गाबाँ : आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील गणतंत्र. क्षेत्रफळ २,६७,६७५  चौ. किमी. लोकसंख्या ४,७५,००० ( १९७० ). २ उ.ते  ३ द. व ९ पू. ते १४ पू. यादरम्यान वसलेल्या या देशाच्या उत्तरेस रीओमुनी (विषुववृत्तीय गिनी) व कॅमेरून, पूर्वेस व दक्षिणेस काँगो ( ब्रॅझाव्हिल) आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. किनारा सु. ८०० किमी. आहे. लीब्रव्हिल ही राजधानी आहे.

भूवर्णन : किनारी मैदानी प्रदेश दक्षिणेस ३० किमी. पासून उत्तरेस २०० किमी. पर्यंत रुंद होत जातो. त्याच्या पूर्वेस सु. ९६ किमी. रुंदीचा व १८० ते ६१० मी. उंचीचा उत्तट प्रदेश असून बाकीचा भाग डोंगराळ आहे. ईबूंजी हे १,५७४ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर ओगोवे व एन्‌ गून्या या नद्यांदरम्यानच्या शायू पर्वतात आहे. ओगोवे ही मुख्य नदी ८०० किमी. लांब असून एन्‌ गून्या व ईव्हींदो या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्या सर्व अंतर्भागात सु. २५०–३०० किमी. पर्यंत नौकासुलभ आहेत. लोपेझ भूशिरापर्यंतचा दक्षिण किनारा बेंग्वेला प्रवाहामुळे बनलेले वाळूचे दांडे व खारकच्छ यांनी युक्त आहे. उत्तरेकडील किनाऱ्यावर खाड्या व उपसागर तयार झाले आहेत. त्यांत गाबाँ नदीची खाडी रुंद व प्रमुख आहे. ओगोवेच्या मुखाकडील भागात काही सरोवरे आहेत.

देशाच्या जवळजवळ मध्यातून विषुववृत्त गेले असल्याने येथे विषुववृत्तीय उष्ण व दमट हवामान आहे.तपमान नेहमी २६ से.च्या आसपास असते. ऋतूंचा फरक जाणवत नाही. जून ते सप्टेंबर हवा फार दमट असते परंतु यावेळी पाऊस फारसा पडत नाही. तथापि वार्षिक पाऊस सु. २५० ते ३७५ सेंमी. पडतो. किनाऱ्याजवळ दक्षिणेकडून येणारा बेंग्वेला थंड प्रवाह आणि उत्तरेकडील उष्ण गिनी प्रवाह एकत्र येतात त्यामुळे पाऊस वाढतो. किनाऱ्याजवळ थंड प्रवाहामुळे तापमान थोडे कमी होते.

बहुतेक सर्व प्रदेश दाट वर्षावनांनी युक्त आहे. त्यांची वाढ जलद होते व ती सतत हिरवीगार असतात. त्यांच्या ३,००० जाती आढळल्या आहेत.ओकूमे किंवा गाबाँ मॉहॉगनी हा कठीण लाकडाचा वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. किनाऱ्याजवळ खारकच्छ वनस्पती व केवड्याची बने असून सरोवरांच्या भागात उंच पपायरस गवताने विस्तीर्ण प्रदेश व्यापला आहे.

अनेकविध प्राण्यांत हत्ती, हिप्पोपोटॅमस, रानरेडे, काळवीट, अनेक प्रकारचे हरिण व माकडे असून विशेष म्हणजे गोरिला हा कपी आढळतो. पॉल बी. द्यू शायू या समन्वेषकाने येथे गोरिला प्रथम पाहिला.

इतिहास : या देशात अश्मयुगीन उपकरणे सापडली आहेत. तेव्हापासून अनेक आफ्रिकी जमातींनी येथे वस्ती केली आहे. पोर्तुगीजांना १४७० मध्ये ह्या देशाचा शोध लागला. पहिल्या संशोधकांना कोमो खाडीचा प्रदेश टोपड्यासह बाह्यांच्या कोटासारखा भासला, म्हणून त्यांनी त्यास ‘गाबाँ’ असे नाव दिले. त्यानंतर ह्या प्रदेशातील बंदरांचा उपयोग गुलामांच्या व्यापाराची केंद्रे म्हणून मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. नंतर इंग्रज, डच, फ्रेंच हे लोकही येथे येऊ लागले.

गुलामांच्या व्यापारास बंदी झाल्यावर १८३९ मध्ये फ्रेंच लोकांनी ह्या प्रदेशात आपला ताबा बसविला व किनाऱ्यापासून आतला प्रदेशही हळूहळू व्यापला. फ्रेंचांनी आपल्या काँगोच्या राज्यात ह्या भागाचा समावेश केला. परतु १९१० मध्ये स्वतंत्र फ्रेंच वसाहत म्हणून हा भाग अलग करण्यात आला. त्यानंतर फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेच्या इतरप्रदेशांप्रमाणे गाबाँ हा त्याचा भाग झाला. १८४९ मध्ये गुलामगिरी रद्द करण्यात आल्यावर लीब्रव्हिल येथे आरमारी व व्यापारी ठाणे निर्माण झाले. गुलामांच्या मुक्ततेमुळेच ह्या शहरास लीब्रव्हिल असे नाव पडले.

१९५८ मध्ये फ्रेंच राष्ट्रकुलांतर्गत संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता ह्या प्रदेशास प्राप्त झाली व १९ फेब्रुवारी १९५९ मध्ये गाबाँची स्वतंत्र राज्यघटनाही अंमलात आली. पुढे १७ ऑगस्ट १९६० रोजी ह्या प्रदेशाने संपूर्ण स्वातंत्र्य जाहीर केले परंतु तो फ्रेंच राष्ट्रकुलातून बाहेर पडला नाही. आर्थिक व तांत्रिक मदतीसाठी त्याने फ्रान्सशी स्वतंत्र करार करून त्या देशाशी आपले संबंध कायम ठेवले.

राजकीय स्थिती : पूर्वीच्या फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिकेतील चॅड,काँगो व मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकांबरोबर जकात, तांत्रिक ज्ञान व आर्थिक बाबी, दळणवळण इ. व्यवहारांसाठी गाबाँने करार केले आहेत. सप्टेंबर १९६० मध्ये गाबाँला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश मिळाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांशी संबंधित बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्वही त्याला मिळाले आहे. फेब्रुवारी १९५९ मध्ये गाबाँने आपले संविधान तयार केले. ते १९६० आणि १९६१ मध्ये दुरुस्त करण्यात आले. त्याच्या प्रस्तावनेतच मानवी हक्कांची घोषणा करण्यात आली असून, प्रत्येक नागरिकांस व्यक्तिस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य व शिक्षणस्वातंत्र्य यांची हमी देण्यात आली आहे. सार्वभौम सत्ता जनतेच्या हाती असून, आपल्या प्रतिनिधींमार्फत अगर सार्वमताच्या मार्गाने जनता आपला अधिकार वापरू शकते. सरळ, सार्वत्रिक व गुप्त मतदान पद्धतींचा स्वीकार करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्षाची निवडणूक सरळ मतदानाने सात वर्षांकरिता करण्यात येते. राष्ट्राध्यक्ष ह्या नात्याने तो संपूर्ण शासनाचा प्रमुख असतो व संरक्षक दलांचाही तो मुख्य असतो. आपल्या मंत्र्यांच्या अगर विधिमंडळातील नेत्यांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष कोणताही प्रश्न सार्वमताला टाकू शकतो. १९६७ मध्ये उपाध्यक्षांच्या निवडणुकीची तरतूद करण्यात आली. मंत्र्यांची नेमणूक राष्ट्राध्यक्षच करतो व ते त्यालाच जबाबदार असतात. याशिवाय संविधानाने मान्य केलेल्या न्यायमंडळ, आर्थिक व सामाजिक मंडळ आणि लवादमंडळ यांच्याही नेमणुका राष्ट्राध्यक्ष करतो. राष्ट्रीय विधिमंडळात ४७ सभासद असतात आणि त्यांची निवडणूक सार्वत्रिक, प्रौढ, गुप्त मतदान पद्धतीने सात वर्षांच्या मुदतीसाठी होते. ही सभा बरखास्त करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षास आहे. परंतु २० ते ४० दिवसांत नवीन निवडणुका घ्याव्या लागतात. राष्ट्रीय विधिमंडळाने पाठविलेला कोणताही कायद्याचा मसुदा फेरवाचनासाठी राष्ट्रीय विधिमंडळाकडे पाठविण्याचा राष्ट्राध्यक्षाला अधिकार आहे. अशा प्रसंगी /3 बहुमताने त्याला संमती मिळावी लागते.

१९६० च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांपैकी कोणासच बहुमत न मिळाल्यामुळे १९६१ मध्ये दोघांनीही एकच उमेदवार यादी मान्य केली. तिला ९९% मते मिळाली. डेमोक्रॅटिक पक्षाचा लीआँ म्बा हा अध्यक्ष आणि दुसऱ्या पक्षाचा प्रमुख औबामे परराष्ट्रमंत्री झाला. १९६३ साली औबामेच्या पक्षाने अधिकारपदे सोडली. १९६४ च्या निवडणुकांच्या वेळी लष्करी रक्तहीन क्रांती झाली. परंतु फ्रेंच सरकारने लक्ष घालून लोकांनी निवडलेले सरकार पुन्हा प्रस्थापित केले. लीआँ म्बा पुन्हा अध्यक्ष झाला. १९६७ मध्ये लीआँ म्बा अध्यक्ष व बाँगो उपाध्यक्ष म्हणून निवडून आले. त्याच वर्षी लीआँ म्बा मरण पावला आणि बाँगो अध्यक्ष झाला.१९६८ पासून त्याचा डेमोक्रॅटिक पक्ष हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे. गाबाँचे ९ शासकीय विभाग व त्यांचे २८ जिल्हे आहेत ३ कारभार केंद्रे आहेत. काही ठिकाणी टोळी-प्रमुखांकडे थोडी सत्ता आहे परंतु ती कमी कमी होत आहे. लीब्रव्हिल व पॉर झाँती येथे निवडलेल्या महापौरांच्या अधिकाराखालील नगरपालिका आहेत.ओयेम, बीटाम, म्वेला व लांबारेने येथील नगरपालिका निवडलेल्या व नेमलेल्या सभासदांच्या आहेत.

न्यायदानासाठी देशात एक सर्वोच्च न्यायालय आहे. त्याखेरीज एक संसदीय न्यायालय आहे. त्याचे सभासद राष्ट्रीय सभेतून निवडले जातात व त्यांना राष्ट्राध्यक्ष व इतर मंत्र्यांची चौकशी करण्याचा अधिकार आहे. वरिष्ठ न्यायालय, अपील न्यायालये, खालची न्यायालये इ. आहेतच.

संरक्षणाच्या दृष्टीने कार्यक्षम अशी संरक्षक दले उभारण्याचा प्रयत्‍नचालू आहे. त्याखेरीज फ्रान्सबरोबर लष्करी मदतीसाठी करारही अस्तित्वात आहे. ९०० सैनिकांचे सेनादल आणि ५० सैनिकांचे हवाईदल आहे.

आर्थिक स्थिती : गाबाँमध्ये नैसर्गिक संपत्ती विपुल असल्याने व्यापारात निर्यात मालाचे प्रमाण आयातीपेक्षा पुष्कळ अधिक असते.स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत गाबाँची अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी त्याच्या वनसंपत्तीवरच अवलंबून असे. परंतु अलीकडे खनिजसंपत्तीही मोठ्या प्रमाणावर मिळू लागली आहे. अशुद्ध तेल उत्पादनात गाबाँचा आफ्रिकेत पाचवा क्रमांक अlहे. दक्षिणेकडील म्वांदाजवळील मँगॅनीजक्षेत्र जगातील समृद्ध मँगॅनीज साठ्यांपैकी एक समजले जाते. ईशान्य भागातील मेकांबोजवळ लोखंडसाठा असून सोने व युरेनियमाचा साठाही मौल्यवान आहे. लोखंड, मँगॅनीज, युरेनियम, खनिज तेल, पोटॅश इ. खनिजांच्या उत्पादनाबरोबरच विषुववृत्तीय फ्रेंच आफ्रिकेतील सर्व राज्यांना उपयुक्त होईल, एवढा मोठा तेलशुद्धीकरण कारखाना पॉर झाँती येथे सुरू करण्यात येणार आहे. तथापि अजूनही ओकूमे व इतर इमारती लाकडाच्या निर्यातीस महत्त्वाचे स्थान आहे. शेती उत्पादनात ७५% कामकरी गुंतलेले असून कॉफी, कोको व तांदूळ ही पिके प्रमुख आहेत. त्यांखेरीज मका, केळी, कसावा, तारो, रताळी व सुरण यांचेही मोठे उत्पन्न येते. मात्र बरीच शेती निर्वाहापुरती आहे. निर्यातीसाठी शेतीची वाढ केली जात आहे. नदीकाठी व लहान तळ्यांतून मच्छीमारीचा धंदाही चालतो. गाबाँमध्ये त्से त्से माशीचा उपद्रव असल्यामुळे पशुधन म्हणण्यासारखे नाही.


नद्यांवर जलविद्युत्‌ निर्माण होऊ शकेल परंतु दाट अरण्यांमुळे धरणांच्या जागेपर्यंत पोहोचणे दुर्घट असते. एम् बेई नदीवर पहिले धरण होईल व १६,९०० किवॉ. वीज निर्माण होईल. सध्या किनारी भागात औष्णिक वीजकेंद्रे आहेत. १९६८ मध्ये ७४१ लक्ष किवॉ. ता. वीज निर्माण झाली. नैसर्गिक वायूचे उत्पादन १९६८ मध्ये २·४ कोटी घ.मी. झाले. गाबाँमध्ये उद्योगधंदे फारसे नाहीत. पॉर झाँती येथे प्लायवुडचा मोठT कारखाना आहे. देशात लाकूड कापण्याच्या १७ गिरण्या व इतर लाकूडकामाचे ४ कारखाने आहेत. कॉफी प्रक्रियेचे सात व ताड तेलाचे चार छोटे कारखाने असून तांदूळ सडण्याचा, दारू गाळण्याचा, पाव भाजण्याचा व बर्फाचा प्रत्येकी एक लहान कारखाना आहे. १९६६–७o च्या योजनेत कागद, सेल्युलोज, फळ्या कापणे, तेल गाळणे, कत्तलखाना, शीतगृह, कापडावरील छापीलकाम, किंग्वेले येथे जलविद्युत्‌ प्रकल्प, ओवेंदो बंदराची वाढ, रस्ते इत्यादींचा अंतर्भाव होता. गाबाँमध्ये बँका आणि विमाकंपन्या मुख्यत: फ्रेंच आहेत. इतर देशांच्या थोड्या आहेत. विकासासाठी गाबाँमध्ये अनेक बँका कार्य करीत आहेत. फ्रँक सी. एफ्‌. ए. हे चलनाचे प्रमाणभूत नाणे आहे व तेच चलन काँगो (ब्रॅझाव्हिल), चॅड व मध्य आफ्रिका प्रजासत्ताक ह्या राज्यांतही प्रचलित आहे. १ अमेरिकी डॉलर = २७७·७१ फ्रँक सी. एफ्‌‌‌‌. ए. असा विनिमय दर आहे. १९७१ च्या अर्थसंकल्पात खर्चासाठी १,६७o कोटी सी. एफ्‌. ए. फ्रँक व विकासखर्च ७८० कोटी  फ्रँक धरण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय व्यापारात १९६७ मध्ये आयात सु. १,६६० कोटी फ्रँक किंमतीची झाली. त्यात मुख्यत्वे यंत्रसामग्री, वाहने, काही विशिष्ट धातू आणि सर्वसाधारण संसारोपयोगी वस्तू ह्यांचा समावेश होता. निर्यात व्यापाराची किंमत ह्याच काळात २,९७o कोटी फ्रँक होती. ह्यात मँगॅनीज, अशुद्ध लोखंड, इमारती लाकूड, अशुद्ध तेल वगैरे बाबींची प्रामुख्याने समावेश होता. फ्रान्स, अमेरिका, प. जर्मनी यांच्याशी मुख्यत: व्यापार होतो.

दळणवळणाच्या साधनांच्या बाबतीत हा प्रदेश मागासलेला आहे. देशात लोहमार्ग नाहीत. म्वांदा येथील मँगॅनीज खनिज ७६ किमी. केबलगाडीने एम्‌. बिंडा येथे येते व तेथून काँगोमधील प्वँतन्वार ह्या बंदराला लोहमार्गाने जाते. बेलिंगा-ओवेंदो लोहमार्ग संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने पुरा होत आहे. रस्त्यांच्या बाबतीतही गाबाँ अगदीच अप्रगत होता परंतु दुसऱ्या महायुद्धात व नंतर ह्या क्षेत्रात पुष्कळ प्रगती झाली. १९३६ मध्ये फक्त ९६ किमी. लांबीचे रस्ते अस्तित्वात होते. आज १,९१८ किमी. राष्ट्रीयमार्ग, २,८७१ किमी. विभागीय रस्ते व १,५०० किमी. कच्चे रस्ते आहेत. तथापि अजूनही समुद्रकिनाऱ्यालगतच्या कित्येक गावांना होड्यांतूनच जावे लागते.

लोहमार्गाचा अभाव आणि घनदाट जंगले यांमुळे विमानवाहतुकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. लीब्रव्हिलला जेट विमाने उतरू शकतील असा मोठा विमानतळ आहे. त्याखेरीज पॉर झाँतीला मोठा विमानतळ असून लहान लहान विमानतळ अनेक ठिकाणी आहेत.

लीब्रव्हिल आणि पॉर झाँती ही प्रमुख बंदरे आहेत. लीब्रव्हिल येथे नभोवाणीचे केंद्र असून, फ्रेंच व इतर प्रादेशिक भाषांतून ध्वनिक्षेपण होत असते. १९६३ पासून दूरचित्रवाणीचीही सोय करण्यात आली आहे. १९६९ मध्ये ४,३०० दूरध्वनी आणि १९७१ मध्ये १,२०,००० रेडिओ संच व ६,००० दूरचित्रवाणी संच होते.

लोक व समाजजीवन : गाबाँच्या लोकसंख्येत सध्या दरसाल १% वाढ होत असली, तरी गेल्या ८० वर्षांत अनेक रोगांमुळे लोकसांख्या कमीच झालेली आढळते. सरासरी लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स २·३ असून ८०% लोक ग्रामीण भागात राहतात. गाबाँमध्ये सु. ४० जमाती राहतात. येथील मूळचे लोक पिग्मी पण सध्या सगळ्यात मोठी जमात म्हणजे फांग (पाहुइन). हे सरळ केसाचे, गरुड नाकी लोक एकोणिसाव्या शतकात उत्तरेकडून आले. हे सु. १,८०,००० असून त्यांखालोखाल शिरा (एकिरा) हे ९६,००० आहेत. यांशिवाय अदौमा (सु. ६५,०००), ओकांदे (सु. २८.०००), सेके,बाकेले,एम्‌ बेडे इ. जमाती आहेत. सु. ८,५०० यूरोपीय येथे आहेत.लोकवस्तीपैकी सु.५०% वस्ती खिश्चन आहे व त्यातही रोमन कॅथलिक पंथाचे प्रमाण मोठे आहे. ३,५०० मुस्लिम आहेत. उरलेल्यांपैकी बहुतेक सर्व जडप्राणवादी आहेत.

समाजोन्नतीच्या योजना गाबाँमध्ये अस्तित्वात नाहीत. परंतु अलीकडे वृद्ध, अपंग लोकांना शक्य ती मदत देण्यासाठी आठ समाजकल्याण केंद्र स्थापण्यात आली आहेत. कुटुंबभत्ता, घरासाठी कर्ज यांची सोय करण्यात येत आहे. जगप्रसिद्ध मानवतावादी डॉ. श्वाइत्सर याने १९१३ मध्ये पश्चिम गाबाँमधील लांबारेने येथे आपले केंद्र उघडले. त्याच्या रुग्णालयाखेरीज १९६७ मध्ये ५ आधुनिक रुग्णालये, २७ विभागीय वैद्यकीय केंद्रे, ५८ दवाखाने, २३ प्रसूतिपूर्व दवाखाने, निद्रानाश उपचाराची ३ केंद्रे, क्षयरोगासाठी व महारोगासाठी प्रत्येकी ४ केंद्रे आणि ९ फिरते दवाखाने होते. रुग्णालयांतून एकूण ४,७८८ खाटांची सोय होती. ८० डॉक्टर, ३८ सुइणी, १७५ परिचारिका, २ दंतवैद्य होते.

फ्रेंच भाषेला संविधानाने राष्ट्रभाषा ठरविली आहे. तथापि बांटू जातीच्या अनेक लोकभाषा प्रचलित आहेत. लीब्रव्हिलमध्ये निरनिराळ्या प्रकारची सु. १० नियतकालिके प्रसिद्ध होत असतात. प्रौढ साक्षरता फारच कमी प्रमाणात आहे. परंतु शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्‍न जोराने चालू आहे. १९६७ मध्ये प्राथमिक शाळांत ८५,६२८ विद्यार्थी २,१५४ शिक्षकांच्या हाताखाली शिकत होते. माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संख्या अनुक्रमे ७,२७८ व ४५४ होती. धंदेशिक्षणाच्या शाळांत १,५३९ विद्यार्थी आणि १४० शिक्षक होते. शिक्षक-प्रशिक्षण विद्यालयात १३६ विद्यार्थी आणि १७ शिक्षक होते. सरकारने शिक्षण आपल्या ताब्यात घेतले आहे पण काही  मिशनरी शाळाही आहेत. शाळेत जाण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सु. ९५% विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. उच्च शिक्षणाची सोय अद्यापि झालेली नाही. १९६८ मध्ये ६४७ प्राथमिक, ३३ माध्यमिक, २२  तांत्रिक व २ शिक्षक-प्रशिक्षण शाळा होत्या. सक्तीच्या शिक्षणाचे वय १६ आहे. १९६७ मध्ये ८०० गाबाँ विद्यार्थी परदेशांत शिकत होते.

महत्त्वाची स्थळे : डॉ. आलबेअर श्वाइत्सर ह्यांचे कार्य पाहण्याकरिता येथे दरवर्षी अनेक प्रवासी येतात. दाट जंगलांत अनेक हिंस्त्र प्राणी असल्याने शिकारी लोकांना त्याचे मोठे आकर्षण आहे. मासेमारीचीही उत्तम सोय आहे. लीब्रव्हिल (लोकसंख्या १,०५ ,०८o०), पॉर झाँती (लोकसंख्या ४८,१९०) ही  महत्त्वाची शहरे असून लांबारेने, फ्रान्सव्हिल, म्वांदा, चिबांगा, ओयेम, ओवेंदो ही  ७,००० वर लोकवस्ती असलेली इतर टुमदार शहरे आहेत.                                                             

कुमठेकर, ज. ब.


ओगोवे नदीवरील आरोग्यधामासाठी प्रसिद्ध असलेले लांबारेने गावगाबाँची वनसंपत्ती