेमुळे ‘बांसबरेली’ या नावानेही ते ओळखले जाते.

शहरात अनेक लहानमोठे उद्योग असून त्यांपैकी साखर उद्योग, कृत्रिम रबर उत्पादन, कापड गिरण्या, यंत्रसामग्री, अभियांत्रिकी उद्योग, लाकडी व लोखंडी फर्निचर, मद्यार्क निर्मिती हे विशेष महत्वाचे आहेत. यांशिवाय पितळी भांडी, गालिचे, काड्यापेट्या, साबण, लाखेच्या कांड्या, टर्पेंटाइन.इ. निर्मिती-उद्योगही येथे आहेत. बरेलीचा सुरमाही विख्यात आहे.

बरेलीत अनेक ऐतिहासिक इमारती असून त्यापैकी १६५७ चा किल्ला, जामा मशीद, मिर्झा मशीद व बाग, हुसेन बाग-बारादरी, रामपूरच्या नबाबाचा वाडा इ. प्रेक्षणीय आहेत. शहरात अनेक शिक्षणसंस्था आहेत. बरेली महाविद्यालय (स्था. १८३७) आग्रा विद्यापीठाशी संलग्न आहे. भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्था आणि रेल्वे कर्मशाळा इझ्झतनगर या उपनगरात आहेत.

कापडी, सुलभा