वास्को द गामा

गामा, वास्को द : (?  १४६o–२४ डिसेंबर १५२४). पोर्तुगीज दर्यावर्दी. पोर्तुगालच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील आलेंतेझु प्रांतातील सीनिश बंदरी याचा जन्म झाला. याच्या बालपणाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. याच्या कुटुंबातील काही पिढ्या पोर्तुगालच्या दरबारी मानाच्या जागेवर असल्याचा उल्लेख आढळतो. वास्कोदेखील दुसऱ्या जॉनच्या पदरी होता. अनेक महत्त्वाची व नाजूक कामे केल्यामुळे त्याने राजाची चांगली मर्जी संपादन केली होती. म्हणूनच हिंदुस्थानला जाणारा मार्ग शोधून काढण्याच्या मोहिमेवर राजाने वास्कोची नेमणूक केली. १४८८ मध्ये डीअश बार्थोलोम्यू याने आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील टोकाशी पोहोचण्याचा विक्रम केला होता. वादळामुळे त्याला परतावे लागले होते. वास्कोने यास बरोबर घेतले. गाब्रिएल, राफेल आणि बेरिओ या तीन जहाजांमधून सु. १५० लोक व सर्व सामग्री भरून, वास्कोने ८ जुलै १४९७ रोजी लिस्बन सोडले. वाटेत त्याने कानेरी, टोगो व केप व्हर्द या बेटांना भेटी दिल्या. बार्थोलोम्यू केप व्हर्द येथे उतरला. तेथून निघाल्यावर व्यापारी वाऱ्यांच्या दिशेने जात, सेंट हेलीना बेटावर वास्को सु. चार महिन्यांनंतर पोहोचला. तेथे थोडा मुक्काम करून त्याने जहाजे दक्षिणेकडे वळविली. वादळ व जहाजांवरील भित्र्या लोकांना तोंड देत शेवटी वास्कोने, केप ऑफ गुड होपला वळसा घातला. आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील मॉसल उपसागरात त्याने जहाजे नांगरली. जमिनीवर उतरून त्याने जहाजांची डागडुजी केली, पाणी घेतले व पोर्तुगीज मालकीहक्क प्रस्थापित करणारे शिलास्तंभ– पेद्रो– तेथे रोवले. पुढे किनाऱ्याने जात ख्रिसमसच्या संध्याकाळी त्यांनी नाताळच्या किनाऱ्यावर पाऊल ठेवले. तेथील प्रदेशावर पेद्रो रोवून, त्या प्रदेशाला ख्रिसमसची आठवण म्हणून नाताळ असे नाव त्यानेच ठेवले. नाताळ सोडून आणखी थोडे उत्तरेकडे गेल्यावर त्याने १४९८ च्या जानेवारीमध्ये कॉपर नदीच्या मुखाशी मुक्काम केला आणि पुढे तो मोझँबीकमध्ये शिरला.वास्को मुसलमान असावा या समजुतीने तेथील मूर लोकांनी वास्कोचा चांगला आदर-सत्कार केला. येथील लोकांशी अरबांचा मोठा व्यापार चालत असे. पुढील मार्ग दाखविण्याकरिता दोन लोकांना तेथील सुलतानाने वास्कोबरोबर दिले पण त्यांतील एकाने पलायन केले. वास्को ७ एप्रिलला मोंबासाला पोहोचला व आणखी उत्तरेला जाऊन १४ एप्रिलला मालिंदी बंदरावर त्याने मुक्काम केला. हिंदुस्थानची वाट माहीत असलेल्या एका अरब खलाशाला बरोबर घेऊन वास्कोने पूर्वेकडे गलबते हाकारली व २० मे १४९८ रोजी कालिकत बंदरात पाऊल टाकले. तेथील लोकांना पाहिल्यावर त्याने वाचलेल्या मार्को पोलोच्या वर्णनाची  त्याला प्रचीती आली. कालिकत हे त्यावेळी हिंदुस्थानातील भरभराटीचे बंदर असून बरेच अरब येथे व्यापाराकरिता येत. कालिकतचे राज्य हिंदू असून तेथील राजास झामोरिन म्हणत. झामोरिनने वास्कोचे चांगले स्वागत केले. झामोरिनबरोबर वास्कोने व्यापारी कराराबाबत बोलणी चालविली. आपल्या व्यापारावर संकट येणार म्हणून अरब व्यापाऱ्यांनी झामोरिनचे कान भरविले. वास्कोला थोडीशी चुणूक दाखवूनच कालिकत सोडावे लागले. अंजदीव बेटावर त्याने पेद्रो रोवले व तो आफ्रिकेकडे निघाला. वादळांमुळे त्याला आफ्रिकेचा पूर्व किनारा गाठण्यास तीन महिने लागले. या अवधीत स्कर्व्ही रोगाने जहाजांवर बरेच बळी घेतले होते. मालिंदी बंदरामध्ये राफेल बोट कमी करून ते पुढे निघाले. मोझँबीकमध्ये ते फेब्रुवारीत पोहोचले. तेथे शेवटचा पेद्रो रोवला. किनाऱ्याने जात त्यांनी केप ऑफ गुड होपला वळसा घातला, परंतु वादळाने दोन्ही जहाजे वेगळी पडली. वाटेत अझोर्समध्ये वास्कोचा भाऊ मरण पावला म्हणून थोडे दिवस थांबून तो ९ सप्टेंबर १४९९ च्या सुमारास लिस्बनला पोहोचला. त्याचे दुसरे जहाजही त्याच दिवशी पोर्तुगीज किनाऱ्यावर लागले. त्यावेळेस पोर्तुगालमध्ये पहिला मॅन्युएल गादीवर आला होता. त्याने वास्कोचा मोठा सत्कार करून त्याला रोख रक्कम, तहहयात निवृत्तिवेतन व इनामी जमिनी दिल्या. मॅन्युएलने १५०० मध्ये पेद्रो काब्राल याला तेरा जहाजे देऊन हिंदुस्थानला पाठविले.

काब्राल हा राजघराण्याशी नाते असणारा व राजाचा मंत्री होता, लिस्बनहून निघाल्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या प्रवाहात सापडून त्याने ब्राझील गाठले. ब्राझीलचा शोध लावणारा हा पहिलाच असावा. परंतु पिंथॉन नावाच्या स्पॅनिश खलाशाने त्याच वर्षी ब्राझीलचे समन्वेषण करून राज्य मिळविले होते. काब्राल तेथून लगेच निघाला व पूर्वेकडे वळून त्याने मोझँबीक गाठले. वाटेत त्याची सहा जहाजे खलास झाली. मोझँबीकची नीट माहिती गोळा करून तो कालिकतकडे रवाना झाला. कालिकतजवळ त्याने एक वखार उघडून चाळीस लोकांना तेथे ठेवले आणि तो पोर्तुगालला परतला. काब्रालची पाठ वळताच वखारीतील लोकांची कत्तल उडविली गेली. ही बातमी पोर्तुगालला पोहोचताच राजाने वास्कोला ॲडमिरल ही पदवी देऊन आणि इतर अनेक सवलती देऊन या प्रकाराचा सूड घेण्याची आज्ञा दिली. वास्को सरळ कालिकतला गेला. त्याच्याविरुद्ध पाठविण्यात आलेल्या जहाजांच्या काफिल्याचा त्याने धुव्वा उडविला. कालिकतवर तोफांचा भडिमार केला व दक्षिणेला कोचीन बंदरावर जाऊन मुक्काम केला. तेथील राजाबरोबर व्यापारी तह करून तो १५०३ मध्ये लिस्बनला परतला. पुढील वीस वर्षे त्याने इव्हरा या आलेंतेझू प्रांताच्या राजधानीत आरामात घालविली. मध्यंतरी हिंदुस्थानातील पोर्तुगीज वसाहतीत गोंधळ माजल्यामुळे पुन्हा १५२४ मध्ये वास्कोला व्हाइसरॉय म्हणून तेथे पाठविण्यात आले. हिंदुस्थानात पोहोचल्याबरोबर वास्कोने पोर्तुगीजांची घडी पूर्ववत बसवून दिली परंतु लवकरच कोचीन येथे तो मृत्यू पावला.

शाह, र. रू.