भरती – ओहोटी : चंद्र व सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणांमांमुळे पृथ्वीवरील महासागरासाऱख्या मोठ्या जलसंचयांतील पाण्याच्या पातळीत आवर्ती (ठराविक कालांतराने पुनःपुन्हा होणारे) चढउतार होतात, यांस भरती-ओहोटी असे म्हणतात. सर्व पृथ्वीचा विचार करता रोज दोन भरत्या होतात. एक चंद्रासमोर येणाऱ्या पृथ्वीच्या भागावर व दुसरी चंद्राच्या विरुद्ध बाजूस असलेल्या पृथ्वीच्या भागावर. भरतीमागून ओहोटी व तीनंतर पुन्हा भरती येण्याचे चक्र असून त्याचा आवर्तन काल सामान्यपणे २४ ता. ५० मि. या चांद्र दिवसाच्या कालवधीशी निगडित आहे. जलसंचयाच्या विस्ताराच्या मानानुसार गुरुत्वाकर्षणाच्या परिणामात फरक आढळतो. त्यामुळे तळयासारख्या जलसंचयाच्या पातळीत होणारे फरक अगदीच अल्प असतात. गुरुत्वाकर्षणाचे परिणाम पाण्याप्रमाणे पृथ्वीच्या घनपृष्ठावर (शिलावरणावर) व त्यावरील वातावरणावरही होतात.

पृथ्वीच्या बहुतेक भागांत दिवसाकाठी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी १२ ता. २५ मि.नी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीतही घडत असतो. प्रत्येक दिवसाच्या भरतीच्या मानात म्हणजे फुगवट्याच्या उंचीत फरक पडत असतात. अमावस्येला किंवा पौर्णिमेला येणारी भरती ही शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील अष्टमीला येणाऱ्या भरतीपेक्षा मोठी असते. समुद्राच्या खोलीनुसारही निरनिऱाळ्या ठिकाणच्या भरत्यांत स्थानिक भेद आढळतात. भरतीचे साधारण तीन प्रकार आहेत : अर्ध-दैनिक, दैनिक व संमिश्र, अर्ध-दैनिक प्रकारात दररोज दोनदा भरती व दोनदा ओहोटी येते आणि दोन्ही भरत्या किंवा ओहोट्या साधारणमानाने सारख्याच उंचीच्या असतात. दैनिक प्रकारात दररोज एक भरती व एक ओहोटी असते. (उदा., फ्लॉरिडाचा पेन्साकोला भाग) संमिश्र प्रकारात अर्ध-दैनिक व दैनिक हे दोन्ही प्रकार महत्त्वाचे असून दोन भरत्यांची उंची काही दिवस वगळता साऱखी नसते. अटलांटिक महासागरवरील भरती सर्वसाधारणपणे अर्ध-दैनिक व पॅसिफिक महासागरातील भरती संमिश्र प्रकारची असते.

भरतीच्या वेळची पाण्याच्या पातळीची उंची व ओहोटीच्या वेळची पातळीची उंची यांतील फरकास ‘भरतीची अभिसीमा’ असे म्हणतात. अमावस्या व पौर्णिमा यावेळी अभिसीमा कमाल असून त्यानंतर ती कमीकमी होत जाऊन अष्टमीला किमान होते. साधारणपणे चंद्रोदयाच्या सुमारास भरतीला सुरुवात होऊन सु. ६ तासांनंतर भरती अंतिम मर्यादा गाठते. या मर्यादेस ‘समा’ असे म्हणतात. समा अवस्था १०-१२ मिनिटे टिकते. ओहोटीच्या वेळेच्या किमान मर्यादेस ‘निखार’ म्हणतात. सागराची सरासरीची पातळी व पूर्ण भरतीच्या वेळेची पातळी यांतील फरकाला भरतीची ‘उंची’ किंवा ‘चढ’ म्हणतात. भरतीची कमाल पातळी ज्या त्वरेने वाढते, त्याच त्वरेने ओहोटीच्या वेळची किमान पातळी सामान्यपणे उतरत नाही.

                      जगातील प्रमुख ठिकाणांवरील भरतीचा कालावधी, माध्य अभिसीमा व उधानाची अभिसीमा. 

ठिकाण 

भरतीचा कालावधी 

माध्य 

अभिसीमा 

मीटर 

उधानाची 

अभिसीमा 

मीटर 

 

तास 

मिनीटे 

   

१ 

२ 

 

३ 

४ 

मॉरिस जेसप भूशिर (ग्रीनलंड) 

१० 

४९ 

०.१२ 

०.१८ 

रेक्याव्हीक (आइसलँड) 

४ 

५० 

२.७७ 

३.६६ 

कॉक्सोआक नदी (हडसन सामुद्रधुनी) 

८ 

५६ 

७.६५ 

१०.१८ 

सेंट जॉन्स (न्यू फाउंडलंड) 

७ 

१२ 

०.७६ 

१.०४ 

वर्न्टकोट हेड (फंडीचा उपसागर) 

० 

९ 

१२.०१ 

१३.५० 

पोर्टलँड (ऑरेगन) 

११ 

१० 

२.७१ 

३.११ 

बॉस्टन (मॅसॅचूसेट्‌स) 

११ 

१६ 

२.८९ 

३.३५ 

न्यूयॉर्क 

८ 

१५ 

१.३४ 

१.६१ 

बॉल्टिमोर (मेरीलंड) 

६ 

२९ 

०.३३ 

०.३९ 

मिआमी पुळण (फ्लॉरिडा) 

७ 

३७ 

०.७६ 

०.९१ 

गॅल्व्हस्टन (टेक्सस) 

५ 

७ 

०.३० 

०.४२* 

माराका बेट (ब्राझील) 

६ 

० 

६.९८ 

९.१४ 

रीओ दे जानेरो (ब्राझील) 

२ 

२३ 

०.७६ 

१.०६ 

कायाओ (पेरु) 

५ 

३६ 

०.५५ 

०.७३ 

बॅल्बोआ (पनामा कालवा विभाग) 

३ 

५ 

३.८४ 

४.९९ 

सॅन फ्रॅन्सिस्को (गोल्डन गेट, कॅलिफोर्निया) 

११ 

४० 

१.१९ 

१.७४* 

सिॲटल (वॉशिंग्टन) 

४ 

२९ 

२.३२ 

३.४४* 

ननाइमो (ब्रिटीस कोलंबिया) 

५ 

० 

— 

३.४१* 

सित्का (अलास्का) 

० 

७ 

२.३५ 

३.०२* 

सनराइज, कुक उपखाडी (अलास्काचे आखात) 

६ 

१५

९.२३

१०.१५

होनोलूलू (हवाई बेटे)

४१

०.३६

०.५८*

पपीटी (ताहिती बेटे)

०.२४

०.३३

डार्विन (ऑस्ट्रेलिया)

४.३९

६.१९

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

१०

०.५२

०.५८

रंगून (ब्रह्मदेश)

२६

३.९०

४.९७

झांझिबार (आफ्रिका)

२८

२.४७

३.६३

केपटाऊन (द. आफ्रिका प्रजासत्ताक)

५५

०.९७

१.३१

जिब्राल्टर

२७

०.७०

०.९४

ग्रांव्हील (फ्रान्स)

४५

८.६८

१२.२५

लीथ (स्कॉटलंड)

३.७२

४.९१

लंडनब्रिज (टेम्स नदी)

१८

५.६७

६.५५

डोव्हर (इंग्लंड)

११

४.४२

५.६७

ॲव्हनमाउथ (सेव्हर्न नदी, इंग्लंड)

३९

९.४८

१२.३१

रॅम्झी (आइल ऑफ मॅन)

१०

५५

५.२४

७.१६

ऑस्लो (नॉर्वे)

२६

०.३०

०.३३

हँबर्ग (प. जर्मनी)

४०

२.२२

२.३८

मुंबई

२.५५

३.६६

मार्मागोवा

१.२१

१.६९

मद्रास

०.७१

१.०१

कलकत्ता

३.१५

४.२१

विशाखापटनम्‌

०.९१

१.४३

* दैनंदिन अभिसीमा

सूर्यामुळे येणारी भरती अधिक मोठी असणारी स्थाने जगात फारच थोडी आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावरील ॲडिलेड बंदर हे त्यांपैकी एक आहे. तेथे एका भरतीनंतर दुसरी भरती सु. १२ तासांनी येते.

भरती-ओहोटी या एकापोठोपाठ घडणाऱ्या घटना असून त्या चंद्र, सूर्य इत्यादिकांची स्थाने, पाण्याची खोली, तापमान, घनता व वातावरणातील क्षोभ यांवर प्रामुख्याने अवलंबून असतात. त्यामुळे पाण्याची उच्च पातळी व नीच पातळी होणे या क्रिया भरती-ओहोटीशी संबंधित असल्या, तरी समकालीन म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या घटना नाहीत.


भरतीजन्य सागरी प्रवाह : सागरावर ऊर्ध्व (उभ्या) दिशेत होणाऱ्या पाण्याच्या पातळीतील फरकाबरोबर क्षैतिज (क्षितिज समांतर) पातळीत पाण्याचे स्थलांतर होत असते. समुद्र-किनाऱ्यावर हे सहज दृष्टोत्पत्तीस येते. जेव्हा प्रवाह समुद्रावरुन किनाऱ्याकडे असतो, तेव्हा त्यास भरती व किनाऱ्याकडून सागराकडे असतो, तेव्हा त्यास ओहोटी असे म्हणतात. भरतीमुळे निर्माण होणारे प्रवाह आणि तापमान किंवा घनतेच्या भिन्नतेमुळे निर्माण होणारे सागरी प्रवाह हे वेगवेगळे असून भरतीजन्य प्रवाह आवर्ती आहेत. महासागरावर किनाऱ्यापासून दूरच्या क्षेत्रावर निर्माण होणारे सागरी प्रवाह भरती-ओहोटीच्या एका आवर्तन काळात आपली दिशा बदलत ३६० अंशांमधून फिरतात यांना ‘फिरते प्रवाह’ असे म्हणतात. सर्वसाधारण त्यांची दिशा उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेत बदलत असते.

भरती-ओहोटीचे स्पष्टीकरण : भरती-ओहोटी घडविण्यास सूर्यसुद्धा कारणीभूत असला, तरी चंद्र हाच जास्त प्रभावी ठरतो. भरती कशी निर्माण होते हे पाहताना पृथ्वीचा संपूर्ण गोल पाण्याने आच्छादलेला असून त्याची खोली सर्वत्र सारखी आहे व पाण्यावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम लगेच घडतो सूर्य-चंद्रांची आकर्षणे एकाच वेळी कार्यरत असली, तरी प्रत्येकाचा परिणाम वेगवेगळा घडतो, असे मानणे सोयीचे ठरते.

न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार पृथ्वीच्या प्रत्येक कणावर चंद्राचा परिणाम होऊन तो कण चंद्रमध्यकडे ओढला जातो. या सिद्धांताप्रमाणे विश्वातील प्रत्येक वस्तुकण दुसऱ्या वस्तुकणास आपणाकडे खेचीत असतो व याची प्रेरणा वस्तुकणांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या सम प्रमाणात व त्यांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. ही प्रेरणा अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलत असल्यामुळे दोन्ही वस्तूंमधील अंतर व त्यांची वस्तुमाने यांमध्ये आकर्षणावर परिणाम करण्यास ‘अंतर’ अधिक कारणीभूत होते. यामुळे सूर्याची पृथ्वीवरील गुरुत्वकर्षणाची ओढ ही चंद्राच्या पृथ्वीवरील ओढीच्या १८० पट अधिक असूनही भरती निर्माण करण्याची चंद्राची क्षमता सूर्याच्या क्षमतेच्या २.१७ पट अधिक आहे.

चंद्राच्या समोर येणारा पृथ्वीचा पृष्ठभाग पृथ्वीमध्यापासून सु. ६,४०० किमी. दूर असतो, पण या भागाचे चंद्रमध्यापासूनचे अंतर वरील अंतराच्या ६० पट अधिक असते, याखेरीज पृथ्वीचे वस्तुमानही चांद्र वस्तुमानाच्या ८९ पट अधिक आहे. याचा विचार करता असे दिसते की, चंद्राच्या समोर येणाऱ्यास पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे आकर्षण चंद्राच्या आकर्षणाच्या सु. ३,००,००० पट अधिक प्रभावी आहे. तेव्हा त्या जागी असलेले पाणी चंद्राच्या आकर्षणाने वर (चंद्रमध्याकडे) उचलले जाऊन भरती येते असे समजणे बरोबर नाही. इतके पाणी पृथ्वीपासून वर उचलून धरण्याची क्षमता चंद्राच्या आकर्षणात नाही. शिवाय भरती ही चंद्र त्या स्थानाच्या मध्यान्हवृत्तावर असताना होते, असे सर्वसाधारणपणे आढळत नाही.

भूमिसरपट दिशेत पाण्याला प्रेरणा दिल्यास पाणी स्थलातंर करु शकते व प्रवाह निर्माण होतो. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी चंद्राचे तेवढेच आकर्षण असते, तर भरती-ओहोटी हे आविष्कार दिसलेच नसते पण चंद्रासमोरील पृथ्वीच्या पृष्ठभागावर चंद्राची जी ओढ असते, तीपेक्षा कमी ओढ चंद्राच्या विरुद्ध बाजूच्या पृथ्वीवरील पृष्ठभागावर असते. चंद्राच्या आकर्षणाचे मान व दिशा या पृथ्वीवरील भिन्न जागी वेगवेगळ्या आहेत व त्यांतील अल्प फरक भरती निर्माण करण्यास कारणीभूत होतो. गुरुत्वाकर्षाने निर्माण होणाऱ्या प्रवेगाचा विचार करुन भरतीचा खुलासा करता येतो. चंद्रमध्यापासून दोन वस्तू भिन्न अंतरांवर असतील, तर त्यांवर निर्माण होणारे प्रवेगही भिन्न असतात व परिणामी त्या वस्तूंमध्ये सापेक्ष हालचाल घडते. कमी अंतरावर असलेली वस्तु चंद्रमध्याकडे अधिक अंशाने ओढली जाते. त्यामुळे चंद्रासमोर असलेल्या पाण्यावर पृथ्वीपेक्षा अधिक प्रवेग निर्माण होतो व चंद्राच्या विरुद्ध बाजूस असलेल्या पाण्याच्या सापेक्ष पृथ्वीवर अधिक प्रवेग निर्माण होतो. अशा तऱ्हेने प्रवेगांमध्ये निर्माण होणाऱ्या फरकामुळे चंद्रासमोरील पाणी चंद्राकडे पृथ्वीपेक्षा अधिक ओढले जाते व तेथे पाण्याला फुगवटा येतो व विरुद्ध बाजूच्या पाण्यापेक्षा पृथ्वी ही चंद्राकडे अधिक ओढली जाऊन त्या जागी पृथ्वीसापेक्ष पाण्यास फुगवटा आलेला दिसतो. प्रत्येक ठिकाणी चंद्रमध्याच्या दिशेने असणाऱ्या प्रवेगांतील फरकांचे विभाजन करुन त्यांचे दोन घटक काढता येतात : एक भूपृष्ठाला लंब व दुसरा भूपृष्ठाला समांतर दिशेत. भूपृष्ठाला समांतर दिशेतील घटकामुळे पाण्याचे स्थलांतर होते. चारी दिशांनी वाहत येणाऱ्या पाण्यामुळे चंद्रासमोरील पाण्यास फुगवटा येतो  यामुळेच भरतीच्या स्थानापासून ९० अंशांवर दोन्ही बाजूंस ओहोटी येते.


पृथ्वीवर दोन प्रेरणा कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या एकत्र परिणामुळे भरती-ओहोटीचे स्पष्टीकरण दुसऱ्या प्रकारे देता येते. पृथ्वी व चंद्र यांच्या ⇨ गुरुत्वमध्याभोवती पृथ्वी फिरत असताना उत्पन्न होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा (मध्यापासून दूर ढकलणारी प्रेरणा) ही पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखी असून तिची दिशा चंद्राच्या विरुद्ध दिशेस असते. चंद्राचे पृथ्वीमध्यावर जेवढे आकर्षण असते, तेवढीच केंद्रोत्सारी प्रेरणा पृथ्वीमध्यावर विरुद्ध दिशेस कार्यन्वित असते.

आ. १ मध्ये अ व आ हे अनुक्रमे पृथ्वी व चंद्र यांचे मध्य असून त्या जागी त्यांची वस्तुमाने केंद्रित आहेत. चंद्राभिमुख पृथ्वीच्या गोलार्धावरील छ बिंदूचे छ आ हे अंतर अ आ यापेक्षा कमी असल्यामुळे तेथील गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्यापाशी असणाऱ्या गरुत्वाकर्षाणापेक्षा व केंद्रोत्सारी प्रेरणेपेक्षा अधिक असेल. म्हणून केंद्रोत्सारी प्रेरणा व गुरुत्वाकर्षण या दोन सदिशांच्या (दिशा व मूल्य हे दोन्ही असणाऱ्या राशींच्या) बेरजेने छ या जागी छ छा ही परिणामी प्रेरणा छ आ या दिशेत असते. चंद्राच्या विरुद्ध असणाऱ्या पृथ्वीगोलार्धावरील ज या बिंदूचे चंद्रापासूनचे आ ज हे अंतर आ अ या अंतराहून अधिक असते, त्यामुळे तेथील गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्यावर असलेल्या गरुत्वाकर्षणापेक्षा व त्यामुळे केंद्रोत्सारी प्रेरणेपेक्षा कमी भरते आणि केंद्रोत्सारी प्रेऱणा व गुरुत्वाकर्षण या दोन सदिंशाच्या बेरजेने मिळणारी ज जा ही परिणामी प्रेरणा आ ज या दिशेत असते. पृथ्वीच्या त्रिज्येच्या मानाने अ आ हे अंतर ६० पट मोठे असल्यामुळे क आणि ख या बिंदूपाशी परिणामी प्रेरणा पृथ्वीमध्याच्या दिशेत असते. छ छा व ज जा या परिणामी प्रेरणा भरती-निर्मितीचे कार्य करतात. त्यांचे विभाजन करुन भूपृष्ठाला लंब व भूपृष्ठ पातळीत असे दोन दोन घटक काढल्यास भूपृष्ठ पातळीतील निरनिराळ्या स्थानांचे घटक चंद्राभिमुख व चंद्राच्या विरुद्ध बाजूचे अनुक्रमे फ व प बिंदूकडे पाण्याचे स्थलांतर करुन भरती आणतात. तिचे सर्वाधिक मूल्य १,२,३ व ४ या स्थानी असते व त्यामुळे क व ख येथील पाणी प व फ या बिंदुंकडे घेण्याची क्रिया घडते. प व फ बिंदू विषुववृत्तावर आहेत असे मानल्यास ९० अंशावर असणाऱ्या रेखाववृत्ताकडे ओहोटी येते व दोन्ही ध्रुवाकडील समुद्रातील पाणी विषुववृत्ताकडे जाण्याचा प्रयत्न करते. आकृतीतील छायांकित भागावर पूर्ण भरतीच्या वेळी पाण्याच्या पातळीची उंची सरासरी पातळीपेक्षा अधिक असते. अशा तऱ्हेने भरती-ओहोटीमुळे पृथ्वीला बृहदक्षीय गोलाभाचा (दीर्घवर्तुळ त्याच्या मोठ्या अक्षाभोवती फिरविल्यास मिळणाऱ्या पृष्ठभागाचा) आकार येतो. गणिताने असे दाखविता येते की, भरती निर्माण करणारी प्रेरणा ही आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या सम प्रमाणात व त्यांच्या मध्यांतील अंतराच्या घनाच्या व्यस्त प्रमाणात असते. चंद्राच्या समोरच्या पृष्ठभागावरील भरती ही विरुद्ध बाजूस येणाऱ्या भरतीच्या सु. पाच टक्क्यांनी मोठी असते. सूर्यांच्या आकर्षणामुळे होणाऱ्या भरतीचा विचार याच पद्धतीने करता येतो.

भरतीची असमानता : एखाद्या विवक्षित ठिकाणच्या भरतीचे स्वरुप स्पष्ट कळण्यासाठी भरतीशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांची गुंतागुंत लक्षात घ्यावी लागते. भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणांची दिशा व मूल्ये यांत अनेक प्रकारे बदल पडत जात असल्यामुळे सकाळच्या व सायंकाळच्या भरतींत फरक होतात व एकच भरती निरनिराळ्या बंदरांत भिन्न रुपे दाखविते.

आ. १ भरती घडविणाऱ्या परिणामी प्रेरणा व त्यांचे घटक

 अर्ध दैनिक परिणाम : चंद्रामुळे त्याच्या समोरील भागावर मोठी व विरुद्ध बाजूस काही अंशी कमी भरती येत असल्यामुळे, विवक्षित स्थानावर दिवसाकाठी दोन भरती व दोन वेळा ओहोटी येते. एखादे विवक्षित बंदर चंद्रासमोर येण्यास रोज ५० मि. उशीर होत जात असल्यामुळे  दररोज घडणारी मोठी भरती (किंवा ओहोटी) ५० मिनिटांनी उशिरा येते.

अर्ध मासिक परिणाम : याचा आवर्त काळ सु. १४/ दिवसांचा असून ज्यावेळी सूर्य, चंद्र व पृथ्वी एका सरळ रेषेत येतात, त्यावेळी हा परिणाम दिसतो. (चंद्राची सूर्यसापेक्ष एक पूर्ण फेरी होण्यास २९/ दिवस लागतात). यावेळी म्हणजे पौर्णिमेस व अमावास्येस चंद्र व सूर्य यांची आकर्षणे एकाच रेषेत येतात व चंद्राच्या आकर्षणाने येणाऱ्या भरतीच्या जागी सूर्याच्या आकर्षणामुळे घडणारी भरती येऊन इतर दिवसांहून फार मोठी भरती होते, हिला ‘उधानाची भरती’ म्हणतात.

शुक्र व कृष्ण अष्टमीला सूर्य व चंद्राच्या आकर्षणाच्या दिशा एकमेकीला काटकोन करीत असल्यामुळे सूर्य व चंद्राच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणाचे परिणाम एकमेकांविरुद्ध होतात. ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती असेल, तेथे सूर्यामुळे ओहोटी असते व भरतीची उंची केवळ चंद्राने होणाऱ्या भरतीच्या उंचीपेक्षा कमी असते, हिला ‘भांगाची भरती’ म्हणतात. न्यूयॉर्क व सॅन फ्रॅन्सिस्को या बंदरांत व मेक्सिकोच्या आखातात उधानाची भरती भांगाच्या भरतीपेक्षा ४० टक्क्यांनी मोठी असते.

आ. २. उधानांची व भांगाची भरती. (अ) उधानाचा भरतीच्या वेळी पृथ्वी, सूर्य व चंद्र एका सरळ रेषेत असतात, (आ) भांगाच्या भरतीच्या वेळी चंद्र, सूर्य यांच्या दिशा पृथ्वीपाशी काटकोनात असतात.

चंद्रांतर परिणाम : याचा आवर्त काळ सु. २७/ दिवसांचा असतो. पृथ्वीभोवती चंद्र विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) कक्षेत फिरत असताना कक्षेवरील उपभू बिंदूत तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो व अपभू बिंदूत पृथ्वीपासून सर्वांत जास्त दूर जातो. चंद्र उपभू बिंदूत असताना येणाऱ्या भरतीची उंची अपभू बिंदूत असताना येणाऱ्या भरतीच्या उंचीच्या ४० टक्के अधिक असते. 

दैनिक परिणाम : चंद्राच्या बदलत्या क्रांतीमुळे [⟶ क्रांति – १] हा परिणाम घडतो. चंद्र जेव्हा खगोलीय विषुववृत्तावर येतो, त्यावेळी घडणाऱ्या दोन्ही भरत्या बहुतांशी समान उंचीच्या असतात. चंद्राची क्रांती जसजशी उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे वाढत जाते, त्यानुसार दिवसात घडणाऱ्या दोन भरत्या (किंवा ओहोट्या) असमान उंचीच्या होत जातात. चंद्राची क्रांती जास्तीत जास्त होते त्या वेळच्या भरतीत ‘उष्ण कटिबंधीय भरती’ असे म्हणतात. कारण यावेळी चंद्र पृथ्वीच्या कर्क किंवा मकर वृत्ताच्या आसपासच्या प्रदेशावर असतो. यावेळी चंद्रासमोरची भरती उत्तर गोलार्धात झाल्यास विरुद्ध बाजूची भरती दक्षिण गोलार्धात असते.


अर्ध-वार्षिक परिणाम : पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना सूर्याच्या क्रांतीमध्ये होणारा बदल हा परिणाम घडवीत असतो. याचा आवर्त काळ ६ महिन्यांचा आहे. वर्षातून दोन वेळा सूर्य खगोलीय विपुववृत्ताच्या जवळपास असतो. याच सुमारास चंद्रही खगोलीय विपुववृत्तावर येत असेल, तर सूर्य-चंद्रांची क्रांती शून्य अंशाच्या आसपास असते. अशा वेळी त्यांच्या एकत्रित परिणामामुळे विषुववृत्तजवळील सागरावर मोठी भरती येते. याच वेळी पौर्णिमा किंवा अमावास्या असल्यास जी अधिक मोठी भरती येते, तिला ‘संपाती उधानाची भरती’ असे म्हणतात. चंद्र कक्षेच्या बृहदक्षाच्या एका प्रदक्षिणेस सु. १९ वर्षे लागत असल्यामुळे काही भरत्यांचा आवर्त काळ १९ वर्षाचा आहे.

सूर्यांतर परिणाम : याचा आर्वत काळ एक वर्षाचा आहे. जानेवारीच्या आरंभी पृथ्वी व सूर्य यांमधील अंतर सर्वात कमी असते. याच सुमारास चंद्र उपभू बिंदूत आल्यास सूर्य व चंद्र यांच्या अधिकतम गुरुत्वाकर्षणामुळे मोठ्या भरत्या येतात. याउलट परिस्थिती जुलैच्या आरंभी सूर्य व पृथ्वी यांमधील अंतर जास्तीत जास्त असताना होते. या सुमारास चंद्र अपभू बिंदूत आल्यास होणाऱ्या भरत्या किमान उंचीच्या असतात.

समुद्रावर दिसणारी भरती चंद्र-सूर्याच्या संयुक्त परिणामामुळे झालेली असते. चंद्र-सूर्याचा परिणाम ७ : ३ या प्रमाणात आहे. त्यामुळे काही वेळा मोठी भरती चंद्र मध्यान्हवृत्तावर येण्यापूर्वीच येते, तर काही वेळा भरती नंतर येते. अमावास्येनंतर शुल्क अष्टमीपर्यत सूर्य चंद्राच्या पश्चिमेस असताना येणारी मोठी भरती चंद्र त्या स्थानाच्या मध्यान्हवृत्तावर येण्यापूर्वी होते. अशीच स्थिती पौर्णिमेनंतर कृष्ण अष्टमीपर्यत असते. शुल्क अष्टमीपासून पौर्णिमेपर्यत व कृष्ण अष्टमीपासून अमावास्थेपर्यत मोठी भरती चंद्र मध्यान्हवृत्तावर येऊन गेल्यावर येते. समुद्र तळावर पाण्याचे घर्षण होत असते. यामुळे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे परिभ्रमण करीत असताना चंद्रासमोर आलेली भरती थोडी पूर्वेकडे नेली जाते. म्हणून बऱ्याच वेळा चंद्र मध्यान्हवृत्तावरून गेल्यानंतर काही वेळाने भरती पूर्ण आलेली दिसते. या दोन घटनांमधील कालावधी भिन्न बंदरांत भिन्न असला, तरी विवक्षित बंदरात नेहमी तोच रहातो.

भरती मापनाची उपकरणे : भरती-ओहोटीच्या पूर्वानुमानासाठी व नवीन बंदराची निवड करताना त्या स्थानी येणाऱ्या भरतीचे वेध अनेक दिवस घेणे आवश्यक असते. समुद्रातील खडकावर उभा केलेला रेखांकित खांब हे भरती मोजण्याचे एक साधे उपकरण बऱ्याच ठिकाणी वापरले जाते. यामध्ये खांबावरील सेंटिमीटरचे रेखांकन करताना त्यावरील आरंभाची शुन्यदर्शक रेषा नीचतम ओहोटीच्या वेळी असणाऱ्या पाण्याच्या पातळीखाली येईल, याची काळजी घेतलेली असते. या खांबाच्या साहाय्याने भरती-ओहोटीच्या वेळी पाण्याच्या पातळीची बदलणारी उंची खांबावरील रेषांवरून मोजता येते.

समुद्राचा खळबळाट किंवा एकसारख्या येणाऱ्या लाटा यांमुळे वरील उपकरण काही ठिकाणी वापरता येत नाही. अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या दुसऱ्या पद्धतीत समुद्रकाठी एक अरूंद पण खोल विहीर केलेली असते. तिचा तळ जास्तीत जास्त ओहोटीच्या वेळच्या पातळीच्या खाली असतो. एक लांब नळी विहीरीच्या तळापासून समुद्रात नेलेली असते. समुद्रातील नळीच्या टोकावर छिद्रं ठेवलेली असतात. या नळीवाटे समुद्र व विहीर यांमध्ये पाण्याची ये-जा चालू रहाते. विहीरीतील पाण्यावर एक धातूचा पोकळ गोल बुचासारखा तरंगत ठेवलेला असतो. भरती येऊन समुद्रातील पाण्याची पातळी वाढली की, समुद्रातील नळीच्या टोकाजवळील पाण्यात दाब वाढून नळीवाटे पाणी विहीरीत येते. विहीरीतील पाण्याची पातळी वाढते व तरंगणारा गोल वर उचलला जातो. या गोलाच्या बदलत्या स्थानावरून भरतीचे मापन होते. हीच मूलभूत कल्पना वापरून पाण्याच्या पातळीचे अभिलेखन करू शकणारी सुधारित उपकरणे बनविलेली आहेत. अलीकडे समुद्राच्या तळाशी दाबप्रचलित (दाबाच्या प्रेरणेवर कार्य करणारी) उपकरणे ठेवूनही भरती-ओहोटीमुळे होणाऱ्या पाण्याच्या दाबातील चढ-उतार मोजतात.

जगामध्ये भरती-ओहोटीची नोंद करण्यासाठी बसविलेल्या उपकरणांची संख्या, पृथ्वीचा एकंदर विस्तार पाहता अपुरी आहे. जी उपकरणे कार्यान्वित आहेत, ती बंदरांच्या किंवा नद्यांच्या मुखापाशी असून त्यांनी घेतलेल्या नोंदींचा उपयोग त्या नद्यांवरील किंवा बंदरांवरील भरतीच्या पूर्वानुमानासाठी केला जातो. मोठ्या सागरावरील भरती-ओहोटीची तुटपुंजी माहिती एकत्र करून व बेटांजवळील भरती-ओहोटीच्या नोंदीचा उपयोग करून समभरती कालरेषा (एकाच वेळी ज्या ठिकाणी भरती येते ती ठिकाणे जोडणाऱ्या रेषा) व सम-अभिसीमा रेषा (भरती व ओहोटी यांतील मर्यादांनतर समान असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा) दर्शविणारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. याचप्रमाणे भरती-ओहोटीसंबंधीच्या दुसऱ्याही काही प्रमुख घटकांचे नकाशे तयार केलेले आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या ‘किनारी आणि भूगणितीय सर्वेक्षण कार्यालया’ कडून दरवर्षी जगाच्या सर्व बंदरांतील भरतीचे मान दाखविणारी कोष्टके प्रसिद्ध होतात. १९६०-७० या दशकाच्या मध्याच्या सुमारास खोल महासागरावरील भरतीमापनाचा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आखण्यात आला होता.

भरती-ओहोटीचे पूर्वानुमान : भरती-ओहोटीच्या पूर्वानुमानाची माहिती जलपर्यटकांना, नौकानयन व मच्छीमारी व्यावसायिकांना त्याचप्रमाणे किनाऱ्यावरील अभियांत्रिकीच्या कामाच्या संयोजनासाठी फार उपयुक्त असते. यासाठी दोन पद्धती वापरतात. एका पद्धतीत प्रत्यक्ष घेतलेल्या वेधांचा उपयोग केलेला असतो. त्याच्या जोडीला बंदराची रचना, चंद्राचे दररोजचे ⇨ भोगांश, त्या ठिकाणी चंद्र मध्यान्हवृत्तावर येण्याची वेळ, चंद्राची कला, चंद्र-सूर्याची क्रांती, अंतरे व ⇨ पराशय इ. भरतीवर परिणाम करणाऱ्या मूलभूत घटकांचा विचार करून गणिताने येणाऱ्या भरतीची वेळ व उंची काढतात. भरती-निर्मितीस कारणीभूत होणाऱ्या घटकांचे परस्परसंबंध हे स्थानभेदाप्रमाणे निरनिराळे पण एकाच स्थानी निश्चित स्वरूपाचे असतात व त्यांत बदल होत नाहीत.


दुसरी पद्धत विश्लेषणात्मक असून त्या पद्धतीत एका चांद्रमासातील भरतीच्या वेधांचा उपयोग केलेला असतो. भरती ही आवर्ती घटना असल्यामुळे तिच्या अभ्यासासाठी ⇨हरात्मक विश्लेषणाच्या गणितीय रीतीचा उपयोग करता येतो. प्रत्यक्ष नोंदलेली भरती ही भरतीवर परिणाम करणाऱ्या अनेक आवर्ती घटकांच्या भरत्यांच्या संयोगाने बनलेली आहे, असे मानले जाते. [⟶ गणितीय उपकरणे] पुढील कोणत्याही वेळी प्रत्येक घटकामुळे होणारी भरतीची स्थिती काढून, सर्वाच्या संयोगाने प्रत्यक्ष भरतीचे पूर्वानुमान करण्यात येते. भरतीचे गणित करणारे यंत्र लॉर्ड केल्व्हिन यांनी प्रथम इ. स. १८७२ मध्ये तयार केले. त्यानंतर अनेक वर्षे एकूण ३७ घटक विचारात घेऊन इष्ट गणितीय समीकरणे अशा प्रकारच्या यंत्राच्या मदतीने सोडवून वर्षभरातील भरतीचे काल व परमप्रसर (परमप्रसर म्हणजेच स्थिर स्थितीपासून होणारे कमाल स्थलांतर) काढण्यात येत होते. डेहेराडून येथील भारतीय महासर्वेक्षकांच्या कार्यालयातून भारतातील व परदेशांतील निवडक प्रमुख बंदरांतील भरती-ओहोटीचे प्रमाण व काळ यांच्या पूर्वानुमानाच्या कोष्टकांची पुस्तिका (भारतीय ज्वार-भाटा सारणी) प्रतिवर्षी प्रकाशित केली जाते.

इ. स. १९६० पासून भरतीचे वेध, विश्लेषण व पूर्वानुमान यांसाठी संगणकांची (गणकयंत्रांची) मदत घेण्यास सुरुवात झाली. यामुळे सु. ४०० घटकांचा विचार करून इष्ट समीकरणे किमान वेळेत सोडविणे शक्य होऊ लागले आहे, त्याचप्रमाणे विश्लेषणाच्या नवीन पद्धतींचा अवलंब करण्यात येऊ लागला आहे. पूर्वीच्या ⇨ फूर्ये श्रेढीऐवजी लघुतम वर्ग व प्रतिसाद पद्धती यांसारख्या नवीन गणितीय पद्धतींच्या अवलंब करून अधिक बरोबर पूर्वानुमाने मिळविण्यात येऊ लागली आहेत.

नद्यांतील भरत्या व प्रवाह : विस्तारित सागरावरील भरती सुमारे अर्धा ते एक मीटर उंचीची असते पण ती जसजशी नदीच्या आकुंचित मुखापाशी येते, तसतशी तिची उंची वाढत जाऊन नदीमध्ये मुखापासून उलट दिशेने भरतीजन्य प्रवाह निर्माण होतो. अमेरिकेतील हडसन नदीत मुखापासून सु. २०० किमी. आत भरतीचा परिणाम अनुभवास येतो. अशा वेळी जेव्हा अरूंद खाडी, नदीचे पात्र किंवा नाला या ठिकाणी पाणी घुसते, तेव्हा पाण्याची पातळी खूपच वर जाऊन पाणी एखाद्या भिंतीसारखे पुढे सरकते, यास ‘भरतीची लाट’ म्हणतात. जेथे नदीच्या प्रवाहाचा वेग व पात्रातील घर्षण लाटेला अधिक विरोध करतात, तेथे अशा तऱ्हेची लाटेची भिंत खूप आतपर्यत जाते. कॅनडातील फंडीच्या उपसागरात अशा तऱ्हेने येणाऱ्या लाटेची उंची १५ मीटरपर्यत असते, तर चीनमधील हांगजो उपसागरास मिळणाऱ्या चिनटँग नदीवर ३ मी. उंचीची लाट येते.

लाटेची पुढे जाण्याची गती ही पाण्याच्या खोलीच्या वर्गमुळाच्या प्रमाणात बदलते. त्यामुळे उथळ पाण्यात आल्यावर लाटेची गती मंदावते, यामुळे ओहोटीनंतर भरती पूर्ण येईपर्यंत वेळ कमी असतो. त्या मानाने भरतीनंतर ओहोटी पूर्ण होण्यास अधिक वेळ लागतो. काही ठिकाणी ओहोटीची प्रगती इतकी सावकाश होते की, पुढील भरती ओहोटीला ओलांडून पुढे जाते.

उलटसुलट धबधबा : नदीच्या पात्राची उंची एखाद्या ठिकाणी धबधबा निर्माण होण्याइतपत एकदम बदलत असेल व ती जागा एखाद्या खिंडीसारखी अरुंद असेल, तर तेथे हा आविष्कार पाहण्यास मिळतो. ज्या वेळी भरतीची लाट मुखाकडून तेथे पोहोचते, त्या वेळी लाटेच्या प्रभावाने पाणी त्या अरूंद मार्गाने वर चढून उंचीवरील पात्रात जाते, या वेळी खालून वर जाणारा उलटा धबधबा दिसतो. यास ‘भरतीजन्य उरफाटा धबधबा’ असे म्हणतात. कॅनडामध्ये न्यू ब्रन्झविक येथे सेंट जॉन नदीवर हे दृश्य पाहण्यास मिळते.

वारा व इतर प्रक्षोभांचा परिणाम : भरतीच्या उंचीवर वारे परिणाम करीत असतात. समुद्राकडून किनाऱ्याकडे वाहणारा वारा भरतीच्या वेळची पाण्याची उंची वाढविण्यास कारणीभूत होतो उलट दिशेत वाहणारा वारा पाण्याला किनाऱ्यापासून दूर लोटून पाण्याच्या पातळीची उंची कमी करतो.

याचप्रमाणे हवेच्या दाबातील वाढीमुळे मोठ्या जलसंचयातील पाण्याची पातळीची उंची कमी होते. दाब १३ मिलिबाराने वाढल्यास पाण्याच्या पातळी सु. ३२ सेंमी.नी खाली जाते. दाब कमी झाल्यास तशाच प्रकारे पाण्याची पातळी वर जाते. हवेचा दाब किमान झालेला असतानाच प्रभावी वारे निर्माण झाल्यास पाण्याची पातळी खूप उंच जाऊ शकते. ज्याला भरतीची प्रचंड लाट असे म्हटले जाते, तो काही सर्वस्वी आकर्षणाचा परिणाम नसतो व त्यामुळे तो आवर्तीही नसतो. अशा लाटा प्रभावी चक्रवातामुळे किंवा समुद्राच्या तळावर झालेल्या मोठ्या भुकंपामुळे निर्माण होतात. भुकंपामुळे उत्पन्न झालेल्या लाटेला ‘त्सुनामी’ असे म्हणतात. अशा लाटा निर्माण झाल्यावर त्या एकीमागून एक येतात व महासागराच्या पृष्ठावरून दर तासास ८०० किमी. वेगाने पुढे जातात व अधिक उतार असलेल्या किनाऱ्यातपर्यत गेल्यास त्यांची उंची खूप वाढून त्या पुष्कळ हानी करतात. मोठ्या जलसंचयावर प्रभावी वाऱ्यांमुळे किंवा त्या क्षेत्रावरील वातावरणीय दांबांतील फरकामुळे स्थायी स्वरुपाच्या लाटा तयार होतात, त्यांना ‘सेश’ असे म्हणतात. यांचा कालावधी अगदी थोडा म्हणजे काही मिनिटांपासून एक तासाच्या आसपास असतो.

भरती-ओहोटीचे फायदे : समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांनी भरती-ओहोटीपासून अनेक फायदे करुन घेतले आहेत. (१) भरतीच्या वेळी किनाऱ्यावरील, नदीमुखांजवळील किंवा खाड्यांतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे मोठ्या जहाजांना किनाऱ्याच्या अधिक जवळ व नदीकाठच्या काही ठिकाणी व खाडीत अधिक आतपर्यंत जाणे शक्य होते. (२) नदीमुखातून व खाड्यांना मुखातून ओहोटीच्या वेळी पाण्याची जोरदार हालचाल होत असल्यामुळे प्रदूषण निर्माण करणारे पदार्थ नैसर्गिक रीत्या सागरात सोडले जातात. त्याचप्रमाणे भरतीच्या वेळी किनाऱ्यावर येणारे पाणी अडवून त्यापासून मीठ उत्पादनासारखे उद्योग केले जातात. भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही. (३) भरती-ओहोटी यांच्या वेळी असणाऱ्या पातळ्यातील अंतर जास्त असेल, तर तेथे विद्युतनिर्मिती करता येते [⟶ जलविद्युत् केंद्र]. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कच्छ व खंबायतच्या आखातांत, त्याचप्रमाणे पूर्वेस गंगेच्या मुखांपाशी येणाऱ्या भरत्यांच्या अभिसीमा मोठ्या असतात. त्यामुळे या ठिकाणी लाटांपासून विद्युतनिर्मिती करणे शक्य आहे. भरती-ओहोटीमुळे काही तोटेही स्वीकारावे लागतात. भरतीचे पाणी किनाऱ्यावर जेथपर्यत दूर जाते, तितक्या जमिनीवर खाजण तयार होऊन जमीन वनस्पतीवाढीस निरुपयोगी होते. भरतीमुळे येणाऱ्या वाळूमुळे खाडयांची खोली कमी होते व मोठ्या भरतीमुळे किनाऱ्याची धूप व नासधूम होते.


घनपृष्ठीय व वातावरणीय भरती-ओहोटी : चंद्र-सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्याप्रमाणे सागराला भरती येते तशीच भरती पृथ्वीच्या घनपृष्ठ भाग (शिलावरण) व त्यावरील वातावरण यांनाही येते. भूमीचे कण पाण्याप्रमाणे स्तालांतर करु शकत नसल्यामुळे भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणेचा भूपृष्ठभागाला लंब दिशेत असणारा घटकच फक्त कार्यरत होतो. यामुळे कोरड्या भूमीला येणारा फुगवटा सु. २०-२५ सेंमी. पर्यंत उंचीचा असून सहजासहजी ध्यानात येत नाही. भूपृष्ठाला येणाऱ्या भरती-ओहोटीमुळे त्या ठिकाणाच्या गुरुत्वाकर्षणाच्या मूल्यात अल्पांशाने चढउतार होतात आणि अशा गुरुत्वाकर्षणातील आवर्ती बदलावरुन भूपृष्ठाच्या भरती-ओहोटीचा पुरावा मिळतो.

वातावरणाला येणारी भरती समुद्राच्या भरतीच्या मानाने अत्यल्पच असते, कारण हवेची घनता पाण्याच्या घनतेच्या केवळ /१००० आहे. वातावरणातील भरतीमुळे हवेचा दाब वाढतो व ओहोटीच्या वेळी दाब कमी होतो. दिवसा व रात्री हवेच्या तापमानात जे दैनिक बदल होतात, त्यामुळे सुद्धा हवेच्या दाबात चढउतार होत असतात. तापमानांतील बदलाचे दाबावर घडणारे परिणाम मोठ्या प्रमाणात असल्याने भरती-ओहोटीमुळे होणारे दाबातील अल्प चढउतार त्यामध्ये संपूर्ण झाकळले जातात. तापमानाच्या दैनिक चढउतारामुळे वातावरणाचा दाब दिवसांतून दोनदा कमीत कमी (पहाटे व दुपारी ४ वाजता) वा जास्तीत जास्त (रात्री व सकाळी १० वाजता) होतो. उष्ण कटिंबधात हवेच्या दाबाचा चढउतार सु. २ सेंमी. उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या दाबाइतका असतो. विषुववृत्तपासून जसजसे ध्रुवाकडे जावे, तसतसा हा दाबातील चढउतार कमी होत जातो. सूर्यापेक्षा चंद्राच्या परिणामामुळे येणारी भरती अधिक असते. परंतु यावेळी पडणारा दाबातील फरक हा पाऱ्याच्या .०६ मिमी. पेक्षाही कमी उंचीच्या पाऱ्याच्या स्तंभाच्या दाबाइतका अल्प असतो. त्यामुळे वातावरणातील भरती-ओहोटीचे होणारे परिणाम शोघणे कठीण होते. वातावरणाची चांद्र भरती, मध्यान्हवृत्तावरून गेल्याबरोबर म्हणजे चांद्र वेळेनुसार ० तास व १२ तास असताना घडते आणि चंद्र क्षितिजावर असतो तेव्हा, म्हणजे चांद्र वेळ ६ तास व १८ तास असताना ओहोटी येते.

भूचुंबकीय भरती-ओहोटी : उच्च वातावरणात आयनांचे (विद्युत भारित वायू अणु-रेणुंचे) स्तर आहेत. त्यामध्ये भरती-ओहोटी घडत असते व आयनांच्या स्तरांच्या हालचालींमुळे उच्च वातावरणात विद्युत प्रवाह सुरू होतात आणि यामुळे ‘भूचुंबकीय क्षेत्रात आवर्ती’ बदल झालेले आढळतात. या आविष्कारास भूचुंबकीय भरती-ओहोटी म्हणतात. चुंबकीय भरती-ओहोटीत चांद्र व सौर असे दोन वेगळे परिणाम स्पष्ट दिसून येतात. [⟶ भूचुंबकत्व].

पृथ्वीचा चंद्रावरील परिणाम : चंद्र व सूर्य पृथ्वीवर भरती घडवून आणतात, त्याप्रमाणे पृथ्वीच्या व सूर्याच्या गुरूत्वाकर्षाचे परिणाम चंद्रावरही घडत असतात. सूर्य पृथ्वीहून फारच मोठा असला, तरी खूप दूर आहे. पृथ्वी त्यामानाने चंद्राजवळ आहे. यामुळे सूर्याची चंद्रावर भरती निर्माण करणारी प्रेरणा पृथ्वीच्या चंद्रावर भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणेच्या फक्त १.५% आहे. चंद्रावर पाणी किंवा हवा नसल्यामुळे भरतीच्या संदर्भात घन षृष्ठभागाचाच विचार करावा लागतो. यात दोन प्रकारचे बदल भरतीशी संबंधीत आहेत. चंद्रावरील छोट्या क्षेत्रांच्या दृश्य स्वरूपात तात्पुरते बदल दिसतात, काही वेळा प्रकाशाचे झोत दिसतात, रंगच्छटांत बदल घडतात व काही क्षेत्रांवरील तपशील अंधुक होतात. हे बदल कधीही होताना आढळत असले, तरी चंद्र उपभू बिंदूत असताना ते अधिक वेळा दिसतात. चंद्र उपभू बिंदूत असताना भरतीस कारणीभूत असणाऱ्या प्रेरणेमुळे चंद्र भूमीत पृथ्वीवरील भूकंपासारखे कंप निर्माण होतात. चंद्र-कंपात भूमीला पडलेल्या भेगांतून बाहेर पडणारे वायू व धूळ तेजाच्या झोतास व क्षेत्रांचा अंधुकपणा आणण्यास कारणीभूत होतात.

घर्षणामुळे पृथ्वीवरील भरती चंद्राचे अक्षीय परिभ्रमण सावकाश करण्यास कारणीभूत होते. चंद्राची अक्षीय परिभ्रमण गती कमीकमी होत जाऊन सध्या चंद्राच्या अक्षीय परिभ्रमणाचा कालावधी अक्षीय परिभ्रमणाच्या कालावधीइतका झाला आहे. पृथ्वीवरही तसाच परिणाम अल्पांशाने होऊन दिवसाचा कालावधी १,२०,००० वर्षात सु. १ ते २ सेकंदांनी वाढला आहे [⟶ चंद्र].

रोश मर्यादा : भारी वस्तुमान असलेल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूच्या निरनिराळ्या बिंदूवर केलेल्या गुरुत्वाकर्षणातील फरकामुळे भरती व ओहोटी हा अविष्कार घडतो. भरती निर्माण करणारी परिणामी प्रेरणा साधारणपणे आकर्षित होणाऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावरील अंतर्गत गुरुत्वाकर्षणापेक्षा खूपच कमी असते. आकर्षित होणाऱ्या वस्तूची घनता व गुणधर्मानुसार त्या वस्तूत तात्पुरती किंवा कायम स्वरूपाची विकृती भरतीजन्य प्रेरणेने निर्माण होऊ शकते. आकर्षित होणीरी वस्तू घन नसल्यास ती भरतीच्या परिणामाने प्रेरणेच्या दिशेत ताणली जाऊन लांबट होते. भरती निर्माण करणारी प्रेरणा दुसऱ्या वस्तुचे अंतर्गत गुरुत्वाकर्षण व अंतर्गत रेणूंची संलग्नी प्रेरणा यांच्या एकत्रीत परिणामाहून अधिक झाल्यास त्या वस्तुचे विभाजन होते. जसजसे वस्तूंमधील अंतर कमी होत जाते, तसतसे भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणेचे मान झपाट्याने वाढत जाते. फ्रेंच शास्त्रज्ञ ई. ए. रोश यांनी १८४९ मध्ये असे दाखविले आहे की, दोन्ही वस्तूंची घनता सारखी असेल, तर ज्या वेळी दोन्ही वस्तूंमधील अंतर आकर्षण करणाऱ्या वस्तूच्या त्रिज्येच्या २.४४ पटीहून कमी असेल त्यावेळी आकर्षित होणारी वस्तु विरुद्ध दिशेत ताणली जाऊन त्या वस्तुचे तुकडे होण्याचा संभव उत्त्पन्न होतो. आकर्षण करणाऱ्या वस्तूची घनता दुसऱ्या वस्तुच्या घनतेहून अधिक असेल, तर वर सांगितलेली मर्यादा थोडी कमी होते.


सूर्यकुलातील व विश्वातील भरतीच्या घटना : चंद्र व पृथ्वी प्रमाणेच सूर्यकुलातील इतर ग्रहोपग्रह व विश्वातील तारकायुग्मे व तारकागुच्छ त्याचप्रमाणे दीर्घिकांचे समूह यांमध्येही भरती-ओहोटीचे आविष्कार घडत असतात.

सूर्यकुलातील ग्रहांच्या निर्मितीसंबंधीच्या एका उपपत्तीनुसार असे मानले जाते की, एक प्रचंड तारा सूर्याजवळून जात असताना ताऱ्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे वायुमय सूर्याच्या पृष्ठभागावर भरती आली आणि तीपासून पृथ्वी व इतर ग्रह यांचा जन्म झाला. मंगळाचे उपग्रह व शनीची कडी यांवरही भरतीसारखे परिणाम झालेले आढळतात.भरतीच्यायोगे निर्माण होणाऱ्या घर्षमामुळे मंगळाच्या दोन्ही उपग्रहांचे अक्षीय परिभ्रमण काळ व कक्षीय परीभ्रमण काळ एकसारखे होऊन दोन्ही उपग्रह आपली एकच बाजू मंगळाकडे रोखून मंगळाभोवती भ्रमण करीत आहेत. फोबस उपग्रह हा डायमॉस या दुसऱ्या उपग्रहापेक्षा मंगळाच्या जवळ असून त्याचे मंगळापासूनचे अंतर रोश मर्यादेपेक्षा थोडे अधिक आहे. त्यामुळे फोबस उपग्रहाच्या कक्षेत काही कारणाने क्षोभ निर्माण झाला व तो मंगळाच्या अधिक जवळ गेला, तर तो फुटून त्याचे तुकडे होण्याचा संभव आहे. मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे दोन्ही उपग्रह लांबट व खडबडीत झालेले असून त्यांची कक्षेच्या पातळीत असलेली बाजू अधिक लांब झाली आहे. शनीचे उपग्रह शनीपासून रोश मर्यादेहून अधिक अंतरावर आहेत, पण कडी मात्र रोश मर्यादेच्या आत आहेत. १८५९ मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी या अंतरावर अखंड कडी असूच शकणार नाहीत आणि ती असंख्य लहान तुकड्यांनी बनलेली असली पाहिजेत, असे सैद्धान्तिक आधाराने दाखविले. १८९५ मध्ये अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जेम्स कीलर यांनी प्रत्यक्ष वेधांनी कडी तुकड्यांच्या समुहांनी बनली असल्याचे सिद्ध केले. शनीच्या कड्यांतील तुकड्यांचे व्यास ४ सेंमी. पासून ३० सेंमी. पर्यंत असून ते बर्फाच्छादित दिसतात. भरतीसहृश परिणामांमुळे कड्यांचे आकार बदलतात. त्यांतील तुकडे क्वचित एकमेकांवर आदळून त्यांच्यापासून आणखी लहान तुकडे होण्याची क्रिया सतत चालू आहे.

तारे हे वायुमय असल्यामुळे तारकायुग्मे, तारकागुच्छ व दीर्घिका यांच्या बाबतीतही परस्परांच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरतीचे आविष्कार पाहण्यात येतात. तारकायुग्मातील जोडीदार गोल नसून भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणेमुळे अंड्यांच्या आकारासारखे लांबट गोल झाल्याचे दिसते. ताऱ्यांचा दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरण्याचा परिभ्रमण काळ जितका कमी, तितकी त्याच्या आकारातील विवृत्तता अधिक दिसते. त्याचप्रमाणे वायूंचे प्रवाह एका ताऱ्यापासून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत गेलेल दिसतात. तारकागुच्छातील तारे हे स्थिर नसून त्यांचे नित्य स्थानांतर चालू असते व ते परस्परांवर गुरुत्वाकर्षणाचे परिणाम घडवून आणतात. त्यामध्ये एखाद्या क्षणी टक्कर होऊन एखादा तारा समूहाबाहेर फेकला जाऊ शकतो. दीर्घिकेमधील परिभ्रमण भिन्नतेमुळे व भऱतीस कराणीभूत असलेल्या प्रेरणेच्या तारकागुच्छावरील परिणामामुळे तारकागुच्छाचा अंतर्भाग बाह्य भागापासून वेगळा पडतो व काळांतराने कमी वास्तुमानाचे तारे नामशेष होत जाऊन तारकागुच्छाचे विघटन होते.

संदर्भ :  1. Defaut, A. Physical Oceanography, Vol. 2, New York, 1961.

            2. Dietrich, G. General Oceanography. An Introduction, New York, 1963.

            3. Macmillan, D.H. Tides, New York, 1966.

नेने, थ. रा.