ट्रिपोली–२ : अरबी–ताराबुलुस एश–शाम. लेबाननमधील उत्तर लेबानन प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,७५,००० (१९७१). भूमध्य समुद्रावरील हे बंदर बेरूतच्या उ. ईशान्येस ६४ किमी. असून बेरूतशी व सिरियातील हॉम्सशी लोहमार्गाने जोडले आहे. इराकमधील किर्कूकपासून निघालेला तेलनळ येथपर्यंत येतो. व्यापार, जहाजवाहतूक व प्रक्रिया यांचे हे केंद्र आहे. तेलशुद्धी, कापूस पिंजणे, साबण यांचे कारखाने असून तेल, रेशीम, साबण, लिंबू जातीची फळे, लोकर येथून निर्यात होतात. समुद्रात स्पंज मिळतात. इ. स. पू. ७०० नंतर या प्राचीन शहराची स्थापना झाली. टायर, सायडन व ॲरडस या तीन गावांनी मिळून हे बनले म्हणून ट्रिपोली हे नाव पडले. सेल्युसिड, रोमन व अरब यांच्यानंतर ११०९ मध्ये धर्मयुद्धात ख्रिस्ती लोकांनी हे घेतले व मोठे ग्रंथालय नष्ट केले. तेराव्या शतकात ईजिप्तच्या सुलतानाने घेतले व पुन्हा बांधले. त्यानंतरची नवीन वस्ती थोडीशी अंतर्भागात होऊन ती बंदराशी रुंद रस्त्यांनी जोडली गेली. सिरियाचे राजे बराच काळ यावर हक्क सांगत परंतु मग ते ईजिप्तच्या इब्राहिम पाशाने घेतले. पहिल्या महायुद्धात ते ब्रिटिशांनी व्यापले होते. १९२० मध्ये ते ग्रँड लिबां राज्यात समाविष्ट झाले. दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिशांनी व फ्रेंचांनी व्यापले होते. १९४३ मध्ये ते लेबाननच्या स्वतंत्र प्रजासत्ताकात गेले. हे मुख्यतः मुस्लिमांचे ठाणे असल्यामुळे ख्रिस्ती प्रभावाखालील मध्यवर्ती सत्तेशी १९५८ मध्ये व नंतरही त्याचे संघर्ष झाले.

लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब.