ताँता : ईजिप्तच्या गारबिया प्रांताची राजधानी व अरबी विद्येचे आणि यात्रेचे प्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या २,५९,१०० (१९७१ अंदाज). हे कैरोच्या उत्तर वायव्येस सु. ८२ किमी. नाईलच्या त्रिभुज प्रदेशात बसले आहे. हे कापूस व धान्य यांच्या समृद्ध प्रदेशात असून येथे कापूस पिंजणे, सरकीचे तेल काढणे, लोकरीचा धागा काढणे, धान्य दळणे, तंबाखूचे पदार्थ  व शेवया करणे इ. उद्योग आहेत. हे कैरो–अलेक्झांड्रिया महामार्गावर असून लोहमार्गांचेही केंद्र आहे. तेराव्या शतकातील मुस्लिम  संत अहमद अल्–बदवी यांची कबर व मशीद येथे असून त्याला जोडून इस्लामी शाळा व अल् अहमदी अरबी महाविद्यालय (सध्याची ताँता) इन्स्टिट्यूट आहे.

लिमये, दि. ह.